जज्जाची कोठी-१

      परीक्षा तोंडावर आली होती आणि सुनीलला कोणत्याही परिस्थितीत निवांत वेळ आणि निवांत जागा हवी होती. गलबला, गजबजाटापासून दूर कुठेतरी जाऊन त्याला एकाग्रतेने अभ्यास करायचा होता. जास्त कशासाठी प्रसिद्ध वगैरे नसलेलं आणि वर्दळ नसलेलं जवळपासचं एखादं छोटेखानी तालुक्याचं गावही चालून गेलं असतं. पण त्याला अशी जागा शोधायला मित्रांचे सल्ले वगैरे नको होते. जो कोणी जी काही जागा सुचवेल तिथे त्याच्या ओळखीचं कोणी न कोणी असणारच.

आणि त्याला कोणत्याही मित्राच्या मित्राचं किंवा मित्राच्या काका-मामा इ. च्या ओळखीचं आणि नंतर त्यांच्या प्रेमळ(??) हस्तक्षेपाचंही ओझं नको होतं..एखादी पूर्ण नवी जागा हवी, जिथे काहीच ओळखीपाळखी नकोत.

      थोडे कपडे,अत्यावश्यक वस्तू आणि जास्तीत जास्त पुस्तकं घेऊन तो निघाला आणि सरळ बसस्टँडवर कोणत्यातरी एका अनोळखी गावाचं नाव वाचून बसमध्ये जाऊन बसला. साधारण तीनेक तासात तो कवठदरीला पोहचला. गाव पाहिल्यावर त्याची आपल्या स्वतःच निवांत जागा शोधण्याच्या निर्णयाबद्दल खात्री पटली. गावात सामसूम होती. त्याने इकडेतिकडे चौकशी करून गावातल्या एकमेव खानावळीत मुक्काम ठोकला.  कवठदरीला महिन्यातून एकदा बाजार भरत होता. त्या दिवशी गाव गजबजलेलं असलं तरी इतर वेळी अगदी ओसाड असायचं. दुसऱ्या दिवशी सुनील आपल्याला पाहिजे तशा शांत (आणि अर्थात स्वस्त भाड्याच्या) घराच्या शोधात गावात फेरफटका मारायला निघाला. असंच दृष्टीस पडलेलं एक घर मात्र त्याला सर्वात जास्त पसंत पडलं. शांत, किंबहुना एकलकोंड्या घराच्या त्याच्या सर्व कल्पनांत ते अगदी चपखल बसत होतं. अगदीच जुनाट बांधणीचं, उतरत्या छपराचं आणि भोवताली उंच भिंतीचं कुंपण. एखादी वर्षानुवर्षं जुनी गढीच जणू. पण सुनीलला ते घर आवडलं. त्याला असं कळलं की ते घर रिकामंच आहे, आणि त्याला ऐकून हायसं वाटलं कारण हेच घर त्याला आवडलं होतं. त्याने पोस्टातून त्या घराचे व्यवहार पाहणाऱ्या एजंट जोशींचा पत्ता घेतला.

      जोशी बरेच वयस्कर होते. वकिलीबरोबरच ते घरांचे व्यवहारही पाहायचे. सुनीलने ते जुनं घर  भाड्याने घ्यायची इच्छा व्यक्त केल्यावर त्यांना अर्थातच आश्चर्य वाटलं.
"तुम्हाला खरं सांगतो, मी जर या घराचा मालक असतो तर आताच्या परिस्थितीत मी एखाद्याला हे घर एक वर्षं फुकटपण राहायला दिलं असतं, उद्देश इतकाच की निदान या घरात माणसं राहतात, राहू शकतात हे बघण्याची तरी इथल्या गावकऱ्यांना सवय व्हावी. बराच काळ हे घर रिकामं आहे आणि त्याबद्दल तर्‍हेतर्‍हेच्या वावड्या उठल्या आहेत. अर्थात तुमच्यासारखा अभ्यासू आणि हुशार माणूस या अफवांवर विश्वास ठेवणार नाहीच." या अफवा कोणत्या वगैरे तपशिलांच्या खोलात सुनील शिरत बसला नाही. त्याला वाटलं तर तो इतर शेजाऱ्या-पाजाऱ्यांना त्या अफवांबद्दल केव्हाही विचारू शकणार होता. त्याने जास्त पुढचा मागचा विचार न करता तीन महिन्यांचं आगाऊ भाडं भरून ती जागा ताब्यात घेतली, हमीदार म्हणून आता तो उतरला होता त्या खानावळवालीचं नाव घातलं आणि त्या घराच्या किल्ल्या खिशात घालून तो खानावळीवर परत आला. खानावळीची मालकीण (तिला सगळे "कावेरीमावशी" म्हणायचे) एक हसतमुख आणि प्रेमळ बाई होती. सुनीलने तिला सांगितलं की त्याला भाड्याचं घर मिळालं. तिथे राहताना आणखी काय काय जीवनावश्यक वस्तू, खरेदी वगैरे करावी लागेल याची चौकशी करत होता. पण घराचा ठावठिकाणा सांगितल्यावर ती उडालीच.
"म्हणजे? तू जज्जाच्या कोठीवर राहणार आहेस??" कावेरीमावशी पांढरीफटक पडली होती.
"जज्जाची कोठी? म्हणजे ते घर एखाद्या जज्जाचं आहे का?"

      कावेरीमावशी अजून धक्क्यातून बाहेर निघाली नव्हती. "नक्की.. नक्की जज्जाचीच कोठी ती...." ती पुटपुटत होती.
"पण मग त्यात इतकं दचकण्यासारखं काय आहे मावशी?"
"नको राहूस पोरा त्या घरात.. मला नक्की माहिती नाही, कारण मीपण या गावात जास्त वर्षं राहिलेली  नाहीय, असं ऐकलं होतं, खूप वर्षापूर्वी तिथे म्हणे एक जज्ज राहत होता. खूप क्रूर, जास्तीत जास्त कडक शिक्षा देण्यात आनंद मानणारा आणि फाशीची शिक्षा ठोठावण्याची आवड होती त्याला. इथल्या तुरुंगात त्याचा खूप दरारा होता म्हणे. गावकरी म्हणत असतात. तिथे काहीतरी आहे. मला अडाणी बापडीला विचारशील तर मला कोणी लाखभर रुपडे दिले तरी मी त्या घरात एक तासभरसुद्धा एकटी थांबायची नाही."
सुनील जरा चकीत झाला.
"माझ्या पोटच्या पोरासारखा तू. तुझ्यासारखं कोवळं पोर तिथे एकटं राहणार?त्या घरात?? मी तुझी आई असते तर तुला एक रात्रपण त्या घरात थांबू दिलं नसतं, मग भले मला एकटीला जाऊन तिथली घंटा बडवावी लागली तरी बेहत्तर!" कावेरीमावशीच्या आवाजात कळकळ होती. सुनील थोडा वैतागलाच होता पण तिच्या आवाजातली आपुलकी आणि माया त्याच्या मनाला जाऊन भिडली. तो गमतीने म्हणाला,
"अहो कावेरीमावशी, ज्याच्या डोळ्यापुढे गॉस थिओरम,झेड ट्रान्सफॉर्म, हीट इक्वेशन रात्रंदिवस भुतासारखे नाचतात त्याला त्या जज्जाकडची भुतं अजून काय वेगळा त्रास देणार?तुम्ही नका चिंता करू मावशी. तिथे जे "काहीतरी" आहे त्याला भेटायला मला वेळ नाही. ते मला काही करत नाही बघा."
कावेरीमावशींनी सुस्कारा सोडत लगेच सामानाची यादी बनवून खरेदी पण करून ठेवण्याचं आश्वासन दिलं आणि सुनील जोश्यांनी सांगितलेल्या मोलकरणीच्या शोधात खानावळीबाहेर पडला. गंगूबाईंना घेऊन तो खानावळीवर परत आला तेव्हा कावेरीमावशी बरीच पुडकी, भांडीकुंडी आणि एक गादीची गुंडाळी एका कोपऱ्यात नीट रचून त्याची वाटच पाहत होती. ते तिघे सामानासहित रिक्शाने जज्जाच्या कोठीवर पोहचले.

       कावेरीमावशींना "जज्जाची कोठी" आतून पाहण्याची उत्सुकता दिसत होती. पण तरी त्यांची भीती लपत नव्हती. अगदी कुठे खुट्ट झालं तरी त्या सुनीलचा हात घट्ट धरून ठेवत होत्या. घर एकट्याच्या मानाने प्रशस्त होतं पण सुनीलने आपला मुख्य मुक्काम माजघरातच ठेवायचं ठरवलं. ती ऐसपैस खोली एकट्याला राहायला पुरेशी होती. कावेरीमावशी आणि गंगूबाई आणलेलं सामान नीट मांडण्यात गुंतल्या होत्या. सुनीलला वाटलं की कावेरीमावशीने नीट विचार करून जुजबी खाण्यापिण्याचं आणि चहापाण्याचं काही दिवस पुरेल इतकं साहित्य व्यवस्थित आणून ठेवलं आहे. म्हणजे आता निदान त्याचा इथे जम बसून एखादी नवी खानावळ वगैरे शोधेपर्यंत तरी खाण्यापिण्याची ददात मिटली होती. जाताना कावेरीमावशी दारातून वळून म्हणाल्या,
"निघते रे. आणि खोली मोठी आहे. जर थंडीबिंडी वाजली तर सगळे पडदे नीट लावून घेऊनच झोप." नंतर अर्धवट स्वतःशी त्या म्हणाल्या, "खरंतर माझ्यावर कधी अशी या घरात कोणाच्यातरी नजरा सारख्या वरुनखालून न्याहाळत असताना एकटं झोपण्याची वेळ येती तर मी भीतीनं मेलेच असते.." विचाराने ती स्वतःच शहारली आणि पटकन बाहेर निघून गेली. गंगूबाईंनी नाक उडवलं. "म्या नाय घाबरत उंदरीघुशींना. जुनं घर म्हन्ल्यावर उंदरं घुशी नाय तर आणि काय अस्नार घरात?"
सुनील म्हणाला, "पण हे सगळ्यांना कळायला हवं ना! गंगूबाई तुम्ही इतरांपेक्षा खंबीर दिसता.तुमचा धीटपणा आपल्याला आवडला. पाहिजे तर तुम्ही मी गेल्यानंतर या घरी दोन महिने विनाभाड्याच्या राहू शकता.तसंपण तीन महिन्याचं भाडं दिलंय खरं , पण माझा अभ्यास एका महिन्यातच आवरतोय बहुतेक."
"थ्यांक्यू साहेब, पन मी कंदी माझं घर सोडून झोपत नाय दुसरीकडं.सवय नाय मला."
"बरं.. मलापण जितका जास्त एकांत मिळेल तितकं चांगलंच आहे अभ्यासाला."
गंगूबाई मशेरीने पिवळे झालेले दात दाखवत हसली.
"होय साहेब. तुम्हास्नी म्होप एकलेपन मिलतया हितं. टेन्सन नाय."

      गंगूबाईला साफसफाईवर सोडून सुनील बाहेर भटकायला गेला. तो परत आला तेव्हा गंगूबाई गेलेली होती. खोली व्यवस्थित आवरलेली होती, कंदील(घरात वीज नव्हती. पण घराच्या कमी भाड्यापुढे या काही गैरसोयी सुनीलच्या खिजगणतीत नव्हत्या.) पेटवून ठेवले होते आणि टेबलावर जेवणाची तयारी करून ठेवली होती. कावेरीमावशींच्या कृपेने त्या दिवशीचं जेवण तयार मिळालं होतंच. सुनीलला आता जरा या घराची घडी नीट बसल्यासारखं वाटलं. जेवण सावकाश करून त्याने खरकटी भांडी आवरून बाजूला ठेवून दिली आणि त्याच प्रशस्त टेबलावर तो अभ्यासाला बसला.

      अकरा वाजेपर्यंत त्याने पूर्ण मन लावून अभ्यास केला. मग तो पाय मोकळे करायला उठला. आपल्या नेहमीच्या रात्रीच्या सवयीने त्याने कोळशाच्या शेगडीवर अगदी कडक आणि कमी साखरेचा चहा बनवून घेतला. चहाचा कप हातात घेऊन तो आरामात गरम चहाचे घुटके घेत होता. कंदिलाच्या प्रकाशात वस्तूंच्या अस्पष्ट सावल्या भिंतींवर हालत होत्या. आता शांत बसल्यावर त्याला उंदरांचा आवाज प्रकर्षाने जाणवला. "मी अभ्यासाला बसलो होतो तेव्हा इतका गोंगाट होता?? मग मला ऐकू कसा आला नाही?" सुनील मनाशी म्हणाला. बरोबर. उंदीर तेव्हा नवीन माणसाची चाहूल लागून भेदरून गप्प बसलेले असणार. आणि आता जरा सरावल्यावर धीट होऊन त्यांनी नेहमीसारखा धुमाकूळ परत चालू केला असणार.. सुनील चहाचे घुटके घेत विचार करत होता. घरात आजूबाजूला आता त्याचं लक्ष गेलं. घर खरोखर प्रशस्त आणि एकेकाळी सुंदर असलं पाहिजे. सागवानी लाकडाचं फर्निचर, सजावटीत पण लाकडाचा मुक्तहस्ते वापर. अशा घराचा आतापर्यंत काहीच उपयोग न करता त्याला वाळीत टाकणारी माणसं मूर्खच म्हटली पाहिजेत. समोरच्या भिंतीवर काही जुनी उंच चित्रं होती. पण त्यांच्यावर धुळीचा इतका जाड राप बसला होता की तो एका दिवसात साफ होणं अशक्यच होतं. तरी तो उत्सुकतेने कंदील जवळ घेऊन चित्र बघत होता. मध्येच त्याला चित्राच्या कोपऱ्यात एक मोठा उंदीर दिसला आणि पटकन चित्रामागे लपला. एक गोष्ट मात्र विचित्र होती. छपरावर एक घंटा होती आणि त्याचा दोर म्हणून खोलीत एक जाड आणि दणकट दोरखंड लटकत होता. कोपऱ्यात एक मोठी लाकडी आरामखुर्ची होती. अगदी वस्तुसंग्रहालयात ठेवावी अशी कोरीवकाम वगैरे केलेली ती खुर्ची त्याला खूप आवडली. त्याने ती सरकवून भिंतीशी ठेवली आणि चहाचा कप बाजूला ठेवून तो परत टेबलाजवळ खुर्चीवर बसून अभ्यासाला लागला. काही तास पूर्णपणे तो सोडवत असलेल्या वेव्ह इक्वेशनच्या गणितात रंगून गेला होता. उंदरांचा गोंगाट चालूच होता. पण लवकरच त्याला त्या आवाजाची सवय झाली आणि एकाग्रता जमली.

      अचानक सुनीलने वर पाहिलं. वेव्ह इक्वेशन अजून सुटलं नव्हतंच. का दचकलो बरं आपण? हं, उंदरांचा आवाज अचानक पूर्ण थांबला होता. त्याचं समोर लक्ष गेलं आणि आजपर्यंत उंदराघुशींचा भरपूर अनुभव असूनपण तो दचकला. समोर आरामखुर्चीवर एक प्रचंड मोठा उंदीर होता आणि तो सुनीलकडे रोखून बघतोय असं त्याला वाटायला लागलं. सुनीलने हात उगारण्याचा आविर्भाव केला पण उंदीर ढिम्म होता. उलट उंदराने आता त्याचे पांढरे दात विचकले होते. त्यामुळे तो क्रूरपणे हसतोय असा भास व्हायला लागला. आश्चर्य आहे. सुनीलने कोपऱ्यातली काठी उचलली आणि तो उंदरावर धावून गेला. उंदीर काहीतरी आवाज काढून उडी मारून घंटेच्या दोरावर चढून दिसेनासा झाला. थांबलेला उंदरांचा गोंगाट परत चालू झाला होता.

      एव्हाना सुनीलचं लक्ष अभ्यासातून उडालं होतं. बाहेर कुठेतरी पहाटेचा कोंबडा आरवला तेव्हा तो भानावर आला आणि झोपायला गेला. त्याला इतकी गाढ झोप लागली की गंगूबाईच्या भांड्यांचा आवाजपण त्याला जाणवला नाही. गंगूबाईने साफसफाई पूर्ण करून टेबलावर नाश्ता मांडून ठेवला आणि त्याच्या पलंगाजवळच्या खिडकीवर टकटक करून त्याला उठवलं आणि ती गेली. सुनीलला रात्रीच्या जागरणाने थकवा जाणवत होता पण परत चहाने तरतरी आली. पुस्तक घेऊन आणि गावातल्या दुकानातून पाव बटर इ. घेऊन तो बाहेर फिरायला गेला. एका निवांत कट्ट्यावर बसून तो परत गणिताशी झटापट करू लागला. घरी परतताना वाटेत तो कावेरीमावशींच्या खानावळीत डोकावला. त्याला तिने आत बोलावलं. बोलताना ती त्याचं बारीक निरीक्षण करत होती. तिने अचानक म्हटलं,
"पोरा, तू फारच अभ्यास करतोयस वाटतं. बघ एका दिवसात कसा चेहऱ्याचा रंग उतरलाय. रात्रीची जागरणं बरी नाहीत तब्येतीला. आणि रात्र व्यवस्थित गेली ना? गंगूबाई भेटली होती सकाळी बाजारात. ती जेव्हा म्हणाली की तू गाढ झोपला होतास आणि व्यवस्थित होतास तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला."

      सुनील मिस्कीलपणे म्हणाला, "हो, मी अगदी व्यवस्थित आहे. त्या घरात जे "काहीतरी" आहे ते मला तरी भेटलं नाही बुवा! फक्त उंदरांचा फार त्रास आहे. रात्रभर खुडबूड चालूच होती. आणि एक गलेलठ्ठ उंदीर तर त्या आरामखुर्चीवर आला होता. मी काठी घेऊन धावलो तसा तो घंटेच्या दोरावर चढून दिसेनासा झाला.एकदम सैतानासारखे डोळे होते त्याचे.. हा हा हा.."
कावेरीमावशी परत दचकल्या. "सैतान...आरामखुर्चीवर बसलेला सैतान..जपून राहा पोरा.गमतीगमतीत खरं बोलून गेलास," त्या पुटपुटल्या.
"म्हणजे काय? मी समजलो नाही," सुनील हसतच होता.
"सैतान..हम्म.सैतान .. हसू नकोस पोरा. तुम्हा तरुण पिढीला सगळीच चेष्टा वाटते. ज्या गोष्टी सांगताना आम्ही पिकली पानं थरकतो त्या पण तुम्हाला विनोदी वाटतात. देव करो आणि तुझं हे हसणं असंच कायम राहो. सोडून दे मी काय बोलले ते." आणि कावेरीमावशी हसली. पण तिच्या हसण्यात मजेपेक्षा सहानुभूती होती असं सुनीलला क्षणभर वाटून गेलं.
"म्हणजे, तुम्हाला असं वाटतं का, कोणी भूत येऊन उंदराच्या रूपात खुर्चीवर बसलं होतं? ये बात कुछ हजम नही हुई.." सुनील अजून हसतच होता. मग निरोप घेऊन तो उठला आणि घरी परत आला.

 

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.