डोंबारी

प्रमोद बेजकर

दिवसांवरती दिवसांचे थर भूतकाळ की रद्दी पेपर
आठवणींचा धुरळा उडतो कधीतरी आवरले जर घर

 रवंथ करता सुखदुःखाचा ढेकर येतो आनंदाचा
कधी सूक्ष्मशी कळही उठते गॅस धरे पश्चात्तापाचा

 हट्टी कोळी विणतो स्वप्ने सर्व निरर्थक खोगिरभरती
“पुन्हा एक अपयशी कहाणी” शब्द तेच ते मथळ्यावरती

 गतकाळाचा जीर्ण सापळा अकस्मात जर उघडला कधी
शिकार करुनी स्वतःची पुन्हा रडे ढसढसा वृद्ध पारधी

 तळहाताच्या जाळीवरती अधांतरी दिसतात बंगले
भिंतीच्या पोपड्यास सांगू चार दिवस येथले राहिले

 भूतभविष्याचा हिंदोळा वर्तमान हलणारी दोरी
तोल कसा सांभाळत राहू विचारात ‘पडतो’ डोंबारी