संशोधन

श्रावण मोडक

(पृष्ठ ३)

आपण केलेलं मॉनिटरिंग चारच साईट्सवरचं असताना पूर्ण शहराविषयी आपण कसं भाष्य करू शकू? असा प्रश्न घेऊन सुशांत जेव्हा फडणीस आणि जाधवांसमोर गेला तेव्हा ते दोघंही चमकले. सुशांतचा प्रश्न त्याच्या संशोधनापुरता मर्यादित असला तरी, हे दोघं चालवत असलेल्या प्रकल्पातील मॉनिटरिंग साईट्स त्याच असल्यानं त्या प्रश्नाचे व्यापक परिणाम त्यांच्या क्षणार्धात ध्यानी आले. हा मुलगा काम करतोय इतकंच आजवर त्यांनी पाहिलं होतं. तो काय काम करतोय, त्याचे परिणाम काय येताहेत या तपशीलात ते पडले नव्हते. त्यातही त्याच्यावरचं खरं काम फडणीसांचं होतं. ते मुख्य मार्गदर्शक होते. त्यामुळं जाधव तसे दूरान्वयानंच या संशोधनाशी संबंधित होते. पण सुशांतनं उपस्थित केलेल्या प्रश्नाची गोम किती खोलवर जाऊ शकते हे ध्यानी येण्याइतके व्यवहारचतुर नक्कीच होते.

जाधवांनी विषय अत्यंत मुत्सद्दीपणानं वळवला. "ते आपण ठरवू तपशीलाचं. आधी तुझ्या मॉनिटरिंगचे निष्कर्ष काय आहेत ते तरी पाहिलं पाहिजे. तू चार्ट केले असतीलच ना आकड्यांचे? ते घेऊन ये." फडणीसांनी त्यावेळी सोडलेला निःश्वास ऐकण्याइतके सुशांतचे कान तरबेज नसावेत बहुधा.
सुशांतने दिलेले चार्ट पाहिल्या-पाहिल्या एक गोष्ट स्पष्ट होत होती. ते आकडे आणि शहरात जागोजागी झळकत असणारे आकडे यामध्ये तफावत होती. तफावतही थोडीथोडकी नव्हती. सुशांतच्या प्रयोगातील आकडे प्रदूषणाच्या मान्य स्तराच्या आसपासचेच होते, अर्थातच, मान्य स्तरापेक्षा अधिक. सुशांतचं मॉनिटरिंग आठवड्यातील तीन दिवस होतं. एका क्षणात जाधवांसमोर चित्र स्पष्ट झालं.
---
व्हीसींच्या समोर सुशांत देशमुखचा अर्ज आला तेव्हा त्यांच्या कपाळावर किंचित आठ्या आल्याच. किती नाही म्हटलं तरी, विद्यार्थ्यांच्या अशा अर्जांचा निपटारा करणं त्यांच्या जिवावर येत असे. त्यांचा सारा भर असायचा तो विस्तार आणि विकास यावर. विद्यापीठाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत हा त्यांचा गेल्या तीन वर्षांत कुलगुरूपदावरून केलेल्या प्रत्येक भाषणातील भरीचा मुद्दा असायचाच. त्यामुळं विद्यार्थ्यांची गाऱ्हाणी समोर आली की ते वैतागत. "या कामांमध्ये मी वेळ घालत बसलो तर विस्तार आणि विकासाकडे लक्ष कसं देता येणार?" काही दिवसांपूर्वी त्यांच्यासंदर्भात एका वृत्तपत्रात टीका झाल्यानं त्यांनी पत्रकार परिषदेनंतर अनौपचारिक गप्पांमध्ये त्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला विचारलं होतं. तो बिचारा कानकोंडा होऊन गेला होता. पण...

हा 'पण'च त्यांच्या कुलगुरूपदाचा एक भाग होता. त्यामुळं त्यांना तो अर्ज समोर घेऊन वाचणं भाग पडलं. दोन पानी मजकूर होता. दोन्ही गाईडविरुद्ध त्याची तक्रार होती. आरोप गंभीर होता. पी.एच.डी. संशोधनाच्या लेखनात अडथळे आणल्याचा. तक्रार अत्यंत सौम्य शब्दांत, पण स्पष्ट मांडणी करणारी होती. "डिफरन्सेस ओव्हर स्टाईल ऑफ रायटिंग" असं मुख्य कारण देण्यात आलं होतं. त्यापुढं काही विशिष्ट बाबींचा उल्लेख होता. थिसीसच्या प्रकरणांची मांडणी हा मुख्य मुद्दा. तीनवेळेस झालेली चॅप्टरस्कीम, त्याच्या ट्री चार्टसह आणि तिन्हीची व्यवस्थित तुलना करून आरंभीच तयार केलेली स्कीम योग्य असताना इतर दोन स्कीम्सचा आग्रह आणि त्यातून खोळंबलेलं काम; लिहून दिलेल्या मजकुरावर नेमकेपणानं टिप्पणी न करता संदिग्ध स्वरूपात केलेल्या शेरेबाजीचे दाखले मुद्देसूद मांडण्यात आले होते. एकूण चित्र असं दिसत होतं की, कुठं तरी पाणी मुरतंय.

व्हीसींनी आपल्याला भेटीसाठी वेळ दिल्याचं समजलं तेव्हा सुशांतच्या आशा पल्लवित झाल्या.

"तुझा हा प्रस्ताव मी पूर्ण वाचला आहे. पण त्यात हायपोथेसीसच नाही!" व्हीसींनी सुशांतचा संशोधन प्रस्ताव पुन्हा त्याच्या हाती ठेवत सांगितलं. त्यांच्या या वाक्यात खरं तर संशोधनाची हाताळणी कशी झाली होती, हेच स्वच्छ दिसत होतं.

"तू असं कर. स्टॅटिस्टिक्सच्या परांजप्यांना भेट. तू मिळवलेल्या माहितीच्या आधारे काही मॉडेलिंग करता येतं का हे ते सांगतील. मी त्यांच्याशी बोललो आहे. तोवर बाकी विषय बाजूला राहूदे. तुझं काम चालू ठेव. परांजप्यांशी झालेली चर्चा मला कळव. त्यानंतर आपण ठरवू."
---
व्हीसींची मुदत संपली तोवर सुशांतचा प्रश्न मार्गी लागलेला नव्हता. परांजप्यांनी उपलब्ध आकडेवारीच्या आधारे मॉडेलिंग कसं करता येईल हे त्याला समजावून दिलं जरूर होतं, पण फडणीस आणि जाधव यांच्यापुढे काही प्रगती होत नव्हती. सुशांतनं व्हीसींकडं मागणी केली होती की, त्याला स्वबळावर हे संशोधन पूर्ण करण्याची मुभा द्यावी आणि त्यासाठी दोन्ही मार्गदर्शकांनी ना हरकत द्यावी. तिथंच दोन्ही मार्गदर्शकांनी त्याला खिंडीत गाठलं होतं. "केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या साधनसामग्रीचा वापर करून मिळवण्यात आलेल्या सांख्यिकीचा कोणत्याही प्रकारे आधार न घेता संशोधन स्वबळावर पूर्ण करण्यास आमची हरकत नाही," असा दाखला दोघांनी दिला होता. आपण वापरलेली साधनसामग्री सीपीसीबीची आहे हे सुशांतच्या गावीही नव्हतं. "विद्यापीठानं दिलेल्या साधनसामग्रीचा वापर करून मी संशोधन केलं आहे." हे त्याचं म्हणणं हवेतच विरून गेलं होतं.

व्हीसींनीही नंतर त्याचा आधीइतक्या पुढाकाराने पाठपुरावा करणं सोडलं होतं. कारण स्वाभाविक होतं, त्यांची मुदतच संपत आली होती. ती संपलीही आणि डॉ. रामकृष्ण ठाकरे यांची नियुक्ती झाली तेव्हा सुशांतचा न्यायालयात जाण्याचा निर्णय झालाही होता. मुंबई उच्च न्यायालयात अॅड. तुषार जोशी यांच्यामार्फत त्याची याचिका सादर झाली होती. पी.एच.डी.चं संशोधन पूर्ण होण्यात मार्गदर्शकांकडून निर्माण झालेले अडथळे पाहता हे संशोधन स्वबळावर पूर्ण करून देण्यासाठी मार्गदर्शकांनी टाकलेल्या अटी काढून टाकण्यास विद्यापीठाला भाग पाडावं, अशी ही याचिका होती. सोबत सीपीसीबीचं पत्र होतं, विद्यार्थ्यानं आपल्या साधनसामग्रीचा वापर करून संशोधन करण्यास काहीही हरकत नसल्याचं.

"केस आपल्या फेवरमध्ये आहे. फक्त कोरम काय असेल ते पहावं लागेल. सामान्यपणे अशा प्रकरणात जजेस फारसं इंटरव्हेन्शन करण्यास तयार असत नाहीत हे मात्र ध्यानी ठेवावं लागेल," तुषारच्या या खास वकिली वाक्यातील खोच आम्ही त्याला भेटलो तेव्हा ध्यानी आली नव्हती. ती आली तेव्हा मात्र खूप उशीर झाला होता.

"या प्रकरणात गाईड्सनी काही अटी टाकल्या आहेत. त्या पूर्ण केल्या तर संशोधन पुढं सरकू शकतं," जज्जचे हे शब्द कानी पडले तेव्हा सुशांत आणि मी अशील मंडळी बसतात तिथं बसलो होतो. तुषारनं मागं वळून आमच्याकडं पाहिलं आणि क्षणात पुन्हा जज्जांकडं पहात होकारार्थी मान डोलावली. ज्या अटी काढून टाकण्यासाठी याचिका केली होती, त्याच अटींचा स्वीकार करण्याची वेळ पुढच्या क्षणात आली आणि कोणाला काही कळण्याच्या आतच पुढच्या केसचा पुकारा झाला.

"हा आदेश निघाल्यानंतर तुम्ही पुन्हा विद्यापीठाकडं त्या अटी काढून टाकण्यासाठी अर्ज करा", हा तुषारचा सल्ला होता आणि सुशांतच्या समोर सारं चित्र स्पष्ट होत गेलं. "व्हीसींना काऊंटर करू नका. अत्यंत सौम्य शब्दांत अर्ज करा" तुषारचं पुढचं वाक्य होतं. कदाचित, त्याच क्षणी सुशांतचा काही निर्णय झाला असावा.
---
"ही सत्याची किंमत असते, सुशांत." मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. पी.एच.डी. सोडून देण्याचा त्याचा निर्णय होता. त्यानं तो मला सांगितला तेव्हा त्याला त्यापासून परावृत्त कसं करावं ह्या पेचात मी पडलो होतो. आपल्याला घ्यावे लागणारे कष्ट पाहता त्यातून म्हणावी तशी फलनिष्पत्ती होत नाही, हे त्याचं म्हणणं होतं. पुढं काय करायचं आहे याचाही त्यानं नीट विचार केलेला दिसत होता. "मी आता बाहेर पडणार आहे. एकूणच इथं माझा जो अभ्यास झालेला आहे तो एम.एस्सी.च्या स्तराचाच आहे. पीएच.डी.च्या माझ्या प्रस्तावात हायपोथेसीसही नाही हे मला व्हीसींकडून ऐकून घ्यावं लागलंच आहे. त्याचा अर्थ माझ्यातही कुठं तरी काही तरी कमी असावं. हे सगळं दुरूस्त करायचं असेल तर माझ्या या क्षेत्रात अधिक चांगलं जिथं मिळेल अशा ठिकाणीच मला जावं लागेल. मी इथं थांबणार नाही."

त्याचं सारं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मी त्याला सत्याची किंमत समजावून सांगू पहात होतो.

"तू म्हणतोस त्यात तथ्य असेलही. पण मला एक कळत नाही, सत्यालाच नेहमी अशी किंमत का मोजावी लागते? आणि त्या तुलनेत असत्याला होणारी शिक्षा काय असते?"

माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नसतं. असतं ते तत्वज्ञानच. "सत्य सिद्ध होण्यानं दीर्घ काळापर्यंतचं समाधान मिळतं. तुझी लढाई सिस्टमशी आहे. त्यात तुला हे असे अडसर ओलांडावे लागणारच..."

"तत्त्वतः मान्य. पण ते ओलांडण्यात माझे जे कष्ट जाणार आहेत तेवढेच करून मी माझी रेषाच थोडी मोठी करणं पसंत करेन."

माझ्याकडं त्याला सांगण्यासारखं सारं संपलेलं होतं.
---
बँकेचं कर्ज आणि इतर माध्यमांतून थोडा पैसा उभा झाल्याचं सुशांतनं अमेरिकन दूतावासाला कळवलं तेव्हा त्याला व्हिसाच्या मुलाखतीसाठी बोलावणं आलं.
"तुम्ही हे शिक्षण घेतल्यानंतर तेथेच राहणार नाही याची काय खात्री?" हा ठरलेला प्रश्न त्याच्यासमोर येणार होताच. त्यावर उत्तर म्हणून इथल्या फ्लॅटची कागदपत्रं, पत्नीच्या नोकरीची प्रमाणपत्रं तयार ठेवण्यात आली होतीच, पण सुशांतचा इरादा काही वेगळाच होता हे मला ठाऊक नव्हतं. मुलाखतीनंतर परतताना मी त्याला विचारलं, तेव्हा त्यानं उत्तर दिलं.

"मी म्हणालो, 'टू बी फ्रँक, आय वुईल बी हॅविंग सच सॉर्ट ऑफ एज्युकेशन, दॅट, फॉर द नेक्स्ट फाईव्ह इयर्स अ‍ॅटलीस्ट, देअर वुईल बी नो ऑपॉर्च्युनिटी फॉर मी हिअर. व्हॉटेव्हर ऑपॉर्च्युनिटीज आर देअर, दे आर इन द डेव्हलप्ड नेशन्स लाईक युवर्स. इन धिस केस, आय कॅन जस्ट शो यू सम इंटरेस्ट्स हिअर टू अॅश्युअर यू ऑन पेपर दॅट आय वुईल रिटर्न. हाऊएव्हर दॅट वोंट बी ऑनेस्ट.'..."

मी उडालोच. तो पुढं बोलतच होता, "माझ्या त्या उत्तरानं तो ऑफिसरही चक्रावला. पण लगेच म्हणाला, 'जस्ट बिकॉज यु आर ऑनेस्ट, आयम गिव्हींग द ग्रीन सिग्नल. नो मोअर क्वेश्चन्स. बट गिव्ह मी अ ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ व्हॉट यू आर गोईंग फॉर.' पुढं मी त्याला विकास आणि पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग या संदर्भाच्या चौकटीत माझ्या अभ्यासाची माहिती दिली. आणि व्हिसा मंजूर झाला."
---
विद्यापीठात आता डॉ. रामकृष्ण ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काम सुरू आहे. ठाकरे यांची आंतरराष्ट्रीय ख्याती ध्यानी घेता विस्तार आणि विकासाच्या आघाडीवर विद्यापीठ बरंच बातम्यांमध्ये असतं. दर आठवड्याला एकदा तरी ठाकरे पत्रकारांशी सुसंवाद साधतात. या विद्यापीठाला जगातील मान्यवर विद्यापीठांच्या यादीत नेण्यासाठी त्यांच्या प्रत्येक जोरदार प्रयत्नांची एक बातमी होत असतेच. जगातील मान्यवर अशा शंभर विद्यापीठांच्या यादीत या विद्यापीठाला नेण्याच्या दृष्टीनं त्यांनी एक मास्टर प्लॅनदेखील आखला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून शंभर कोटी रुपयांचं खास अनुदान मिळवण्याच्या त्यांच्या खटपटींना यश येण्याची चिन्हं आहेत, असंही आता बातम्यांत सांगितलं जाऊ लागलं होतं.
---
यावर्षीच्या एम.एस्सी.च्या निकालावर फडणीस नजर फिरवत होते तेव्हा त्यांच्या ध्यानी आलं की, गेल्या दोन वर्षांत पुन्हा एकदा विद्यापीठातील विभागांचेच विद्यार्थी पहिल्या पाचामध्ये झळकले आहेत. म्हणजे त्यांनाच आता पुढच्या संशोधनासाठी प्रवृत्त करावं लागणार, हे त्यांच्यासमोर स्पष्ट झालं. जाधवांची त्याला ना असणार नाहीच हेही त्यांना ठाऊक होतं आणि त्यादृष्टीनं त्यांनी त्या यादीवर पुन्हा एक बारीक नजर फिरवण्यास सुरवात केली.