ज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा

प्रकाश घाटपांडे

(पृष्ठ ३)

कौल घेणे
जीवनात घडणार्‍या गोष्टी या तुम्हाला जेव्हा कालमर्यादेत करायच्या असतात त्यावेळी तुम्ही काय शकुनाची वाट बघत राहणार का? मग कौल लावणे ही संकल्पना पुढे आली. कौल कुणाला लावायचा? तर देवाला. सुप्रीम ऍथॉरिटी! मग ते ग्रामदैवत असेल, देवी असेल, खंडोबा असेल, म्हसोबा असेल. बहुतांशी वेळी फूल हे तसबीर, मुर्ती, पिंड यांच्या माथ्यावर गंध लावून चिकटवायचे. समजा ते डाव्या बाजूला पडले तर नकारात्मक कौल व उजव्या बाजूला पडले तर सकारात्मक कौल मिळाला असे मानले गेले आहे. डावी बाजू ही वाईट मानली गेली आहे. त्यामुळेच एखादी व्यक्ती वाईट मार्गाला लागली तर ती वाममार्गाला लागली आहे असे म्हटले जात असावे. सरस बाजू सांगताना उजवी बाजू आहे असे मांडले जाते. रंगाने गोरी असलेली व्यक्ती सुद्धा रंगाने उजवी आहे असे म्हणतात. लोकशाहीत अपारंपरिक विचार, पुरोगामी यांना डावे मानले गेले आहे. याव्यतिरिक्त कौल मागणारा भक्त व कौल देणारा देव यांच्यात एक मध्यस्थ वा दुवा असतो. तो पुजारी, मांत्रिक, तांत्रिक या प्रकारचा असतो. तो कौलांचे अन्वयार्थ भक्ताला सांगतो. कौलांची पद्धत स्थानिक रितीरिवाजानुसार वेगवेगळी असू शकते. पण मथितार्थ एकच असतो. भविष्यात करणार्‍या गोष्टीला देवाची मान्यता ही शुभसूचक आहे की नाही? देवाने नकारात्मक कौल दिल्यावर विषाची परीक्षा कोण घेणार? त्यातून उत्तर हे 'हो' किंवा 'नाही' अशा ५०% शक्यता या प्रांतात असल्याने ५०% प्रतिकूल शक्यता ही अपयशाच्या १००% मोजमापात जाते. लेक्चर बुडवून मॅटिनीला जायचे की नाही अशा संभ्रमात पडणारा कॉलजकुमार छापा-काटा करुन याचा निर्णय लावतो, म्हणजे तो पण कौल घेत असतो.

शांती करणे
शांती कोणाची केली जाते? जो अशांत आहे त्याची. मग अशांत कोण? देवता अशांत, ग्रह अशांत, नक्षत्र अशांत, पृच्छक अशांत. मग नेमके कोण अशांत आहे व किती प्रमाणात अशांत आहे हे पाहून त्याची शांती करतात. साडेसातीत शनीची शांती केली जाते. साडेसातीच्या काळात माणसाच्या प्रयत्नांना यश येत नाही, त्याची व्यावहारिक गणिते चुकतात, त्याला दुर्बुद्धी सुचते, त्याच्यावर संकटे कोसळतात अशी समजूत आहे. या काळात शनीची अवकृपा होउ नये म्हणून शनिवारी, अमावस्येला शनीला तेल वाहणे, रूईची माळ वाहणे, शनीमहात्म्य वाचणे इ. गोष्टी पीडाशामक म्हणून ज्योतिषी सुचवतात अन् माणूस त्या गोष्टी करतो. शनी अनिष्ट असता शनिवारी यथासांग पूजा करुन; लोखंड, उडीद, तेल, मीठ, काळे कापड या गोष्टींचे दान करून शनीला वश करुन घेणे. समजा शनीने जाहीर केले की, बाबांनो मी काही तुम्हाला त्रास देणार नाही, तर मग कोण कशाला करील या गोष्टी? म्हणजे या सर्व गोष्टी शनीच्या भीतीपोटी केल्या जातात, भक्तीपोटी नव्हे. पण भीती असो वा भक्ती, 'शांत होणे' महत्त्वाचे.

नाडीग्रंथात एका व्यक्तीसंबंधाने सोळा कांडे (प्रकरणे) असतात. त्यात शांतिपरिहार कांडात गतजन्मी केलेल्या पापांचा पाढा असतो. त्याचे परिमार्जन करण्यासाठी उपायांची माहिती असते. दीक्षाकांडामध्ये मंत्र, जप, शत्रूभयापासून मुक्ततेसाठी काय धारण करावे, याची माहिती असते. नाडी पट्टी वाचताना त्यात परिहार करण्याचा आदेश वजा सल्ला आलेला असतो. शांती, दीक्षा इत्यादी सोपस्कार म्हणजे पूजापाठ, जपजाप्य, होमहवन, अभिषेक वगैरे विधी करावे लागतात. हे केले तरच त्रास कमी होऊ शकेल असा त्याचा अर्थ.

कालसर्प योगाचे निवारण करण्यासाठी नारायण नागबली विधी, त्रिपिंडी श्राध्द सांगितले जाते. त्र्यंबकेश्वरला ते घाऊक प्रमाणात केलेही जाते. सर्पशाप, नागपूजा वगैरे गोष्टींचा कालसर्पयोगाशी बादरायण संबंध लावून परिहार म्हणून असे विधी सांगितले जातात.

मूळ नक्षत्र हे तमोगुणी, दारूण, अनिष्ट मानले गेले आहे. त्यामुळे मूळ नक्षत्रावर मूल जन्मले तर ते आईबापाच्या मुळावर आले आहे असा समज निर्माण झाला. ज्येष्ठा नक्षत्र भ्रात्यास वाईट किंवा दिरास वाईट. अशा अनिष्ट नक्षत्रातील अनिष्ट भाग काढून टाकण्यासाठी त्याची शांती करण्याचे प्रकार अर्थातच भीतीपोटी निर्माण झाले. "शांती" हा शेवटी मन:शांतीसाठी केलेला प्रकार आहे.

यंत्र
यंत्र म्हणले की आपल्या डोळ्यासमोर कारखान्यातील अवजड यंत्रे येतात किंवा शिलाई मशीन, वॊशिंग मशीन, मिक्सर, ओव्हन अशी घरगुती उपकरणे येतात. 'भविष्यकले'तील ही यंत्रे पण जीवन सुकर करणारी उपकरणेच आहेत. फक्त ती तुम्ही मनोभावे वापरली पाहिजेत. निरनिराळे भौमितिक आकार, काही अंक व काही अनाकलनीय अक्षरे यांचा समुच्चय म्हणजे यंत्रे. कधी फरशीवर कोळशाने, कधी कागदावर रंगाने, तर कधी तांब्याच्या पत्र्यावर कोरलेली अशी ही यंत्रे आता बाजारात मिळतात. साडेसातीत सिद्ध शनी यंत्र, सिद्ध नवग्रह यंत्र, रामरक्षा यंत्र, श्रीयंत्र, श्री गणेश यंत्र, श्री दत्तात्रय यंत्र अशी विविध संकटविमोचन यंत्रे वापरण्यायोग्य आहेत असे सांगितले जाते. आपल्या ऐपती व कुवतीप्रमाणे आपण यापैकी सिलेक्ट करायचे असते. नुसते यंत्र घेऊन चालत नाही तर ते "सिद्ध" करावे लागते. म्हणजे तुमचा मोबाईल किंवा संगणकप्रणाली जशी वापरकर्त्याला ऍक्टिव्हेट करावी लागते, तरच तिचा लाभ घेता येतो तसेच या यंत्रांचे आहे. गणपतीची जशी प्राणप्रतिष्ठापना होते तशा प्रकारचे पूजाविधी किंवा मंत्र म्हणून हे यंत्र ऍक्टिव्ह केले जाते.

कवच
कर्णाला कवच कुंडले असल्याने तो अभेद्य होता असे महाभारतात म्हटले आहे. लढाईत योद्धे हे चिलखत घालीत. शत्रूचा प्रहार झेलला तरी त्यामुळे आपल्याला इजा होऊ नये म्हणून हे चिलखत काम करते. चिलखत म्हणजे एक प्रकारचे संरक्षक कवचच. कवच असले की कसे सुरक्षित वाटते. वाहतुकीत काही अपघात झाला तर आपले डोके शाबूत राहावे म्हणून घातले जाणारे हेल्मेट हे कवचच आहे. डोके हा शरीराचा भाग झाला, पण आतल्या मनालासुद्धा संरक्षक कवच लागते. ही कवचे म्हणजे विशिष्ट प्रकारची स्तोत्रे असतात. ती विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट काळ म्हणावयाची असतात. सूर्य कवच हे एक असे प्रभावी कवच आहे की ज्याने आरोग्ये, संतती, प्रमोशन, दिवाळखोरी असे प्रश्न सुटतात. पूर्वी डॉक्टरांच्याकडे सर्व रोगांवर चालणारे बाटलीतील एक लालरंगाचे औषध असायचे अगदी तसे हे रामबाण कवच. एखाद्या कवचाला "सिद्ध होण्याच्या प्रतीक्षेत" ही थांबावे लागते. कारण तुमच्या कवचाने तुमचे संरक्षण झाले पाहिजे हे खरे, पण इतर कवचांची हानी होता कामा नये.

शेवटी आपल्यासाठी कवच आहे कवचासाठी आपण नाही, हे भान बाळगावे लागते नाही तर कवचाखालचा माणूस संपून गेला तरी कवचाला पत्ता नाही अशी वेळ यायची.