कुरवाळत बसलो

केदार पाटणकर

 

लोकांमधल्या प्रतिमेला सांभाळत बसलो
मी इथल्या नियमांना साऱ्या पाळत बसलो 

सगळे पुस्तक वाचायाची हिंमत नव्हती
निवडक निवडक आठवणींना चाळत बसलो 

ये दुनिये, घे शेकोटीची ऊब आयती
हा बघ येथे प्राणाला मी जाळत बसलो 

दूरदूरचा नको एवढा विचार केला
पावलातल्या दगडाला ठेचाळत बसलो 

प्रत्येकाने कविता केली, दाद मिळवली
मी केवळ दुःखाला या कुरवाळत बसलो