पुलावरचा तरुण

चौकस

तो एका पुलावर बसला होता. त्याला ही जागा अत्यंत आवडू लागली होती. बहुतेक वेळेस तो पुलावर बसलेला असे. सुरुवातीला तो पुलावरून जाणार्‍या मोटारी, सायकली आणि मुली यांच्याकडे लक्ष देऊन पाहत असे, पण तो उद्योग आता त्याने सोडून दिला होता. बसल्याबसल्या त्याने सगळ्या मोटारी, सायकली आणि मुली पाहून घेतल्या होत्या आणि त्यांत बघण्यासारखे काही उरले नव्हते हे त्याला उमगले होते. तरीही, तो त्या पुलावर बसलेला असे.

त्याला कुठेही नोकरी नव्हती. न मिळणार्‍या नोकर्‍या शोधून शोधून तो दमला होता आणि ते बंद करून आता तो फक्त पुलावर बसून राहत असे.

एक दिवस एक 'नेता' प्रकारातली व्यक्ती त्याच्याकडे आली आणि त्याला प्रश्न करती झाली, "तू मला प्रश्न विचारू शकशील काय?"

"मला काही प्रश्नबिश्न विचारायचे नाहीत."

"मी तुला सांगेन ते प्रश्न तू मला विचार."

"त्याने काय होईल?"

"मी उत्तर देईन."

"तुम्ही स्वतःलाच का नाही प्रश्न विचारत?"

"असं होत नसतं बाबा. प्रश्न कुणी दुसर्‍याने विचारावा लागतो, मी उत्तर देतो."

"पण मला उत्तर ऐकायचं नाहीये."

"नको ऐकूस. तू फक्त प्रश्न विचार."

"पण हे सगळं कशासाठी?"

"तुला काय करायचंय?"

"मी तुम्हाला माझ्याकडे नसलेले प्रश्न विचारायचे, जे विचारायची माझी इच्छा नाही. मग तुम्ही उत्तर देणार, जे मला ऐकायची इच्छा नाही आणि त्याची गरज पण नाही. काय वेडेबिडे आहात का?"

"नाही. मी नेता आहे."

पुलावर बसलेला तरुण नेत्याकडे आश्चर्याने पाहू लागला.

"तू माझ्याबरोबर चल आणि फक्त मी सांगेन ते प्रश्न विचार. त्याबदल्यात मी तुला पैसे देईन."

"हे मात्र जमलं!" पुलावरचा तरुण हसला. "तुम्ही मला प्रश्न पण देणार आणि ते विचारण्याबद्दल पैसे पण. तसं असेल तर मी कदाचित उत्तरही ऐकेन. असो, आत्ताला एक रुपया द्या, सिगरेटचं पाकीट घेतो."

नेत्याने रुपया काढून दिला. तरुण उठला आणि सिगरेटचे झुरके मारत नेत्यापाठोपाठ चालू लागला. काही अंतर गेल्यावर त्याने नेत्याला थांबवले आणि म्हणाला, "हे बघा, पैसे तुम्ही देताय, तेव्हा वाटलं तर तुम्ही प्रश्न विचारा, उत्तर मी देईन. मी असं ऐकलंय की नोकरीत असंच होतं. जो पैसे देतो तो प्रश्न विचारतो आणि ज्याला पैसे मिळतात तो उत्तर देतो."

"असं करायची अजिबात गरज नाही. सांगितलेलं काम तेवढं कर." दोघेही परत चालू लागले.

काही वेळानंतरचा प्रसंग. शहरातल्या एका गर्दीच्या ठिकाणी तो नेता भाषण देत होता आणि पुलावरचा तो युवक त्या गर्दीत उभा होता. भाषण रेंगाळत होते आणि त्या तरुणाला आलेला कंटाळा स्पष्ट दिसत होता. तरीही पुनःपुन्हा सिगरेटी पेटवत आणि फुंकत तो रेटून उभा होता.
नेत्याने भाषण संपवले आणि विचारले, "तुमच्यापैकी कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का?"

त्या तरुणाला वाटले की त्या गर्दीत नेत्याने त्याला पाहिले नसेल. तो हात वर करून ओरडला, "मला विचारायचाय, मला विचारायचाय. मी इथे उभा आहे, मला प्रश्न विचारायचाय."
नेत्याने आपले ठेवणीतले हास्य चेहर्‍यावर फासले आणि हॅ हॅ करीत तो वदला, "विचारा, विचारा ना काय प्रश्न आहे तो."

"पहिला प्रश्न हा आहे, की स्वातंत्र्यानंतर आपला देश प्रगती करू शकला नाही, आपण जिथल्या तिथेच राहिलो, याचे काय कारण आहे?"

नेत्याने गंभीर विचार करत असल्याचे भाव चेहर्‍यावर आणले आणि त्याच्या तोंडातून संथपणे शब्द घरंगळू लागले. "याचं कारण असं की या देशाला लायक असे नेतेच मिळाले नाहीत. माझंच उदाहरण घ्या ना. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी एका फर्ममध्ये सेक्रेटरी होतो. बरीच वर्षं होतो. आमच्या मालकांना वाटायचं की या नेत्यांनी काम भागेल, पण काही वर्षं उलटल्यावर उमगलं की ते चुकीचं होतं. मग एक दिवस शेट मला म्हणाले की तू राजकारणात जा आणि मी आलो. असे अजून नवनवीन नेते येताहेत. कुणी ठेकेदार आहेत तर कुणी कारखानदार. यामुळे देशाची प्रगती होईल आणि देश सुधारेल. जुन्या नेत्यांमुळे प्रगती खुंटली होती ती आता सुरळीत होईल. "

"अगदी बरोबर बोलले", "काय झकास उत्तर आहे", "वाह वाह" गर्दीतल्या दोन-तीन व्यक्ती ओरडल्या. मग गर्दीही नेत्याच्या उत्तराची प्रशंसा करू लागली.

तो तरुण चमकला आणि अचानक आठवण झाल्यासारखे त्याने विचारले, "आणि दुसरा प्रश्न असा आहे की आज आपल्या देशाला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे असे तुम्हांला वाटते? "

"छोटी मोटारगाडी", नेता तत्परतेने उत्तरला. "आमचे शेट नेहमी म्हणायचे की या देशात छोट्या मोटारींचा कारखाना झाला पाहिजे. सगळ्यात जास्त गरजेची गोष्ट. तसंच टेलिव्हिजन पसरला पाहिजे. फ्रिज अजून घरांघरांतून पोचला नाहीये. या देशात फार टंचाई आहे. जनता प्रगतीच करत नाहीये."

परत गर्दीतल्या दोन-तीन व्यक्ती "बरोबर", "खरं आहे" असे ओरडल्या. मग गर्दीही माना डोलावू लागली.

पुलावरच्या तरुणाकडे आता एकच सिगरेट उरली होती, ती काढून त्याने पेटवली.

नेता अंगात आल्यासारखे ओरडू लागला, "अजून प्रश्न विचारायचेत कुणाला? अजून प्रश्न? "

तरुणाला आठवले की त्याने तीन प्रश्न विचारण्याची बोली होती. दोन विचारून झाले होते, पण तिसरा काही त्याला आठवेना. इकडे नेता ओरडतच होता. तेवढ्यात त्या तरुणाला आठवले.

"अजून एकच प्रश्न. आता एकच प्रश्न असा आहे की देशातली बेकारी हटवण्यासाठी काय करायला पाहिजे? "

नेत्याने विचारवंताची मुद्रा धारण केली आणि उत्तराला सुरुवात केली. "कारखानदारांना लायसन्सेस दिली पाहिजेत. मालकलोक कारखाने सुरू करण्यासाठी लायसन्स मागतात पण सरकार मोकळेपणे ती देत नाही. आमच्या शेटवरती पण हाच अन्याय झाला आहे. त्यांनी लायसन्स मागितलं, पण सरकारने दिलं नाही. शेट म्हणाले, 'कारखाना नाही काढला तर लोकांना नोकर्‍या कशा मिळणार?' अगदी बरोबर म्हणाले. माझं पण हेच म्हणणं आहे की कारखानदारांना लायसन्सेस दिल्याशिवाय देशातली बेकारी हटणार नाही. "

"वा, वा, प्रश्नाला कसे मुळापासून उत्तर दिले एकदम", गर्दीतल्या दोन-तीन व्यक्ती परत बडबडल्या. मग सर्वजण बेकारी दूर करण्याच्या या प्रस्तावावर विचार करू लागले.

त्या तरुणाचे सगळे प्रश्न आणि सगळ्या सिगरेटी संपल्या होत्या. नेता अजूनही घुमत होता, "अजून काही प्रश्न? कुणाला अजून काही प्रश्न विचारायचेत का? " तरुणाला सिगरेटची तलफ अनावर होऊ लागली. आणि तेवढ्यात नेत्याने थेट त्यालाच सवाल केला, "बोला, तुम्हांला काही प्रश्न तर विचारायचा नाही ना? "

तरुणाने खिशातलं सिगरेटचं रिकामं पाकीट काढून फेकले आणि तो म्हणाला, "एकच प्रश्न आहे. "

"विचारा, विचारा, जरूर विचारा. "

"मी सगळे प्रश्न विचारून टाकले, आता मला पैसे कधी मिळणार? मला सिगरेटी खरेदी करायच्या आहेत. "

नेत्याने त्याच्याकडे नाराजीने पाहिले. गर्दीतले लोक हसू लागले. एकाएकी नेत्याने गंभीरपणे बोलणे सुरू केले, "हा व्यक्तिगत प्रश्न आहे, एकदम व्यक्तिगत प्रश्न आहे. जे प्रश्न समाज आणि राष्ट्राच्या समस्यांशी संबंधित आहेत अशाच प्रश्नांची मी इथे उत्तरं देईन. "

गर्दीतून दोन-तीन जण बोलू लागले, "अगदी बरोबर. व्यक्तिगत प्रश्न इथे विचारले जायला नकोत. हे अगदी अयोग्य आहे. नेताजींना सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्वाचेच प्रश्न विचारायला हवेत. " आता सगळी गर्दीच म्हणू लागली की हा प्रश्न अगदी व्यक्तिगत आहे आणि इथे विचारला जायला नको.

काही वेळाने तो तरुण परत त्या पुलावर येऊन आधी बसला होता तसाच बसला. आधीसारखा तो मोटारी, सायकली किंवा मुली यांतले काहीही पाहत नव्हता. सिगरेटी संपल्याचे जे दुःख त्याला झाले होते तेही संपले होते. एवढ्यात दोन-तीनजण तिथून जात असताना त्याला पाहून थबकले.

"गर्दीतून प्रश्न तूच विचारत होतास ना? " त्यातल्या एकाने विचारले.

"हो."

सगळे त्याच्याकडे पाहून हसू लागले.

"चूक केलीस तू. पैशांचा प्रश्न तिथे उगाच काढलास. पैसे सभा संपल्यावर मिळतात. आम्ही तिघे नेताजींच्या उत्तरांची तारीफ करण्याकरता गर्दीत उभे होतो, आता पैसे घ्यायला त्यांच्या घरी जातोय. तू चुकलासच. "

तिघेही झपाझप पावले टाकत निघून गेले.

पुलावरचा तरुण त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याला विचार करूनही त्याची काय चूक झाली हे कळलं नाही. त्याच्या सिगरेटी संपल्या होत्या आणि नवीन सिगरेटी घेण्यासाठी त्याला पैसे हवे होते. मग ते मागण्यात काय चुकले?

पुलावर बसून तो बराच वेळ याचा विचार करतो आहे. समोरून मोटारी, सायकली आणि मुली जाताहेत.

 

सुप्रसिद्ध हिंदी लेखक शरद जोशी यांच्या कथेवर आधारित.