संशोधन

श्रावण मोडक
संशोधन

"वेल, द नेक्स्ट इज द टॉप टेन!", एस. के. गुहा यांनी पुढच्या मुद्याला हात घातला तेव्हा फडणीसांचे डोळे लकाकले. त्यांनी हळूच एक कटाक्ष जाधवांच्या दिशेने टाकला. गेले दीड तास सुरू असलेल्या या प्रेझेंटेशनमधील हा शेवटचा भाग होता आणि फडणीस-जाधव या जोडगोळीला त्यातच मुख्य रस होता. व्हीसींपुढे घेऊन जाण्याजोगं मटेरियल याच भागातून समोर येणार होतं, हे गुहा यांच्या असिस्टंटने त्यांना सांगून ठेवलं होतं.

"हाऊएव्हर, डोण्ट टेक द वर्ड टॉप इन कन्व्हेन्शनल सेन्स. इट शुड बी बॉटम ऍक्च्युअली. पण आपल्याकडे बॉटममध्येही मोठं कोण हे पाहण्याची रीत असतेच. त्यामुळंच मी त्यांना टॉप टेन असं म्हटलं आहे." गुहा यांनी बोलणं सुरू ठेवलं. समोर होते देशातील आघाडीच्या दहा विद्यापीठांतील प्राध्यापक, व्याख्याते आणि काही प्रमुख सरकारी संशोधन संस्थांतील संशोधक. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड - सीपीसीबी) वतीने होत असलेलं हे पहिलं प्रेझेंटेशन भविष्यात देशात पर्यावरणाच्या क्षेत्रात व्हावयाच्या मोठ्या मोहिमेची पायाभरणी मानलं जात होतं. विविध संस्थांकडून त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार असल्यानं या प्रेझेंटेशनच्या अंती किमान तीन ते चार प्रकल्प तरी प्रत्यक्षात आले पाहिजेत, हे गुहा यांच्यासमोर ठेवण्यात आलेलं लक्ष्य होतं. आणि हे प्रकल्प प्रामुख्याने मोठ्या शहरांमधीलच असावेत, हे त्यांनी पक्कं केलं होतं. तिथंच सारं काही होतं. पुढच्या काळासाठीचा व्यावसायिक आधार त्यातूनच निर्माण होणार होता. शिवाय पर्यावरणाचा अभ्यास आणि संवर्धन-संरक्षण ही विस्तारत जाणारी व्यवस्था असल्यानं पहिल्या तीन-चार प्रकल्पांनंतर आणखी पंचवीसेक शहरं कवेत घेणं पाचेक वर्षांमध्येच शक्य झालं असतं. तिथून पुढं ग्लोबल वॉर्मिंगच्या पर्यायांकडें देशाला नेता येणं सोपं ठरणार होतं. यात आणखी एक छोटी छटा होती. गुहांच्या भावाने अलीकडेच लखनौमध्ये एक नवीन कारखाना सुरू केला होता. इकोटेक या नावाचा. त्याच्या कारखान्यात तयार होणाऱ्या 'रेस्पिरेबल डस्ट सँपलर'साठी बाजारपेठ अशी अद्याप तयार झालेली नव्हती. आरंभीच्या काळात गुहांनी काही उद्योगसमुहांना सांगून तेथे मॉनिटरिंगची व्यवस्था करण्यास सुचवलं होतं. गुहांचीच सूचना ती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला आणि त्याचे सचिव म्हणून गुहांना असणारे अधिकार ध्यानी घेता बऱ्याच ठिकाणी ते सुरूही झालं होतं. त्यामुळं भावाच्या कारखान्याची सुरवात तरी बरी झाली होती. पण मोठी उडी घ्यावयाची असेल तर व्याप्ती वाढवणं आवश्यक होतं. त्यादृष्टीनंही या प्रेझेंटेशनचं एक आगळं महत्त्व होतं. आराखडा पक्का होता.

"ही आहे भारतातल्या सर्वाधिक प्रदूषण असलेल्या दहा शहरांची यादी. ऑन द स्क्रीन, यू कॅन सी हाऊ डीप द मॅलडी हॅज बीन हिअर अँड द फिगर्स स्पीक फॉर देमसेल्व्झ. आत्ता, ताबडतोब आपण काही केलं नाही तर..." त्यांनी ते वाक्य अर्धवट सोडलं. साध्या रेस्पिरेबल डस्ट सँपलरवर करण्यात आलेल्या पाहणीचे हे प्रायोगिक स्वरूपाचे निष्कर्ष आहेत, यावर गुहांचा भर होता. सामान्यपणे विदेशांमध्ये हाय व्हॉल्यूम सँपलर वापरून वायूप्रदूषणाचं मापन केलं जातं हे समोर बसलेल्या अनेकांना ठाऊक आहे, हे त्यांच्या ध्यानी होतं. पण तो सँपलर आणि त्यासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीच्या तुलनेत रेस्पिरेबल डस्ट सँपलर चांगला हे ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

समोरच्या पडद्यावर तिसऱ्या क्रमांकावर आपल्या शहराचं नाव पाहून फडणीसांनी लगेच जाधवांच्या दिशेनं एक कटाक्ष टाकला. ही सगळी आकडेवारी त्यांच्या हाती नंतर पडणारच होती. त्यामुळे ती टिपून घेत बसण्यात अर्थ नव्हता. जाधवांशी नजरानजर झाली तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर "जमलं" असे भाव आले. हाय व्हॉल्यूम सँपलर किंवा रेस्पिरेबल डस्ट सँपलर हा त्यांच्या लेखी केवळ तपशिलाचा मुद्दा होता.
---
"सर, त्या प्रेझेंटेशननंतर एक गोष्ट फक्त सिद्ध झाली आहे. प्रदूषण आपल्या इथं आहे, हे काही नवीन नाही. पण त्याचा स्तर किती भयंकर आहे, हे मात्र त्यातून पुढं आलं आहे. आपण हा प्रकल्प केला पाहिजे."

"व्हॉट आर वी गोईंग टू गेट फ्रॉम इट, अपार्ट फ्रॉम डेटाबेस फॉर क्रिएटिंग अवेअरनेस इन द सिटी?" व्हीसींचा प्रश्न फडणीसांना अनपेक्षित नव्हता.

"देअर इज ह्यूज पोटेन्शियल इन द प्रोजेक्ट, सर. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की, आपल्याला भविष्यात यूएसइपीएशी टायअप करता येईल. त्यांच्याकडून नवं तंत्रज्ञान इथं येईल, या मॉनिटरींगमध्ये त्यांनाही मोठा इंटरेस्ट आहे. क्लायमेट चेंजच्या संदर्भातील त्यांच्या एकूण ऍक्टिव्हिटीचा आपण एक भाग होऊ शकतो."

"पैशांचं काय?"

"ऍज पर अवर डिस्कशन्स, सीपीसीबी वुड बी प्रोव्हायडिंग द इन्स्ट्रूमेंट्स, इक्विपमेंट्स. यूएसईपीए वुड बी इंटरेस्टेड इन द डेटा आणि त्यामुळंच त्यांनी आर्थिक आघाडीवर कॉंट्रिब्यूट करण्याचं मान्य केलं आहे." जाधवांनी प्रथमच तोंड उघडलं. "प्रकल्पावर काम करणार्‍या दोन्ही प्रमुखांसाठीचं मानधन, या प्रकल्पाच्या कार्यवाहीसाठी होणाऱ्या त्यांच्या दौऱ्यांचा खर्च वगैरे तिकडून मिळेल, शिवाय प्रकल्पासाठी तीन सहाय्यक ते देतील. त्याकरिता मान्यता देताना सीपीसीबीची अट एकच आहे की, या प्रकल्पांत विद्यार्थ्यांना सामावून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासाठीची तरतूद विद्यापीठानं करावी."

"हाऊ मच विल दॅट कॉस्ट?"

"एकूण प्रकल्प व्यवस्थापन खर्चापैकी हार्डली ५ ते १० टक्के. पहिल्या वर्षांसाठी आपण तीन विद्यार्थी घ्यावेत. पुढे टप्प्याटप्प्यानं ते वाढवत न्यावेत. पहिल्या वर्षाचा तीन विद्यार्थ्यांचा खर्च साधारण तीस हजार रुपयांच्या घरात असेल. दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी."

"ओके. सुरवात करा," व्हीसींचे नेहमीचे शब्द बाहेर आले आणि फडणीस - जाधव उठले.
---
एम.एस्सी.च्या परीक्षेत विद्यापीठाच्या विभागाव्यतिरिक्त बाहेरच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या पाचात स्थान मिळवण्याची कामगिरी आजवर झालेली नव्हती. सुशांत देशमुखनं जेव्हा ती केली तेव्हा स्वाभाविकच 'हा कोण?' हा प्रश्न त्या विभागातच नव्हे तर इतर विभागांमध्येही उभा ठाकला होता. शेवटी एन्व्हायर्नमेंटल सायन्स हा विभाग स्कूलच्या स्तराचा असला तरी, तिथं इतर विभागांमधूनच मनुष्यबळ उसनं घेऊन काम चालत होतं. फडणीस तिथं जिओलॉजीतून तर जाधव केमिस्ट्रीमधून आले होते. या विभागाचा अभ्यासक्रम ठरवण्याच्या समितीवरही हे दोघं कायम असतच. विभागासाठी दोघांच्या खटपटी नेहमी सुरू असायच्याच. दहा वर्ष एअर क्वॉलिटी मॉनिटरींगचा प्रकल्प सुखेनैव सुरू होता. त्यामध्ये काम करत सुमारे पन्नासेक विद्यार्थी पुढं निघून गेले होते. पण एम.एस्सी.च्या पुढं त्या प्रमाणात काही नेणं या दोघांना शक्य झालं नव्हतं. या दहा वर्षांच्या काळात दोघांच्या हातून झालेल्या पी.एच.डी. संशोधनांची संख्या अवघ्या दोन्ही हाताच्या बोटांमध्येच सामावून जाणारी होती. विद्यार्थी एम.एस्सी. करीत आणि बाहेर जात. त्यामुळं दरवर्षी निकालावर वेगळ्या दृष्टीतून नजर ठेवणं हे फडणीसांचं अलीकडं एक कामच झालं होतं. सुशांत देशमुखचं नाव त्यांच्यासमोर झळकलं ते त्याच अर्थानं. आणि एकदा का असं नाव डोळ्यांत भरलं की, ते काही काळात मॉनिटरिंगच्या प्रकल्पावर येण्यास वेळ लागत नसे. सुशांतचंही तसंच झालं. या प्रकल्पावर तो आला आणि त्याचवेळी त्याच्या पीएच.डी. संशोधनाची आऊटलाईन विद्यापीठाला सादर झाली: 'शहरातील वायूप्रदूषणाचा स्तर : प्रमुख चौकांतील पाहणी'.
---
विद्यापीठाच्या एकूण कारभाराचं स्वरूपच असं होतं की, सुशांतचा हा प्रस्ताव मंजूर होण्यास वेळ लागला नाही. जाधवांनी स्वतः प्रस्तावावर छाननी समितीची बैठक वगैरे सोपस्कारांना खुबीने फाटा देत थेट समितीच्या अध्यक्षांची सही घेऊन सुशांतला पत्र रवाना होईल असं पाहिलं आणि चार केंद्रांवरचं मॉनिटरींगचं सुशांतचं काम सुरू झालं. संपूर्ण एका वर्षाचा कालावधी, तिन्ही मौसम आणि आठवड्यातील तीन दिवस मॉनिटरिंग असं आंतरराष्ट्रीय मापदंडांमध्ये बसणारं वेळापत्रक आखलं गेलं. शहरालगतच्या एका आयटी पार्कची निवड कंट्रोल साईट म्हणून करण्यात आली. औद्योगिक वसाहतीतील, पण महामार्गापासून दीड किलोमीटर आत असणारा एक चौक, मध्यवर्ती रहिवासी क्षेत्रातील बस थांबा आणि नव्या विस्तारित भागातील गजबजलेला एक चौक अशी ही चार केंद्रं. केंद्रांची निवडही शहरीकरणातली वेगवेगळी क्षेत्रं सूचित करणारी होती. या चारही साईट्स विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या मॉनिटरिंग साईट्सच होत्या. सुशांतवर अट एकच होती.