पडू आजारी, मौज हीच वाटे भारी...

प्रभाकर पेठकर

(पृष्ठ ३)

"अंकल, ऐसा नही करनेका। ठीक होना है आपको? रोनेका नही।" ती बिचारी नर्स माझ्या कपाळावर थोपटून मला समजावत होती. मीही मनाला आवर घातला. अजून मला नक्की काय झाले आहे आणि का झाले आहे, ह्याची आईला-ताईला कल्पना नव्हती. ती मी दिली. काळजी करण्यासारखे काही नाही असे वारंवार समजावले.
संध्याकाळी मुख्य डॉक्टरांची फेरी झाली. रिपोर्ट बघितला.
"गुड! काळजीचे कारण नाही."
मी मंद स्मित केले.
"किती दिवस राहायला लागेल अजून?" मी मुख्य मुद्द्यालाच हात घातला.
"पाहूया. स्टूल चा रिपोर्टही आलाय. अजून रक्तस्त्राव होतोय. वुई हॅव टू फर्स्ट अरेस्ट दॅट. हिमोग्लोबीन खूप लो आहे. आज अजून एक रक्ताची बाटली चढवू. काही औषधे बदलून देतोय. दोन दिवस ऑब्झर्व्ह करू. देन वुई विल डिसाईड."
"पण डॉक्टर खरंच त्याची काही आवश्यकता आहे का? आय ऍम फिलिंग बेटर. इफ आय गो होम, आय विल रिकव्हर फास्ट."
डॉक्टरांनी मंद स्मित करून मला थोपटल्यासारखे केले. "अहो, आम्हाला काय हौस आहे का तुम्हाला इथे झोपवून ठेवायची? आम्हालाही तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन घरी जायला हवे आहात! पण काही कारणाने परिस्थिती आवाक्याबाहेर गेली तर तुम्हालाच जास्त त्रास होईल. त्यामुळे इथे तुमची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल. २ दिवस जास्त राहावं लागलं म्हणून काही बिघडत नाही. पूर्ण बरे होऊन घरी जा. ओके?" पुन्हा नाईलाज!
"पण डॉक्टर, एक रिक्वेस्ट आहे."
"बोला"
"कॅथेटरची गरज नसेल तर काढून टाकायला सांगा ना कोणाला तरी! फार त्रास होतोय!"
त्यांनी नर्सकडून कसलेसे रिपोर्टस मागवले. ते तपासून कॅथेटर काढण्याची सूचना नर्सला दिली.
मी त्यांना धन्यवाद दिले. त्यांनी हसून थोपटले आणि ते निघून गेले.
कॅथेटर निघाले. पण दोन दिवस मूत्र विसर्जनास त्रास होत होता.
रक्ताच्या दोन बाटल्यांमुळे आता जरा हुशारी वाटत होती. जेवण्याखाण्याचे काय? नुसत्या सलाईनने भूक जरी लागली नाही तरी तोंड फारच बेचव झाल्यासारखे झाले होते.
दुसरी रात्र झोप लागली. बहुतेक त्या वातावरणाची सवय झाली. अजून २ दिवस राहावे लागणार ह्याची मनाने केलेली स्वीकृती, सगळ्या टेस्ट्स झाल्यामुळे (आणि रिपोर्टस नॉर्मल आल्यामुळे) मनावरचे दडपण उतरले होते. आता आजूबाजूचे ज्ञान होऊ लागले.


माझ्या पासून जवळच एक कोकणस्थ ब्राह्मण आजी होत्या. मला दिसत नव्हत्या पण २ बेड जवळच होत्या. आजींचे खास कोकणस्थ ब्राह्मणी शब्दोच्चार, विधानांमधला ठामपणा, आख्ख्या वॉर्डला डोक्यावर घ्यायची धमक ही मला पडल्या जागेवरूनच जाणवत होती.
"जाऊ द्या मला. मरू द्या मला." मध्येच ओरडायच्या.
मुलगा भेटायला आला की, "तू मारून टाक मला. जड झाल्ये मी तुम्हाला!" असे ओरडायच्या.
डॉक्टर आणि मुलातले संभाषण मला ऐकू आले. डॉक्टर सांगत होते, "त्यांना ऑक्सिजन लावणे गरजेचे आहे. पण त्या ऐकत नाहीत. त्यांना जगण्याची इच्छा उरलेली नाही." मला ऐकून वाईट वाटायचे. त्यांना काय व्याधी होती कळायला मार्ग नव्हता पण त्यांच्या जिवाची तडफड इतरांच्या मनाला अस्वस्थ करणारी होती. नर्सच्या अंगावरही ओरडायच्या. इंजेक्शन द्यायला आलेल्या नर्सच्या फाडकन कानाखाली वाजवली आजीबाईंनी. वॉर्डभर आवाज घुमला. पण नर्स त्यांच्या अंगावर ओरडली नाही.
"हं माँजी ऐसा नही करनेका! दवाई लेना चाहीए।" असे म्हणून तिने दोन वॉर्डबॉइजच्या मदतीने आजीबाईंना धरून ठेवले आणि इंजेक्शन दिले. नंतर ती एका बाजूला इतर नर्सेसच्या कोंडाळ्यात थोडावेळ बसली होती. रडत असावी. इतर मैत्रिणी तिचे सांत्वन करीत होत्या. दहा मिनिटात काही झालेच नाही अशा आविर्भावात ती कामाला लागली.
संध्याकाळी माझ्या मित्राचे डॉक्टर आले. पेपर्स तपासले. मला वाटले खुश होतील. उद्या डिस्चार्ज घेऊ म्हणतील. पण झाले उलटेच.
मला म्हणाले, "एक छोटाशी, फार पूर्वी बरी झालेली, जखम आहे. त्यावर अगदी छोटा डाग दिसतोय. पण तीच जखम ओपन होऊन पुन्हा बंद झाली की दुसरी एखादी जखम अजून कुठे आहे, ते कळत नाही."
"पण डॉक्टर दुसरी जखम नाही असे रिपोर्टमध्ये दिले आहे."
"हो, नं! पण आता आपण ही जी तपासणी केली ती घशापासून जठरा पर्यंत. त्यात अन्ननलिकेच्या टोकाला ती जखम आहे. जुनी जखम. बरी झाली आहे आता, पण जठराच्या पुढे आतड्यात काही जखम असेल तर? आता आपण ऍडमिट झालोच आहोत तर सर्व चेक करून घेऊया."
'आपण ऍडमिट झालोय?' व्वा!. च्यायला, ऍडमिट मी झालो आहे. त्रास मला भोगायला लागताहेत. ह्याला काय लागतं हे चेक करूया ते चेक करूया म्हणायला? सायकलचे पंक्चर शोधायचे असल्यासारखे 'सहज' सांगत आहे!
"'इज इट रिअली नेसेसरी डॉक्टर?"
"हो! आपण कोलोनोस्कोपी करून घेऊया."
"ते काय असतं?" मी अंदाज येऊन घाबरून म्हणालो.
"काही नाही! एंडोस्कोपी केली तसेच आतडेही चेक करून घ्यायचे. म्हणजे कसं एकदा सर्व चेक झाले की शंका उरणार नाही. उगीच नंतर पस्तावायला नको. दोन दिवस जास्त राहावं लागलं तरी पुढची ऑपरेशन्स आणि जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याचं टाळता येईल."
"ठीक आहे." पुन्हा माझा नाईलाज.
***
डॉक्टर मला भीतिदायक विचारांच्या आवर्तनांमध्ये झोकांड्या खाण्यासाठी सोडून निघून गेले. डॉक्टरांनी गुळमुळीत उत्तर दिले असले तरी मला अंदाज होताच की एंडोस्कोपी ही वरून केली जाते तर कोलोनोस्कोपी खालून केली जाते. बापरे! प्रसंग वेदनादायी असेल का? भूल वगैरे देतात की भूल दिल्याशिवायच करतात? रुग्णाच्या पार्श्वभागी कॅमेर्‍याची नळी घुसवून आतड्यांचे फोटो घ्यायचे आणि तपासणी करायची. कल्पनाच भयानक होती. पण मानवी शरीर हे एक यंत्र आहे आणि त्यात बिघाड झाले तर ते दुरुस्त करण्यासाठी आताचे वैद्यकीय शास्त्र बरेच प्रगत आहे. अशी मनाची खोटीच समजूत घालायचा प्रयत्न करायला लागलो.
नर्सने विचारले, "अंकल, व्हॉट यू लाइक टू ड्रिंक? पेप्सी, मिरींडा, स्प्राईट?" मला प्रश्नाचा रोख कळेना.
मी म्हणालो, "सिस्टर, आय लाइक पेप्सी वुईथ जमाईकन डार्क रम अँड आईस."
ती हसायलाच लागली. "यू आर व्हेरी जोविअल! अंकल, कल कोलोनोस्कोपी है नं, उसके लिए पेट साफ करनेकी दवा सॉफ्ट ड्रिंकमेसे देनी है। टेल मी नाउ व्हॉट यू लाइक?"
"ठीक है। गीव्ह मी स्प्राईट."
त्या रात्री २ लिटर स्प्राईट जुलाबाचे औषध घालून थोडे थोडे प्यायलो. रात्रभर मी आणि नाइट ड्यूटीवरचे वॉर्ड बॉइज जागत होतो.
त्या रात्री शेजारच्या बेडवर एक ऍक्सीडेंट केस आली होती. बाई होती. पस्तीस-चाळिशीतली असावी. बापरे! फार वाईट ऍक्सीडेंट होता. बाई दिसत नव्हत्या पण त्यांचे ओरडणे, विव्हळणे, डॉक्टरांनी हात लावला की कळवळणे अंगावर भीतीचा काटा आणणारे होते. त्यांच्या गाडीला ऍक्सीडेंट झाला होता. त्यांचे पती आणि इतर दोघेही अतिदक्षता विभागात वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करून घेतले होते. कोणाचा कोणाला पत्ता नाही. पण त्यांना भेटायला येणार्‍या नातेवाईकांकडून, जबानी घ्यायला आलेल्या पोलिसाकडून, कानावर पडणार्‍या त्यांच्या संभाषणातून जाणवले की चूक समोरच्या माणसाची होती. त्याला अटक झाली होती वगैरे.
त्या बाईंना हॉस्पिटलमध्ये भेटायला येणारी नातेवाईक मंडळीही गमतीशीर होती.
रात्रीच एक बाई आली.
"अग! काय झालं एकदम हे! मला सुलभाचा फोन आला तर माझ्या हातून फोन गळूनच पडला. मी ह्यांना म्हंटलं आपण ताबडतोब गेलं पाहिजे."
'हं", "हं.. हं", "हं... हं", "हं" बाई कण्हत होत्या.
"दुखतंय का गं?"....... काय प्रश्न आहे! (मी मनातल्या मनात)
"अगं! आत्ता आत सोडतच नव्हते. म्हणायला लागले उद्या या. असं कसं गं? एखाद्याचा पेशंट नाहीच जगला दुसर्‍या दिवसा पर्यंत तर कोण जबाबदार?" मी कपाळाला हात! (मनातल्या मनात). "शेवटी ह्यांनी कोणालातरी फोन लावला. ह्यांच्या ओळखी फार आहेत नं बिझनेसमुळे! त्याचा फायदा होतो. त्या माणसाने काहीतरी सांगितलं त्या बरोबर लगेच म्हणाला एकेकाने जा. सगळ्यांनी एकदम जाऊ नका. इतर पेशंटांना त्रास होतो. आता मला सांग! आम्ही काय लहान आहोत का इतर पेशंटांना त्रास द्यायला? पण नाही! काहीतरी अडवणूक करायचीच! हे म्हणाले तू जाऊन ये, मी मग जातो. ह्यांचा स्वभाव मेला अस्साच भिडस्त! येतीलच मी गेल्यावर."