रुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक

जीवन जिज्ञासा

(पृष्ठ २)

 आयुष्याच्या या दोन टोकांना एका धाग्यात बांधण्याची किमची धडपड सुरू आहे. रहस्य आणि विविध घटनांनी भरलेले पण तरीही धार्मिकतेचा शोध घेणारे असे हे एक उत्कंठावर्धक पुस्तक आहे. ब्रिटिशकालीन भारताचे व तत्कालीन राजकीय घटनांचे चित्रण जिवंत करण्यात किप्लिंग यशस्वी झाला आहे. बौद्ध परंपरेवर आधारित एक उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक आगळा ठसा उमटवते. वाचकांना किप्लिंगचे व्यक्तिमत्त्व आणि किम यात साम्य वाटावे अशा घटना, अशी वर्णने किममध्ये आहेत. या पुस्तकावर अनेकांच्या प्रतिक्रिया वाचावयास मिळतात. त्यामध्ये कवी टि. एस. इलिएटला सुरुवातीचे आणि नंतरचे असे किप्लिंगच्या मनात असलेले भारताचे चित्र खूप बदललेले आणि एकदम वेगळे वाटले. या विरोधाभासाची कल्पना सुरुवातीच्या कथा आणि किम मधील व्यक्तिरेखा यांचे वर्णन पाहिले तर सहज लक्षात येते. इलिएट म्हणतो की लहान वयात किप्लिंगने भारतावर आणि भारतीयांवर प्रेम केले. त्याचमुळे किम मधील व्यक्तिरेखांमध्ये एक सच्चेपणा आहे कारण त्यांच्यामध्ये कि्प्लिंगची प्रेममय जाणीव दिसते. म्हणूनच किममध्ये असणारी श्रीमंत विधवा, लामा, हरीचंदर मुखर्जी, मेह्बुब अली ही पात्रे खरीखुरी माणसे वाटावीत अशी आहेत. पण तरूण वयात किप्लिंगच्या लेखनात जो उपरोध दिसतो त्यातून भारतातले ब्रिटिश, सिमला आणि दिल्लीच्या कथांची वर्णने आली आहेत.

१९१५ साली पहिल्या महायुद्धादरम्यान पश्चिम आघाडीवर तो पत्रकार म्हणून गेला होता. त्याने त्या काळात 'फ्रान्स ऍट वॉर', 'द फ्रिंजेस ऑफ द फ्लीट' (१९१५) व 'सी वॉरफेअर' (१९१६) ही पुस्तके लिहिली. 'द आयरिश गार्डस इन द ग्रेट वॉर' (१९२३) या पुस्तकात त्याने आपल्या १८ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूबद्दल लिहिले आहे. आपल्या मुलाला आयरिश सैन्यात भरती होण्यास त्याने प्रवृत्त केले होते, याविषयी एक अपराधीपणाची भावना हे पुस्तक वाचतांना जाणवते. १९२२ साली त्याने 'द रिच्युअल ऑफ द कॉलींग ऑफ ऍन इंजिनियर' आणि 'द आयर्न रिंग सेरेमोनी' यांचे लेखन केले.

टाइम्सच्या मुखपृष्ठावर किपलिंग

टाइम्सच्या मुखपृष्ठावर किपलिंग

१९२६ साली त्याचे छायाचित्र 'टाइम' मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते. या साहित्यिकाचा मृत्यू १९३६ साली जानेवारी महिन्यात झाला. 'पोएट्स कॉर्नर' या ठिकाणी इतर प्रसिद्ध साहित्यिकांप्रमाणे त्याचेही थडगे आहे. सुप्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑरवेलने किप्लिंगवरील लेखात त्याचा उल्लेख ब्रिटीशांच्या हुकुमशाही राजवटीचा प्रेषित असा केला आहे. त्याच्या कविता वाचून ऑरवेलला जर्मन आणि ब्रिटिश सत्ताधारी लोकांमधील संघर्षाची प्रकर्षाने आठवण झाली होती. ख्यातनाम कवी टी. एस. एलिएटने किल्पिंगचा उल्लेख एक उत्तम कवी म्हणून केला आणि त्याने कविता लिहिणे सोडू नये अशी टिप्पणी आधीच केली होती. भारताचे पहिले पंतप्रधान श्री. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या आवडत्या पुस्तकांमध्ये किप्लिंगच्या 'किम' या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. त्याच्या कारकिर्दीत आणि मृत्यूनंतर किप्लिंग वर्णद्वेष, हुकुमशाही राजवटीचा पुरस्कार यामुळे वादाच्या भोवऱ्यात आणि प्रकाशात येत राहिला. त्याची ही भूमिका जशी नाकारता येत नाही तसेच त्याचे साहित्यातले स्थानही नाकारता येत नाही. मुंबईत जे. जे. स्कूलच्या आवारात त्याचा पुतळा आहे आणि तिथेच लेखकाचे स्मारक करण्याचा निर्णयही झाला आहे. 'जंगल जंगल पता चला है' असे म्हणत 'मोगली' आपल्या डोळ्यासमोर येतो आणि त्या वेळी किप्लिंगचे स्मरण होते एवढे मात्र नक्की!.

संदर्भसूची:

  1. समथिंग ऑफ मायसेल्फ, फॉर माय फ्रेंडस, नोन ऍंड अननोन - (ISBN 8120612663, 9788120612662)
  2. किप्लिंगचे आत्मचरित्र -विकिपिडिया- (इंग्रजी) रूडयार्ड किप्लिंग
  3. किम, पेंग्वीन फिक्शन , ISBN-014 018352 3