तू नसताना ...

भास्कर

(पृष्ठ ३)

प्रिय माधुरी,

एव्हढे लिहून ते थांबले. काय लिहावं हे त्यांना सुचेना. माफी मागावी का? की नुसतंच लवकर परत ये म्हणून लिहावं? 'मी तुला ', 'माझ्या मनात ', 'तू नसताना ' अश्या पुष्कळश्या सुरुवाती लिहून जोगसाहेबांनी नवीन कागद घेतला. मग मराठीत असे काही लिहिणे शक्य नाही असे म्हणून इंग्रजीतून तसेच काही लिहून पाहिले. पण जमेना. कागदावर पेन टेकवून बराच वेळ नुसता विचार करून जोगसाहेब दमून गेले.

खुर्चीत मागे टेकून त्यांनी डोळे मिटले. काहीबाही बोलणार्‍या माधुरीवहिनींची प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर आली. तरूण, टवटवीत फुलासारखी, हसरी. 'आत्ता कदाचित माधुरीही कुठेतरी बसून आपला विचार करत असेल. कदाचित परत यायला निघालीही असेल. कदाचित इथेच असेल दाराबाहेर. किंवा कदाचित रस्त्यात तिला अपघात झाला तर? माधुरी परत आलीच नाही तर. माधुरीशिवाय आयुष्य? तिला काय हवंय हे न सांगताच ती निघून गेली तर?' जोगसाहेबांचे मन याच विचाराशी झिम्मा खेळू लागले. पुन्हा पुन्हा 'ती का येत नाही अजून' आणि 'ती आलीच नाही तर' या दोन टोकांत ते हेलकावू लागले. पुन्हा पुन्हा चाहूल घेऊन कोणीच येत नाही हे त्यांच्या लक्षात आले. 'आता इथून पुढे असेच नुसते आठवणीत जगायचे. एकटे. माधुरीला इतक्यां बोलावून ती येत नाही म्हणजे ती निघून गेली आहे कायमची. तिला सुखी करू शकलो तर नाहीच शिवाय माफीही मागता आली नाही. त्याची शिक्षा म्हणून आता हे एकाकी जीवन.' स्वतःचे पोरकेपण मनोमन पटून त्यांच्या घशाशी हुंदका दाटला. आणि पापणीबाहेर एक थेंब गालावर ओघळला.

अश्या अवस्थेत किती वेळ गेला काही कळलं नाही पण अचानक दारावरची घंटी वाजली. जोगसाहेब दचकले. गडबडीत त्यांनी चेहर्‍यावरून हात फिरवला. एका क्षणात त्यांच्या लक्षात आले, 'घंटी! माधुरी आली!' ताडताड चालत ते दाराकडे आले. दार उघडलं, तर समोर ताटासकट जोशीसाहेब.

"अरे! या या!" पुढे काय बोलायचं न सुचून आणि थोडं निराशेनी जोगसाहेबांनी आपल्या शेजार्‍यांचं स्वागत केलं.

"येत नाही. मंडळी पानं वाढून वाट पहातायत. काही फोन वगैरे? नाही ना. काही सांगता येत नाही हो हल्ली. आपणच काळजी घ्यायला हवी." एका दमात सगळं बोलून ताट देऊन जोशीसाहेब गेले.

जेवणाच्या टेबलावर ताट तसंच ठेवून जोगसाहेब बाहेर येऊन दिवाणावर बसले. भरले घर भकास जाणवू लागले. समोर पडलेला रिमोट घेऊन त्यांनी टीव्ही लावला. कर्कश्य संगीत, जाहिराती सुरू होत्या. त्रासदायक वाटला तरी तो आवाज त्यांना सोबतीला हवा वाटला. अंगात काही त्राण उरले नाही, आपण म्हातारे झालो असे काहीतरी त्यांना वाटू लागले. तेव्हढ्यात पुन्हा घंटी वाजली. जागेवरून उठून दारापर्यंत जाणे त्यांना अशक्य वाटले. पण सावकाश जाऊन त्यांनी दार उघडलं, तर समोर माधुरीवहिनी!

जोगसाहेबांना काय बोलावे सुचेचना. अस्वस्थता परत चाललेल्या लाटेसारखी वेगाने आटू लागली. वहिनींच्या हातातली बॅग घेत त्यांनी त्यांना आत यायला जागा करून दिली. माधुरीवहिनी आत आल्या आणि जरा टेकल्या. जोगसाहेबांना अजुनही शब्द सुचत नव्हते. दार लावून टीव्ही बंद करून माधुरीवहिनीही आल्या.

"काही झालेलं नव्हतं हो शरदरावांना. नेहमीचाच वाताचा त्रास. उगीच घाबरवून सोडलन् झालं." परत येऊन जेवायला बसत माधुरीताई सांगू लागल्या.

"पावणेसातला फोन आला तिचा. ह्यांना दवाखान्यात ठेवलंय ताई, लौकर ये ...", माधुरीवहिनी बोलत होत्या. आणि जोगसाहेबांना सगळ्या गाठी सुटाव्यात तसं सैल वाटत चाललं होतं.

जोगसाहेबांचं जेवण झालं. ते उठले. बाहेरच्या खोलीतल्या काळ्यापांढर्‍या फोटोसमोर जरा रेंगाळले. आणि पायात चपला सरकवत म्हणाले,

"जरा जाऊन येतो गं."