सुकाळसौदा

आजानुकर्ण

कुरूक्षेत्रावरील युद्धात कृष्णाने त्याचे काही अक्षौहिणी सैन्य कौरवांच्या बाजूने लढेल आणि तो स्वत: पांडवांच्या बाजूने हे जाहीर केले. या गोष्टीचे सर्वात जास्त दु:ख चंद्रभानला झाले. सत्य, नीतीमत्ता वगैरे गोष्टींचे रोमॅंटिक, भोंगळ आकर्षण त्याला फार होते. विशेषत: दिलेल्या शब्दाखातर द्यूत खेळताना स्वत:च्या बायकोलाही पणाला लावणारा युधिष्ठिर त्याला अगदी आदर्श पुरुष वाटत असे. युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी कृष्णाची विनवणी करून त्याने कृष्णाच्या वैयक्तिक सेवकांमध्ये आपला समावेश करुन घेतला आणि रथाला हनुमानाचे चित्र असलेला झेंडा लावून पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी तो दाखल झाला. एवढ्या मोठ्या पांडवांच्या सैन्यात एक सैनिक जास्त म्हणजे दर्यामें खसखसच. तिकडे कौरवांनाही एक सैनिक कमी आहे हे लक्षात आले नाही. पण थोड्याच दिवसात चंद्रभानचा भ्रमनिरास झाला. एक तर सैन्याचे नेतृत्त्व कोणाकडेही असो, सैन्यातील खालच्या पातळीवरचे राजकारण दोन्हींकडेही सारखेच आहे हे त्याला कळून आले. पांडवांच्या सैन्यामध्ये सार्जंटच्या जागेवर असणारा माणूसही सुट्टी वगैरे घ्यायची असली की बायकोच्या बाळंतपणाचे खोटे कारण देत असे हे त्याला फारच अनैतिक वाटले. त्या सार्जंटने हे कारण इतक्या वेळा दिले होते की पुढच्या युद्धात पांडवांना सैन्याची कमतरता मुळीच भासली नसती. युद्धातले घाणेरडे राजकारण सहन करूनही पहिले काही दिवस पांडवांची साथ त्याने दिली. पण चंद्रभानचा खरा अपेक्षाभंग झाला तो द्रोणाचार्यांना गंडवल्यावर. प्रत्यक्ष युधिष्ठिरानेच ’नरो वा कुंजरो वा’ असा संदिग्ध आधार घेतल्यानंतर खरा धर्म काय असतो याचे स्पष्ट दर्शन त्याला झाले. डोळेच उघडले म्हणा ना त्याचे! त्याच रात्री स्वयंपाकासाठी लाकडे आणायला जाणार्‍या बुणग्याचे सोंग घे‌ऊन तो सटकला आणि थेट दक्षिण भारतात दाखल झाला. पळून येण्यापूर्वी पांडवांच्या खोटारडेपणाचा व आपल्या मूर्खपणाचा पश्चात्ताप म्हणून त्याने सहदेवाची राखीव तलवार चोरून आणली.

चंद्रभान अतिशय तल्लख बुद्धीचा असला तरी त्याला तलवार चालवण्याशिवाय इतर कौशल्यपूर्ण असे काही येत नव्हते. आणि इथे दक्षिण भारतात लोक फारशी भांडणेबिंडणे करत नसत. अगदीच वादावादी - इथे त्याला मतभेद म्हणत असत - झाली तरी लोकांमध्ये मारामारी करण्याचा दम नव्हता. ताबडतोब तडजोड करून नृत्य, संगीत, काव्य, साहित्य वगैरेंसमोर बूड रोवून बसणे आणि नंतर त्यावर जोरजोरात चर्चा करणे हेच त्यांना आवडत असे. दक्षिण भारतातील राजेलोकांनी तर क्षात्रवृत्तीला काळिमाच फासला होता. एकमेकांशी साटेलोटे करून आजूबाजूच्या सर्व राजांशी घरोब्याचे संबंध प्रस्थापित करून टाकले होते. मधुचंद्र, पर्यटन किंवा तीर्थाटनासाठी राज्याबाहेर पडणार्‍या राजवंशातील कुटुंबियांचे निदान "मेव्हणीच्या नणंदेचा धाकटा दीर" इतके जवळचे संबंध सर्वत्र होते व त्यामुळे परप्रांतातली त्यांची गैरसोय टळत असे.

तात्पर्य काय की चंद्रभानच्या तलवारीचा इथे फारसा उपयोग नव्हता. शेतावरून भाज्या आणून त्या निवडणे व तलवार वापरून त्या चिरणे. चिरलेल्या भाज्यांचे वाटे करून बाजारात विकणे असा एक व्यवसाय त्याने सुरुवातीला करून बघितला. इथल्या लोकांना चिरलेल्या भाज्या बाजारात मिळतात हे पाहून फारच आनंद झाला. विशेषत: नगरातल्या बायकांचा भाज्या निवडण्याचा त्रास वाचल्यामुळे त्यांना एकमेकींच्या घरी जा‌ऊन कान भरण्याचे उद्योग करण्यास जास्त वेळ मिळू लागला. लवकरच कौटुंबिक भांडणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. गावाच्या पोलीस उपनिरीक्षकांना ह्या मूळ कारणाचा सुगावा लागणे शक्यच नव्हते. आपल्या बायकोला डोके खाण्यास इतका जास्त वेळ कसा काय मिळतो ह्याचेच उत्तर शोधण्यात ते गुंग होते.

चंद्रभान मूळचाच तल्लख असल्याने त्याने प्रांतातील व्यवहाराची भाषा, पद्धत चांगलीच अवगत केली होती. धूम्रपानाचे व्यसन इमान‌इतबारे करतानाही, अंगठा व तर्जनीच्या चिमटीमध्ये धूम्रकांडी धरून उकिडवे बसण्याची त्याची आवडती पद्धत त्यागून इथल्या लोकांनी विकसित केलेली झाडाच्या बुंध्याला सपाट टेकून बसून दोन बोटांच्या बेचक्यात कांडी पकडून नंतर हाताची मूठ वळून नंतर शंख वाजवल्याप्रमाणे ती तोंडासमोर धरून मोठा झुरका घेण्याची अळणी पद्धत त्याने आत्मसात केली होती. त्याला स्वत:ला धूम्रकांडीचा ओष्ठद्वयांना होणारा आकर्षक स्पर्श हा त्या चैतन्यदायी धुरा‌इतकाच अतिप्रिय होता. मात्र पोट भरण्यासाठी व्यावसायिक चातुर्य हे वैयक्तिक पूर्वग्रहांपेक्षा अधिक उपयुक्त असते हे त्याला माहिती होते. थोड्याच दिवसात तर्जनी व अंगठा यांची पेरे मूळच्या उजळ रंगाची झाली आणि तर्जनी आणि मध्यमेतल्या बेचक्याला करडेपणा आला.

एक दिवस दुकानात आलेल्या महिलांच्या घोळक्याला "भाजीचे भाव हे योग्यच आहेत व स्वत:ला काडीचाही फायदा न होता केवळ समाजसेवा व गावातील लोकांच्या चांगुलपणाबद्दल एक कृतज्ञपणा म्हणूनच या भाज्या इतक्या पडेल भावाने विकत आहे" हे चंद्रभान कसोशीने समजावून सांगण्याचा प्रयत्न असताना बायकोला सोबत म्हणून बाजारात आलेल्या नगरशेटजींचे लक्ष चंद्रभान बसला होता त्या मृगाजिनाखाली लपवलेल्या तलवारीकडे गेले. तलवारीचे धारदार निळसर पाते आणि मुठीला लावलेले रंगीत खडे पाहून ही तलवार आपल्या घराच्या दिवाणखान्यात अगदी शोभून दिसेल असे त्यांना वाटले. चंद्रभानाचा सगळा माल संपेपर्यंत समोरच्याच एका दुकानाच्या कट्ट्यावर तांबूलभक्षण करीत नगरशेटजी बसले आणि चंद्रभान मोकळा झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्याला हाक मारली.

"चंद्रभाना, तुझ्या व्यवसायकुशलतेवर आम्ही प्रसन्न आहोत."

चंद्रभानाला ही शासकीय भाषा समजली नाही. "माफ करा महाशय, पण तुम्ही काय बोललात ते कळले नाही."

"अरे तुझा हा धंदा करण्याची पद्धत आम्हाला आवडली आहे."

"धन्यवाद महाशय!"

"मात्र तू इथे व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ती अनुज्ञप्तीपत्रिका प्राप्त केली आहेस का? म्हणजे हा धंदा करण्यासाठीचा परवाना घेतला आहेस का?"

"माफ करा महाशय पण असे काही असते हे मला माहिती नाही."

"महाराजांच्या राजमुद्रेसहित वितरित झालेल्या राजाज्ञेनुसार ’या राज्यात व्यवसाय किंवा सेवा किंवा दोन्हींपैकी एक किंवा दोन्ही किंवा यापेक्षा काही वेगळे करून अर्थप्राप्ती किंवा अर्थार्जन किंवा यापैकी एक किंवा दोन्ही किंवा यापेक्षा वेगळे करण्याचा हेतू मनामध्ये धरून त्यानुसार वर्तणूक करणार्‍या व्यक्तीने - मग ती स्त्री किंवा पुरुष किंवा त्यापेक्षा वेगळी असेल तरीही - नगरशेट किंवा त्यांपेक्षा वरिष्ठ पदावरील अधिकार्‍याकडून आवश्यक ते अनुज्ञप्तीपत्र राजाच्या मुद्रिकेच्या चिन्हासह प्राप्त करणे आवश्यक आहे’ असे म्हटले आहे."

"माफी असावी महाराज, पण नियम सांगण्यापेक्षा आता उपाय काय हे तुम्ही सांगाल तर बरे हो‌ईल!"

"तुला तो परवाना प्राप्त करावा लागेल. त्यासाठी तुला दोन हजार मोहरा द्याव्या लागतील."

"दोन हजार मोहरा! काही दुसरे करता नाही का येणार?"

"हम्म, एक उपाय आहे. तुझ्याकडे एक सुंदर तलवार आहे. ती आम्हाला दिली तर आवश्यक ती कागदपत्रे पुरवण्याची व्यवस्था आम्ही करू."

"महाराज, पण ती तलवार उतरेकडील कीर्तिमान राजे सहदेव यांची आहे. युद्धात पराक्रम गाजवल्याबद्दल त्यांनी स्वहस्ते मला भेट दिली आहे. एका अर्थाने ती तलवार अनमोल आहे. मात्र तुमची फारच इच्छा असेल तर ती तलवार मी तुम्हाला तीन सहस्र मोहरा आणि व्यवसायाचा परवाना यांच्या बदल्यात दे‌ऊ शकतो. अशी वस्तू इथे दक्षिणेत मिळणे महाकठीण!"

नगरशेटजींसाठी तीनसहस्त्र मोहरा काही जास्त नव्हत्या. शिवाय शहराच्या कोतवालांना खिजवण्यासाठी अशी वस्तू दिवाणखान्यात असणे आवश्यक होते. त्यांनी ताबडतोब मोहरा देण्याची व्यवस्था करून कोणताही व्यवसाय करण्याचे परवानगीपत्र चंद्रभानला मिळवून दिले. चंद्रभानला एक नवा व्यवसाय करण्याची युक्ती सुचली ती अशी. थोड्याच काळात चंद्रभान पुरातन वस्तूंचा जाणकार आणि विक्रेता म्हणून प्रसिद्ध झाला. परिसरातील गावांमध्ये हिंडून एखादी पुरातन वस्तू मिळते का ते शोधणे आणि ती वस्तू अक्षरश: मातीमोल भावात विकत घे‌ऊन शहरातल्या बड्या धेंडांना विकणे हा त्याचा व्यवसाय जोरात चालू झाला. जवळपासच्या गावांच्या फेर्‍यांमध्ये त्याला अनेक पुरातन वस्तू मिळाल्या. राजदरबारातील वळसेदार पायांचे खानदानी सिंहासन, मुख्य सेनापतींच्या दिवाणखान्यातील चहापानाचे कोरीव मेज, धर्मगुरुंच्या आश्रमाच्या प्रवेशद्वारावरील हत्तीचे मुख, प्रधानीणबा‌ईंच्या रंगवेशभूषामहालातील मढवलेला आरसा हे सगळे त्यानेच आणून दिले होते. सप्ताहान्ती होणार्‍या प्रतिष्ठितांच्या मेजवान्यांमध्ये जर एखादीने ’ऐकलंत का सेनापतीणबाई, चंद्रभानकडून आम्ही नवीन फडताळ घेत आहोत’ असे म्हटले तर ऐकणार्‍या सर्वांचा असूयेने अगदी जीव नकोसा होत असे. एकूण काय तर चंद्रभान हा एक ब्र्यांड झाला होता. त्याचा व्यवसाय अत्यंत जोमाने चालला होता. त्याने अमाप संपत्तीही कमावली होती. मात्र व्यवसायाच्या यशस्वितेसाठी आवश्यक असलेले ’वस्तू कमीत कमी किंमतीत घेणे आणि जास्तीत जास्त किंमतीत विकणे’ हे ब्रीद तो कटाक्षाने पाळत होता. सुरुवातीला प्रवासासाठी भीमथडीची तट्टे वापरणार्‍या चंद्रभानकडे क्रमाक्रमाने काठेवाडी आणि अरबी घोडे आले होते. हल्ली हल्ली तर नगरात फिरण्यासाठी त्याने एक हत्तीही विकत घेतला होता. व्यवसायासाठी मात्र त्याने विशेष रचनेचा एक रथ बनवून घेतला होता.