आठवले काका

भोचक

आठवलेकाकांचा नि माझा संबंध माझ्या लहानपणी आला. उणापुरा तीन-चार वर्षांचा. त्यावेळी मी सातवी-आठवीत असेन. पण तो काळही आयुष्यावर प्रभाव टाकणारा ठरला. एकाच माणसाची रूपंही किती वेगवेगळी असतात हेही त्यांच्या निमित्तानं कळलं. आता ते कुठे असतील? माहीत नाही. गाव सोडून गेल्यानंतर त्यांची काहीही खबरबात नाही. कोकणातल्या कुठल्या तरी गावात बदली झाल्याचं शेवटचं कळलं होतं. पण कोणत्या गावात ते काही कळलं नाही. 

आठवले काकांची पहिली भेट अजूनही आठवते. गावात आमचं पेपरचं एकमेव दुकान. साहजिकच नवीन आलेली माणसं आमच्या दुकानात आल्याशिवाय रहायची नाहीत. गाव तालुक्याचं असलं तरी करमणुकीला काहीच साधन नव्हतं. मग वेळ घालवायला पेपर तरी हवाच. म्हणूनही गावातली नवी आलेली मंडळी आमच्या दुकानात यायची. तसेच आठवलेकाकाही एक दिवस आले. 'लोकसत्ता द्या' असा भरदार आवाज ऐकून दुकानात खाली वाकलेला मी वर झालो, तेव्हा उंचापुरा माणूस दिसला. कोकणस्थी गौर वर्ण, सोनेरी रुबाबदार मिशा, स्वच्छ तलम ऑफव्हाईट शर्ट, काळी पँट आणि किंचित हसू. पण या सगळ्यांपेक्षा लक्षात राहिली ती त्यांची दुकानाच्या फळकुटापासून छतापर्यंत पोहोचणारी उंची नि भरदार आवाज. दुकानात बाबाही होते. पेपर दिल्यानंतर सवयीप्रमाणे बाबांनी कुठून आले, कोणत्या खात्यात नोकरी करता? अशी चौकशी केली. बोलणं काय झालं ते फारसं आठवत नाही. पण पंचायत समितीत नोकरी करतात हे समजलं. पंचायत समितीतले हे नवे भाऊसाहेब. हा माणूस काही तरी वेगळा आहे, असं उगाचच वाटलं.

पुढे काका नेहमीच दुकानात यायला लागले. कधी पेपरच्या निमित्तानं तर कधी इतर काही घेण्यासाठी. मग आल्यानंतर बाबांशी त्यांच्या चांगल्या गप्पाही रंगायच्या. त्या गप्पा ऐकायला मला फार आवडायचं. ते अतिशय गोष्टीवेल्हाळ होते. पण भरघोस मिशा आणि तसाच भरदार आवाज असणार्‍या काकांची काहीशी भीतीही वाटायची. काका कोणत्याही गोष्टीवर लीलया बोलायचे. अध्यात्मापासून चित्रपटापर्यंत. त्यांच्या हुशारीची कल्पना एव्हाना बाबांनाही आली आणि त्यातच त्यांनी एक दिवस फतवा काढला. आठवलेकाकांकडे जाऊन परवचा पाठ करून घ्यायचा. झालं. आम्ही दोघंही भावंडं (मी आणि भाऊ अभिजित) थोडे थरकापलोच. कारण पाठांतर वगैरे करण्याचा आम्हा दोघांना भयंकर कंटाळा. पण बाबांचा हुकुम मोडण्याची आमची काय बिशाद. मग आम्ही शेजारच्या तेंडुलकरांचा जितू नि संगीता यांनाही तयार केलं. तेही आमच्याबरोबर यायला तयार झाले.

आठवलेकाका रहायचे ते तेंडुलकरांच्याच वाड्यात. तेंडुलकरांचा वाडा हे एक मोठं प्रकरणच होतं. वाडा म्हटल्यावर डोळ्यासमोर जी प्रतिमा उभी राहील, त्याच्या विसंगत ही वास्तू. गावात वेगवेगळी सरकारी ऑफिसं आल्यामुळे बाहेरची अनेक मंडळी गावात येऊ लागली. त्यांना रहायला जागा नव्हती. तेंडुलकरांची जागा भरपूर होती. त्या जागेच्या मध्ये त्यांचं जुन्या पद्धतीचं घर होतं. गावातली खोल्यांची टंचाई पाहून तेंडुलकरांच्या म्हातारीनं (तिला आम्ही याच नावाने संबोधत असू) घरासभोवतालच्या जागेत फटाक्याच्या लडीसारखी एकेक-दोन खोल्यांची जमेल तशी घरं बांधली. बांधकामाचा कुठलाही नियम न लावता रामा मिस्तरीनं ही घरं बांधली. त्यामुळे वाकड्या तिकड्या भिंती नि तशाच खिडक्यांच्या खोल्या एकमेकांना चिकटल्या गेल्या. या सगळ्यांना मिळून तेंडुलकरांचा वाडा म्हणण्याची प्रथा पडून गेली.

... तर अशा या वाड्यातल्या एका खोलीत आठवलेकाका रहायचे. रस्त्याला लागून गटार आणि पलीकडे त्यांची खोली. सुदैवाने त्यांना दोन खोल्या मिळाल्या होत्या. पहिली अगदीच छोटी, तर दुसरी थोडी मोठी. पहिल्या खोलीत आरामखुर्ची असायची. आरामखुर्ची मी पहिल्यांदा त्यांच्याचकडे पाहिली. दुसर्‍या खोलीतला काळाकुट्ट अंधार तेवढा आठवतोय. दिवसाही या खोलीत जायला आम्ही घाबरत असू. त्याच खोलीत गोंदवलेकर महाराजांचा फोटो होता. काका या महाराजांचे अगदी निस्सिम भक्त होते. संध्याकाळी पिवळट दिव्यात या फोटोसमोर आम्ही परवचा म्हणायचो.

पहिला दिवस अजूनही आठवतो. या दिवशी काकांनी आमच्याकडून फक्त शब्द म्हणवून घेतले. 'पश्चिम'. मी पच्छिम म्हटलं की काका पुन्हा म्हणायचे पश्चिम. जोपर्यंत मी योग्य शब्द म्हणत नव्हतो तोपर्यंत त्यांनी मला ते म्हणायला लावला. माझ्यानंतर बाकीच्यांनाही यातून जावं लागलं. काकांचं हे रूप पहिल्यांदाच पहायला मिळालं. त्यांचे नियम भलतेच कडक होते. बरोबर आठच्या ठोक्याला त्यांच्या घरी हजर व्हायला लागायचं. उशीरा आलं की ते अंगठे धरायला लावत. दहा मिनिटं अंगठे धरल्यानंतर मग आतल्या खोलीत बोलवत. सुरवातीच्या काळात स्तोत्र कशी म्हणायची, कशी पाठ करायची हे समजावून सांगितलं. स्तोत्रही ते नीट कान देऊन ऐकायचे. जोपर्यंत उच्चार नीट होत नाही, तोपर्यंत प्रत्येक श्लोक ते पुन्हा पुन्हा म्हणायला लावायचे. त्यांना सिगारेट ओढायची फार सवय. त्यामुळे घरात माचिस बर्‍याच होत्या. त्यातल्या अर्ध्या जळालेल्या काड्या ते जवळ ठेवायचे. कुणी जांभई देतोय, उच्चार नीट करत नाही, हे लक्षात आलं की ते काडी बरोबर त्याला फेकून मारायचे. आमच्यात जित्या अत्यंत आळशी. शिवाय त्याच्या पाठांतराचीही बोंब. त्यामुळे त्याने अशा अनेक काड्या 'पचवल्या'.

काकांकडे जायला लागल्यापासून त्यांचे व्यक्तिमत्त्व हळूहळू उलगडत गेले. काकांना गावात फारसे मित्र नव्हते. पण आमचे बाबा नि पलीकडे राहणार्‍या दळवींशी तेवढं त्यांचं जमायचं. त्यांच्यात हास्यविनोद अनेकदा चालायचे. सुरवातीला संध्याकाळी त्यांच्याकडे जाणारे आम्ही मग इतरही वेळी त्यांच्याकडे जायला लागलो. हळूहळू त्यांच्याविषयीची भीती चेपली. त्यांच्याकडे जायला आणखी एक कारण असायचं. काका गोष्टी फार रंगवून सांगायचे. त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकणे हा एक अनुभव असायचा. गोष्ट सांगण्याची त्यांची शैली फार निराळी होती. त्यावेळी काका फक्त पांढर्‍या चट्ट्यापट्ट्याच्या चड्डीवर आरामखुर्चीवर बसलेले असायचे. पूर्ण आरामखुर्ची व्यापून. आराम या शब्दातील 'आराम' त्यांच्या त्या कृतीतही दिसायचा. आरामखुर्चीचा थाट त्यांना शोभायचा. मग आमच्यातला कुणीतरी त्यांना सिगारेट आणून द्यायचा. त्यानंतर मग दोन जण दोन्ही हात आणि दोन जण पाय दाबून देत. हात-पाय दाबणं सुरू झालं की मग काका गोष्ट सांगायला सुरवात करायचे.

आमची 'डिमांड' भुताच्या गोष्टीचीच असायची. भुताच्या गोष्टीची भीती तर वाटायची, पण आकर्षणही असायचं. मग काका "हे बघा, गोष्ट सांगतो, पण चड्डी ओली होईल बरं का!" असं म्हणत हसायचे. आम्ही 'चालेल' असं एकमेकांकडे बघत सांगायचो. काकांची गोष्ट सांगण्याची पद्धत विलक्षण होती. इतक्या चित्रदर्शी शैलीत ते गोष्ट सांगायचे की सगळी गोष्ट जणू जिवंत व्हायची. गोष्ट इतक्या लवकर आमच्या मनाचा ताबा घ्यायची की मग आम्ही हात-पाय दाबायचेही विसरून जात असू. गोष्ट सांगता सांगता काका मध्येच 'भक' असा आवाज करत आणि आधीच घाबरलेले आम्ही आणखी घाबरत असू. मग काका आम्हाला हात-पाय दाबण्याची आठवण करून देत. ड्रॅक्युलाच्या भयप्रद कथा पहिल्यांदा मी त्यांच्या तोंडूनच ऐकल्या. मग ड्रॅक्युला दुसर्‍याच्या गळ्यात आपले दात कसे घुसवतो, याचं चित्रण काका शब्दांत असे काही करायचे की ऐकता ऐकता आमची 'बोबडी' वळायची. 'बोबडी' वळणे हा खास त्यांचा शब्द. गोष्ट सांगून झाल्यानंतर थरकाप उडालेले आम्ही त्यांच्या पायाशी बसायचो. मग काय घाबरलात की नाही? असं म्हणत काका गडगडाटी हसायला लागायाचे.

एकटे राहणारे काका स्वयंपाकही एकट्यानेच करायचे. आम्हालाही काहीवेळा खास काही केलं तर खायला द्यायचे. त्यांचा स्वयंपाक अतिशय चविष्ट असायचा. काकांकडे रोज जायला लागल्यामुळे आम्ही त्यांच्या घरचेच एक झालो होतो. मग एक जण घर झाडून काढेल. दुसरा पाणी भरेल. तिसरा बाजारातून काही आणून देईल. अशी कामच आम्ही वाटून घेतली होती. हळूहळू काका उलगडत चालले होते.

असंच एक दिवस दुपारी त्यांच्या घरी गेलो. घर बंद दिसलं. काका कुठे गेले ते कळलं नाही. मग कोणीतरी सांगितलं, "अरे, खालच्या आळीला शंकराच्या देवळाजवळ पडलेत ते!" काकांना काय झालं असेल या भीतीने आम्ही चौघंही जण धावत धावत गेलो. पाहतो तर काय? काका चक्क दारू पिऊन जमिनीवर लोळत होते. पिऊन तर्रर्र झालेल्या काकांना कपड्यांचीही शुद्ध उरली नव्हती. ते दृश्य पाहून मी तर पार सटपटून गेलो. काकांसारखा माणूस असाही असू शकेल याची कल्पनाही मी करू शकत नव्हतो. पण इथे असलेलं वास्तव त्याहून कठोर होतं. मला प्रतिक्रिया काय व्यक्त करावी तेही कळत नव्हतं. खरं तर दारूडा माणूस मी तेव्हा पहिल्यांदा पाहिला होता, असंही नाही. गावात दारू पिणारे लोक भरपूर होते. अगदी रस्त्यावरून दारू पिऊन शिव्या देत जाणारेही लोक रोजच दिसायचे. काही पांढरपेशे लोकही दारू पितात हेही माहीत होतं. पण आठवलेकाका? हा धक्का पचवणं खूप अवघड गेलं.