फुकटचे पौष्टिक

अरुण मनोहर

खापरीचा तुकडा नेम धरून तिसऱया घरात टाकला. एका हाताने केसांचे गुंताड सावरीत
दुसऱया हातात कळकटलेला झगा धरून,
गीन्नी लंगडी घालत एक एक घर पार करू लागली.

 .......................

उन्हं वर आली तरी पोरीला असे बाहेर हुंदडतांना पाहून
रक्मीचा पारा उन्हासारखाच वर चढला.
"अग हुडदांगडे, तुज्या बानं गीन्नी नांव ठेवलं, म्हंजे काय
सोन्याच्या इटा नाही ठेवल्या.
सौता माहीत नाय कुठे उलथला रातला दारू ढोसून.
आणि ही नटवी बंदरउड्या मारतेय सकाळधरनं.
ए अवदसे, जा पटकन भांडे घेऊन...... "
गीन्नीला ओढत घरात आणत रक्मी ओरडली.
"तो भाड्या, तुजा बापुस येईल रातभर गटारात लोळून, चहा चहा बोंबलत.
तो यायच्या आंत चुलीवर दूध नाही चढले,
तर रिकाम्या चुलीवर मला ढकलायला मागे नाही पाहणार करमझवा. "
............................

पोंचे आलेली दुधाची तपेली घेऊन, वाहणारे नाक बाहीला पुसत पुसत
गीन्नी मिशन सेंटरकडे निघाली.
मागे एकदा उशिरा गेल्यामुळे
रोज मिशन सेंटरवर फुकट मिळणारे दूध संपून गेले होते.
गीन्नी रिकामी तपेली हलवीत घरी गेली होती.
बापूने ती तपेली गीन्नीच्या हातून हिसकावून
आयशेच्या डोसक्यांत हाणली होती.
असे किती तरी पोचें आलेली तपेली बोटांवर गरागरा फिरवत
गीन्नी मिशन सेंटरवर आली.
.......................................

"काय चिमणे, आज उशिरा? "
पांढरा पायघोळ झगा घातलेला फादर
लायनीत उभ्या असलेल्या गीन्नीच्या जटांवरून हात फिरवत बोलला.
"हो फादर, इसरूनच गेली मी. "
"ओ. के. माय चाइल्ड. दूध घेऊन, इथे बसूनच प्यायचे बरं कां..
नाहीतर पळून जाशील घरी नेहमी सारखी. "
"हो फादर.. " गीन्नी पुटपुटली.
आपण दूध घेऊन घरी पळून जातो हे फादरला माहीत आहे........
आज जपून पळाले पाहीजे. माय घरी पेटली आहे.
फादर नंतर, लांब काळा झगा घातलेल्या सिस्टरला काय बोलला
ते काही तिला पूर्णपणे समजले नाही.
कारण तोंवर तिचा नंबर आला होता.
"सिस्टर, ह्या चिमण्यांच्या पोटांत थोडे तरी न्युट्रीशस जावे म्हणून ह्यांना
आपण रोज दूध वाटतो. पण हे बच्चे इथे पीतच नाहीत.
नंतरच्या 'मास'ला किती कमी मुलं असतात!
हे रोज चालणार नाही.
काहीतरी केलं पाहिजे. "

.....................................

तपेलीत दूध घेऊन गीन्नी सूममध्ये घरी पळाली.
पोटांत खड्डा पडला होता.
घरी पोहचण्याअगोदर, तिने तपेली तोंडाला लावून
दोन घोट अधाशासारखे मटकावले.
आज उशीर झाल्यामुळे कमीच मिळाले असे सांगणे सहज खपून जाईल.
दोन रट्टे मिळतील. त्याचे येवढे काही नाही.
.....................................

"आणलं दूध? ब्येस केलं! "
"माय गं, बापू.........?
"तुजा बापू झोपलाय ओकून ओकून आत मध्ये.
तो कसला चाय पितो आता!
चार घंट्याशिवाय उठणार नाही मुडदा. "
"माय गं, मग हे दूध मी पिऊ? "
मघाची रेंगाळणारी दुधाची चव ओठांवरून चाटत गीन्नी बोलली.
"बाये गं... मार खायची अवदसा आठवली कां तुले?
तो मुडदा पेटून उठेल तवा त्याचं नरडं थंड करायला काहीतरी ओतावं लागेल ते कुठून आणू?
मी टाकते येक भाकरी तुज्याकरता. ती खाय लसन लावून.
तोंवर भायेर खेल, जा... "
मायने भायेर खेलायला हो म्हटल्याच्या आनंदात, गीन्नी खापराचा तुकडा उचलून धूम पळाली.