जेव्हा फारुकी हरवतो...

स्वाती दिनेश

फारुकी म्युनशनला एका कॉन्फरन्ससाठी येणार आणि मग पुढे चार दिवस फ्रांकफुर्टात आमच्याकडे मुक्काम करणार असे समजल्यापासून आम्ही फार आनंदलो होतो कारण आता गाणी, किस्से,गप्पागोष्टी ह्यात आमचे चार दिवस मजेत जाणार याची खात्रीच! मुंबापुरीतल्या एका कॉलेजातला हा संख्याशास्त्री पुलंपासून गंगाधर गाडगीळांपर्यंत सगळ्यांवर अधिकारवाणीने बोलायचा.. नौशादसाब आणि लता ही त्याची दैवतं.. त्याचबरोबर भाभी पाठवणार असलेल्या मठऱ्या, शक्करपारे, मिठाई यावरही डोळा होताच ;)

फारुकीची यायची तारीख उजाडली. आज संध्याकाळपर्यंत त्याचा म्युनशनहून फोन येईल असा अंदाज होताच आणि फोन वाजला.. त्याचाच फोन, म्हणत मी उचलला तर फोनवर नुझाभाभी, "हम बहोत परेशान है, अभीतक उनकी कोई खबर नही, ना ही फोन!" "अगं येईल फोन.. आत्ता इथे फक्त सहा वाजत आहेत, आत्ता तर जेमतेम पोहोचला असेल तो म्युनशनला.. बूथ मिळून फोन करायला वेळ लागेल त्याला.." मी भाभीची समजूत घालायला लागले. त्यावरच तिचे म्हणणे, त्याचे विमान पहाटे पावणेसहाच्या सुमाराला फ्रांकफुर्टला पोहोचणार होते आणि आता संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. त्याने दिलेल्या विद्यापीठाच्या फोननंबरचा रेकॉर्डेड जर्मन संदेश तिला समजत नव्हता. त्यामुळे ती आणखीच हवालदिल झाली होती. इतिहाद एअरवेजचे त्याचे विमान आणि मुंबई-- अबुधाबी-- जर्मनी असा प्रवास होता. नुझाभाभी तणावाखाली वेळेमध्ये गडबड करते आहे असे वाटून मी नाझियाला, फारुकीच्या मुलीला फोन लावला आणि परत एकदा सगळे डीटेल्स विचारले. पण खरंच त्याचे विमान जर्मनीत यायची वेळ सकाळचे पावणेसहाच होती. आता मात्र आम्हालाही जरा काळजी वाटायला लागली.

फारुकीला हृदयविकार आहे. ७ लहानमोठे झटके येऊन गेले आहेत, अँजिओग्राफी झालेली आहेच. मानसिक ताण, हवामानातला मोठ्ठा फरक त्याच्यासाठी हानीकारक आहे. मुंबईमधून तो निघाला तेव्हा तिथले तापमान साधारण २६, २७ अंश से. होते आणि इथे जर्मनीत तर कडाक्याची थंडी होती. पारा शून्य किवा त्याखालीच असतो बरेचदा. त्यातून म्युनशन हे आल्पसच्या कुशीतले शहर! त्यामुळे थंडीचा कडाका भरपूर! हे सारे काही डोक्यात येत होते आणि फोनवरून नुझाभाभी नेमके तेच बोलत होती. तिला धीर देत होते तरी आतून चांगलीच काळजी वाटायला लागली. दुसऱ्या फोनवर नाझिया, "मुझे सच सच बताओ, सब ठीक तो है ना?" असे विचारत होती.

शेवटी दोघींनाही फोन ठेवायला सांगून मी म्युनशन विमानतळावर फोन केला तेव्हा समजले की विमानाला अबुधाबीहून सुटायला ८ तास उशीर झाला आहे आणि सकाळी पावणेसहाऐवजी ते संध्याकाळी सातच्या सुमाराला म्युनशनला पोहोचले आहे. आम्ही हुश्श केले आणि लगेच ही बातमी भाभीला कळवली. "आता सव्वासातच वाजत आहेत, त्याला सगळे सोपस्कार उरकून बाहेर पडायला अजून तासभर तरी लागेल, मग येईलच त्याचा फोन." असे बोलून सुटकेचा निःश्वास टाकला. संध्याकाळ अशीतशीच गेली. कान फोनकडे होते. ११ वाजून गेल्यावर एकदाचा फोन किणकिणला. आला बाबा एकदाचा फारुकीचा फोन असं म्हणत दिनेशने फोन घेतला तर तो नुझाभाभीचा होता. आत्ता ह्यावेळी भाभी फोनवर? तिकडे तर आत्ता २.३० वाजून गेलेत. त्या क्षणभरात मनात किती विचार येऊन गेले आणि भाभीच्या तोंडून तर शब्द फुटत नव्हता‌. शेवटी नाझियाने तिच्या हातून फोन घेत अजूनही त्याची खुशाली न समजल्याची बातमी दिली. आम्ही मनातून धास्तावलेलो असताना तिला कोरडा धीर देत फोन ठेवला आणि म्युनशन विमानतळावर फोन फिरवला.

"इतिहाद एअरवेजचे अबुधाबीहून येणारे विमान आले का?" परत एकदा तीच प्रश्नोत्तरे ... ८ तास लेट असलेले विमान उतरूनही चार साडेचार तासावर वेळ होऊन गेला होता. एव्हाना विमानतळावरून म्युनशनविद्यापीठात पोहोचून तो जुना व्हायला हवा आणि किमान आम्हाला फ्रांकफुर्टला तरी त्याचा फोन यायला हवा होता, पण.. रात्री साडेअकरा वाजता विद्यापीठात फोन करून काही उपयोग नव्हता. मग परत एकदा विमानतळावरच फोन करून प्रवासीयादी सांगू शकाल का? अशी विचारणा केली. पण ते नियमबाह्य असल्याने यादी मिळणार नव्हती. पण त्या बाईला काय वाटले कुणास ठाऊक? तिने आपणहूनच विचारले, "तुमचा एवढ्यात दोनतीनदा फोन आला, काही अडचण आहे का?" आत्तापर्यंतची सगळी घडामोड तिला घडाघडा सांगून टाकत प्रवासीयादी मिळणे आम्हाला किती गरजेचे आहे ते पटवून देण्याचा एक क्षीण प्रयत्न केला. तरीही खेद व्यक्त करीत तिने परत यादी देऊ शकत नाही हेच ऐकवले. निराश होऊन फोन ठेवणार तेवढ्यातले तिचे शेवटचे वाक्य थोडा धीर देऊन गेले‍. "जेवढे प्रवासी अबुधाबीत चढले तेवढे सगळे म्युनशनला सुखरूप उतरलेत, शुभेच्छा!" हे ते वाक्य! अर्थ डोक्यापर्यंत पोहोचायला क्षणभर वेळ लागला पण अबुधाबीला त्याने चेक इन केल्याची बातमी फारुकीच्या मेव्हण्याने दिली होतीच म्हणजे निदान विमानातून जर्मनीत तरी हा बाबा सुखरुप आला आहे असा विश्वास वाटायला लागला.

आता हा बाबा गेला तरी कुठे? जर्मन भाषेचा त्याला गंध नाही आणि म्युनशन विमानतळावर फ्रांकफुर्ट सारखे सगळ्यांना इंग्रजी येतेच असे नाही. विमानाला एवढा उशीर झाल्याने साहजिकच त्याला घ्यायला येणाऱ्याची आणि ह्याची भेट झाली नसेल आणि विद्यापीठ शोधण्याच्या नादात हा कुठे हरवला तर नसेल? फेब्रुवारी महिना चालू होता. दिवस लहान, पारा शून्याकडे झेपावणारा आणि हा असा हृद्रोगी.. ह्या हवामानात कुठे शोधाशोध करत, भटकत राहिला असेल? हे सगळे विचार तसेच मनात ठेऊन भाभीला फोनवर मात्र अबुधाबीला जेवढे लोक चढले तेवढे सगळे म्युनशनला सुखरुप उतरले आहेत ही बातमी सांगत, विद्यापीठाची कचेरी बंद झाली असेल, पब्लिक बूथवरच्या जर्मन सूचना न समजून त्याला फोन करता नसेल आला, झोपा तुम्ही शांतपणे. उद्या सकाळी येईल त्याचा फोन, नका काळजी करू दोघी..'नो न्यूज इज गुडन्यूज' असं सांगत तिला आणि स्वतःलाच धीर दिला. आता हसनचा, त्याच्या मुलाचा लंडनहून फोन आला. त्यालाही तेच सांगितलं. उद्या सकाळची वाट पाहण्याखेरीज आता दुसरे काही हातात नव्हते.

सकाळी म्युनशन वैद्यकीय विद्यापीठात फोन लावला. सेमिनार आजच सुरू होणार होता आणि फारुकीची अजूनही नोंदणी झालेली नाही असे उत्तर तिथून मिळाले. तासाभराने तिने परत चेक करा असे सांगितल्यामुळे परत फोन केला. अजूनही त्याच्या नावाची नोंद तिथे झालेली नव्हती आणि तेही लोक त्याची वाट पाहत होते. आता मात्र काळजी वाढायला लागली. त्यांचे सौदीतले नातेवाईक भारतीय वकिलातीत जा, असे सांगत होते. तिथे जाऊन तरी सांगणार काय? आम्ही त्याचे जवळचे मित्र असलो तरी नातेवाईक नव्हतोच आणि त्याचा आमचा धर्मही एक नव्हता. भारतीय वकिलातीने हजार प्रश्न नक्कीच विचारले असते. त्याचा फोटोबिटोही आमच्याजवळ नव्हता. दिनेशला वकिलातीत जाण्याऐवजी म्युनशनमधल्या त्यांच्या कंपनीतल्या कोणाला तरी विद्यापीठात पाठवून काही खबर समजते का ते पहावे असे वाटायला लागले, तर आकिम आजोबा म्हणाले पोलिसात जाऊ म्हणजे विमानतळावरची यादी, विद्यापीठातही हवी ती माहिती सहज मिळेल. काय करावे काही सुचत नव्हते.

जालावर तरी त्याची नावनोंदणी झालेली दिसते का ते पहावे अशा विचाराने दिनेशने शोध घ्यायला सुरूवात केली तर डॉ. महम्मद अली झाकिर हुसेन फारुकी ह्या नावापुढे प्रेझेंटेशनची वेळ आणि क्रमांक सापडला. परत विद्यापीठात फोन लावला. माझा आवाज ऐकल्यावर लगेचच मी काही विचारायच्या आधीच त्या बाईंनी हर्षाने त्याची नोंदणी होऊन काही वेळापूर्वीच त्याच्याशी बोलल्याचेही सांगितले. माझा दूरध्वनी क्रमांक तिला देऊन फारुकीला मला संपर्क करायला सांगून मी लगेचच भारतात ही बातमी कळवली.

जेवणाच्या सुट्टीत जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा बाकीचा उलगडा झाला. त्या मंडळींना विमानातच ६ तासाच्यावर नुसते बसवून ठेवले होते. तांत्रिक दोषामुळे उशीर होतो आहे ह्याउप्पर काही सांगत नव्हते आणि विमानात बसल्यामुळे फोन करता येत नव्हता. म्युनशनला आल्यावर त्याला भाषेचा प्रश्न आलाच आणि विद्यापीठवाल्यांनी विमानतळावरील चौकशीकक्षात ह्याच्याकरता निरोप ठेवला आहे हे समजायलाच त्याला तासभर लागला. तिथे पोहोचेपर्यंत कचेरी बंद झाली होती आणि पब्लिकबूथवरच्या जर्मन सूचना त्याला समजल्या नाहीत. त्याच्या भटक्याची बॅटरी डाऊन झाली आणि इथले आणि तिथले प्लग वेगळे असल्याने त्याला री-चार्जही करता आले नाही. सकाळी नावनोंदणीसाठीचे आवश्यक सोपस्कार पार पडायला वेळ लागला तोपर्यंत आमचे विद्यापीठात फोनावर फोन झाले होते.
आता मात्र खराखरा सुटकेचा श्वास सोडला आणि भाभीला आनंदाने फोन फिरवला.