आवरताना काल मिळाल्या काही कविता

अनिरुद्ध अभ्यंकर

 

 

आवरताना काल मिळाल्या काही कविता
लिहिलेल्या मी साऱ्या होत्या तुझ्याच करता

 

लिहायचो मी पत्र तुला दररोज पानभर
जपुनी ठेवली ती सारी मी न पाठवता

 

तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी
आले नाही कधीच पण ते मज गोठवता

 

दिलेस तू ते फूल आजही वहीत आहे
गंध तुझा मज करतो वेडा वही उघडता

 

अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित
वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता

 

कधी एकटा असलो की मी रडून घेतो
सवयीने मग येते आता हुकुमी हसता

 

खूप ठरवले सारे सारे विसरायाचे
कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता?