मैत्र जिवांचे !

सुमती वानखेडे

 

नाते कुठले... सांगू कसे मी ?
रडताना तू... ओचा झाले !
वणवण भिंगरी शोधी किनारा
सावरणारा... खोपा झाले !

नाते अपुले... सांगू कसे मी ?
झाले गंगा... राधा झाले !
प्रेमधुंद तू होऊन जाता
घमघमणारा... चाफा झाले !

नाते जुळले... सांगू कसे मी ?
नव्हे देवकी... यशोदा झाले !
आण-बाण अन शानही जपण्या
अकबराची... जोधा झाले !

नाते जगले... सांगू कसे मी ?
ईश्वरचरणी... माथा झाले !
नाते नसता जपले सारे
कृष्ण-मीरेची... गाथा झाले !

नकोच नाते... नकोच गुंता
दूर जरी... परी अपुले असते !
आभाळाचे रूप घेऊनी
स्निग्ध मायेचे छत जे धरते !