नेहमीसारखाच धडपडता दिवस

अनु

वेळ सकाळ ७. १३
’निळी ओढणी सापडत का नाही’ म्हणून दोन खणातले गठ्ठे उचकल्यावर ओढणी सापडते आणि अनूला अंगावरच्या कपड्यांसहित ’युरेका!! ’ ओरडायचा मोह होतो. ’अरे! डि‌ओडरंटच्या फवार्‍याशेजारी हा मॉर्टिनचा ’ऑल इन्सेक्ट किलर’ फवारा कोणी ठेवला? मूर्ख! बावळट! खाकेत विष फवारले असते ना आता डि‌ओ समजून.. अनू, मी तुला व्यवस्थित टापटिपीची समजत होते. कोण होतीस तू, काय झालीस तू... ’ इ. इ. स्वगते उच्चारत हपिसाला जायची तयारी होते. नवरोबा झोपलेले. ’उठ आता. उशीर हो‌ईल पुढे.. मी निघते, चल बाय! ’
’हे काय? अशी पगडी घालून जाणार आहेस हपिसात? नाही म्हणजे बायका हपिसात केस विंचरतात हे माहिती होते, पण अशी टॉवेलची पगडी घालून हपिसात जायचं म्हणजे जरा टू मचच ना? ’
’उप्स!! ’ अनू धुतलेल्या केसांवरची टॉवेलची पगडी घा‌ईत काढून ती केसांच्या अस्ताव्यस्त टोपल्यावर मुंडासे उर्फ स्कार्फ गुंडाळते आणि निघते. दारात दुधाच्या पिशव्या टाकून विजेच्या वेगाने दूधवाला दुसर्‍या मजल्यावर चालला आहे. ’ए दूध!! ए दूध! शुक शुक! रुको!’ जिन्याच्या बाराव्या पायरीवरून दूधवाला ’अवंतिका’ मालिकेतल्या अवंतिकेसारखा मागे वळून पाहतो. ’क्या है बोलो ना! ’ ’कलसे ना, एकही पिशवी डालना हां! और परसोका खाडा बिलमें लिखा है क्या?’ अनू पुण्याच्या परंपरेला जागून हिंदी भाषेचा खून पाडते. ’हो लिहीतो यावेळी न विसरता!’ शुद्ध मराठीत म्हणून दूधवाला अडीच मजल्यापर्यंत आधीच पळालेला असतो.

वेळ सकाळ ७. २०
"हॅक्स्क्युज मेय, म्याय नो व्हे‌इज इ विंग? "
जुन्या कळकट फडक्याने दुचाकी पुसता पुसता अनू दचकते. समोर कानात डूल, वाढलेली दाढी, वाढलेले केस, नाडी आणून बांधली नाही तर घसरेल अशी वाटणारी जीन्स या वेषभूषेतला तरुण. "क्यालिफोर्निया बिबवेवाडी विमान कधी सुरू झालं? भल्या पहाटे हा इंपोर्टेड प्राणी इथे कसा अवतीर्ण झाला? वरच्या वरदे काकूंच्या मुलासारखा दिसतो का जरा? नाही, तो तर कालपरवापर्यंत बरंच आपल्यातलं इंग्रजी बोलायचा.. तो नसेल. आपल्या बिल्डिंगला इ विंग आहे का फक्त डी पर्यंतच आहेत? " असे अनेक विचार भरभर करून अनू आपल्या कुवतीनुसार ’अमेरिकन ऍक्सेंट’(म्हणजे अनूच्या समजुतीनुसार तोंडे वेडीवाकडी करून अस्पष्ट आणि भरभर उच्चार करणे) आवाजात आणून उत्तर देते "न्यो आय डोन’ स्पोझ धिस बिल्डिंग हॅस इविंग, यु खॅन चेकॅ‌उट द अड्रेस विथ वॉचमन" तरुण काहीतरी पुटपुटून जिन्यापाशी जा‌ऊन नावे वाचायला लागतो आणि अनू कचेरीच्या वाटेवर मार्गस्थ होते. चौकात भाजी ताजी आहे. घ्यावी का संध्याकाळसाठी? का संध्याकाळीच घ्यावी? का आता पण आणि संध्याकाळी पण? ’फायबर्स खा’ हा आरोग्यशास्त्रातला आग्रह आठवून अनू काकड्या, मटार आणि गाजर घेते. "या फुल्याफुल्याफुल्या आयटीवाल्यांमुळे गाड्या, घरं, सोनं, दगड, धोंडे, विमानं, भांडी, पाणी, वीज... अमुक, तमुक पुण्यात महाग झालंय बघा. हातात डॉलर युरोमध्ये पैसा आहे म्हणून नुसते वेड्यासारखे उडवत असतात लेकाचे" हे जनसामान्य मत ऐनवेळी आठवून अनू पाच मिनिटं हुज्जत घालून, प्रत्येक भाजीत दोन दोन रु. कमी दे‌ऊन आत्मिक समाधानाने तरंगत तरंगत पुढच्या प्रवासाला लागते. वाहतुकीची गर्दी सुरू होण्या‌आधी कचेरीत पोहचण्यातलं सुख अनुभवण्यासाठी अनूला स्वतःची नोकरी आवडत असते.

वेळ सकाळ ७. ५५
स्वतःच्या कचेरीच्या राखीव तिसर्‍या मजल्या‌ऐवजी दडपून दुसर्‍या कचेरीसाठीच्या पहिल्या मजल्यावर दुचाकी पार्क करून अनू लिफ्टपाशी येते. लिफ्टचा दरवाजा उघडल्यावर आलेल्या भपक्याने ’आजचा नाश्ता: तेलकट मेदूवडे आणि भरपूर भोपळे घातलेले सांबार वरच्या मजल्यावर सुखरूप पोहचले आहे’ ही वार्ता मिळते. लिफ्ट मध्ये टांगलेली ’उदवाहन चालवण्याची अनुमती(प्रत्यावर्तित धारा)’ वाचत ’इतके कठीण मराठी शब्द हे कागदपत्र बनवणार्‍यांना तरी कळत असतील का’ हा विचार करतानाच कचेरी येते. ’भाजीची पिवळी फुलंफुलंवाली फाटकी पिशवी लपवायला हवी’ ही पश्चातबुद्धी हो‌ईपर्यंत दारात शिरणार्‍या एकदोन जणांनी ती पाहिलेली असतेच! ’जा‌ऊ देत, जर लोक केस लाल रंगवून, हिरव्या पँटवर पिवळ्या आणि तपकिरी पट्ट्यांचा टीशर्ट आणि खाली पांढरे लाल बूट घालून कचेरीत येत असतील तर मेल्या माझ्या भाजीच्या पिशवीनेच काय घोडं मारलंय?’ हा विचार करून अनू ’कूल’ रहायचा प्रयत्न करत जागेवर स्थानापन्न होते. ’नखे कापायची आहेत’ ही आठवण नेहमी हपिसात आल्यावरच का यावी बरे? शेजारच्या जागेवरचा सहकारी आज लवकर आल्यामुळे ती पटकन नखं कापायचा विचार आवरता घेते. इलेक्ट्रॉनिक पत्रपेटी मधली ४०-५० ’फुकट कोकेन मिळवा’, ’सवलतीच्या दरात स्विस घड्याळे मिळवा’, ’तुमच्या प्रेयसीला खूष करा’, ’नायजेरियातल्या करोडपती टुंबा लुमुंबा यांनी मरताना ५ लक्ष डॉलर रँडमली तुमच्या नावावर केले आहेत, आम्हाला तुमच्या बॅंकेचे तपशील द्या, बाकी सगळं आम्ही करतो, तुम्हाला तीन दिवसात पैसे पाठवतो’ अशी तद्दन असंबद्ध पत्रे कचरापेटीत रवाना केल्यावर ’हे पत्र १० जणांना पाठवा, नाहीतर नोकरीत वा‌ईट घडेल, अमक्याने ५ मिनिटाच्या आत हे पत्र १० जणांना पाठवले, त्याला सहाव्या मिनिटाला लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली, तमक्याने पत्र लगेच कचर्‍यात पाठवले आणि त्याची नोकरी गेली’ हे पत्र जवळच्या मैत्रिणीकडून पाहून ’आपणही १० जणांना वैताग आणावा का’ या विचारात अनू पडते. पण शहाणं मन जिंकतं आणि हेही पत्र कचरापेटीत रवाना होतं. कचेरीच्या स्वागतिकेकडून ’सकाळच्या नाश्त्यात केस, स्टॅपलरची पीन, प्लॅस्टिकचा तुकडा कोणाला आल्यास तो पुरावा म्हणून व्यवस्थित जपून ठेवा’ या आशयाचे पत्र वाचून ’आपण नाश्ता कचेरीत करत नाही’ याबद्दल ती नव्याने सुटकेचा निश्वास सोडते. ’पाणीपुरी खाल्याने एड्स, मॅगी खाल्ल्याने कॅन्सर, मोबा‌ईल वापरल्याने ट्यूमर झाला’ इ. इ. पत्रे वाचून डोकं गरगरायला लागल्यावर (ना‌ईलाजाने) अनू रोजच्या कामाकडे वळते.

वेळ सकाळ ११. ००
प्रोग्राम फक्त ’आ‌उट ऑफ मेमरी’ हे अखेरचे तीन शब्द कसेबसे बोलून प्राण सोडतो आणि संगणकाच्या पडद्यावरून अदृश्य होतो. ’अरे सोन्या, नुसतं आ‌उट ऑफ मेमरी काय रे? जरा मनमोकळेपणाने तपशीलात बोललास तर ना मला कळणार तू आ‌उट ऑफ मेमरी का आहेस ते? असं मनातल्या मनात कुढून कसं हो‌ईल? बरं बाबा, थोडावेळ थोडावेळ विश्रांती घे.’ असा असा प्रेमळ संवाद साधून अनू ’जोधा अकबर’ चे परीक्षण आणि विकीपिडीयावर ’त्वचेची निगा’ ’केसाची निगा’ इ. इ. उपयुक्त माहिती वाचायला घेते. तितक्यात धूम्रपानासाठी गेलेल्या सहकार्‍यांच्या पादत्राणांचा ’टॉक टॉक’, ’फतक फतक’ आणि ’खर्र खर्र’ असा पदरव ऐकू येतो आणि ती सावध हो‌ऊन विकीपीडियावर योग्य ते तांत्रिक पान उघडते. तितक्यात मोबा‌ईल गुरगुरतो. कोणीतरी अमक्या तमक्या नोकरी सल्लागाराचा अमक्या तमक्या नोकरीतल्या संधीसाठी फोन आहे.. अनू ’आता फोनवर निवांत बोलायला कुठे जावे’ अशा विचारात इकडे तिकडे अंदाज घेते. चहाची वेळ असल्याने सर्वत्र सहकार्‍यांचा संचार आहे. प्रसाधनगृहात मोबा‌ईल लहरींची रेंज नाही.. बाहेर पण सगळे गप्पा मारत उभे आहेत. मोजकी हो/नाही मध्ये उत्तरे दे‌ऊन ती चहापानगृहात जाते. तिथे एक निवांत कोपरा शोधून संभाषण जरा सुरळीत चालू होतंय तितक्यात साक्षात साहेबच काहीतरी कामाचं सांगायला तिथे येतो. ’ए चल, मी फोन ठेवते गं, परवा पमीच्या डोहाळेजेवणात भेटूच, बाय!! ’ म्हणून अनूला संभाषणाचा पतंग काटणे भाग पडते. कुठेतरी बंगळूरुमध्ये बसून नॉयड्यात मुख्य शाखा असलेल्या कंपनीच्या पुणे शाखेसाठी उमेदवार(बकरे) पटवणार्‍या तेलूगू सल्लागाराची ’उमेदवारीणीच्या डोक्यात बिघाड असल्याबद्दल’ खात्री पटेल या विचाराने अनूला खीखीखी हसावेसे वाटत आहे. भरकटणार्‍या डोक्याला कामाकडे खेचून आणत ती जागेवर जाते. ’मुलाखतीच्या आदल्या दिवशी नवर्‍याशी भांडण केल्यास नोकरीची मुलाखत चांगली जा‌ऊन निवड होते’ ही अनूची नितांत श्रद्धा असते. त्यामुळे ती ’शुक्रवारी नवर्‍याशी भांडायला कोणता विषय निवडावा’ हा गहन विचार सुरू करते.

वेळ दुपार २.३०
डोळे कितीही ताणले तरी मिटत आहेत.. सल्लामसलतीच्या खोलीत चांगला अंधुक प्रकाश आहे, समोर पडद्यावर बरेच रंगीबेरंगी आलेख दिसत आहेत आणि साहेब ’कंपनीची वाढ, नियोजन, कामाचे तास, मागच्या वेळपेक्षा यावेळी कामात ०.३% दिरंगा‌ई, प्रगतीकडे वाटचाल, बजेट कमी, गिर्‍हा‌ईक मांगे मोर’ इ. इ. विषयांवर बराच वेळ बोलत आहे. अशा पोषक वातावरणात निद्रानाशाचा विकार असलेल्यालाही गाढ झोप लागेल.. आता डुलकी लागली तर शिक्षा म्हणून शाळेतल्यासारखे टेबलावर उभे करतील का, या चिंतेने अनू तातडीचा झोप घालवणारा विरंगुळा शोधायला घेते. वहीवर २१, २०... २, १ असे कमी करत ठिपके आणि चांदण्यांची रांगोळी. अशा वेळी मध्येच कोणी ’तुला या मुद्द्याबद्दल काय वाटते’ असे विचारल्यास ’मला वाटते आपण गरजांचा नीट अभ्यास करून मगच निर्णय घेतला पाहिजे’ असे ’नरो वा कुंजरो वा’ उत्तर अनूने मनात तयार करुन ठेवलेले असते.