क्या होती है हमारी ड्यूटी ?

संतोष शिंत्रे

वर्ष १९७५ सोलापूर. एका अत्यंत मध्यमवर्गी मंडळींच्या गल्लीत राहणारे आम्ही इयत्ता सहावीतले काही मित्र खेळायच्या नावाखाली बर्‍याच दिवसांनी संध्याकाळी एकत्र आलो होतो. 'खेळण्या'ची रेंजही फार नसायचीच. गोट्या, क्रिकेट, कधी अमुक अंतरावर दोरी बांधून बॅडमिंटन. त्या दिवशी आमच्यातल्या एकाचे डोळे कुठल्यातरी अगम्य आनंदानं चमचमत होते. आम्ही भेटल्याभेटल्याच पाण्याचा लोंढा फुटावा, तशी त्यानं बोलायला सुरुवात केली.

"संत्या, पाच्छा, आज दुपारी 'दीवार' पाहिला!"

दुसर्‍या मित्राचे वडील रेल्वेत टायपिस्ट होते. त्यामुळे सांस्कृतिक श्रेष्ठत्वाची कोणतीही ओझी डोक्यावर न बाळगता, बायकामुलासह सर्व हिंदी सिनेमे ते निःशंकपणे पहायचे. ज्वार-भाटा, हमजोली असे अप्रतिम सिनेमेही ते सोडायचे नाहीत.

"तुम्ही आत्ता पाहिला? आम्ही केव्हाच पाहिला!" दुसरा मित्र.

आमच्या घरात त्या काळी 'गीतरामायणा'चा धुमाकूळ चालू होता. त्यामुळे त्यांचं बोलणं मला कळायला काही स्कोपच नव्हता.
"काय बोलताय तुम्ही? पिक्चर आहे हा? कोणाचा?" मी.
ज्या नजरेनं त्या दोघांनी माझ्याकडं पाहिलं, ती मी आजतागायत विसरु शकत नाही.... पण आज समजू मात्र शकतो.

"दीवार बे ! (सोलापूर!) माहिती नाही तुला? आभिताब बच्चन! (त्यानं असाच उच्चार केला.) काय पिक्चर आहे! दोन भाऊ-एक इन्स्पेक्टर,एक स्मगलर. काय काम केलंय आभिताब नं!"... 

ती संध्याकाळ उर्वरित वेळ त्यांनी माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून 'दीवार' मधल्या सौंदर्यस्थळावर सहावी यत्तेच्या पातळीवरची उद्बोधक चर्चा करण्यात घालवली. मी त्यांच्या बोलण्यातून मला काय मिळतील, ते ज्ञानकण टिपण्यात वेळ घालवला. नशीब, आमच्या घरच्यांनी मला 'आनंद' दाखवला होता. त्यात डॉक्टरचं काम केलेला जो माणूस तोच हा, इतपत बोध मला त्यांच्या बोलण्यातून झाला.

इयत्ता अकरावी. पुण्यातल्या नीलायम टॉकीजला सवयीप्रमाणे 'दीवार' लागला होता. री-रनला अमिताभचे सिनेमे कुठल्या थेटरात कुठले लागायचे हेही ठरुन गेल्याचा तो काळ होता. त्यानुसारच हे सगळं चाललं होतं. फक्त माझ्या हातात 'दीवार'चं तिकीट होतं, आणि काही काळातच मी तो बघणार होतो.... पहिल्यांदाच. सकाळीच जेव्हा मित्रानं 'जायचं का? तुझा राहिलाय'.... ही आठवण करून देतानांच सोलापूरच्या 'त्या' प्रसंगाची, मित्रांच्या नजरेची आठवण ताजी केली होतीच. बघून बाहेर आल्यावर माझं काय झालं, याची वर्णनं करण्यात काहीच हशील नाही. ताबडतोब त्याच दिवशी मी तो नऊ ते बाराच्या खेळालाही पाहिलाच, इतकं पुरेसं आहे. मंगला गोडबोल्यांवर पु.लं.चा, कणेकरांवर दिलीपकुमारचा पहिला प्रभाव पडतांना जे काही झालं असेल, ते सगळं गारूड पूर्ण होऊन चुकलं होतं. जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी या विषयावरील त्यांचे ते ते लेख वाचावेत. पडणा‍र्‍या अनेक प्रश्नांची उत्तरं घरातून मिळेनाशी झाली होती. बाकी आसपास इंजिनियरींग - मेडिकलच्या ऍडमिशनसाठी रात्री कुथणा‍र्‍या नामदार गोखले टाईप अभ्यासू लोकांची चलती होती. भाषणां-व्याख्यानां-पुस्तकांमधून डोकावणारी अपेक्षित नैतिकता रोजच्या वागण्याबोलण्यात कुठेच, कुणाचीच दिसत नव्हती. 'प्रेम जमणे' या तत्कालीन सर्वोच्च अँबिशनला खतपाणी घातलं जावं, अशी एखादीही घटना क्षितिजावर सुद्धा दिसत नव्हती. काहीतरी "म्यँ" टाईप झालं होतं - पण काय झालंय तेच कळतं नव्हतं. जे चाललं होतं ते नको होतं. त्यापासून सुटकाही दिसत नव्हती. अभ्यासक्रमातून काही मिळेल, ही शक्यता खात्रीशीर रीतीनं दुरावली होती. आपल्या मनातलं बोलणारा, पण आपल्याहून सर्वश्रेष्ठ असा एखादा, आदर्श स्वप्नं रंगवण्यासाठी का होईना, हवा होता. कार्डबोर्ड कॅरॅक्टर तर कार्डबोर्ड कॅरॅक्टर; लार्जर दॅन लाईफ तर लार्जर दॅन लाईफ; फिक्शनल, तर फिक्शनल. हे सगळं आत्ता कळतंय. तेव्हा फिकीरच कुणाला होती? 'आनंद' मधल्या डॉ. बॅनर्जीच्याच भाषेत म्हणायचं, तर "उन्हीं दिनों मेरी मुलाकात अमिताब बच्चन से हुई।" 

मग काहीच सुटलं नाही. 'त्रिशूल', 'डॉन', 'मजबूर', 'काला पत्थर' अगणित वेळा झालेच. पण 'समविचारी' अनेक मित्र भेटल्यामुळे 'ग्रेट गॅम्बलर'च्या पातळीवरचेही सिनेमे दोनदोनदा झाले, याची आज गंमत वाटते. वेगवेगळ्या पातळ्यांवर अभ्यास सुरू झाला. 'दीवार' मध्ये शेवटी मंदिरात जातांना विजय बूट काढून जातो की नाही या पैजेच्या खातरजमेसाठी एकदा 'दीवार' (पुन्हा!). यातून शशीकपूरकडे 'केस' सोपवली जात असतांना मागे 'सरोज वॉच कंपनी'चं कॅलेंडर आहे- त्यावरची तारीख १९ जुलै आहे, म्हणजे पुढच्या सीनच्या पावसाळ्यातल्या पाठलागाची बरोबर कंटिन्युइटी कशी आहे इतपत चर्चेइतका तो विकार बळावत गेला.

आजूबाजूनं जेव्हा, जसा, जिथे जमेल तसा 'शोले' साथीला असायचाच. पण ते सगळं गणितच वेगळं जमलं होतं. त्याच्याबद्दल भरपूर लिहून झालंही आहे आणि ही स्मरणयात्रा जराशी वेगळी आहे. आमच्या या आदर्शवत आयकॉनचा दरवेळी एक वेगळाच काहीतरी पैलू समोर यायचा. 'सौदागार' मधली पश्चात्तापदग्ध हार, 'आलाप' मधला वेगळाच सूर, 'दो अंजाने' च्या पहिल्या भागातला साधेपणा, 'मजबूर' मधलं नजरेनजरेतून ओसंडणारं बहिणीचं आणि कुंटुंबावरचं प्रेम, 'कभी कभी'तला उत्तरायुषात आलेला कोरडा अबोलपणा, 'जंजीर'च्या प्राणच्या गाण्यानं हसू फुटण्यापूर्वी दाबलेली धुम्मस, 'डॉन' मधल्या पानवाल्याच्या मिश्कीलीनं आणलेली रंगत.

या जादूभर्‍या, शौकीया दिवसांच्या पहिल्या मोहिनीनंतर आपल्याला आवडणारं पडद्यावरचं हे व्यक्तिमत्त्व कुठून कुठून तयार होत गेलेलं असतं हे आणखी चांगलं कळायला लागलं. अनेकांचा हातभार त्याला लागत होता. कित्येक वेळा अशा काही गोष्टी लोकांच्या, प्रेक्षकांच्या नजरेतून निसटलेल्याही दिसतात. उदाहरणार्थ, 'दो अंजाने' मधला आधीचा अमिताभ ड्राफ्टिंग क्लार्क दाखवला आहे. (स्पेलचेकच्या जमान्यात अर्थात ही जमात नष्ट!) त्यामुळे इंग्लिश 'ग्रामर' तो रागाच्या तीव्र प्रसंगीही, दारूच्या नशेतही, विसरत नाही. प्रेम चोप्राला तो शिवी देतो ती सरळ 'छक्क्या' वगैरे न म्हणता 'यू थर्ड पर्सन सिंग्युलर, न्यूट्ररुजेंडर!' असं म्हणतो. हे कौशल्य कोण संवादलेखक असेल त्याचंच म्हणायला हवं. सलीम - जावेद नसते तर अमिताभचं काय झालं असतं? पण यश चोप्रा - सलीम जावेद आणि अमिताभ हे सामंजस्य नंतर त्या प्रमाणात कधी पहायला मिळालं नाही हे ही खरंच. ही 'यशो'गाथाही 'दीवार'नंच सुरु केली. दीवारच्या शेवटी असलेलं अमिताभचं सर्वाधिक गाजलेलं मरणदृश्य. घंटांमधून हेलपाटत अमिताभ आईच्या मांडीवर कोसळतो, ते. सकाळी ठीक ९ वाजता अमिताभ चित्रीकरणाला हजर झाला होता. यश चोप्रांनी त्याला सांगितलं, की हवा तेवढा वेळ घे. शॉटसाठी तयार झालास की सांग. अमिताभनं सांगितलंय, की पुरेसं धैर्य गोळा करुन एका 'टेक' मध्ये शॉट देण्यासाठी त्यानं अकरा वाजेपर्यंतचा वेळ घेतला - जो चोप्रांनी त्याला दिला होता. पंचाहत्तर टक्के दीवार पूर्ण होताहोताच, त्यांनी 'कभी कभी' सुरु केलाही होता. दोन्हींची जातकुळी पूर्ण वेगळी. याच सामंजस्यातून 'त्रिशूल' आणि 'काला पत्थर'ही निर्माण झाले - त्यांचीही भट्टी मस्त जमली. अनेकवेळा खुद्द अमिताभच्या सूचनाही लोकांनी स्वीकारल्या, हे काही ठिकाणी रेग्युलर आपल्यावर उपकार झाले आहेत. 'राखी'च्या मृत्यूनंतर 'शक्ती' मधला दिलीप कुमार- अमिताभचा एकमेकांसमोरचा अबोल शॉट. मूळ चार पानी संवाद अमिताभसाठी लिहीला गेला होता. पण हे दृश्य संपूर्ण शांततेत, निःशब्दच पार पडलं पाहिजे या अमिताभच्या आग्रहाला सलीम जावेद आणि दिग्दर्शक, दोघांनीही मान्यता दिली, म्हणून तो आज दिसतो तो शॉट झाला.

अनेक ठिकाणी विनोदी ढंगानं (अमर, अकबर, अँथनी, नमकहलाल) इंग्लिशचा वापर अमिताभ प्रभावीपणे करु शकला, ते त्याच्या घरच्या सुसंस्कृत वळणामुळं - किंवा शिक्षणामुळं. 'माय नेम इज अँथनी गोन्साल्वीस' गाण्यातला काही भाग मायकेल ड्रेटनच्या 'जोना अँड द व्हेल' नं प्रभावित आहे, कारण कॉलेजमध्ये अमिताभनं ती कविता वाचली होती - लक्षात ठेवली होती. 'अँथनी'ची 'ज्युक्स्टापोझिशन्ड बाय द हेमोग्लोबिन इन द् अटमॉसफिअर' ही गाजलेली अर्थहीन बकबक, नमकहलालमधली पूर्ण लांबड लावलेली क्रिकेट कॉमेंट्री - हे सगळं अमिताभनं उत्स्फूर्त म्हटलं आहे. त्याला ते कुणी लिहून दिलेलं नाही. गंमत म्हणजे (पुन्हा दीवार!) दीवारच्या शेवटच्या दृश्यातले संवादही अमिताभनं आपापले, उत्स्फूर्त म्हटले आहेत. एकही लिखित ओळ त्यात नाही. 'ह्या' वेळी एखाद्या माणसाच्या काय भावना असतील? खरं, आतलं आणि 'शेवटचं' भावनांचं प्रदर्शन तो नक्की कसं करेल? हे सगळं विचारांत घेऊन ती उत्स्फूर्तता त्यानं तिथे आणली आहे.