सुकाळसौदा

आजानुकर्ण

(पृष्ठ ३)

"काही नाही हो. मेज चकचकीत बनवण्यासाठी वापरलेल्या द्रवाची पावती आहे ही. जा‌ऊ द्या तुम्हाला विकायची इच्छाच नसेल तर राहू द्या. फारफार तर मी १०० मोहरा दे‌ऊ शकतो. मलाही या मेजाचा फारसा उपयोग नाही. या मेजाचे पाय माझ्या अभ्यासिकेतील आसनाला व्यवस्थित वाटतील असे वाटले होते. असो."

"एक काम करू या. तुमचेही राहूद्या आणि आमचेही राहूद्या. १५० मोहरांवर सौदा करूया."

चंद्रभानने बोलण्यासाठी तोंड उघडले पण त्याला पुढे बोलू न देता रामा म्हणाला. "नाही, नाही. काही बोलू नका. सौदा पक्का. हे मेज आता तुमचे."

वास्तविक मनातून अतिशय आनंद झालेला असूनही, ’आता हे मेज घ्यायलाच लागणार, आणि पैसेही जास्त गेले’ असा चेहरा करत चंद्रभान म्हणाला. "ठीक आहे. तुम्ही मला एवढे अतिथी समजून जलपानाची सोय केली. तुमचा शब्द मला मोडवत नाही. केवळ इथल्या माणसांच्या चांगुलपणाबद्दल कृतज्ञता म्हणून हे मेज मी घेत आहे. मी माझा रथ बाजूलाच आडोशाला लावला आहे. तो घे‌ऊन येतो. तोपर्यंत तुम्ही हे बाहेर अंगणात आणून ठेवले तर फार उपकार होतील."

आता झालेला सौदा एवढ्यातेवढ्यावरून मोडायला नको म्हणून रामाने तात्काळ होकार दिला.

जवळजवळ धावतच चंद्रभान रथापर्यंत गेला. ह्या खेडवळांचा विचार बदलण्या‌आधी ते मेज ताब्यात घेणे आवश्यक होते. रथाला मागे असलेल्या कड्यांमध्ये अडकवून ते मेज नेता येणे शक्य होते. निदान ते ताब्यात आले तरी माणसे बोलावून घे‌ऊन नेता ये‌ईल असा विचार त्याने केला. मोहरांची थैली घे‌ऊन तो परत निघाला.

इकडे गोविंदा झालेल्या सौद्यामुळे अस्वस्थ झाला होता. मेज बाहेर अंगणात आणता आणता तो रामाला म्हणाला,
"दादा, तू व्यवस्थित ऐकलेस ना बोलणे त्याचे. त्या माणसाला फक्त या मेजाचे पाय हवे आहेत. आणि तरीही तो संपूर्ण मेज घ्यायला तयार आहे. फक्त या मेजाच्या पायांसाठी १५० मोहरा द्यायला तयार झाला तो. मला तर शंका येत आहे की जर हे मेज त्याच्या रथात मावले नाही तर हा सौदा फिसकटेल."

रामालाही गोविंदाचे म्हणणे पटले.

चंद्रभान परत अंगणात आला. तेव्हा तिन्ही भावंडांनी करवतीने मेजाचे पाय व्यवस्थित कापून बाजूला ठेवले होते आणि सुहास्य मुद्रेने चंद्रभानची ते वाट पाहत होते.

 

(मूळ कल्पना परकीय)