केतकर

सन्जोप राव
शिक्षक या व्यक्तीविषयी आदर वाटावा असे फार कमी लोक आजवर भेटले. लहानपणी शाळेत असताना आमच्या हिंदी शिक्षकांचे ज्ञान 'मकान' म्हणजे शेत आणि 'मूंगफली' म्हणजे मुगाच्या डाळीपासून तयार केलेला पदार्थ असे सांगण्याइतपत अगाध होते. त्या वेळी मी नुकताच 'रोटी, कपडा और मकान' हा अप्रतिम चित्रपट पाहिलेला असल्याने 'मकान' म्हणजे शेत असणे शक्य नाही, इतपत माहिती होते. त्यावरून मी हिंदीच्या शिक्षकांशी वाद घातलेलाही आठवते. वाद घालण्याची परंपरा इतकी जुनी आहे. असो.

काही वर्षांपूर्वी एका व्यवसायानिमित्त मुंबईच्या गुप्ता नावाच्या माणसाला भेटलो. त्याने मला पुण्यातल्या केतकर नावाच्या गृहस्थांना भेटायला सांगितले. 'उसने नीम के ऍप्लिकेशनपे बहुत काम किया है, ही इज नोन ऍज दी नीम मॅन' असे म्हणून त्याने मला केतकरांचा नंबर दिला. केतकर हे नाव आणि पत्ता शनिवार पेठ, पुणे म्हटल्यावर मी जरा भीतभीतच केतकरांना फोन केला. चारपाच वेळा रिंग वाजली आणि कुणीतरी फोन उचलला.

"केतकर." करारीपणा आणि तुसडेपणा यांच्या मधल्या आवाजात कुणीतरी म्हणालं.

मी स्वतःचा परिचय करून दिला आणि काम आहे, कधी भेटायला येऊ? असं विचारलं.

"रविवारी सकाळी साडेनऊ वाजता फोन करा." आवाज पुन्हा तसलाच. हा काय पुण्याच्या हवापाण्याचा गुणधर्म आहे की काय कुणास ठाऊक!

"रविवारी.... " मी चाचरत म्हणालो, "जरा तातडीचं काम होतं, आज उद्या नाही का भेटता येणार?""रविवारी म्हणजे रविवारी." केतकर कडकपणे म्हणाले. "चौदा तारखेला. त्याच्या आधी मला वेळ नाही. नमस्कार. "

मग मी रविवारी (फोन करून) त्यांच्या घरी गेलो. शनिवार पेठेतल्या एका जुन्या वाड्यात पहिल्या मजल्यावर ते राहत होते. दारावर एम. के. पेस्ट कंट्रोल आणि मोहन केतकर अशा पाट्या होत्या. मी बेल वाजवली. केतकरांनी दार उघडलं.

सडपातळ अंगयष्टीने अधिकच वाटणारी बर्‍यापैकी चांगली उंची, मूळचा उजळ असावासा वाटणारा पण आता रापलेला वर्ण, चेहर्‍यावर वयाच्या आणि कष्टाच्या रेषा, डोक्यावरच्या बर्‍याच केसांनी निरोप घेतलेला, भरपूर नाक आणि भेदक डोळे. भेदक पण जरासे मिष्किलही. पण एकंदरीत जरा दबकल्यासारखं व्हावं असंच व्यक्तिमत्त्व.

परिचय, नमस्कार चमत्कार झाले. "चहा घेता? " केतकरांनी विचारलं

"घेऊ की!" मी म्हणालो. शनिवार-सदाशिव या परिसरात तुम्ही संकोचलात की मेलात. चहापाणी सोडाच, कुणी उन्हाळ्यात पंखाही लावणार नाही, इतपत पुणं आता मला समजायला लागलं होतं.

चहा झाला. केतकरांनी सिग्रेट पुढे केली. मीही जरा मोकळा झालो. मग तुम्ही कुठले, आम्ही कुठले हे झालं. त्यात केतकर काही दिवस जयसिंगपूरला झुऑलजी शिकवायला होते, असं कळालं. बायॉलजीचा मास्तर आणि तोही गावाकडचा! मी खूष झालो. ओळखीपाळखी निघाल्या आणि मला तर केतकरांना एका ठिकाणी भेटल्याचंही आठवलं. केतकरांच्या बाकी काही लक्षात नव्हतं.

"अहो म्हणजे केतकरसाहेब, माझ्या मामाला, मावशीला तुम्ही शिकवलेलं असणार. म्हणजे सर तुम्ही आमचे. अहो, मग मला अहोजाहो काय म्हणताय? अरे म्हणा!" मी म्हणालो. कसं कुणास ठाऊक, केतकरांना ते पटलेलं दिसलं. मग पहिल्या भेटीतच त्यांनी मला अरे म्हणायचं आणि मी त्यांना सर, हे ठरून गेलं.

"हं. तर मायक्रोबायॉलॉजिस्ट काय तू?... कायकाय विषय असतात रे तुमच्या एमेस्सीला?" केतकरांनी मुलाखत घेताना विचारावं तसं विचारलं. मी सटपटलोच. आता हा प्राध्यापक माझी लक्तरं धुवायला काढतोय की काय म्हटलं! मी काहीतरी जुजबी सायटॉलजी, बायोकेमिस्ट्री अशी उत्तरं दिली.

"बायोकेमिस्ट्री काय? टीसीए सायकल आठवतंय का?" केतकर सोडायला तयार नव्हते.

"अहो, फार वर्षं झाली त्याला सर. टीसीए म्हणजे क्रेब्ज सायकल ना? थोडंथोडं आठवतंय, ऑक्झॅलोऍसिटेट, सायट्रेट, आयसोसायट्रेट, अल्फाकीटोग्लुटारेट.... " मी अडखळलो.

"पुढे?" केतकर मिष्किलपणे म्हणाले

"नाही बुवा आठवत."

"सक्सिनिल को ए, सक्सिनेट, फ्युमॅरेट आणि मॅलेट. नॉट बॅड हां!" हे ते मला म्हणाले की स्वतःला कुणास ठाऊक! पण एकंदरीत केतकरांना बरं वाटलं असावं.

पहिल्या भेटीतच हे पाणी काही वेगळं आहे असं माझ्या ध्यानात आलं. मग केतकर बर्‍याच वेळा भेटले, भेटतच राहिले. काही व्यावसायिक कारणानं आम्ही एकत्र आलो खरे, पण ते कारणही नंतर विरघळून गेलं. केतकर झुऑलजीचे प्रोफेसर होते खरे, पण त्यांनी प्राध्यापकी सोडूनही आता बरीच वर्षं झाली. गेली काही वर्षं ते पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करतात. त्या आधी काही वर्षं त्यांनी इंडस्ट्रीतही काम केलं होतं. आता सगळं स्थिरस्थावर झालं आहे, मुलंही आपापल्या मार्गाला लागली आहेत, पण केतकरांचा धडपड्या स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नाही. सतत त्यांच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं.

प्रखर बुद्धी, विज्ञानावर गाढ श्रद्धा, प्रत्येक गोष्ट ज्ञानाच्या कानसेवर पारखून घ्यायची जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती आणि असं इतकं चिकित्सक राहायचं असेल तर त्याला आवश्यक असणारा किंचित तुटक, तिरका स्वभाव. आजपर्यंत केतकर मला इतके समजले आहेत. एरवी गंभीर आणि कडक वाटणारे केतकर खेळकर आणि मिष्किलही आहेत. बोलताबोलता ते एखादा खोचक विनोद करतील आणि खळखळून हसतीलही. त्यांच्या बोलण्याची एक विशिष्ट ढब आहे. संथपणे, किंचित कापर्‍या, हेलकावणार्‍या खर्जातल्या आवाजात ते बोलतात. त्यांचं मराठी आणि इंग्रजी उत्तम आहे, पण उच्चारांवर छाप बाकी अस्सल पुणेरी. एखाद्या किचकट शास्त्रीय प्रयोगाचं वर्णनही ते करतात ते मंत्रपुष्पांजली म्हटल्याच्या आविर्भावात. त्यांचं मराठीही वेगळंच आहे. त्यांच्या बोलण्यात जुने, बोलीभाषेतून हद्दपार झालेले शब्द सहजपणे येतात. 'जरा वेळ थांब' ला ते सहजपणानं 'क्षणभर थांब' म्हणून जातात. काहीतरी जबरदस्त दिसलं, झालं, कळालं की त्याला ते 'ज्याचं नाव ते!' असं म्हणतात. एकदा मी त्यांना दुपारी काय करताय? असं विचारत होतो.

" उद्या दुपारी ना? अं.. अरे हो, माझं उद्या दुपारी त्या ऑयस्टर हॉटेलमध्ये लग्न आहे.."

"आँ...?" माझ्या हातातली काडेपेटी खाली पडली.

केतकर नेहमीप्रमाणे खळखळून हसले. "लग्न म्हणजे, जायचंय मला किडे मारायला!" त्यांनी हाताने पंप मारल्याचा आविर्भाव केला. "म्हणजे पेस्ट कंट्रोलला रे...." ते म्हणाले.

साधारणतः पन्नाशीनंतर माणसाची शारीरिक आणि मानसिक लवचिकता कमी होत जाते. नवीन गोष्टी शिकण्याची, स्विकारण्याची इच्छाही. केतकरांचंही थोडंसं तसं झालं आहे. "मला त्या तुमच्या कंप्युटरमधलं आणि इंटरनेटमधलं काही कळत नाही." असं ते वरचेवर म्हणतात. पण इंटरनेटबद्दल त्यांना सगळी माहिती असते. "आता नवीन काही वाचावसं वाटत नाही" असंही ते परवा म्हणाले. पण जे ठाऊक आहे, आणि ज्याचा अभ्यास केलेला आहे, ते केतकरांच्या मनात अगदी जिवंत, धगधगीत आहे. केतकर एरवी इतके मोकळे असले तरी काहीकाही बाबतीत त्यांनी स्वतःला शिंपल्यासारखं मिटून घेतलेलं आहे. (हे स्वतः केतकरांनी लिहिलं असतं तर कदाचित 'हर्मिट क्रॅब' सारखं असं म्हणाले असते!)

मध्यंतरी एकदा गोमूत्राचा शेतीसाठी वापर या विषयावर बोलत होते. म्हणाले, " हे बघ, कुणी काही सांगतो म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवणं बरं नव्हे. शास्त्राचे विद्यार्थी ना आपण? आता शेतजमिनीत गोमूत्र, गोमय, आणखी काही - काय ते तुम्ही अमृतपाणी की काय म्हणता ते - हे घातलं की नक्की कायकाय होतं त्याचा अभ्यास करायला पाहिजे. केमिकल चेंजेस काय होतात, फ्लोरा आणि फॉना कसा बदलतो याचा शास्त्रीय अभ्यास व्हायला पाहिजे. खूप मोठं काम आहे रे हे. टप्प्याटप्प्यानं करायला पाहिजे कुणीतरी. मग हे जर खरंच उपयोगाचं आहे असं दिसलं तर त्याचं स्टँडर्डायझेशन करून ते शेतकर्‍यांना देता येईल. आणि असंलं काहीही होत नाही असं जरी आपल्याला प्रूव्ह करता आलं तरी हेसुद्धा महत्त्वाचंच फाईंडिंग आहे. अरे, रिसर्चमध्ये निगेटिव्ह रिझल्टसही महत्त्वाचे असतात..."

"अहो, तुम्ही म्हणताय ते खरंच महत्त्वाचं आहे." मी उत्साहानं म्हणालो, "आपण एक प्रोजेक्ट करुया का यावर? मी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनला असलेली मुलं देतो. तुम्ही फक्त त्यांना गायडन्स द्यायचा. वाटल्यास आपण तीनचार गट करुया. एक गट बेसवर्क करेल. दुसरा... "

केतकर नकारार्थी मान हलवत होते.

"काय झालं, सर?"