धूम

आर्य चाणक्य
धूम

धूम मचाले, धूम मचाले धूम धूम..... धूम शब्द ऐकला की तरुणांच्या कानात धूमचे गाणे घुमते, डोळ्यासमोर येतात अभिषेक, जॉन अब्राहम, हृतीक, एशा देओल आणि ऐश्वर्या बच्चन (काहींना आदित्य चोप्रा, बिपाशा सुद्धा येऊ शकतात. येण्यास आमचा आक्षेप नाही :) अरे हो, ती रिम्मी सेन विसरलोच - दिलबरा बिचारी). हे सगळं तरुण तरुणींच्या कानावर आणि डोळ्यासमोर येत असतानाच एक गोष्ट जी येथे अजून लिहिली नाही ती येते. ओळखलंत? बरोबर... मोटर सायकल - सुसाट वेगाने जाणाऱ्या आणि स्पोर्ट्स बाइकचा दृश्य अनुभव देणाऱ्या या दुचाक्या. भारतीय वाहन व्यवसायाला हातभार लावला तो या सिनेमाने आणि तयार केले नवे नवे मोटरसायकल चाहते.

ही झाली आजच्या पिढीची गोष्ट ज्यांना स्वतःची आवडती बाईक आणि आवडती बाई (मैत्रिण, बायको,...) असली की बस बाकी काही नको :) . बजाब पल्सर, हिरोहोंडा करिझ्मा, होंडा युनिकॉर्न, टिव्हीएस अप्पाचे, अन सर्वात नवीन यामाहा आर १५ या आजच्या जमान्याच्या काही लोकप्रिय मोटरसायकल. पण या आधीच्या पिढीला सुद्धा मोटरसायकलींचे वेड होते. आपले काही काका लोक सुद्धा बेल बॉटम पँट घालून, कानाजवळ केसांचे कल्ले वाढवून आणि भले मोठाले गॉगल्स डोळ्यावर चढवून मनसोक्त फिरले आहेत. स्कूटरसारखी कौटुंबिक दुचाकी सर्वसामान्य माणसाने आपलीशी केली, पण त्यावेळी सुद्धा मोटरसायकलवर प्रेम करणारे प्रेमवीर होतेच आणि अशाच प्रेमवीरांच्या प्रेमिकांपैकी एक म्हणजे येझडी.

येझडी ला येझडी हे नाव मिळण्याआधी ती जावा म्हणून ओळखली जायची. झेकोस्लोवाकियाच्या Frantisek Janecek यांनी विसाव्या शतकाच्या तीसच्या दशकात जावा कंपनी तयार करून मोटरसायकल बनवायला सुरूवात केली. जावा हे नाव "Janacek" and "Wanderer" या दोन शब्दांच्या मिलनातून तयार झाले असे म्हणतात. (आज आपण जावा वेगळ्या संदर्भात ओळखतो ही गोष्ट वेगळी).

येझडी

भारतामध्ये १९६० साली म्हैसूर येथे Ideal Jawa (India) Ltd ही कंपनी स्थापन झाली आणि १९६१ पासून झेकोस्लोवाकियाच्या जावा लिमिटेड या कंपनीसोबत तांत्रिक सहकार्य करून जावा मोटरसायकलींचे उत्पादन सुरू झाले. दरवर्षी अंदाजे ३६,००० मोटरसायकली बनवल्या जायच्या आणि विकल्या जायच्या. हे तांत्रिक सहकार्य १९६८ पर्यंत चालूच होते. त्या नंतर मग ग्राहकांचा मिळवलेला विश्वास आणि मिळालेले तांत्रिक सहकार्य या जोरावर येझडी हा ब्रँड चालू झाला तो थेट १९८५-८६ पर्यंत अव्याहत सुरूच होता.

भारतीयांनी येझडीवर मनापासून प्रेम केलं. येझडी रोडकिंग, येझडी क्लासिक आणि येझडी डिलक्स ही काही खास उत्पादने, ज्यावर लोकांचा खास जीव होता. दोन धुराडी असलेली मोटर सायकल ही येझडीची ओळखही होती आणि खासियत सुद्धा. येथे लिहिलेल्या गाड्यांपैकी येझडी रोडकिंग ही सर्वात लोकप्रिय होती. टू स्ट्रोक - २५० सीसी (घन. सेमी. ) क्षमतेच्या या गाडीच्या इंजिनाची शक्ती होती १६ बीएचपी (अश्वशक्ती). हे इंजिन एअर कूल्ड होते तसेच याला एक पिस्टन, पण २ धुराडी होती. मोटरसायकल सुद्धा बटणाने सुरू होतात ही आलिकडची गोष्ट झाली. हो, ही मोटरसायकल मात्र किक स्टार्ट होती.

१९८५-८६ या काळापर्यंत जेव्हा वाहन बाजार हा विक्रेत्यांचा बाजार होता आणि पैसे भरल्यानंतर गाड्यांचा ताबा घेण्याची वाट महिनोंमहिने पाहिली जायची, तोवर या गाडीने खूप धंदा केला. पण नंतर मात्र एस्कॉर्ट-यामाहाच्या राजदूत आणि राजदूत यामाहा ३५० ने या गाड्यांना थोडे झाकोळून टाकले. त्यानंतर टू स्ट्रोक मोटरसायकलच्या क्षेत्रात यामाहा आर एक्स १०० ने अक्षरशः राज्य केले अन येझडी हळूहळू लयाला जाऊ लागली. "गाडी आयुष्यभरासाठी - मोबदला आयुष्यभरासाठी" हे ब्रीद मिरवणाऱ्या या कंपनीला स्पर्धेत राहणे कठीण झाले आणि काळाच्या ओघात लोकांनी सुद्धा आयुष्यभरासाठी एकच गाडी वापरणेही सोडून दिले. जपानी तंत्रज्ञानावर आधारित, सुंदर दिसणाऱ्या आणि चांगली इंधन क्षमता असलेल्या १०० सीसी, फोर स्ट्रोक इंजिनाच्या मोटरसायकली बाजारात आल्या आणि येझडी या व्यावसायिक स्पर्धेत मागे पडली. जेव्हा कंपनी बंद झाली तेव्हा येझडी १७५, रोडकिंग, क्लासिक, मोनार्च आणि सीएल-२ या गाड्या बाजारात होत्या.

कामगार संघटना, टू स्ट्रोक गाड्यांचे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे व्यवस्थापनावरचा ताण ही कंपनी बंद होण्याची मुख्य कारणे होतीच. पण यासोबतच नव्या आलेल्या १०० सीसी मोटर सायकलींच्या तुलनेत लागणारे जास्त इंधन, म्हणजेच येझडीची कमी इंधन क्षमता, इंधनांच्या सतत वाढणाऱ्या किंमती आणि हिवाळ्यात गाडी सुरू करण्यासाठी होणारा त्रास ही सुद्धा काही कारणे होतीच. काळाच्या प्रवाहाचा वेग आणि बदलणारी बाजाराची दिशा योग्यप्रकारे पकडू न शकल्याने येझडीचे उत्पादन बंद झाले आणि सुरु झाले नव्या जमान्याचे नवे गाणे. धूम मचाले, धूम मचाले, धूम धूम धूम...

असे असूनसुद्धा, येझडीवर प्रेम करणारे काही प्रेमी अजूनही आहेत. आजसुद्धा जर ते धूम सिनेमा पाहतील तर नायकाच्या जागी स्वतःला पाहतील आणि त्यांच्याच तारुण्यातल्या येझडी सुद्धा पाहतील.