मंत्र सत्तेचा

पराग जोगळेकर

आचारसंहिता आचारसंहिता आचारसंहिता लागू ऽ ऽ !
चला मते - जोगवा मागू ! ॥ धृ.॥

दिली सुसाट आश्वासने
राखण्या अमुची आसने
झोकात करुनी भाषणे
फिरुनिया तेच ते सांगू - !

गटबाजी असे जरी थोडी
वरवरी दाखवू गोडी
शत्रूसह करू आघाडी
मागुती यशाच्या लागू - !

सत्तेस्तव करू काहीही
नच लाज न लज्जा पाही
सत्ताच आम्हाला त्राही
सत्तेविण आम्ही पंगू - !

करुनिया सैलसर कृष्णवर्णी गाठोडे
उधळुनी पसाभर किंवा अजून थोडे
नाहुदे पुन्हा सत्तेत आपुले घोडे
मग माया-भजनी पुन्हा नव्याने रंगू - !