मराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत

अरुण फडके

(पृष्ठ २)

ह्याशिवाय, 'किडा, शिरा, खजिना, दागिना; जुना, सुटा, नमुना, पाहुणा; पुरी, बुडी, पाहुणी, माउली' असे सर्वच मराठी शब्द नियम क्र.६प्रमाणे चालतात; त्याचप्रमाणे, 'दिशा, हिरा, कविता, महिला; उषा, सुधा, तनुजा पादुका; कुपी, त्रिपुरी, फाल्गुनी, भिक्षुकी' असे काही संस्कृत शब्दही मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच चालतात; परंतु 'क्रीडा, गीता, तृतीया, परीक्षा; पूजा, मंजूषा; भूमी, रूढी, मयूरी' असे काही संस्कृत शब्द मात्र मराठीच्या प्रकृतीप्रमाणे चालत नाहीत. काही शब्द नियमानुसार चालणे, काही शब्द नियमानुसार न चालणे, जे नियमानुसार चालत नाहीत ते नेमके संस्कृत शब्द असणे, आणि ते संस्कृत आहेत हे ओळखता न येणे, अशी ही गुंतागुंत आहे.

उपान्त्य अक्षराला इकार किंवा उकार असलेले असे ए-कारान्त आणि ओ-कारान्त संस्कृत शब्द मराठीत वापरात नाहीत. त्यामुळे कोणताही गोंधळ न होता ह्या नियमानुसार लिहिता येतात असे मराठी शब्द दोनच प्रकारचे. ए-कारान्त, उदा.- इथे, तिथे, पाहिजे; कुठे, पुढे, सुटे; आणि ओ-कारान्त, उदा.- निघो, फिटो, मिळवितो; उठो, तुटो, फुटो. परंतु असे शब्द मराठीतही थोडेच आहेत. एकूण काय, नियमानुसार लिहायला गेलो, तर गोंधळ होणार्‍या शब्दांची संख्याच जास्त.
अन्त्य अक्षरातील स्वर दीर्घ असेल, तर उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार र्‍हस्व असतो, ही मराठीची प्रकृती लक्षात घेऊन ह्या नियमात बदल व्हायला पाहिजे.

नियम क्र.७
- ह्या नियमाचा पूर्वार्ध असा आहे - अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत. उदा.- गरीब, वकील; सून, वसूल. अपवाद: र्‍हस्वोपान्त्य अकारान्त तत्सम शब्द. उदा.- विष, गुण. अ-कारान्त शब्दातील उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार लिहिताना मराठीची प्रकृती कशी आहे, हे नियम क्र.६प्रमाणेच ह्याही नियमात धडधडीत दिसत आहे. तरीही संस्कृतमधील शब्द मराठीत घेताना ती प्रकृती इथेही सांभाळलेली दिसत नाही. त्यामुळे नियम क्र.६मध्ये मांडलेली गुंतागुंत इथेही तशीच आहे. कशी ते पाहा - 'खीर, नीट, रतीब, विहीर; ऊठ, गूळ, खेडूत, माणूस' असे सर्वच मराठी शब्द नियम क्र.७प्रमाणे चालतात; त्याचप्रमाणे, 'ईश, दीप, कुटीर, सुनील; गूढ, दूत, भूत, शूर' असे काही संस्कृत शब्दही मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच चालतात; परंतु 'दिन, विष, गणित, जटिल; गुण, सुख, चतुर, तरुण' असे काही संस्कृत शब्द मात्र मराठीच्या प्रकृतीप्रमाणे चालत नाहीत. म्हणजे सर्व गोंधळ नियम क्र. ६प्रमाणेच.

अ-कारान्तापूर्वीचा इकार किंवा उकार दीर्घ असतो, ही मराठीची प्रकृती लक्षात घेऊन ह्या नियमात बदल व्हायला पाहिजे.
ह्या नियमाचा उत्तरार्ध असा आहे - मराठी शब्दातील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यतः र्‍हस्व असतात. उदा.- भिंग, नारिंग, गुंज, सुंठ; छिः, थुः; भिस्त, मुक्काम. परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे र्‍हस्व किंवा दीर्घ लिहावेत. उदा.- चित्र, तीक्ष्ण; पुत्र, पूज्य इत्यादी. ".... इकार व उकार सामान्यतः र्‍हस्व असतात.' ही नियमाची भाषा नसून निरीक्षण नोंदवण्याची भाषा झाली. ".... इकार व उकार र्‍हस्व लिहावेत.' ही नियमाची भाषा झाली. असो. जोडाक्षरापूर्वीचा इकार आणि उकार ह्या बाबतीतील गुंतागुंत वरील नियम क्र. ६प्रमाणेच आहे. कशी ते पाहा- 'किल्ला, शिल्लक, बुक्का, दुप्पट' असे सर्वच जोडाक्षरयुक्त मराठी शब्द नियम क्र.७प्रमाणे चालतात; त्याचप्रमाणे, 'चित्र, आधिक्य, दुष्ट, पुस्तक' असे काही संस्कृत शब्दही मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच चालतात; परंतु 'तीव्र, नावीन्य, मूल्य, फूत्कार' असे काही संस्कृत शब्द मात्र मराठीच्या प्रकृतीप्रमाणे चालत नाहीत. अनुस्वारयुक्त, विसर्गापूर्वीचा आणि जोडाक्षरापूर्वीचा इकार आणि उकार र्‍हस्व असतो, ही मराठीची प्रकृती लक्षात घेऊन ह्या नियमात बदल व्हायला पाहिजे.

नियम क्र.८ अंशतः
- ह्या नियमाचा सुरुवातीचा भाग असा आहे - उपान्त्य दीर्घ ई-ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य ईकार-ऊकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी र्‍हस्व लिहावा. उदा.- गरिबास, वकिलांना, सुनेला, वसुलाची. अपवाद: दीर्घोपान्त्य तत्सम शब्द. उदा.- शरीरात, सूत्रास. नियम क्र.६मध्ये मांडलेली गुंतागुंत इथेही काही प्रमाणात तशीच आहे. कशी ते पाहा - 'कीस- किसाचा, पूड- पुडीला' असे उपान्त्य दीर्घ इकार किंवा उकार असलेले सर्वच मराठी शब्द नियम क्र.८प्रमाणे चालतात; मात्र 'वीर- वीराला, पूजा- पूजेत' असे सारेच संस्कृत शब्द मराठीच्या प्रकृतीप्रमाणे चालवता येत नाहीत. 'कुटुंबीयांना' हा शब्द 'कुटुंबियांना' असा अनेक वेळा चुकीचा लिहिला जाण्याचे कारण आहे ते ह्या नियमाला असलेला तत्सम शब्दांचा अपवाद. 'कुटुंबीय' हा शब्द संस्कृत आहे, हे माहीत नसते आणि तो संस्कृत आहे, हे ओळखायला कोणताही निकष लावता येत नाही. इतर संस्कृत शब्दांच्या बाबतीतही हीच प्रामाणिक अडचण आहे. उपान्त्य अक्षराचा दीर्घ इकार आणि उकार उभयवचनी सामान्यरूपात र्‍हस्व होतो, ही मराठीची प्रकृती लक्षात घेऊन ह्या नियमात बदल व्हायला पाहिजे.

नियम क्र.११- हा नियम असा आहे - 'हळूहळू, मुळूमुळू, खुटूखुटू' या शब्दांतील दुसरा स्वर व चौथा स्वर दीर्घ लिहावा. वरील शब्दांप्रमाणेच "तसूतसू, झुंजूमुंजू, चिरीमिरी' यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील ऊकार व ईकार मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावेत. परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील, तर ते उच्चाराप्रमाणे र्‍हस्व लिहावेत. उदा.- लुटुलुटु, दुडुदुडु, रुणुझुणु. पुढे दिलेल्या चार कारणांमुळे हा नियम गोंधळात टाकणारा ठरतो-

१)"पुनरुक्त' शब्द म्हणजे काय, हे ह्या नियमात कोठेही समजावून सांगितलेले नाही. ही एक शब्दसिद्धी आहे, परंतु ही शब्दसिद्धी कशी असते, हे आपण पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोठेही शिकवत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मुळात "पुनरुक्त' म्हणजे काय, हेच अनेकांना कळत नाही.
२) 'हळूहळू, मुळूमुळू, खुटूखुटू' हे शब्द महामंडळाने 'नादानुकारी' मानलेले नाहीत. 'हळूहळू' हा शब्द नादानुकारी नाही हे मान्य आहे. पण 'मुळूमुळू, खुटूखुटू' हे शब्द नादानुकारी नाहीत असे म्हणता येत नाही. 'मुळूमुळू' हा रडण्याच्या किंवा बोलण्याच्या वर्णनासाठी असलेला शब्द आहे. मग त्यात 'नाद (आवाज)' नाही असे कसे म्हणता येईल? 'खुटूखुटू' हा शब्द एखाद्या क्रियेच्या पद्धतीचे वर्णन करणारा आहे. ती क्रिया प्रत्येक वेळी 'नादहीनच' असेल, असे कसे म्हणता येईल? म्हणजे हा शब्द प्रसंगानुसार किंवा क्रियेनुसार 'खुटूखुटू' किंवा 'खुटुखुटु' असा कसाही लिहिलेला चालेल, असे होते. त्यामुळे मुळात 'नादानुकारी' म्हणजे काय, असा प्रश्न पडतो.
३) 'लुटुलुटु, दुडुदुडु, रुणुझुणु' ही सर्व उदाहरणे चारही अक्षरांना उकार असणारी झाली. त्यामुळे प्रश्न असा पडतो की, चारही अक्षरांना इकार येईल तेव्हा काय? उदा.- 'फिदिफिदि'. त्याचप्रमाणे, फक्त पहिल्या आणि तिसर्‍या अक्षराला इकार किंवा उकार येईल तेव्हा काय? उदा.- 'किरकिर, गुणगुण'.
४) 'चुटपुट, मिणमिण, लुडबुड, हुरहुर' ह्यांसारखे काही शब्द 'नादानुकारी' मानायचे का, ह्यावर वाद होऊ शकतो. त्यामुळे असे शब्द 'चुटपूट, मिणमीण, लुडबूड, हुरहूर' असे नियम क्र.७प्रमाणे लिहिले, तरी ते बरोबर धरावे लागतात. 'भुरुभुरु' हा शब्द जळणाचा आवाज म्हणून घेऊ, तेव्हा नादानुकारी ठरतो, परंतु उडणार्‍या केसांसाठी वापरू, तेव्हा नादानुकारी ठरत नाही. मग तो संदर्भाप्रमाणे 'भुरुभुरु' (नियम क्र.११), आणि 'भुरुभुरू' (नियम क्र.५ आणि ६), असा दोन्ही पद्धतींनी लिहिलेला चालेल का? पण नियमात तर म्हटले आहे की, असे शब्द 'उच्चाराप्रमाणे' र्‍हस्व लिहावेत. 'भुरुभुरु'चा उच्चार तर दोन्ही वेळा सारखाच होतो. मग लेखनात फरक करायचा की, उच्चारात फरक करायचा?

असा हा गोंधळात टाकणारा आणि वादग्रस्त ठरणारा नियम पूर्णपणे बाद करून टाकावा, आणि ह्या शब्दांच्या अर्थांचा आणि उच्चारांचा संदर्भ न घेता, ते अनुक्रमे नियम क्र.५, ६ आणि ७ ह्यांनुसार लिहिले जावेत, असे वाटते. ह्यांशिवाय, ह्या शब्दांचा विचार करता, उपान्त्यपूर्व इकार-उकार कसे असावेत, ह्यासंबंधीही नियम होणे आवश्यक आहे. आता तोच पुढे सांगतो आहे-

उपान्त्यपूर्व अक्षराचा इकार आणि उकार - र्‍हस्व-दीर्घ लेखनासंबंधी महामंडळाने केलेले सर्व नियम हे शब्दातील केवळ अन्त्य आणि उपान्त्य अक्षराचे इकार किंवा उकार केव्हा आणि कसे लिहावेत ह्यासंबंधीचे आहेत. परंतु उपान्त्यपूर्व अक्षराला इकार किंवा उकार असलेले असे कितीतरी मराठी आणि संस्कृत शब्द आपण नेहमी वापरतो. आता आपण त्यांची काही उदाहरणे पाहू -

'किनारा, चिवडा, गुडघा, बुटका, निसरडा, विरजण, चुरगळा, रुखवत' हे मराठी शब्द पाहिल्यावर मराठीची प्रकृती अशी दिसते की, मराठी शब्दांमध्ये उपान्त्यपूर्व अक्षराचा इकार किंवा उकार नेहमी र्‍हस्वच असतो. 'किरण, कुमार, विशेषण, उपकार' असे काही संस्कृत शब्दही मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच चालतात. परंतु 'जीवन, भूषण' असे काही संस्कृत शब्द मराठीच्या प्रकृतीप्रमाणे चालत नाहीत. उपान्त्यपूर्व इकार आणि उकार मराठीत र्‍हस्वच असतात, ही मराठीची प्रकृती पाहूनच हा नियम झाला पाहिजे.