मि. ईस्टवूडचे साहस

सौरभ पांडकर

(पृष्ठ २)

आता ईस्टवूडला आपण स्वत:साठी खोदत असलेल्या खड्ड्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली. असंच चालू राहिलं तर पुढच्या मिनिटातच त्याला काही ना काही घ्यावं लागलं असतं. म्हातारीचे डोळे तर इतके भयकारी होते की काहीच न घेता दुकान सोडणं ही त्याच्यासाठी अशक्य कोटीतली बाब होती.

"त्या, त्याचा काय भाव आहे?" एका झुंबराकडे बोट दाखवून त्याने विचारलं.

"३५ गिनीज."

"३५ गिनीज खूपच होतात. मला नाही परवडायचं ते." अँथनी निराश हो‌ऊन म्हणाला.

"पण तुला नक्की काय पाहिजे? लग्नासाठी काही प्रेझेंट वगैरे पाहिजे का?"

"अं? हो, तेच ते! " चालून आलेलं हे उत्तर गोंधळलेल्या अँथनीसाठी पुरेसं होतं.

"पण ते आवडीचं मिळेलच असं नाही."

"हा, मग तसं सांगा ना! " म्हातारी आता चिकाटीने जागेवरून उठली.

"हे बघ! हे नक्षीदार ग्लास! कुणालाही आवडतील. आणि हे बघ, हे काचेचे मग आहेत. किंवा मग हा लिकर सेट. खास एकदम नवर्‍यामुलीसाठीच. "

अशी पुढची जवळजवळ दहा मिनिटं अँथनीने जन्मभराच्या वेदना सहन केल्या. म्हातारीने त्याला पूर्ण कह्यात घेतले होते. जे जे काही म्हणून काचेत शक्य आहे ते सगळं अँथनी निमूटपणे पाहत होता. निरर्थक बडबडल्यासारखा ’सुंदर, सुंदर’ हा त्याचा एकच जप चालू होता. शेवटी वैतागून हातात कोंबलेला एक उंची चषक त्याने खाली ठेवला आणि म्हातारीला विचारलं, "तुमच्याकडे इथे फोन आहे का?"

"नाही. इथे नाहीये पण तिकडे थोडं पुढं पोस्टात फोन आहे. पण मग तुमचं काय ठरलं? हे काचेचे पेले घेणार की तो उंच चषक दे‌ऊ?"

तो स्त्री नसल्या कारणाने काहीच न घेता दुकानाबाहेर पडण्याच्या सूक्ष्म कलेशी अँथनी पूर्णपणे अनभिज्ञ होता.

"मी, अं, मला तो लिकर सेटच द्या." तो उदासवाण्या स्वरात उत्तरला.

त्यातल्या त्यात तोच सगळ्यात लहान दिसत होता. मात्र म्हातारी अजूनही एखादं झुंबर आपल्या गळ्यात मारेल अशी धास्ती त्याला वाटत होती. तोंड वाकडं करतच त्याने लिकर सेटचे पैसे दिले नि म्हातारीने पॅकिंग करायला सुरुवात केली. पण अचानकच त्याचा आत्मविश्वास परत उसळून आला. नाहीतरी तिला जास्तीत जास्त काय वाटेल? विचित्र, विक्षिप्त वगैरे वगैरे! अजून काय? आणि तिला वाटलंच तरी एका म्हातारीची कोण पर्वा करतो?

"काकडी." तो स्पष्ट आणि निर्धाराने म्हटला.

पॅकिंग करता करताच म्हातारीची मान झटक्यात वर झाली.
"काय? काय म्हणालास तू?"

"काय, कुठे काय?" अँथनी.

"नाही, नाही! तू नक्कीच काकडी म्हणालास."

"बरं म्हणालो! मग?"

"शहाण्या, तुला हे आधीच म्हणायला काय झालं होतं? फुकट माझा वेळ वाया घालवलास. त्या तिकडे दार आहे, जिन्याने वर जा. ती तुझी वाट बघत आहे."

स्वप्नात असल्याप्रमाणे अँथनी तिने सांगितलेल्या दाराने निघाला. अतिशय गलिच्छ जिन्याने वर गेल्यावर एक दार आणि त्यामागे एक छोटी बैठकीची खोली दिसत होती. खोलीत खुर्चीवर बसलेली नि अधीरतेने दरवाजाकडे पाहणारी एक अतिशय सुंदर तरूणी त्याची वाट बघत होती. अँथनीने आजवर लिहिल्याप्रमाणेच तिचा मोतिया वर्ण होता. आणि तिचे डोळे! ती इंग्लिश नव्हती हे अँथनीला पाहताक्षणी जाणवलं. तिचं भुरळ पाडणारं सौंदर्य साध्याश्या कपड्यांतही उठून दिसत होतं.

लाजून अँथनी दारातच उभा राहिला. या सगळ्या झालेल्या गोंधळाचं स्पष्टीकरण देण्याची वेळ आता आली होती. मात्र त्याला पाहताच आनंदातिरेकाने ती धावत आली आणि त्याच्या बाहुपाशात शिरली.

"तू आलास! खरंच तू आलास? देवाने माझी प्रार्थना ऐकली म्हणायची. "

आलेली संधी साधून, तिच्या पावलावर पाय ठेवत अँथनीने देखील तिला प्रेमाने आलिंगन दिलं. आता मात्र ती लाजली.

त्याच्या चेहर्‍याकडे पाहत म्हणाली, "मी तुला ओळखलंच नसतं रे!"

"का?"

"तू पूर्वीपेक्षा कितीतरी तरूण दिसतो आहेस. आणि तुझे डोळे! एकदमच वेगळे दिसत आहेत!"

"खरंच?"

मनात मात्र अँथनी शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. भयानक वेगाने आकार घेणारे हे कथानक हातचे घालवून चालणार नव्हते. काहीही करून डोकं शांत ठेवण्याची गरज होती.

"मी... मी तुझं पुन्हा एक चुंबन घे‌ऊ का?"

"नक्कीच घे‌ऊ शकतेस! तुला पाहिजे तितक्या वेळा!" अँथनी मनापासून म्हणाला.

हा एकंदरीतच प्रकार त्याला खूप सुखावह वाटत होता. ’कोण जाणे मी कोण आहे ते! आणि ही मुलगी पण काय सुंदर दिसते! देवाची कृपा होवो नि तो खरा माणूस इकडे ये‌ऊ नये म्हणजे झालं.’

पण एकदमच ती मुलगी त्याच्या पासून बाजूला झाली. तिचे डोळे शंकास्पद दिसत होते.

"इकडे येताना तुझा कुणी पाठलाग तर नाही ना केला?"

"छे, छे! शक्यच नाही."

"बरं झालं. पण ते खूप धूर्त आहेत रे! मी त्यांना चांगलीच ओळखून आहे. तो बोरीस तर राक्षस आहे नुसता."

"त्या बोरीसचं काय करायचं ते मी बघतो आता."

"खरंच? तू एका सिंहासारखा शूर आहेस रे! एक सिंह! खरंच! बाकी ती सगळी जनावरं आहेत. माझा ठावठिकाणा त्यांना लागला असता तर त्यांनी मला मारूनच टाकलं असतं बघ. मला काहीच कळेना. पण मग एकदम तुझी आठवण झाली..... शऽऽऽऽ! हा आवाज कसला?"

खाली दुकानातूनच तो आवाज येत होता. त्याला तिथेच थांबायला सांगून ती हळूच चोरपावलांनी जिन्याकडे निघाली. मात्र धावतच ती परत आली. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता.

"खाली पोलिस आले आहेत. बहुधा इकडेच यायला निघालेत. लवकर, एखादा सुरा किंवा पिस्तूल, काही आहे का तुझ्याकडे?"

"जरा थांब तरी! एखाद्या पोलिसाचा मी खून करावा अशी तुझी इच्छा आहे काय?"

"अरे असं काय करतोस? तुला काय वेड लागलंय काय? ते नक्कीच तुला पकडतील आणि मग कदाचित तुला फाशीसुद्धा देतील. मरेपर्यंत!"

"काय? काय करतील?" भीतीची एक थंडगार लाट आपल्या अंगातून गेल्यासारखं त्याला झालं.

तोपर्यंत जिन्यात पावलं वाजायला सुरुवात झाली होती.

"बघ, ते आलेच! मी काय सांगते ते ऐक. सगळ्याला नाही म्हण. तेवढा एकच मार्ग उरलाय आता." कानापाशी ती कुजबुजली.

"हे तर खूपच सोप्पं आहे!" अँथनी.

दुसर्‍याच क्षणी दोघांनी खोलीत प्रवेश केला. त्यांनी साधेच कपडे घातले होते, मात्र त्यांच्या एकंदर हालचाली त्यांची ओळख पटवण्यासाठी पुरेशा होत्या. त्यांच्यातल्या बुटक्या, करड्या रंगाचे डोळे असलेल्या माणसाने बोलायला सुरुवात केली.

"मी तुम्हाला अटक करत आहे, कॉनरॅड फ्लेकमन. ऍना रोझेंबर्गचा खून केल्याच्या आरोपावरून! तुम्ही जे काही म्हणाल ते कोर्टात तुमच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरण्यात ये‌ईल. हे माझं वॉरंट आणि शांतपणे तुम्ही आमच्या बरोबर आलात तर बरं हो‌ईल."

एक अस्फुट किंकाळी मुलीच्या ओठातून निघाली. अँथनी मात्र शांतपणे पुढे झाला.

"तुमची काही तरी चूक होते आहे ऑफिसर. माझं नाव अँथनी ईस्टवूड आहे."

मात्र त्या दोघांच्याही चेहर्‍यावर त्या वाक्याने काहीही फरक पडला नाही.

"ते काय ते आपण नंतर बघू." दुसर्‍याने तोंड उघडलं. "आत्ता तुम्ही आमच्याबरोबर चला."

"कॉनरॅड" मुलगी ओरडली. "त्यांना असं काही करू दे‌ऊ नकोस."

अँथनीने त्या दोघांकडे वळून पाहिले.

"एक मिनिट! या मुलीचा निरोप घ्यायला तरी तुम्ही मला नक्कीच परवानगी द्याल. नाही का?"

अपेक्षेपेक्षा जास्तच सभ्यतेने ते दोघेजण दारात जा‌ऊन उभे राहिले. अँथनीने मुलीला खिडकीजवळच्या कोपर्‍यात ओढलं नि भराभर झाला प्रकार सांगायला सुरुवात केली.

"हे बघ, मी जे काही सांगितलं ते खरं होतं. मी खरंच कॉनरॅड फ्लेकमन नाही. आज सकाळी तू फोन केलास तो बहुधा राँग नंबर होता. माझं नाव अँथनी ईस्टवूड आहे. तुझ्या हाकेला मी धावून आलो याचं कारण खरंतर....... जा‌ऊ दे! काही नाही. मी आलो एवढंच!"

तिने साशंकतेनं त्याच्या डोळ्यात पाहिले.

"तू कॉनरॅड फ्लेकमन नाहीस?"

"नाही."

"अरे देवा!" तिचा आवाजात निराशा होती. "मी..... मी मघाशी तुझं चुंबन घेतलं रे!"

"त्याचं काही नाही एवढं! अशा गोष्टी होतच असतात." तिला समजावत तो म्हणाला. "पण आता मी काय सांगतो ते नीट ऐक. मी या दोघांबरोबर जात आहे आणि लवकरच माझी ओळख त्यांना पटवून दे‌ईन. तुला काही काळजी करायचं कारण नाही. तेवढ्या वेळात तू तुझ्या या खर्‍या कॉनरॅडला सावध कर. नंतर.. "

"नंतर काय?"