संशोधन

श्रावण मोडक

(पृष्ठ २)

त्याच्या ठरलेल्या तीन दिवसांप्रमाणेच उरलेले चार दिवसही त्याने सकाळ आणि संध्याकाळच्या मॉनिटरिंगवर लक्ष ठेवायचं. त्या बदल्यात त्याला दरमहा हजार रुपयांचं विद्यावेतन मिळणार होतं. त्याचं संशोधनही मार्गी लागणार होतं.
---
माझ्यासमोर पहिल्यांदा हा विषय आला तो अगदी सहजच. विद्यापीठातल्या एका संशोधकानं माझ्याकडे दिलेल्या अनुवादाचं काम घेऊन गेलो होतो. हॉस्टेलसमोरच्या कँटीनवर एका मित्रासमवेत चहा पित गप्पा सुरू होत्या तेव्हा सुशांत तिथं आला. या मित्रानंच आमचा परिचय करून दिला. तो पीएच.डी. करीत असल्याचं त्यावेळीच कळलं. एकूणच पर्यावरण या विषयातील माझा रस ऐकण्यापुरता भरपूर असल्यानं मी त्याच्याकडून ऐकू लागलो. चौकाचौकांत फलकांवर दिसणारे प्रदूषणाचे आकडे रोज पहात असल्यानं शहरातील स्थिती खरोखरच काय आहे हे समजून घेण्याची ही एक संधी असाही एक कावेबाज दृष्टिकोण होताच. हे आकडे म्हणजे हल्ली माझ्यालेखी चेष्टेचा विषय झाले होते. मान्य पातळीच्या दुप्पटीच्या आसपास किंवा त्यापेक्षाही पुढे असेच ते असायचे. त्यातून खरंच किती लोकजागरण होत होतं हा वेगळ्याच संशोधनाचा विषय होता. अर्थात, या क्षेत्रात अनेकांचे अनेक पातळ्यांवर असणारे स्टेक्स ध्यानी घेता मी ते फारसे गंभीरपणे घेतही नव्हतो. स्टेक्स म्हणजे लोकजागर करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला मिळणारी अनुदानं, हे आकडे मिळवून देण्याचं काम करण्यासाठी विद्यापीठाच्या विभागाला मिळणारी अनुदानं, त्यानिमित्त प्रकल्पावर काम करणाऱ्या शिक्षक मंडळींना मिळणाऱ्या वेगवेगळ्या संधी असे सारे प्रकार.
"नेमका विषय काय आहे?" मी.
सुशांतनं सांगितलं, "शहरातील प्रमुख चौकातील प्रदूषण."
"व्वा! पण यातून नेमकं स्पष्ट होत नाहीये."
सुशांत बोलू लागला. गेल्या काही वर्षांमध्ये वाढत चाललेलं प्रदूषण, शहरात त्याची तीव्रता, वाहनांची संख्या आणि गर्दी असं करीत-करीत तो त्याच्या विषयावर आला. "चार ठिकाणी मॉनिटरिंग करतोय. त्यावरून शहरातील प्रदूषणाचा स्तर कसा आहे आणि त्याच्या निवारणासाठी काय करावे लागेल, हे मांडणार आहे."
"गाईड कोण आहेत?"
"फडणीस आणि जाधव."
"त्यांचा काय संबंध? जिओलॉजी आणि केमिस्ट्री."
"आमच्या विभागाचे आमचे म्हणून शिक्षकच नाहीत. इतर विभागांकडून उसने घेऊनच आमचं काम चालतं." सुशांतचं उत्तर. म्हणजे त्याला हे ठाऊक होतं पक्कं.
"खरंय ते. किती झालंय काम?"
"मॉनिटरींगचा शेवटचा महिना आहे. ते झालं की लेखन सुरू."
शुभेच्छा देऊन मी संवाद संपवला. नवीनच ओळख होती, त्यामुळं फारसा खोलात शिरलो नाही.
---
'द एअर'चे प्रकाशन सुरू होऊन दहा वर्षे झाली होती. हवेशी संबंधित प्रत्येक गोष्टीतील प्रत्येक नव्या संशोधनाची ओळख करून देणारं नियतकालिक एवढाच त्याचा रुबाब नव्हता. त्याहीपलीकडं त्याकडं पाहिलं जायचं ते त्याचे संपादक जॉर्ज मिलर यांच्यामुळं. मिलर हा हवेच्या प्रदूषणासंबंधातील अखेरचा शब्द मानला जात असे. त्यांनी त्यांच्या चिकीत्सक वृत्तीतूनच या नियतकालिकाला आकार दिला होता. त्याची प्रतिष्ठा निर्माण केली होती. जगातील सर्वच प्रमुख संशोधन संस्थांमध्ये स्थान मिळवून दिलं होतं. अवघ्या दहा वर्षांमध्ये विशिष्ट विषयाला वाहिलेलं हे नियतकालिक व्यावसायिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं होतं ते त्यातूनच. मुळात हे क्षेत्रही तसं अजून वाढीच्या अवस्थेत होतं हा एक भाग होताच. पण मिलर यांची चिकीत्सक वृत्ती ही त्याला जोड म्हणून लाभदायी ठरली होती हे निश्चित. प्रकाशनासाठी आजच्या घडीला 'द एअर'कडे शोधनिबंधांची प्रतीक्षा यादी सहा महिन्यांच्या काळापर्यंतची होती. प्रतिक्षा यादीचा काळ वाढवणं म्हणजे नियतकालिकाचं यश की, वेळच्या वेळी शोधनिबंध प्रकाशित करण्याची क्षमता तयार करणं हे यश, या प्रश्नातून मात्र मिलर यांची अद्याप सुटका झालेली नव्हती.
मिलर यांनी अकराव्या वर्षातील दुसऱ्या अंकाच्या डमीवर नजर मारून तो छपाईला पाठवण्याची सूचना केली आणि मेलकडे नजर वळवली. दर शनिवारी संध्याकाळी ते जगभरातून विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या मेलना उत्तरं देत असत. त्यादिवशी इतर व्यवहार नाही. विद्यार्थ्यांच्या मेल म्हणजे हवा आणि प्रदूषण यांच्याशी संबंधित. त्यांच्या शंकांचं निरसन, कुणाला इतर काही मार्गदर्शन, या क्षेत्रातील संधींविषयी थोडा माहितीपर ऊहापोह असं या इमेलव्यवहाराचं स्वरूप असायचं. बहुतेक प्रश्नोत्तरं यापैकी दुसऱ्या दोन प्रकारातीलच असायची. पहिल्या प्रकाराबाबत वारंवार त्यांनी 'द एअर'मधून आवाहन करूनही फारशा मेल येत नसतच. त्याला आपली प्रतिष्ठा आड येत असावी अशी त्यांची शंका होती. त्या शनिवारी मात्र एका मेलनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं.
"एअर पोल्यूशन मॉनिटरिंग" इमेलचा विषय स्पष्ट होता. विद्यार्थ्याचा प्रश्न नेमका होता. एका साईटवरून केलेल्या मॉनिटरिंगचे आकडे त्याभोवतीच्या किती क्षेत्रासाठी लागू ठरू शकतात किंवा किती क्षेत्रासाठी एक मॉनिटरिंग साईट आवश्यक आहे? प्रश्नकर्ता होता सुशांत देशमुख. भारतातील एक विद्यार्थी.
मिलर चमकले. एक तर हा देश या क्षेत्रातच तसा नवीन होता. तिथं मॉनिटरिंग सुरू होऊन अवघी दहा वर्षँ झाली होती. पाश्चात्य देशांमध्ये मॉनिटरिंग सुरू होऊनच आता अडीच दशकांहून अधिक काळ गेला होता. पण या काळात असं काही प्रमाण ठरवलं गेल्याचं त्यांच्याही आता ध्यानी येत नव्हतं. हवेतील प्रदूषणाचं मॉनिटरिंग करणाऱ्या केंद्रांची म्हणजेच साईट्सची संख्या इतकी प्रचंड होती की, त्याचे क्षेत्रनिहाय प्रमाण हा मुद्दा त्यांच्या विमर्षामध्ये तसा शिरून बसलेला नव्हता. या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे काही त्यांच्या ध्यानी येत नव्हतं. "असं नेमकं सांगता येणार नाही. प्रत्येक देशानं त्याचं काही प्रमाण ठरवलेलं असतं. त्यानुसारच ती व्यवस्था साकारावी लागते. तुमच्या देशातही त्याचं काही प्रमाण निश्चित झालं असेल. त्यातूनही पुढं जाऊन सांगायचं तर त्या प्रमाणात केलेल्या मॉनिटरिंगमधूनही नेमकी स्थिती स्पष्ट होत असतेच असं नाही. अखेर हे सारं इंडिकेटिव्ह स्वरूपाचं असतं आणि त्यातून प्रदूषण निर्मूलनासाठी काही मार्ग मिळतात इतकंच!" मिलर यांनी उत्तर लिहिलं.
---
प्रदूषणाचं मापन करण्यासाठी चार साईट्सवर मशीन्स होती. रेस्पिरेबल डस्ट सँपलरमध्ये फिल्टर पेपर ठेवायचा, मॉनिटरिंगच्या काळात त्यावर धूलीकण वगैरे जमा होतात. नंतर तो पेपर काढून त्याचं रासायनिक विश्लेषण करून त्या धूलीकणांमध्ये काय-काय आहे, त्यांचं प्रमाण किती आहे वगैरे बाबी निश्चित करायच्या अशी प्रयोगाची प्रक्रिया होती. सुशांतला फिल्टर पेपर मॉनिटरिंग प्रकल्पातून मिळत होतेच. प्रश्न होता तो फक्त विश्लेषणाचा. आठवड्याकाठी त्याच्याकडे छत्तीस फिल्टरपेपर जमा व्हायचे. त्यांचं विश्लेषण करण्यासाठी त्याच्या स्कूलमध्ये तर प्रयोगशाळा नव्हती. ते शक्य होतं केमिस्ट्रीच्या प्रयोगशाळेत किंवा जनरल सायन्सेसच्या प्रयोगशाळेत. त्यापैकी जनरल सायन्सेस आणि त्याचं स्कूल यांच्यातून विस्तव जात नव्हता. हेल्थ सायन्सचे प्रमुख डॉ. राकेश भटनागर यांनी त्याला आधीच स्पष्ट सांगितलं होतं. "तिथं काम करतोस तर तिथल्या चॅनलमधून करून घे सारं काही. पुढे त्रास नको. आणि मला त्यात पडायचंही नाही." त्यांनी हे असं का सांगितलं असावं हे सुशांतच्या ध्यानी आलंही आणि नाहीही. आलंही म्हणजे त्याला कळलं की डॉक्टरांच्या या सांगण्यामागं आपल्याच हिताची चिंता आहे. ध्यानी आलं नाही ते त्यामागं खोलवर दडलेलं राजकारण. ते ध्यानी आलं असतं तर कदाचित भविष्यातील सुशांतची पंचाईत वाचली असती. पण...
केमिस्ट्रीकडं सुशांतनं आपल्या फिल्टरपेपरच्या विश्लेषणासाठी धाव घेतली तेव्हा त्याच्यासाठी मोठा धक्का प्रतीक्षा करीत होता. तिथं विश्लेषणासाठी त्याला एका पेपरच्या एका पॅरामीटरसाठी (म्हणजेच विश्लेषणातून एका घटकाची माहिती काढण्यासाठी) वीस रुपये मोजावे लागत होते. सुशांतला आराखड्यानुसार प्रत्येक पेपरमधून पाच घटकांची माहिती काढायची होती. म्हणजेच आठवड्याला येणारा खर्च ३६०० रुपयांवर तर वर्षाच्या विश्लेषणाचा खर्च दोन लाख रुपयांच्या घरात जाणार होता. "यावर तुला काही तरी मार्ग काढावा लागेल. इतका खर्च करणं तर शक्य नाही हे मलाही समजतं. आपल्या प्रयोगशाळेत तर इतकं विश्लेषण शक्यही नाही." फडणीसांचं हे उत्तर सुशांतच्या लेखी कडेलोट होतं. पण त्यानं धीर सोडला नाही. "तुम्ही काही सजेस्ट करा, सर. त्यानुसार आपण मार्ग काढू." काही वेळ विचार करून फडणीस बोलू लागले, "सुशांत, तुझ्या मागच्या प्रेझेंटेशेननं डॉ. ठाकूर खूप इम्प्रेस झाले होते. त्यांच्याशी तू संपर्क का नाही साधत?" सुशांतच्या काही लक्षात आलं नाही, हे फडणीसांच्या ध्यानात आलं. त्यांनी सविस्तर खुलासा केला आणि पंधरवड्यानंतर सुशांतनं पेच सोडवला. ठाकूर यांची स्वतःची पर्यावरणविषयक पाहण्या करणारी छोटी संस्था होती. त्यामार्फत काही उद्योगांमध्ये वायूप्रदूषणाची मोजणी करण्याचं काम केलं जात असे. तेवढ्यापुरतं काम करू शकणारी प्रयोगशाळाही त्यांनी उभारली होती. फडणीसांनी सांगितल्याप्रमाणं सुशांतनं ठाकुरांशी संपर्क करताना वैयक्तिक स्वरूपातच मदतीची विनंती केली. ठाकुरांची शिस्त, प्रोफेशनल ऍप्रोच या बाबी ध्यानी घेता, त्यांचा इकडं अभावच असल्यानं ते विद्यापीठातील या विभागासाठी साह्य करण्यास फारसे उत्सुक नसतात हे फडणीसांनी सुशांतला सांगून टाकलं होतं. त्यामुळं त्याला वैयक्तिक विनंती करणं भाग पडलं आणि ते त्याच्या पथ्यावर पडलंही. कारण ठाकुरांनी त्याच्यासाठी आपल्या प्रयोगशाळेची दारं खुली केली, तीही मोफत.