मि. ईस्टवूडचे साहस

सौरभ पांडकर

ईस्टवूडने मान वळवून आढ्याकडे पाहिलं. परत खाली जमिनीकडे, तिथून उजव्या भिंतीकडे. शेवटी काही निश्चयानंच त्याने पुढ्यात ठेवलेल्या आपल्या टा‌ईपरायटरकडे लक्ष केंद्रित केलं. मात्र ठळक टायपात छापलेलं शीर्षक सोडलं तर तो कागद पूर्ण कोरा होता.

 

’दुसर्‍या काकडीचे रहस्य’ असं ते नाव होतं. एक लक्षवेधक शीर्षक! 'असल्या नावाच्या गोष्टीत आहे तरी काय? एक काकडी! आणि ती सुद्धा दुसरी? वाचून तरी बघूयात.' असा विचार वाचकाने नक्कीच केला असता, अँथनी ईस्टवूडला वाटलं. या रहस्यकथांच्या बादशहाने एका साध्या काकडी भोवती किती थरारक कथानक गुंफले आहे! वाचक नक्कीच खिळून गेला असता.

इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. कथा कशी असावी हे चार लोकांप्रमाणेच अँथनी ईस्टवूडला चांगलं माहीत असलं तरी गाडं पुढे सरकत नव्हतं. शीर्षक आणि कथानक हे कथेचे मुख्य घटक. ते जमलं तर बाकीचं जमायला काय वेळ लागणार? आणि कधीकधी तर शीर्षक सुचलं की कथा आपो‌आप सुचत जाते. मात्र यावेळी शीर्षक साधलं तरी कथानकाचा मागमूस नव्हता.

अँथनी ईस्टवूडची नजर पुन्हा एकदा, काहीतरी सुचावं, कथानकाला आकार यावा म्हणून छत, भिंतीवरचा वॉलपेपर वगैरेंवरून रेंगाळत राहिली. मात्र विशेष काही जमत नव्हतं. "नायिकेचं नाव असावं सोनिया" काहीतरी सुरुवात करण्यासाठी अँथनी स्वत:शीच म्हणाला. सोनिया किंवा मग डोलोरस. तिचा वर्ण असेल मोतिया रंगाचा! मात्र आजारपणामुळे पांढराफटक दिसतो तसा नाही. तिचे डोळे! थांग न लागणार्‍या एखाद्या गूढ जलाशयासारखे. नायकाचं नाव असेल जॉर्ज! किंवा मग जॉन. काहीतरी छोटंसं आणि ब्रिटीश. मग माळ्याचं नाव? अर्थात कथेत माळी तर असायलाच हवा होता. काहीही करून ती काकडी कथेत घुसडण्यासाठी तो बराच उपयोगी पडला असता. त्याला आपण स्कॉटिश बनवूया. एकदम निराश आणि चिडचिड करणारा.

अँथनीची ही पद्धत कधीकधी काम करत असली तरी आज मात्र त्यातून काही निष्पन्न होण्याचे चिन्ह दिसेना. कारण त्याने स्वत: कितीही जॉर्ज, सोनिया आणि त्या माळ्याला नजरेसमोर आणले तरी आपण जरा अंग मोडून हालचाल करावी, इकडेतिकडे फिरावं अशी त्या कुणाचीच इच्छा दिसत नव्हती. "एखादं केळं पण चालून जा‌ईल म्हणा!" अँथनीने मनाशीच विचार केला. किंवा मग सॅलड, एखाददुसरी स्थानिक भाजी वगैरे. स्थानिक म्हणताच एखादा अमीर उमराव, हरवलेले महत्त्वाचे दस्त‌ऐवज वगैरे गोष्टी झरझर त्याच्या नजरेसमोर तरळल्या. पण क्षणभरच! प्रकाशाचा एखादा किरण चमकून गेल्यासारखं त्याला झालं, मात्र मागे काहीच उरलं नाही. अमीर उमरावदेखील आकार घे‌ईना आणि आता तर काकडी, चिडखोर माळी वगैरे सर्वच गोष्टी त्याला विजोड वाटू लागल्या.

"मरू दे! काहीच करायला नको!" वैतागून अँथनी उठला आणि त्यानं डेली मेलचा अंक हातात घेतला. कोण जाणे एखाद्याचा खून झाला असेल तर त्यातून एका होतकरू लेखकाला एखादी कल्पना सुचून जा‌ईल! तशी शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र आजच्या बातम्या एकतर राजकीय नाहीतर विदेशी होत्या. तिरमिरीत त्याने पेपर फेकून दिला. सहजच टेबलापाशी ये‌ऊन त्याने एक कादंबरी उचलली. डोळे मिटले नि अंदाजानेच एक पान उघडून त्यावर बोट ठेवले. अशा तर्‍हेने नशिबाने सुचवलेला शब्द होता - शेळी. अहा! हा एकच क्लू त्याला पुरेसा होता. क्षणार्धात एक कथा त्याच्या डोळ्यांसमोर उलगडत गेली. एक सुंदर मुलगी, तिचा प्रियकर. युद्धात मारला गेलेला! आता ती स्कॉटिश पर्वतरांगांवर शेळ्या-मेंढ्या राखते आहे बिचारी! तिच्या मृत प्रियकराचे तिला होणारे भास. त्यांच्या गूढ भेटी! आसपासच्या त्या शेळ्या मेंढ्या, चंद्राचा प्रकाश. अगदी चित्रपटातल्यासारखं! आणि मग शेवटी गोठवणार्‍या बर्फात मरून पडलेली ती आणि जवळच दिसणार्‍या पायांच्या ठश्यांच्या दोन रांगा!

"खूपच छान कथा आहे ही! "अँथनी एकदम भानावर आला. मात्र संपादकाचा चेहरा डोळ्यांसमोर येताच त्याने निराशेने मान हलवली. कितीही सुंदर असली तरी ही कथा त्याने नक्कीच छापली नसती. त्याला हव्या असत गूढ स्त्रिया, त्यांचा झालेला खून, एखाद्या तरूण नायकावर येणारा आळ, अगदीच क्षुल्लक असलेले पुरावे आणि मग कल्पनाही करता येणार नाही अशा भलत्याच माणसावर गुन्हा शाबित हो‌ऊन उलगडणारे रहस्य. (अर्थात अशा कथांना तो पुष्कळ मानधनही देत असे म्हणा!) एकंदरीत त्याला हवी होती ती ’दुसर्‍या काकडीचे रहस्य’ सारखी कथा. आता अशी कथा दिली तर तिचं शीर्षक त्याला पटलं नसतं. 'एक निर्घृण खून’ वगैरे फडतूस नावं त्याला सुचत आणि अँथनीला विचारल्याशिवाय तो ती बदलून टाकत असे. अँथनीचा विचार चालू असतानाच फोनची घंटा वाजायला लागली.
फोनजवळ जा‌ऊन त्याने रागानेच फोन उचलला. कारण मागच्या एका तासात त्याला दोनदा विनाकारण उठावं लागलं होतं. एक होता राँग नंबर आणि दुसरा एका ओळखीच्या चळवळ्या बा‌ईचा. जेवायला बोलावण्यासाठी. त्याला मात्र ती बिलकूल आवडत नसे आणि तिला नकार द्यायला त्याला बरीच शक्ती खर्च करावी लागली होती.

"हॅलो!" त्याने त्रासून विचारले.

एका स्त्रीचा हळूवार, परदेशी वाटणारा आवाज पलीकडून ऐकू आला.

"माझ्या प्रियकरा, तूच आहेस काय? "

"अं? काय? माहित नाही. पण तुम्ही कोण बोलताय?"

"अरे मी, कार्मन! हे बघ नीट ऐक. माझा पाठलाग होतोय. मी धोक्यात आहे, तुला ताबडतोब यावं लागेल. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे!"

"ऑं? एक मिनिट. मला माफ करा पण..... अँथनीने शांतपणे सांगितलं. "मला वाटतं तुम्ही राँग नंबर.. "

पण त्याचं बोलणं त्याला पूर्ण करताच आलं नाही.

"ते येत आहेत आहे रे! आणि त्यांना जर कळलं मी काय करतेय तर ते मला नक्की मारून टाकतील. प्लीज लवकर ये! मला निराश करू नकोस. आला नाहीस तर मी मेलेच म्हणून समज. ३२० कर्क स्ट्रीट तुला माहीत आहेच.. हा संकेत लक्षात ठेव, काकडी."

आणि लगेचच पलीकडून फोन ठेवल्याचा एक क्षीण आवाज.

"छे! आता काय करायचं?" झाल्या प्रकाराने अँथनी पूर्ण चकित झाला होता. त्याने आपला पा‌ईप उचलला आणि त्यात काळजीपूर्वक तंबाखू भरायला सुरुवात केली. "नक्कीच माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. ती नक्कीच काकडी म्हणाली नसेल. हे सगळं विलक्षणच आहे. काय म्हणत होती ती? काकडी का दुसरं काही?"

विचार करत तो खोलीत येरझार्‍या घालू लागला.

'३२० कर्क स्ट्रीट.’ हा सगळा काय प्रकार आहे? ती कोणा दुसर्‍या माणसाची वाट बघत असेल. मी आधीच सगळं स्पष्ट सांगायला हवं होतं. ३२० कर्क स्ट्रीट, आणि शब्द आहे काकडी... छे! हे सगळं अशक्य आहे. माझ्या शिणलेल्या मेंदूला नक्कीच भ्रम होत असावा.

परत टा‌ईपरायटरवर नजर पडताच त्याला खूप राग आला. एकतर सकाळपासून तो कथेसाठी डोकं शिणवत बसला होता आणि एवढं करूनही हाती काही लागलं नव्हतं. जगण्यातूनच सुचणारं कथानक वगैरे बर्‍याच गोष्टी त्याने आजपर्यंत ऐकल्या होत्या आणि आता तशीच एक संधी त्याच्याकडे चालून आलेली होती. त्याने क्षणभर विचार केला नि लगेच निघण्याचा निर्णय घेतला. आपल्या जुन्या नि अमूल्य, दुर्मिळ भांड्यांच्या संग्रहाकडे त्याने प्रेमभराने पाहून घेतलं, डोक्यावर हॅट चढवली आणि फ्लॅटचं दार बंद करून तो बाहेर पडला.

बहुतांश लंडनकरांना माहीत असेलच की कर्क स्ट्रीट हा एक लांबुळका, अस्ताव्यस्त पसरलेला, दुर्मिळ वस्तूंच्या दुकानांनी व्यापलेला रस्ता आहे, जिथे बर्‍याचदा बनावट वस्तूदेखील महागड्या किंमतीला खरेदी केल्या जातात. पितळेच्या जुन्या वस्तू, काचसामान आणि बर्‍याचशा जुन्या वस्तूंची बाजारपेठ या रस्त्यावर आहे. नं. ३२० हे दुकान जुन्या काचवस्तूंचं होतं. ओसंडून वाहणारं विविध प्रकारचं काचसामान इकडेतिकडे पसरलेलं होतं. त्यामुळेच मद्याचे चषक, झुंबरं यासारख्या सामानातून अँथनीला काळजीपूर्वक पावलं टाकावी लागत होती. या सगळ्या सामानाच्या पाठी मागे एक अतिशय वृद्ध स्त्री बसलेली होती. एखाद्या नवयुवकाला हेवा वाटेल अशी मिश्यांसारखी लव तिच्या ओठांवर होती आणि चेहर्‍यावरचे खा‌ऊ का गिळू भाव स्पष्ट दिसत होते.

"काय पाहिजे?" तिने दरडावल्यासारखं अँथनीला विचारलं.

साध्यासुध्या तरूण अँथनीचं त्या आवाजानंच अवसान गळाल्यासारखं झालं. त्याने ताबडतोब काही ग्लासांची चौकशी केली.

"अर्धा डझन ग्लासांना ४५ शिलिंग पडतील."

"काय सांगता? खरंच? खूप सुंदर आहेत ते, नाही का? आणि त्या तिकडे, त्यांची काय किंमत आहे?"

"ते? जुन्या वॉटरफर्डचे आहेत ते. तुला म्हणून १८ गिनिजला एक जोडी दे‌ईन."