श्री गणेश खानावळ

चिन्मय रहाळकर

श्री गणेश खाणावळीत एक फाटकासा दिसणारा मनुष्य आला. वयाने जास्त नसावा पण कुठल्यातरी चिंतेने माणूस खंगून जातो तसा तो दिसत होता. दाढी दोन-तीन दिवस केलेली नसावी. काही केस पांढरे झाले होते. कपडे जीर्ण झालेले होते पण स्वच्छ होते. कंबरेवर पट्टा विजारीला घट्ट धरून बसला होता. शर्टावर एक बटण गळलेलं होतं. तिथे पिन लावली होती. बांध्याने तो अगदी सडपातळ होता. एकूण त्याचं व्यक्तिमत्त्व म्हणजे तो कुठे आला काय, गेला काय, कोणाच्याही लक्षात फारसं येणार नाही. पण तो आज विशेष आनंदात दिसत होता. विजार वर करत त्याने खाण्याची ऑर्डर दिली. तेवढ्यात त्याचे लक्ष खाणावळीतील कुटुंबाकडे गेले, खास करुन गर्भवती मुलीकडे. तो सारखा तिच्याकडे बघू लागला.

एक जोडपं आणि त्यांच्या सोबत मुलीचे आ‌ई-वडील असावेत. मुलगी गर्भवती होती. सगळं कुटुंब तिच्या प्रत्येक हालचाली कौतुकाने बघत होतं. नवरा विशेष काळजी घेत होता, किंवा तसा निदान प्रयत्न करत होता. जेवायला काय हवं, नको सारख विचारीत होता. मुलीची आ‌ई हे नको खायला, हे खायला हवं अशा सूचना करत होती. एकंदर कुटुंब स्वतःतच गुंग होतं. खाणावळीत फारसं कोणी नव्हतं. मालक माश्या मारत बसला होता. म्हणजे खरंच, अक्षरश: माश्या मारत होता.

सुरुवातीला त्या मुलीने म्हातारा बघतोय याकडे फारसे लक्ष दिले नाही पण म्हातारा आता सरळ सरळ तिच्याकडे टक ला‌वून बघू लागला. त्यामुळे तिची थोडी चुळबुळ सुरू झाली. तेवढ्यात वेटर अन्न घेऊन आला. म्हातार्‍याचे लक्ष विचलित झाले. त्याचेही अन्न घेऊन वेटर आला होता. त्याला फार भूक लागली असावी कारण त्याचे हात थरथरत होते. पण गरम गरम अन्न समोर ठेवले होते तरी तो अन्नाला हात न लावता नुसताच एकटक बघत होता. जणू अन्नाच्या सुवासाने त्याची भूक पार उडून गेली असावी. त्याने अन्न थोडे चिवडले आणि एक घास कसा-बसा तोंडात टाकला. त्याचा घास तोंडातच घोळत होता कारण त्या पोरीकडे परत बघून त्याचा कंठ दाटून आला होता. पोरीने म्हातार्‍याकडे बघितले तसा म्हातारा तिच्याकडे बघून केविलवाणा हसला. झाले, ते म्हातार्‍याच हसणं म्हणजे पोरीच्या सहनशक्तीचा जणू अंत होता. तिने नवर्‍याच्या मनगटावर हात ठेवून त्याचे लक्ष म्हातार्‍याकडे वेधले. नवर्‍याने म्हातार्‍याकडे बघितले तर म्हातार्‍याची तंद्री लागली होती. नवरा उठून तरातरा चालत म्हातार्‍याच्या टेबलाजवळ गेला.

"का हो, काही लाज-बिज नाही का तुम्हाला?"

म्हातारा थोडा भांबावला व वेड्यासारखा उगाचच परत हसला.

"कळतंय का मी काय बोलतोय ते? की सकाळी सकाळी टुन्न होऊन आला आहात? तरूण पोरीबाळींकडे बघण्याचा छंद दिसतोय तुम्हाला?"

"अहो, काय बोलताय? कोणाबद्दल बोलताय?" म्हातारा जणू त्याच्या विचारांच्या दुनियेची खर्‍या दुनियेसोबत सांगड घालण्याचा घाईघाईने प्रयत्न करत होता.

"वरून चोराच्या उलट्या बोंबा" पोरीचे वडील टेबलाजवळ येत उद्गारले.

"काय झाल साहेब?" दुकानाचा शेठने पृच्छा केली.

"हा मनुष्य इथे बसून सारखा माझ्या बायकोकडे बघतोय. थोडीही सभ्यता नाही या माणसात."

आता म्हातार्‍याच्या डोक्यात दिवा पेटला. "नाही, नाही. मी त्या नजरेनं कसा बघेन. मला मुलीसारखी आहे तुमची बायको. खरं सांगायचं तर तुमची बायको माझ्या मुलीसारखी दिसते अगदी, म्हणून मी कौतुकाने बघत होतो एवढंच. चुकलं साहेब. माफ करा"

"वा वा, अरे हरामखोरा, जनाची नाही तर मनाची तर लाज बाळग. हे सालं असल्या लंपट लोकांना चौकात उलट टांगून बडवायला हवं." पोरीचा बाप खवळून बोलू लागला.

"साहेब, तुम्ही काळजी करू नका. मी हाकलतो या नालायकाला. अरे, विनायक, याला बकोट धरून काढ बाहेर." शेठ गरजला.

म्हातार्‍याला हे सगळं असह्य होऊ लागलं. कॉलरचे बटन लावण्या-उघडण्याचा काहीसा चाळा करत तो बोलण्याचा प्रयत्न करू लागला. पण संतापाने त्याला श्वास लागला होता. त्याची छाती भात्यासारखी वर-खाली होत होती व तोंडातून शब्दांऐवजी नुसतेच फस-फस, सूं-सूं असले काहीसे आवाज येत होते.

"साला, नाटक बघा कसा करतोय. तुझ्या तर..." असं म्हणत नवरा म्हातार्‍यावर तुटून पडला.

"अहो, राहू द्या" बायको घाबरून मागून ओरडली.

शेठने व पोरीच्या बापाने नवर्‍याला कसंबसं धरून मागे खेचलं. या भानगडीत टेबलवरचं अन्न म्हातार्‍यावर सांडलं व तो खुर्चीला अडखळून मागे पडला.

"मला काय अडवताय. पोलिसांना बोलवा." नवरा खेकसला.
"बोलवतो साहेब. तुम्ही शांत व्हा." मालक म्हणाला.

म्हातारा उठण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला धड उठताही ये‌इना. त्याचा पिन लावलेला शर्ट फाटला होता. फार केविलवाणी स्थिती झाली होती त्याची. जमिनीवरच तो गुडघ्यावर डोकं ठेवून रडू लागला. ’किती अंत बघायचा कुणाचा.’ असं काहीसं तो पुटपुटत होता. त्याचं रडणं बघून नवरा अजून पेटला. "असं पोरीबाळींकडे बघण्याचं सोडा. बोगार‌ओळीत जायला मी पैशे देतो."

हे ऐकून म्हातार्‍याने अजून मान टाकली. टेबलाला धरून कसंबसं उठत तो म्हणाला, "कोणाला सांगताय बोगार‌ओळीत जायला? देवाने सुखी समृद्ध आयुष्य दिलंय म्हणून एवढं माजायचं!"

"कसा वटावटा बोलतोय बघा!" पोरीच्या आ‌ईने भांडणात आपल योगदान दिलं.

म्हातार्‍याचं त्याकडे लक्ष नव्हतं. "माझी लेक अगदी अशीच दिसायची." म्हातार्‍याने काकुळतीने परत पोरीकडे बघितलं. "सहा महिन्याची पोटुशी होती जेंव्हा तिच्या सासरच्यांनी तिला जाळलं"

’जाळलं’ या शब्दाचा परिणाम खोलीभर जाणवला. नवराही थोडा चपापला.

"लग्नानंतर दीड वर्ष झालं तरी हुंडा पोचला नव्हता आणि गर्भ चाचणीत पोटात मुलगी आहे हे कळलं. ही दोन कारणं पुरेशी होती."

"बरं, बरं. उगाच थापा मारणं बंद करा." पोरीचा बाप बोलला. "गोष्टी तर तयारच असतात."

म्हातार्‍याने फाटक्या शर्टाच्या खिशातून कागदाचा जुना तुकडा काढून नवर्‍यासमोर ठेवला. ’हुंडा-बळीची अजून एक दारुण घटना. गर्भवती सुनेला जाळल्याचा सासू-सासर्‍यांवर आरोप’ ते वर्तमान पत्राचे कात्रण जणू किंचाळत होते.

"तिला मारण्याच्या एक आठवडा आधी मी तिला भेटलो होतो. ’मला इथून घेऊन चला’ अशी गयावया करत होती बिचारी. मी विचार केला, बाळंतपणाला महिन्याभरात घेऊन जा‌ईनच घरी." म्हातारा खिन्नपणे हसला. "तुमचं बरोबर आहे. मी नालायकच आहे. पोटच्या पोरीला आगीत ढकलून आलो"

हे सगळं अनपेक्षित होतं. नवरा चांगलाच ओशाळला. "माफ करा साहेब. पण तुम्हाला कल्पना आहे का जमाना किती खराब आहे आज काल."

"तुमचं काही चुकलं नाही. माझं नशीबच फुटकं आहे, त्याला तुम्ही काय करणार?"

"मग पोलिसांनी अटक केली का?" नवर्‍याने विचारले.

"केली ना आणि लगेच सोडूनही दिले. पुरावा नाही म्हणे. माझ्या पोरीचा कोळश्यासारखा झालेला देह पुरेसा पुरावा नव्हता त्यांच्यासाठी. मी कोर्टात गेलो. गेली ५ वर्षे कोर्टाच्या पायर्‍या घासून ही परिस्थिती झालीय. आज शेवटी निकाल लागला व त्या सगळ्यांना शिक्षा झाली. म्हणून मी जेवायला इथे आलो."

मग पोरीकडे बघून तो म्हणाला "पण यांच्याकडे बघून मला माझ्या पोरीची इतकी आठवण येत होती की घशाखाली घास जा‌ईना. पण मी माझ्या पोरीची आठवण काढलेली सुध्दा देवाला मंजूर नाही."

खाणावळीत कोणाला काय बोलावे सुचेना. म्हातारा रडत रडत आपला शर्ट विजारीत खोचण्याचा प्रयत्न करत बाहेर निघून गेला. नवरा जागेवर थिजल्यासारखा स्तब्ध होता. म्हातार्‍याला थांबवण्याचं सुद्धा कोणाला सुचलं नाही.