पडू आजारी, मौज हीच वाटे भारी...

प्रभाकर पेठकर

(पृष्ठ ४)

"हं." ...... बाई वैतागल्या असाव्यात.
"बरं मी निघते आता. काही नाही, देव करतो ते बर्‍या करता करतो असं म्हणून सगळं चांगलं मानून घ्यायचं. मस्त आराम कर. नाहीतर तू कशाला कधी आराम केला असतास. नाही, मला माहित्ये त्रास होत असणारच. अगं एवढा मोठा ऍक्सीडेंट! पण काय करणार आपल्या हातात काय आहे? येऊ मी?"
बाई गेल्या. त्यांचे यजमान आले. माणूस शांत वाटला. थोडावेळ काहीच बोलला नाही.
"फार वाईट झालं, पण जिवानिशी वाचलात सगळे ही केवढी भाग्याची गोष्ट आहे! लवकर बर्‍या व्हा. काही लागलं तर सांगा. संकोच करू नका. येऊ मी? आराम करा!" गेला बिचारा. बाई रात्रभर विव्हळत होत्या. पायाचे हाड मोडले होते (बहुतेक).
मी जवळ जवळ रात्रभर जागाच होतो. पोटात अन्नाचा कण नाही आणि वर जुलाबाचे औषध. कपडे धुऊन काढावेत तशी माझी आतडी धुऊन काढली जात होती. हा सिलसिला सकाळी ९ पर्यंत चालला होता.

सकाळपासून पुन्हा नातेवाईकांची, मित्रांची वर्दळ सुरू झाली. त्यांच्याशी गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळले नाही. शेजारच्या बेडवरील ऍक्सिडेंटच्या पेशंटनाही भेटायला नातेवाईक येत होते. त्यांच्या यजमानांच्या ऑफिसमधील कोणी गृहस्थ आले होते.
ते म्हणत होते, "कसं वाटतंय आता? काळजी करू नका कंपनीचा विमा आहे. सर्व खर्च विमा कंपनीच करणार आहे."
दुसरे एक गृहस्थ म्हणाले, "काय वाट्टेल ते होऊ दे, पण हॉस्पिटलचे जिणे नको बाबा! फार त्रासाचे हो! मी बघा आज ६९ वर्षाचा आहे पण कधी हॉस्पिटल नाही."
मला बाईंची दयाच येत होती. कोणी धड नातेवाईक नाहीत. रूग्णाशी कसे आणि काय बोलावे ह्याचेही भान नाही!
त्यापेक्षा माझे मित्र बरे होते. यायचे, "अरे! काय रे! च्यायला, एकदम हॉरीझाँटल? बरं आहे नं आता? आपल्या पुढच्या शनिवारच्या बैठकीचे काय? आहे नं? की कॅन्सल? असं करू नकोस बाबा! मोठ्या मिनतवारीने बायकोची परवानगी मिळवल्ये!"
"नाही, नाही. कॅन्सल नाही. मी येतोच आहे तोपर्यंत घरी. आणि मी नसलो तरी तुम्ही करा? काय?"
"नाही... ते आहेच रे! आम्ही दुसरा प्लॅनही तयार ठेवलाय. उगीच शनिवार वाया घालवणार नाही. पण तू असतास तर बरं झालं असतं. बरं! मी निघू? आज एका क्लायंटबरोबर मीटिंग आहे. साला बॉस पण येतो म्हणालाय. जायलाच हवं!" आणि गेला पण!
असे मित्र असावेत. प्रसंगाचं गांभिर्य मानायचेच नाही, उलट पेशंटला वेगळीच हुरहूर लावून जायचे! म्हणजे तोही 'शनिवार संध्याकाळच्या' ओढीने औषधाविनाही बरा होतो. ह्यालाच कदाचित नॅचरोथेरपी म्हणत असावेत! असो.

११ वाजता आमची यात्रा पुन्हा निघाली लॅबकडे. डॉक्टर तेच. म्हणजे सीमान्त पूजन, लग्न आणि रिसेप्शनला जसा एकच फोटोग्राफर असतो तसेच. हाही फोटोग्राफरच.
पुन्हा एकदा आमचे सर्व 'प्रायव्हेट' पार्टस 'पब्लिक' झाले. तिथे २-३ वॉर्डबॉइज होते. स्वतः डॉक्टर होते आणि कोणी २ लेडी ट्रेनी डॉक्टर होत्या. (माझा अंदाज). तीन दिवसांच्या वास्तव्यात मीही जरा निर्ढावलो होतो.
'हं, पेठकर कुशीवर वळा!"
कॅमेराच्या नळीने माझ्या शरीरात प्रवेश केला.
"उप्स!" मी.
"हं, घाबरू नका. काही कळणारही नाही. फार वेळ नाही लागणार, पाच मिनिटांचे काम आहे."
बोलता बोलता डॉक्टर आतील 'दृश्ये' काँप्यूटरच्या मॉनिटरवर पाहत होते. गरज वाटेल तिथे क्लिक करत होते.
वॉर्ड बॉइजचे काम होते माझे बंडल तिथे आणून सोडायचे. ते झाल्यावर त्यांनी खरे पाहता बाहेर जाऊन थांबायचे पण लॅब वातानुकूलित होती. ती त्यांच्यासाठी 'बातानुकुलीत'ही होती.
"मंग गनपतीला गावी जानार की नाय?" पोरे कोकणी होती. प्रश्नकर्त्याला ज्याला प्रश्न विचारला होता त्याची रजा कॅन्सल झाल्याची बातमी आधीच लागलेली असावी असे वाटले.
"नाय वो. कुठला गनपती न कुठली गवर. आमचा आपला सगला हितेच. रजा गावत नाय."
"गावत नाय म्हनजे? गनपतीत गावाकरे जायाला नको?" प्रश्नकर्ता आगीत तेल ओतू पाहत होता.
"ते खरा. पन आमचा डीपार्टमेट वेगला परतो नां. इमरजन्सी केसी असत्यात." त्याने हळूच आपण आय. सी. यू. चे वॉर्डबॉय असल्याचे भाव खाऊन सांगितले. "आमचं तुमच्या सारखं नाय, कवाबी आलं आनी कवाबी गेलं तरी चालतंय!"
इकडे दोघी ट्रेनी डॉक्टरणी टीव्हीवर शोले पिक्चर बघावा तशा 'इंटरेस्ट'ने मॉनिटर वरील दृश्ये पाहत होत्या.
"सर, ते ऍपेंडीक्स आहे का?"
"कुठे?.. अं.. नाही, नाही. ते ऍपेंडीक्स नाही. ऍपेंडीक्स दाखवतो हं.."
दर वेळी डॉक्टर त्यांच्या त्या कॅमेरा नळीलाच जोडलेल्या नळीने आंत पाण्याची फवारणी करायचे आणि आतडे तपासायचे. असे करत करत जवळ जवळ बादलीभर पाणी माझ्या आतड्यात फवारले असावे. त्याचे 'प्रेशर' वाढत होते. मला दुसर्‍याच संकटाची भीती वाटू लागली. जुलाबाचे औषध दिले होते. आणि फवारलेले पाणी प्रेशर वाढवीत होते. हे प्रेशर आता कसे हँडल करावे?
डॉक्टरांनी पुन्हा पाणी फवारून दोघींना ऍपेंडीक्स दाखवले.
"हे पाहा ऍपेंडीक्स."
"हं" दोघी हुरळल्या.
मला वाटलं दोघीही लहान मुलींसारख्या टाळ्या वगैरे वाजवतील. पण तसे झाले नाही.
मी उगीच जरा कण्हल्यासारखे केले. मला भीती वाटत होती. आता ह्या दोघी प्लीहा कुठे? यकृत कुठे? विचारतील आणि डॉक्टर माझ्याच पैशात त्यांना 'एंटरटेन' करतील.
"हं....झालं आता. कॅमेरा बाहेर घेतो मी. ओके?"
मी हंऽऽऽऽ! केले.

नंतर पोटात फवारलेलं पाणी एका नळीद्वारे बाहेर काढण्यात आलं. मला दिसत नव्हतं. पण चाळीतल्या सार्वजनिक नळाखाली बादली लावावी असा आवाज येत होता.
शेवटी कोलोनोस्कोपीची सर्व प्रक्रिया संपली तेंव्हा वीसेक मिनिटे झाली होती. मी कपडे करेपर्यंत डॉक्टरही एप्रन उतरवून आले.
"सो. नॉट टू वरी. एव्हरीथिंग इज फाईन. यू आर क्वाईट नॉर्मल."
मी फक्त "थँक्यू, डॉक्टर" म्हणालो.
वरून-खालून तपासून मी नॉर्मल असल्याचे निदान झाले होते.
कोलोनोस्कोपी झाल्यावर स्पेशल वॉर्डात ट्रान्स्फर करू असे मोठे डॉक्टर म्हणाले होते. म्हणजे ईसीजीच्या नळ्या, मानेवरील ऍटॅचमेंट वगैरे काढतील, स्वतःच्या पायांनी संडास-बाथरुमला जाता येईल आणि मुख्य म्हणजे गरम पाण्याने अंग शेकून मस्त अंघोळ करता येईल, ह्या सर्व सुखांच्या प्रतीक्षेत ४ दिवस काढले होते.
स्पेशल वॉर्डात ट्रान्स्फर झाली. आय. सी. यू. चे दडपण उतरले. स्पेशल वॉर्डात आल्याआल्या अगदी कढत पाण्याने अंघोळ केली. स्वच्छ दाढी केली. आता उद्या घरी जायचे ह्या सुखस्वप्नात नातेवाईकांशी गप्पा मारण्यात संध्याकाळ घालवली. संध्याकाळी मुख्य डॉक्टर आले. मी मुद्दाम जास्तच फ्रेश दिसण्याचा प्रयत्न केला. अगदी ह्या कानापासून ते त्या कानापर्यंत हसून त्यांचे स्वागत केले.
"सो हाऊ आर यू, मिस्टर पेठकर?"
"ओह! क्वाईट फ्रेश अँड फिलिंग फिट, डॉक्टर!" मी उसन्या अवसानात.
"गुड!"
"उद्या... घरी जाता येईल?" मी घाबरत घाबरत. अजून ह्यांचा भरवसा नाही.
"ओ, या! रिपोर्टस आर नॉर्मल. सॉफ्ट डाएट सुरू करायला हरकत नाही. म्हणजे, इडली, आइस्क्रीम, ज्यूस वगैरे वगैरे. अजून एक दिवस वाट पाहू आणि परवा घरी जायला हरकत नाही."
बापरे! अजून एक दिवस.. पुन्हा नाईलाज!
पण स्पेशल वॉर्डात एक बरे होते. एसी आणि टीव्ही होता. शेजारी नातेवाईकांना झोपायला बेड होता. चालाफिरायची बंधने नव्हती. तो दिवसही कसाबसा काढला. आणि प्रत्यक्ष सुटकेचा दिवस उजाडला.... वीस वर्षांनी कैदेतून सुटणार्‍या कैद्याला कसे वाटत असेल?

सकाळ पासून मी उतावळाच होतो. पण नर्सेस रोजची कामे करीत होत्या. मला औषधांचे डोस पाजत होत्या. टीव्हीवर कार्यक्रम चालू होते. मला कंटाळा येत होता. शेवटी संयम सुटला. मी बेल दाबून नर्सला बोलावलं.
"काय चाललंय काय? मला कधी डिस्चार्ज मिळणार आहे?"
"वो.. बडा डॉक्टर अभीतक आया नही है। वो डिस्चार्ज शीटपर साईन करेगा बादमे घर जानेका।"
"कभी आएगा बडा डॉक्टर?"
"अभी आना मंगता है। मालूम नही क्यों लेट हुवा।"
"फोन लगाव उनको। मै बात करुंगा।"
मग जरा धावपळ करून एक - दोन ठिकाणी फोनाफोनी केली त्यांनीच आणि सांगितले, "दस मिनिटमे आता है डॉक्टर."

डॉक्टर आले आणि परस्पर सह्या करून निघूनही गेले. मग सुरू झाली 'पैसे वसुली' प्रक्रिया. सगळे पेपर्स अकाउंटस डिपार्टमेंटला गेले. तिथे बिल बनायला २ तास लागले. कारण काय तर सर्व डिपार्टमेंटसचे रेकॉर्ड जमा करण्यात वेळ जातो. त्या नंतर बिल प्रत्यक्षात भरण्यात आलं. इन्शुरन्स नव्हताच. पुन्हा बिल भरल्याचे इथे दाखवा/तिथे दाखवा करून केस फाइल मिळवली आणि दुपारी ३ वाजता सुटका झाली.
सहा दिवसांच्या वास्तव्यानंतर मी 'दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल' मधून, ६५०००/- रुपये खर्च करून, पार अगदी 'दीऽऽऽऽन' आणि 'अनाथ' होऊन बाहेर पडलो!