रूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास

प्रदीप लाड

(पृष्ठ २)
 

म्हणून गिफर्डला पराकोटीची गुप्तता बाळगून ह्या गावास भेट देणे भाग पडले. त्याच्याबरोबर हू जिआ होता. तिथे दोघांनी एकत्र जाणे, पीडितांना भेटणे, त्यांच्याशी चर्चा करणे व अधिकार्‍यांना काही सुगावा लागायच्या अगोदर तेथून पोबारा करणे आवश्यक होते. ठरवल्यानुसार गिफर्ड हू समवेत शांगचायला गेला, व तेथे तो अनेक दु:खी ग्रामस्थांना भेटू शकला. त्या सगळ्यांच्याच कुटुंबातील कुणी ना कुणीतरी गेल्या दोन- चार वर्षांत एड्सचे बळी झालेले होते, व ते सगळेच्या सगळे स्वतःही एड्सने ग्रस्त होते. त्यांना आता उत्पन्नाचे काहीही साधन नव्हते. भकास जीवन ते जगत होते. "तुम्हाला कायदेशीर इलाज करण्यास काही मदत पाहिजे का?" गिफर्डने त्यांना विचारले. "तसे आम्ही काहीही करू शकणार नाही. कुणी बाहेरून आम्हाला पैसा दिला, तरी ह्या प्रदेशातील कुणीही वकील आमच्यासाठी वकिली करण्यास कबूल होणार नाहीत. कारण ते सगळे सरकारी अधिकार्‍यांना सामिल आहेत", ते उत्तरले.

ह्या सर्व प्रवासात लपूनछपून केलेली अशी गिफर्डची ही एकच मोहीम. अन्यथा त्याची पद्धत म्हणजे समोरच्या व्यक्तीशी सरळ संवाद सुरू करण्याची. नानजिंगहून पश्चिमेकडे निघाल्यावर अन्हवे (Anhui) प्रांतात प्रवेश केल्याकेल्या एका सायकलस्वाराकडे त्याचे लक्ष गेले. त्याच्या सीटला एक उंच लाल निशाण बांधले होते आणि मागच्या चाकावर एक मोठ्ठी पिवळी पाटी लावली होती. गिफर्डने टॅक्सी थांबवली व त्याच्याशी गप्पा सुरू केल्या. वांग योंगकांगने दक्षिण चीनमध्ये हॉटेल सुरू करण्यासाठी सुमारे १००, ००० डॉ. इतक्या रकमेची गुंतवणूक केली होती. पण त्याच्या म्हणण्यानुसार भष्टाचारी सरकारी अधिकार्‍यांनी त्याला पूर्ण ठकवले होते. हॉटेल काही उभे राहिलेच नाही आणि त्याचे सगळे पैसेही गेले. तेव्हा त्याची ही दक्षिणोत्तर सायकल यात्रा भष्टाचारी सरकारी अधिकार्‍यांचा निषेध नोंदवण्याकरिता होती. त्याच्या मागच्या चाकावरील त्या मोठ्ठ्या पिवळ्या पाटीवर लिहीले होते 'भष्टाचार- निषेधार्थ देशांतर्गत यात्रा'.

ह्या सबंध प्रवासात गिफर्डला प्रादेशिक सरकारी नोकरांचा भष्टाचार, त्यांची अरेरावी व मनमानी वागणूक ह्यांबद्दल सतत काही ना काहीतरी ऐकावयास मिळाले. नानजिंगच्या बाहेर, हफयच्या दिशेने जातांना त्याला एक शेतकरी त्याच्या शेतात बैल घेऊन नांगरणी करतांना दिसला. मग त्या शेतकर्‍याचे काम चालू असतांनाच गिफर्ड त्याच्या बाजूने चालता चालता त्याच्याशी बोलू लागला. शेतकरी सहासष्ठ वर्षांचा होता. "गावात राहून शेतावर राबून गुजराण करणे दिवसेंदिवस कठीण होते आहे, व ह्याला कारणे दोन", त्याने सांगितले. पहिले, कंबरडे मोडणारे कर आणि दुसरे प्रादेशिक सरकारी अधिकार्‍यांची शेतकर्‍यांकडून जमिनी ताब्यात घेण्यासाठी चाललेली मनमानी. सर्वच जमीन सरकारची, आणि ती दीर्घ मुदतीच्या बोलीवर शेतकर्‍यांना भाड्याने दिलेली. पण आता आजूबाजूची शहरे झपाट्याने विस्तारत होती, त्यांच्यासाठी शेतजमिनी उपलब्ध करून दिल्याने स्थानिक ग्रामिण संस्थांना पैसा मिळू शकत होता. तेव्हा जरूर पडेल त्यानुसार तेथील अधिकारी शेतकर्‍यांकडून जमिनी परत मागत, न दिल्यास बळजबरीने कब्जा करत. म्हातार्‍याची सर्व मुले व सुना आता शहरात राहत, व तो येथे कसेबसे दिवस कंठत होता. गिफर्डने ट्रकमधून प्रवास केले त्या त्या वेळी त्याने ट्रक ड्रायव्हर्सना, उगाच काही ना काही खुसपट काढून पैसे उकळण्यासाठी महामार्गावर दबा धरून बसलेल्या पोलिस पार्टींना कसे तोंड द्यावे लागते, हे अनुभवले.

गोबी वाळवंट

गांसू राज्याची शिंजियांग ह्या पश्चिमेच्या राज्याशी जेथे सीमा भिडते, तेथे ३१२ रस्त्यावर शिंगशिंगशिया (Xingxingxia) हे छोटेसे गाव आहे. ह्याच्या उत्तरेस गोबीचे वाळवंट. हा सगळा रखरखीत प्रदेश. हे गाव तेथील गोड्या पाण्याच्या विहिरींसाठी पूर्वापार प्रसिद्ध आहे. शियांग ह्या चीनच्या एकेकाळच्या राजधानीपासून निघून पश्चिमेकडे मध्य आशियाकडे जाणारा सुप्रसिद्ध सिल्क रोड आणि आताचा हा नवा करकरीत चारपदरी ३१२ रस्ता, हे जवळजवळ एकत्रच मार्गक्रमण करतात. पूर्वी वाळवंटातून पूर्वेकडे आलेले, अथवा आता पूर्वेकडून वाळवंटात प्रवेश करणारे ह्या सगळ्या प्रवाश्यांसाठी ह्या शिंगशिंगशियातील विहीरी पाणी पुरवत आलेल्या आहेत. ह्या गावी गिफर्ड जेवणासाठी रस्त्याकडेच्या एका छोट्याश्या धाब्यात गेला. हा धाबा म्हणजे लाओ जांग ह्या गृहस्थाचा एकखांबी कारभार. त्याच्या डोळ्यात चिनी लोकांच्या डोळ्यात सहसा न दिसणारे एक स्फुल्लिंग आहे, असे गिफर्डला वाटले. तो स्वयंपाक तयार करीत असता गिफर्डने त्याला बोलते केले. "आयुष्य कसे आहे? कसे आहे? काय सांगू तुम्हाला... " तो उद्वेगाने म्हणाला, आणि त्याचा धुमसता अंगार गिफर्डसमोर बरसू लागला. त्या गावातील गोड्या पाण्याची एक मोठी विहीर काही महिन्यांपूर्वी तेथील आधिकार्‍यांनी बुजवून टाकली होती, आणि ह्याचा लाओला विलक्षण राग आला होता. "हे असे करण्याचे कारण काय?" "त्यांनी स्वतःची पाणीपुरवठा करणारी कंपनी काढली आहे, आणि सर्व जनतेने त्या कंपनीकडून पाणी घ्यावे असा त्यांचा आग्रह आहे!" लाओ त्यांच्याशी भांडला. पण शेजारच्याच शिंज्यांगमध्ये (Xinjiang) विघूर (Uighur) विघटनवादी आहेत, तेव्हा २००१ सालानंतर इथे सरकारी अधिकारी कधीही तुम्हाला विघटनवादी म्हणून पकडून तुरुंगात घालू शकतात. लाओलाही त्यांनी ही धमकी दिली. मग त्याचे काही चालले नाही. पण तो त्या अधिकार्‍यांच्या कंपनीचे पाणी मात्र विकत घेत नाही. मग पुढच्या तासा- दोन तासाभरात लाओने गिफर्डला त्या अधिकार्‍यांच्या मनमानीचे, भ्रष्टाचाराचे अनेक किस्से सुनावले. "ह्यातून पुढे काय करता येईल?" गिफर्डने त्याला विचारले. आता लाओ बराच निवळलेला दिसत होता. त्याने दोन बोटे गिफर्डसमोर धरली, व म्हटले "पुढे काय करता येईल हे मी दोन शब्दात सांगतो तुम्हाला." 'ग मिंग? (बंड?)' असे तो म्हणणार असे गिफर्डला वाटले. "रन शौ (सहन करणार!)" लाओ उत्तरला. त्याच्या ह्या उत्तरातून चीनचा गेल्या हजार वर्षांचा इतिहासच बोलला जणू, असे गिफर्डला मनोमन वाटून गेले.

सहन करणे हेच गेल्या अनेक शतकात सर्वसामान्य चिनी जनता करत आलेली आहे, आणि पुढल्या अनेक शतकातही ती हेच करत राहणार आहे, त्याला उद्वेगाने वाटले. परंतु गिफर्डच्या सगळ्याच भेटी अशा विमनस्क करणार्‍या होत्या असे नव्हे. गांसूतीलच ३१२ रस्त्यावरच असलेल्या जांग्य (Zhangye) ह्या गावातील दोन तरूणांसमवेत त्याने जवळजवळ एक संध्याकाळ घालवली होती. त्याबद्दल तो लिहितो की त्या अर्ध्या दिवसात त्यांचा सळसळता उत्साह, त्यांची उमेद त्याला अगदी निकट स्पर्शून गेली. नेहमीसारखी ह्या दोघांची व गिफर्डची भेट रस्त्यात झाली, सहज बोलणे सुरू झाले. हे दोघे 'ऍम-वे' ह्या सुप्रसिद्ध अमेरिकन व्यापार कंपनीच्या तेथील ऑफिसातील विक्रेते होते. चीनच्याच ग्वांगदाँग ह्या दक्षिणेकडील प्रांतात असलेल्या फॅक्टरीत तयार झालेला माल ह्या पंचक्रोशीत विकणे हे त्यांचे काम होते. ह्यात त्यांची कमाई चांगली होत होती. ते जणू उत्साहाने निथळतच होते म्हणा ना, गिफर्ड लिहितो. त्यांच्यापैकी एकाने तर सरकारी नोकरीतील भरपूर आराम असलेली नोकरी सोडली होती. ते दोघे जेवणानंतर गिफर्डला त्यांच्या ऑफिसात घेऊन गेले. तिथे त्यांच्या ह्या कामातील गुरू व त्यांचे अधिकारी श्री. हू ह्यांनी एक छोटीशी मीटिंग आयोजित केली होती, त्यातही गिफर्डला भाग घेता आला. त्या ऑफिसातील प्रत्येक विक्रेता आपला एक मित्र अथवा मैत्रिण घेऊन आला होता. प्रत्येकाने आपली थोडक्यात ओळख करून दिली व आपण पूर्वी काय करत होतो, व आता हे काम मिळाल्यावर आपल्या जीवनात कसा आमूलाग्र बदल झालेला आहे, हे सांगत होता. 

ज्यायुग्वान किल्ला

शेवटी श्री. हू ह्यांनी समारोप केला तेव्हा ते म्हणाले, "'थोडे अथवा जास्त' अशी तडजोड आयुष्यात करू नका. संधी आता आहे, तिचा फायदा घ्या." अगदी छोट्याश्या गावातील लोकांच्या जीवनातील हा बदल अत्यंत सुखावह होता. आता आपली स्वप्ने प्रत्यक्षात येऊ शकतात, हे लक्षणीय आहे. हा छोटासा का होईना, पण सुखावह बदल अगदी ग्रामीण जीवनातही घडून येत आहे, हे समाधानकारक होते. ज्यायुग्वान (Jiayuguan) ते दुनहुआंग (Dunhuang) ह्या अगदी विरळ वस्ती असलेल्या प्रदेशातून बसने जात असता शेजारी बसलेल्या गरीब मध्यमवयीन शेतकर्‍यानेही असेच समाधान गिफर्डकडे व्यक्त केले होते. 'आम्ही पूर्वी अन्नासाठी मोताद होतो, आता कितीतरी संधी उपलब्ध आहेत जीवनात! इथल्या प्रत्येक फाटक्या माणसाकडेही मोबाईल फोन आहे, ह्याला प्रगती नाही म्हणायची तर काय? '