प्राथमिक शाळा

सुधीर कांदळकर

(पृष्ठ २)

नेरूरकर बाई देखण्या नसल्या तरी नीटनेटक्या होत्या. एरवी त्या एक शेपटा पाठीवर सोडीत. सणावारी आंबाडा असे. व आंबाड्याभोवती डौलदार वेणी. हे मला आमच्या इमारतीतीत बेबीने दाखवले. मुलांना या गोष्टी कुठून दिसणार! त्या जवळ आल्या की फुले व पावडर याबरोबर त्यांच्या साडीच्या स्टार्चचा देखील वास येई. बेबी चवंडे माझ्यापेक्षा पाचसहा वर्षाने मोठी. मला न दिसणार्‍या बर्‍याच गोष्टी तिला सहज दिसत. हा तपशील तसेच जोशीबाईंचा तपशील पण तिनेच पुरवलेला. उजव्या बाजूच्या काही रांगा मुलींच्या होत्या. नेरूरकर बाई दुसरीला सगळे विषय शिकवीत होत्या. त्या फारच प्रेमळ होत्या. मुलांनी कधी फारशी मस्ती केली नाही. त्यांनी कोणाला कधी शिक्षा केली नाही वा मारले नाही. कोणी मस्ती केलीच तर त्या मित्रत्त्वाच्या नात्याने समजावून सांगत की असे करू नये. तरी हूड मुलेमुली कधीतरी मस्ती करीतच. कविता तर छानच समजावून सांगत. 'देवा तुझे किती सुंदर आकाश' तर छानच शिकवली. 'मी खीर खाल्ली तर बूड घागरी' हा धडा शिकवतांना तर त्या आमच्यातल्याच एक झाल्या होत्या. दोनचारदा त्यांच्या लक्षात आले की मुले आज कंटाळली आहेत. मग त्या एखादी गोष्ट सांगत. एकदा तर त्यांनी किशोर मासिकात आलेली उसाच्या शेतातल्या चोरांची एक छान गोष्ट वाचून दाखवली होती. कधी कुणाला गाणे म्हणायला सांगत. सुनंदा खोत आमच्या विठ्ठलवाडीतच राहायची. सुभद्रा बिल्डिंगमध्ये. माझ्यापेक्षा पाचसात वर्षांनी मोठी असावी. नेहमी निळा स्कर्ट आणि पांढरे पोलके घालून यायची. ती गाणे छान म्हणायची. गातांना हातवारे करायची. उजवा पाय मागे उचलून तालावर आपटायची. 'गोरी गोरी पान', 'घरात हसरे तारे' वगैरे गाणी मस्तच म्हणायची. आमच्या बालमनाशी बाईंनी एवढी जवळीक साधली होती की दुसरीच्या निकालाच्या वेळी पुढच्या वर्षी त्या नसणार म्हणून आम्हाला रडू आले. मग त्यांनी आम्हाला ‘आता हसा पाहू’ असे म्हणून एक सॉऽऽलिड बातमी दिली. तिसरीला पण आम्हाला त्याच शिकवणार म्हणून. आम्ही आनंदाने टाळ्या, बाके वाजवून जल्लोष केला. वार्षिक शुक्रवार साजरा होत असे. पाच पाच पैसे वर्गणी आणायला सांगत. कुरमुरे, चणे, शेंगदाणे, कांदा वगैरे घालून लिंबू पिळून मोठ्या मुली सुकी भेळ बनवीत. देवीची आरती करायची व भेळ खायची. मज्जाच मज्जा. तिसरीत मात्र त्यांनी या दिवशी सांगितले की आता तुम्ही मोठे झालात. पुढल्या वर्षी तुम्ही चौथीत जाणार. पारखी मास्तर येणार. खूप छान शिकवतात. पण मस्ती केली तर पट्टीने मारतात. अशी मनाची तयारी अगोदरच करून घेतली, म्हणून निकालाच्या वेळी एकदोन लहान मुली सोडल्या तर बाई आमच्या वर्गावर नसणार म्हणून फारसे कोणी रडले नाही.

पारखी मास्तर छानच शिकवायचे. कोंबडा पाडायचे. असा कोंबडा नंतर बर्‍याच वर्षांनी सिनेमात देवानंदच्या केसांचा पाहिला. कडक इस्त्रीचे कपडे. पायात लाल बूट. शर्टाच्या बाह्या कोपरांच्या वरपर्यंत दुमडायचे. शर्टाला एक खिसा. खिशातून पेनची दोन चकचकीत टोपणे डोकवायची. एक काळ्या तर दुसरे लाल शाईचे. पण फारच कडक होते. उभ्या पट्टीने मारायचे. एक फटका बसला की हात लाल व्हायचा. दोनदोन दिवस दुखायचा. सप्टेंबरमध्ये मी दोनतीन आठवडे आजारी होतो. एके शनिवारी परीक्षा दिलीच नाही. तेव्हा तिमाही, सहामाही वगैरे परीक्षा नव्हत्या. दर महिन्यातील गुणांची बेरीज करून त्याप्रमाणे नंबर लावत. नंबर पार घसरला. अण्णांनी प्रगतीपुस्तकावर सही दिली नाही. सोमवारपासून शनिवारपर्यंत रोज दोन्ही हातावर एकेक उभी पट्टी खाल्ली. रविवारी आईला कधीतरी तळहातावर वळ दिसले. मग तिने सही घेऊन दिली.

शाळा जरी १०० - १५० पावलांवर होती तरा मला एकट्याने जायची भीती वाटत असेच. दादा मोठ्या मुलांच्याबरोबर जात असे. दोन दिवस आई शाळेत सोडायला व घरी न्यायला आली. बेबी चवंडे आमच्याच इमारतीत रहायची. माझ्यापेक्षा पाचसहा वर्षांनी मोठी. आईला तिने सांगितले की काकी तुम्ही काळजी करू नका, मी नेईन आणि आणीन याला माझ्याबरोबर. दिसायला गोरीपान, सुंदर होती. घरची गरिबी असली (तिचे बाबा वारले होते, आईच नोकरी करायची) तरी नीटनेटकी राहायची. एक शेपटा घालायची. छानछान रिबिन बांधायची. गडद रंगांचे कपडे, स्कर्ट घालायची. कसलेतरी झाडपाल्याच्या छान वासाचे हिरव्या रंगाचे तेल ती केसांना लावत असे. ती चार पावलांच्या अंतरावर आली तरी तो छान वास येई. दुसरी आणि तिसरी दोन वर्षे तिने मला संभाळून शाळेत नेले. ती झरझर वेगाने पाटीवर लिहायची. अक्षराला मोठ्या माणसांसारखे विशिष्ट वळण होते. माझा गृहपाठ ती जसाच्या तसा उतरवून काढत असे. (बहुतेक म्हणूनच) ती तिसरीत नापास झाली व तिला तिच्या आईने शाळेतून काढले. पण तोपर्यंत मी मोठा झालो होतो. दादा, आमच्या इमारतीतले रवी, विजय म्हात्रे वगैरे त्याचे मित्र तर मला मुलीबरोबर चालत जातो म्हणून चिडवत असत. मला मात्र ती परीसारखी, राजकन्येसारखी वाटत असे. तिला परीसारखे पंख असते तर फार बरे झाले असते. तरी शेवटी शेवटी मला पण मुलीबरोबर चालायची लाज वाटायला लागली. तिला तिच्या आईने शाळेतून काढले आणि मी सुटलो. पण तिच्या सौजन्याचे न फिटणारे ओझे माझ्यावर आहेच.

घरून निघाले की कोपर्‍यावर डावीकडे फाटा फुटतो. डाव्या कोपर्‍यावर शाळा. उजवीकडे फाटा नाही. रस्ता सरळ व डावीकडे शाळेला लागून फाटा. उजव्या फूटपाथवर चिंचेच्या झाडाखाली कचर्‍याची गाडी उभी असे. तेव्हाच्या कचर्‍याच्या गाडीची एक गंमतच होती. मागे दोन चाके. पुढे फक्त टेबलाच्या पायासारखे चौकोनी पण लोखंडी पाय. त्याच्यापुढे कांगारूच्या पुढच्या लोंबत्या पायासारखी दोन वीतभर व्यासाची दोन लोखंडी चाके. वरून अर्धागोलाकृती सरकदरवाजे. कचर्‍याची गाडी तसलाच रिकामा डबा घेऊन यायची. या डब्याच्या मागे उभी राहायची. मग ड्रायव्हर एक बटण दाबायचा व गाडी पुढे घ्यायचा. डबा मागेच राहायचा व इंजिन फक्त पुढे सरके. मागील डब्याचे दुमडलेले पाय सरळ होऊन त्यावर डबा उभा राही. लोखंडी चाके कांगारूच्या पायासारखी पुन्हा पुढे लोंबत. मग तो ते इंजिन भरलेल्या डब्याच्या पुढून मागे घ्यायचा. डबा लोखंडी चाके व पाय दुमडून इंजिनावर चढायचा. ड्रायव्हर मग तो भरलेला डबा जरा पुढे घेऊन उभा करायचा. पुन्हा रिकामे इंजिन मागच्या रिकाम्या डब्याला जोडून कचर्‍याच्या डब्याच्या ठरलेल्या जागी आणून ठेवायचा. पुन्हा रिकामे इंजिन आणून भरलेल्या डब्याला घेऊन जायचा. इंजिनाच्या धुराचे नळकांडे वरच्या बाजूला असे. मिलच्या चिमणीसारखे. त्यातून काळाशार धूर यायचा आणि प्रचंड आवाज यायचा. हे सगळे पाहायला मुले जमायची. कचर्‍याच्या डब्याच्या बाजूला चंदेरी रंग फासलेल्या नक्षीदार खांबावर गॅसचा दिवा होता. काही मोठी मुले खांबावर चढून दिवा लावू शकत. बी. ई. एस. टी. चा माणूस टोकाला कडी असलेल्या लांब बांबूच्या काठीने दिवा चालू करी. तो कधी सुटीवर असला तर ही मुले हे काम करीत. कचर्‍याच्या गाडीचे इंजिन कुठलेतरी एकच बटण खेचल्यावर चालू होई. या मुलांना हे ठाऊक होते. ड्रायव्हर कधी विडी ओढायला किंवा निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला गेला की ही मुले अशी संधी न दवडता इंजिन चालू करीत. त्यामुळे मोठ्यांना व्रात्य वाटली तरी आमच्या बालमनाला ही मुले शूर वाटत. आमच्या दादाचा या मुलांत समावेश होताच. शूरपणावरून मी सगळ्यांचे नंबर लावले होते. सगळ्यात शूर भीम आणि अर्जुन, नंतर रामलक्ष्मण. मग हनुमान, जांबुवंत आणि अंगद. त्यानंतर दारासिंग आणि माझा पहिलवान व बॉक्सर मामा. या नंतर मोटार मेकॅनिक. मोटारीखाली झोपून गाडी दुरुस्त करायला काय कमी धैर्य लागते काय? त्याच्यानंतर ही सगळी मुले. पण मोठी माणसे वेडपटच असतात. अगोदर सगळ्यात शूर कोण, नंतर कोण हे सगळे विचारतात. मग सांगितले की उगीच कौतुक करतात्त आणि हसतात.

आता शाळेच्या जागी पोलिस स्टेशन आहे. मारुती मंदिर मात्र अजूनहि तसेच आहे. चिंचेचे झाड देखील तसेच आहे. पण आता मारुतीला फक्त बिनवासाची रुईची फुले दिसतात. बालमनातील पहिल्यावहिल्या निरागस विश्वातील स्मृती मात्र तिथून जातांना जिवंत होतात. व्यवहारातील निबरतेचा, स्वार्थाचा, मतलबाचा स्पर्श न झालेल्या स्मृती. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीच्या अनोख्या विश्वात घेऊन जाणार्‍या स्मृती.