पूर्वार्ध

सतीश वाघमारेसार्‍या नजरा चुकवत
त्या दोघांची पहिली डोळाभेट झाली
तेव्हा, त्यांच्याशिवाय एकांतात तिथे
त्यांच्याही नकळत आणखी कुणीतरी होतं,
हळूहळू आकार घेऊ पाहणारं,
दोन जिवांतलं नवजात नातं.....
त्यांना माहीत नव्हतं, पण-
त्यांच्यामधल्या अदॄश्य सेतूवर हुंदडत
त्यांच्याकडे निरागस अपेक्षेने बघत,
त्यांना अनावरपणे एकमेकांकडे ओढत....
प्रत्येक भेटीत, पुढच्या मीलनाची ओढ लावत,
ते क्षणागणिक बाळसं धरू लागलं होतं....
.....
यथावकाश ते वयात आलं, आणि दोघांनी
एक दिवस त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं,
तेव्हा ते नातं अमाप सुखावलं,
दोघांच्या गळ्यात पडून, क्षणभर विसावलं.
त्या दोघांना कवेत घेऊन, हवेत तरंगू लागलं
त्याचा दरवळ सुदूर पसरला..
तिच्या लाडक्या हिरव्या चाफ्यासारखा, स्वप्नवत्.
....
दरम्यान, अव्याहतपणे -
वास्तवातल्या दिवसांचे आठवडे होत होते, महिन्यांची वर्षं
ते नातं नुकतं कुठे स्थिरावत होतं, आणि एका गाफिल दिवशी..
शब्दांवर शब्द आदळून तो तिच्यावर रागावून ओरडला,
तेव्हा ते केवढ्यांदातरी दचकलं-
त्यांना एकटं सोडून कोपर्‍यात एकटं थरथरत उभं राहिलं..

अनुत्तरित प्रश्नांच्या, गैरसमज-मतभेदांच्या वावटळीत सापडलेली
ती दोघंही भिरभिरत राहिली, बराच काळ.

वादळानंतरच्या शांततेत दिलजमाईची एक गार झुळूक दबकत आली,
तेव्हा कुठे त्या नात्यावरचा ताण सैलावला
आणि मनाशी काही ठरवून ते निर्धाराने पुढे सरलं.
नवीन जबाबदारीची जाणीव होऊन ते आता
अकाली पोक्तपणाने, त्यांना हाकारु लागलं...
.....
आत्ता कुठे सुरू झाला होता,
त्यांच्यातल्या नात्याचा अधिकॄत प्रवास, उत्तरार्धाकडे !