दोन कविता

उत्पल चंदावार

दिवस

काहीच्या काही दिवस...
बाईपणाच्या वेशीवर असल्यासारखा वागणारा एखादा दिवस.
मर्दपणाच्या बेहोषीत जगणारा एखादा दिवस.
सावल्या ताणत, चढत चढत जाणारा एखादा दिवस.
अर्धांग झटकत, अर्धांग आळसावत कामावर जाणारा एखादा दिवस.
प्रहरचे प्रहर उगीच कुणाचीतरी वाट बघणारा एखादा दिवस.
अर्धमिटल्या डोळ्यांत संभोगाची एखादी आठवण रिचवणारा दिवस.
बेरजा-वजाबाक्या करणारा एखादा मध्यमवयीन दिवस.
मातीने अंग भरून घेणारा एखादा लहानसा दिवस.
उजाडताच प्रश्न विचारणारा एखादा दिवस.
उजाडताच झोपी जाणारा एखादा दिवस.
काहीच्या काही दिवस...

 

आनंदघन

सोडूनिया देगा देवा
तुझ्या प्रश्नांचीच माया

आत आत विसरे मी, पात्याची धार
कट्यार नुसती, कुचकामी

जोडतो अक्षरे, भरतो कागद
शाईच्या कळाच, लडिवाळ

सोयरे सुबक, अदृष्ट हाती
झुलतो पाळणा, आपसूक

पाया पडू जाता, सापडेना वाट
रटाळ कबंध, हाती लागे

माझा मी गोंध, उपकारमय
बरा मी बराच, एकटाच

गुणांची आवड, तूच म्हणे
स्वतः निर्गुण, परी कल्पवृक्ष

मिटू देत पंख, उभारतो कंठ
भेटाया आला, आनंदघन