पडू आजारी, मौज हीच वाटे भारी...

प्रभाकर पेठकर

(पृष्ठ २)


तेवढ्यात पुन्हा ते वॉर्डबॉइज स्ट्रेचर घेऊन आले. अरे! मी पुन्हा समजावयाचा प्रयत्न केला. "अहो! कुठे जायचंय मला सांगा मी येतो. मी चालू शकतोय उगीच स्ट्रेचर वगैरे कशाला?" पण ते ऐकेनात. "वॉर्डात जायचंय. झोपा तुम्ही." नाईलाज झाला. डाव्या बाजूला सौ. आणि मुलगा (चिंताक्रांत), उजव्या बाजूला, सलाईनची बाटली हातात धरलेला, कर्तव्यपूर्तीने भारलेला मित्र, डोक्याशी स्ट्रेचर ढकलणारा आणि पायाशी स्ट्रेचर ओढणारा असे, स्टेशनवरच्या हमालासारखे भाव चेहर्‍यावर असणारे, दोन वॉर्डबॉइज. असे पुढून मागून इंजीन जोडल्याप्रमाणे आमची यात्रा सुरू झाली. मला रस्ता दिसत नव्हता. नुसते वरचे मजले आणि गोलाकार छत दिसत होते. मध्ये मध्ये इतर पेशंटचे नातेवाईक (इतर काही काम नसल्यामुळे) उठून स्ट्रेचरवर झोपलेल्या माझ्या चेहर्‍याकडे, 'वैष्णव जन तो तेणे कहिए रे, पीड परायी जाणे रे' अशा चेहर्‍याने बघायचे. मी त्यांच्याकडे हसून बघितले की त्यांचा 'हिरमोड' होऊन ते पुन्हा आपापल्या जागेवर बसत होते. बाह्यरुग्ण विभागातून, गॅलरीतून, लिफ्ट मधून अशी माझी यात्रा ४थ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात पोहोचली.
तिथे बहुतेक आधीच कळविले होते. कारण ते वाटच पाहत होते. आल्या-आल्या मला काही न विचारता ४-५ जणांनी ती चादर माझ्यासकट उचलून मला बेड क्रमांक ५ वर ठेवले.

रेसींग कारच्या ट्रॅक मध्ये जसे लॅप संपल्यावर तिथले कर्मचारी रेसींग कारचा ताबाच घेतात, कोणी टायर बदलतो, कोण हवा भरतो, कोण दिवे पुसतो तर आणखीन कोणी आणखीन काही करतो तसे तिथले कर्मचारी चारही बाजूंनी मला झटले. माझा शर्ट काढला गेला. छाती स्वच्छ पुसून (मी सकाळी लक्स साबणाने स्वच्छ अंघोळ केल्याला अजून ४ तास पण झाले नव्हते) माझ्या छातीवर डाव्या-उजव्या बाजूस २-२ आणि छातीवर मध्यभागी एक अशी लीडस चिकटवून त्याच्या वायर्स मागच्या मॉनिटरला जोडल्या. मला न दिसणार्‍या मॉनिटरवर टीऽऽऽक.. टीऽऽऽक.. टीऽऽऽक अशी, मी जिवंत असल्याची, मला जाणीव करून देणारी, यंत्रणा कार्यान्वित झाली.
तिथल्या डॉक्टरला मी "माझ्या नाकातून खुपसलेल्या नळीचे काम आता झाले असेल तर काढून टाका." अशी विनंती केल्याबरोबर त्याने ती काढून टाकली. आत्तापर्यंतच्या माझ्या विनंत्यांपैकी ह्या एकमेव विनंतीला मान देण्यात आला होता. तेवढ्यात एक डॉक्टरीण आली.
मला म्हणाली, "हे सलाईन अपुरे आहे. एका वेळी २ बाटल्या लावाव्या लागतील. त्यामुळे हाताचे सलाईन काढून मानेच्या बाजूस एक बारीक छेद देऊन तिथे मोठे सलाईन लावावे लागेल." म्हंटले, "'करा काय करायचंय ते!" मानेच्या बाजूस एक मोठे छिद्र करून तिथे चाव्यांच्या जुडग्यासारखा एक इन्लेट्सचा जुडगा बसविण्यात आला. त्यातील दोनातून सलाईन, आणि बाकीच्या इन्लेट्समधून औषधे अशी व्यवस्था करण्यात आली.
ते झाल्या झाल्या ती मला म्हणाली, "पँट काढा, कॅथेटर बसवायचे आहे."
मी त्याला मात्र कठोर आक्षेप घेतला. "म्हंटले कशा करता. मी शुद्धीत आहे. माझे सर्व व्यवहार व्यवस्थित करू शकतोय."
डॉक्टर, "नो सर, बट वुई हॅव टू मॉनिटर युरीन. वुई हॅव टू मेझर इट."
मी, "नो, बट आय ऍम क्वाईट ओके अँड हॅवींग नो कंप्लेंटस अबाउट युरीन."
डॉक्टर, "आय नो! बट इटस आय. सी. यू. प्रोटोकॉल. प्लीज कोऑपरेट."
माझा नाईलाज झाला. माझे सर्व 'प्रायव्हेट' पार्टस, 'पब्लिक' झाले.
मी डोळे मिटून घेतले.
सर्व आटपून सर्व जणं गेले तेंव्हा मी नळ्या आणि वायर्सने मशिनला जोडलेला एक पेशंट झालो होतो. बेड क्रमांक ५.
***
दुपारी मुख्य डॉक्टर आले.
"हं! ....काय म्हणताय पेठकर?" असे 'लहानपणी आपण एकत्र सूर-पारंब्या खेळत होतो की नाही?' अशा टाईपची जवळीक साधत माझी 'प्रोफाइल' वाचायला लागले. मी पुन्हा, सकाळ पासून तिसर्‍यांदा, आख्खी टेप वाजवली.
"'हं .. सर्वात आधी मी तुमची ऍस्प्रीन बंद करतोय."
वा! हा डॉक्टर बरा दिसतो आहे! औषध देण्याऐवजी बंद करतो आहे!
"अल्सर आहेसे वाटते आहे. आपण उद्या एंडोस्कोपी करून टाकू. बरं वाटेल तुम्हाला. काळजी करू नका." आणि नर्सला काही सूचना देऊन डॉक्टर निघून गेले.
'एंडोस्कोपी करून टाकू' हे डॉक्टर 'उद्या तुम्हाला एक छानशी कानटोपी शिवून टाकू' इतक्या सहजपणे सांगून गेले, तरी मला मला कल्पना होती की आता उद्या हे माझ्या घशातून कॅमेरा आंत सोडून तपासणी करणार. अल्सर कुठे आहे? किती आहेत? किती लहान किंवा किती मोठे आहेत? इत्यादी तपासणार. मला डॉक्टरने नुसते, 'हं.. जीभ बघू दे' असे म्हणून जास्तवेळ जीभ बाहेर ठेवायला लावली तरी उलटी सारखे होते. काय होणार उद्या? चिंता वाटू लागली.
संध्याकाळी माझ्या मित्राचे डॉक्टर भेटायला आले. पेपर तपासले, ट्रीटमेंट काय चालू केली आहे ते पाहिले. माझ्याशी बोलले आणि "काळजी करू नका, काही त्रास होत नाही. ५ मिनिटांचे काम असते" असे सांगून गेले.
अजून मुंबईला घरी कळविले नव्हते. ते सर्वांना कळवून टाक असे बायकोला सांगितले. पण त्यांना म्हणावे नुसत्या टेस्ट्स आहेत काळजी करू नका, असे सांगण्यास सांगितले. नाहीतर आई उगीच रात्रभर जागत बसली असती.

त्या रात्री मलासुद्धा झोप नीट लागली नाही. कशी लागावी? मानेला तो जुडगा बांधून ठेवला होता. छातीवर पाच वायर्स आणि खाली मुत्रवहनासाठी नळी. कुशीवर वळता येत नाही. उताणाच्या उताणा. रात्री कोणी पेशंट जोरजोरात कण्हतात, कोणी ओरडतात. जरा शांत झाले की घड्याळाची टिक टिक ऐकू यायची. मध्येच ग्लानी यायची, मध्येच जाग. हाताला घड्याळ नाही, भिंतीवरचं दिसत नाही. डोक्यामागची खिडकी बंद असल्यामुळे बाहेरचे आवाज, प्रकाश काही नाही. जाग नाही, झोप नाही, वेदना नाही पण अडचण! कुशीवर वळता येत नाही आणि उताणे झोपायची सवय नाही. स्वप्न नाही पण भास होताहेत. केव्हा होणार सकाळ? केव्हा होणार सकाळ? केव्हा होणार सकाळ?
***
"अंकल, अंकल!"
"अं!"... अरे! म्हणजे झोप लागली होती वाटते!
सिस्टर उठवत होती.
"स्पंजिंग करनेका है।"
"हं .."
स्पंजिंग, दात घासणे उरकले पण चहा नाही. कालपासून अन्नाचा कणही पोटात नव्हता. नुसते सलाईन चालू होते. अर्थात भूक ही लागली नव्हती.
सिस्टर मलबारी होती. स्वभावाला चांगली होती. सेवाभावी वृत्तीची होती.
सकाळी सकाळी वॉर्डमध्ये लता मंगेशकरची भजने, भक्तिगीते अगदी ऐकू येईल न येईल इतपत आवाजात लावलेली होती. सकाळपासून औषधे-गोळ्या सुरू झाल्या. पुण्यात ज्यांना ज्यांना कळविले होते त्यांची खरेतर कालपासूनच वर्दळ सुरू झाली होती. अशा अवस्थेत आपल्याला कोणी पाहू नये असे वाटत होते. आज भयंकर अशक्तपणा जाणवत होता. डॉक्टरीण बाई आल्या. नर्सला माझे हिमोग्लोबीन, शुगर तपासायला सांगितले. कालही दोनदा तपासले होते. हिमोग्लोबीन बरेच खालावले होते. माझे डोळे तपासून "रक्त द्यावे लागेल" असे तिने सांगितले. हल्ली हॉस्पिटल म्हंटले की एड्सची लागण होण्याची भीती वाटते. त्यातून रक्त देणार म्हणजे भीती जास्तच. मी माझी भीती बोलून दाखविली.
पण डॉक्टरांनी, "तशी काही चिंता करू नका. योग्य त्या सर्व तपासण्या करूनच रक्त दिलं जातं अशी शाश्वती दिली."

पण मन चिंती ते वैरी न चिंती. करणार काय? नाईलाज!
रक्त चढविण्यात आले. बाहेर नातेवाईक चिंताक्रांत. आख्खी सकाळ त्यात गेली. मध्ये जागेवरच २-४ एक्स रे काढण्यात आले.
अकरा वाजता एंडोस्कोपीसाठी जायची वेळ आली. पुन्हा बेडवरून स्ट्रेचरवर. सगळ्या वायर्स, नळ्यांसहित आमची यात्रा पुन्हा वॉर्डमधून गॅलरीत, तिथून लिफ्टमध्ये, तिथून कुठल्यातरी मजल्यावर, तिथे लॅब मध्ये. बरोबर सौ., मुलगा, मित्र, नातेवाईक.... मी असाहाय्य.
डॉक्टर मराठी होते. माझ्याशी गोड बोलत, माझा धीर वाढवत त्यांनी माझ्या पोटात कॅमेर्‍याची नळी घातली. मला कोरड्या उलट्यांसारखे व्हायला लागले.
डॉक्टर, "हं ... झालं!", "रिलॅक्स! होतंच आहे!", "झालं झालं! काढतो कॅमेरा बाहेर." असे म्हणत आतले परीक्षण करत होते, फोटो काढत होते. दहा मिनिटात कार्यक्रम आटपला. पण डोळ्यातून पाणी आले. दुखत खुपत नाही पण कोरड्या उलट्यांमुळे शरीर आतल्याआत फार धडपड करते. लगेच रिपोर्ट तयार झाला. "जुन्या अल्सरची बंद झालेली २ सें. मी. X २ सें. मी. जखम दिसते आहे. पण ती ओपन नसल्यामुळे तिथूनच रक्तस्त्राव झाला की नाही समजण्यास मार्ग नाही. बाकी कुठे जखम नाही."
हुश्श! झाली एकदाची टेस्ट. आता सोडतील लवकरच. आमची यात्रा आय. सी. यू. त परतली.
टेस्टचे जे एक दडपण मनावर होते ते उतरले. आता मुख्य डॉक्टर काय सांगतात ते पाहायचे. मुंबईहून आई, बहीण, भाऊ, मेव्हणे सर्व जण आले होते. आईच्या आणि ताईच्या डोळ्यांचे पाणी ठरेना. मलाही भावना आवरता आल्या नाहीत. असा वायर्स आणि नळ्यांनी जखडलेला, असाहाय्य मी कधीच नव्हतो. त्या केविलवाण्या अवस्थेत कोणी आपल्याला पाहू नये असे वाटत होते. त्यामुळे मलाही अश्रू अनावर झाले.