मराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत

अरुण फडके

(पृष्ठ ३)

महामंडळाच्या ज्या नियमांच्या बाबतीत मी ह्या निबंधात सकारण आणि सोदाहरण आक्षेप नोंदवला आहे, त्या नियमांमधील गोंधळ सोडवण्यासाठी आवश्यक असे काही नियम मी आता मांडणार आहे. परंतु हे नियम मांडण्यापूर्वी ह्या नियमांबद्दलची माझी भूमिका थोडक्यात मांडतो -
विविध ठिकाणी आणि विविध प्रसंगी मराठीची लिखित प्रकृती कशी आहे, हे आपण आत्तापर्यंत सोदाहरण पाहिले. मराठीची ही लिखित प्रकृती पाहूनच पुढील सर्व नियम मांडले आहेत. त्यामुळे एक विशिष्ट शास्त्र पाळले जाऊनही नियम मात्र सोपे होतात. असे सोपे नियम पाळणे सहज शक्य झाल्याने लेखनात शिस्त आणि एकवाक्यता राहते. उच्चार आणि लेखन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न मी कुठेही केलेला नाही. तसे करणे मला योग्य आणि शक्य वाटत नाही. ह्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत-

१) आपण आपल्या मुखावाटे जेवढे ध्वनी काढू शकतो, त्या प्रत्येक ध्वनीसाठी एक स्वतंत्र लेखनचिन्ह उपलब्ध असणारी समृद्ध लिपी ज्या भाषेची आहे, त्याच भाषेत 'उच्चारानुसारी लेखनाचे नियम' ही गोष्ट शक्य आहे. आपल्या भाषेची लिपी एवढी समृद्ध नसल्यामुळे 'उच्चारानुसारी लेखनाचे नियम' ही गोष्ट आपल्या भाषेत मला शक्य आणि योग्य वाटत नाही.
२) 'कोणाचे आणि कोणते उच्चार प्रमाण मानायचे' ह्याचा निर्णय करणे ही गोष्ट आज वाटते तेवढी सहजशक्य राहिलेली नाही.
३)
'उच्चारशास्त्र' आणि 'उच्चारकोश' ह्या विषयांवर मराठीत सविस्तर ग्रंथ उपलब्ध नाहीत. त्यामुळे उच्चारांच्या बाबतीत आलेली अडचण सोडवण्यासाठी मराठीत पुरेसे संदर्भ उपलब्ध नाहीत.
४)
महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या व्यक्तींचे वेगवेगळे उच्चार ध्वनिमुद्रित करून घेऊन त्यांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणाने काही निष्कर्ष काढण्याचे शास्त्रशुद्ध काम महाराष्ट्रात आजपर्यंत झालेले नाही.
५) आपल्या सर्व मुळाक्षरांचे योग्य उच्चार कसे करायचे (उदाहरणार्थ; ऋ, ङ, ञ, ष, क्ष) हे प्राथमिक शिक्षणही आपण कोणत्याही इयत्तेत धडपणाने देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे 'उच्चारानुसारी लेखनाचे नियम' हे धोरण राबवणे मला योग्य आणि शक्य वाटत नाही.
६)
'लेखन करताना लेखनाचे नियम पाळावेत, आणि बोलताना बोलण्याच्या पद्धती पाळाव्यात' हे धोरण मला अधिक योग्य वाटते; आणि माझ्या मते बहुसंख्य किंवा सर्वच प्रगत भाषा कमी-अधिक प्रमाणात ह्याच धोरणाने चालत असाव्यात. किमानपक्षी इंग्लिश आणि जर्मन ह्या भाषांमध्ये तरी हेच धोरण दिसते.

त्यामुळे आता मराठीची लिखित प्रकृती पाहून मला योग्य वाटत असलेले काही नियम पुढीलप्रमाणे आहेत -

०१) अन्त्य अक्षराचा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा.
(प्रचलित नियमानुसार मराठीमधील 'आणि' व 'नि' ही दोन अव्यये; आणि संस्कृतमधील 'अति, अद्यापि, इति, कदापि, किंतु, तथापि, परंतु, यथामति, यथाशक्ति, यद्यपि' ही दहा अव्यये; एवढे बाराच नित्योपयोगी शब्द र्‍हस्वान्त लिहावे लागतात. अन्त्याक्षर दीर्घ लिहिणे ही मराठीची प्रकृती आहे. त्यामुळे नियमात एकवाक्यता ठेवण्यासाठी हे सारे शब्द दीर्घान्त लिहायला हरकत नसावी, असे मला वाटते.)
०२) अन्त्य अक्षरातील स्वर र्‍हस्व असेल, तर उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा.
(सर्व मराठी शब्द आणि 'दीप, वीर, गूढ, शूर' असे अनेक संस्कृत शब्द सध्या ह्याच नियमानुसार लिहिले जातात. त्यामुळे 'गणित, हित, गुण, सुख' असे संस्कृत शब्दसुद्धा 'गणीत, हीत, गूण, सूख' असे मराठीच्या प्रकृतीनुसारच लिहिले जातील. नाहीतरी कित्येक संस्कृतप्रेमी व्यक्तीसुद्धा 'विष, हित, गुण, सुख' अशा संस्कृत शब्दांचे उच्चार मराठीतील 'खीर, खूण' ह्यांप्रमाणेच 'वीष, हीत, गूण, सूख' असेच करताना आढळतात.)
०३) अन्त्य अक्षरातील स्वर दीर्घ असेल, तर उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार र्‍हस्व लिहावा.
(सर्व मराठी शब्द आणि 'कविता, प्रतिमा, तनुजा, बहुधा, अतिथी, भगिनी' असे अनेक संस्कृत शब्द सध्या ह्याच नियमानुसार लिहिले जातात. त्यामुळे 'क्रीडा, असूया, पूजा, मयूरी' असे संस्कृत शब्दसुद्धा 'क्रिडा, असुया, पुजा, मयुरी' असे लिहिले जातील. त्याचप्रमाणे 'नीती, प्रीती, भूमी, रूढी' अशा संस्कृत शब्दांमध्येही अन्त्य अक्षरातील स्वर दीर्घ होत असल्यामुळे ह्यांतील उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार र्‍हस्व होईल. 'गृहिणी, भगिनी, कुपी, विदुषी' असे ह्याच नियमानुसार चालणारे शब्द संस्कृतमध्ये आहेतच. लागोपाठ दोन दीर्घ इकार किंवा उकार ही गोष्ट फक्त जोडशब्दात किंवा सामासिक शब्दातच शक्य होईल.)
०४) उपान्त्यपूर्व अक्षराचा इकार किंवा उकार र्‍हस्व लिहावा.
(सर्व मराठी शब्द आणि 'किरण, विशेषण, दिवाकर, सुधारणा' असे संस्कृत शब्द सध्या ह्याच नियमानुसार लिहिले जातात. त्यामुळे नियमात एकवाक्यता ठेवण्यासाठी 'जीवन, समीकरण, भूषण' असे संस्कृत शब्द 'जिवन, समिकरण, भुषण' असे लिहिले जातील.)
०५) अनुस्वारयुक्त इकार किंवा उकार, विसर्गापूर्वीचा इकार किंवा उकार, आणि जोडाक्षरापूर्वीचा इकार किंवा उकार हे र्‍हस्व लिहावेत.
(सर्व मराठी शब्द आणि 'चिंतन, कुटुंब, निःशस्त्र, दुःख, चित्र, दुष्ट' असे अनेक संस्कृत शब्द सध्या ह्याच नियमानुसार लिहिले जातात. त्यामुळे 'रवींद्र, अतींद्रिय, तीव्र, सूक्ष्म' असे संस्कृत शब्दसुद्धा 'रविंद्र, अतिंद्रिय, तिव्र, सुक्ष्म' असे लिहिले जातील. ह्यांतील 'रवींद्र, अतींद्रिय' हे शब्द दीर्घत्व संधीने झालेले आहेत, ह्याची जाण मला आहे. परंतु ह्या नियमाला हे दोनच शब्द अपवाद ठरत असतील, तर त्यांतील अनुस्वारयुक्त इकार र्‍हस्व लिहिण्याने काही अनर्थ होतो असे मला वाटत नाही. त्यांचे विग्रह अनुक्रमे 'रवि+इंद्र आणि अति+इंद्रिय' असे आहेत, हे कोशात आणि व्याकरणाच्या पुस्तकात दाखवता येईलच.)
०६) सामासिक शब्द किंवा जोडशब्द लिहिताना प्रत्येक घटक शब्दाचे लेखन संबंधित नियमानुसार करावे.
(खडीसाखर, वांगीपोहे (तत्पुरुष); दहीभात, भाऊबहीण (द्वंद्व); मातीमोल, कडूसर (बहुव्रीही); ह्यांसारखे मराठी सामासिक शब्द सध्या ह्याच नियमानुसार लिहिले जातात. त्यामुळे बुद्धिवैभव, अणुशक्ती ह्यांसारखे संस्कृत शब्दही 'बुद्धीवैभव, अणूशक्ती' असे लिहिले जातील.) ('उपान्त्यपूर्व अक्षराचा इकार किंवा उकार र्‍हस्व लिहावा', हा नियम इथे कोणत्याच शब्दाला लागू होत नाही.)
०७) उपान्त्य अक्षराचा दीर्घ इकार किंवा दीर्घ उकार सामान्यरूपात र्‍हस्व लिहावा.
(सर्व मराठी शब्दांची सामान्यरूपे सध्या ह्याच नियमानुसार लिहिली जातात. त्यामुळे 'वीर, पूजा' ह्यांसारख्या संस्कृत शब्दांची सामान्यरूपेही 'विराला, पुजेत' अशी लिहिली जातील.)
०८) उपसर्गघटित आणि प्रत्ययघटित असा कोणताही शब्द लिहिताना मुख्य शब्द आणि उपसर्ग किंवा प्रत्यय हे स्वतंत्र घटक मानून त्यांचे लेखन त्या-त्या नियमानुसार करावे.
('पाणीदार, तीळमात्र, पाटीलकी, कंजूसपणा' ह्यांसारख्या मराठी शब्दांप्रमाणेच 'शक्तीशाली, जंतूनाशक' असे संस्कृत शब्दही लिहिले जातील.) ('उपान्त्यपूर्व अक्षराचा इकार किंवा उकार र्‍हस्व लिहावा', हा नियम इथे कोणत्याच शब्दाला लागू होत नाही.)
०९) संस्कृतसह इतर कोणत्याही भाषेतून मराठीत घेतलेला कोणताही शब्द आणि त्याची वापरावी लागणारी कोणतीही रूपे ह्यांचे लेखन वरील नियमांना अनुसरून करावे.
('काश्मीर, मुस्लीम, हकिकत, ब्रिटीश, हाऊस, टाईम, पाईप, इंजीन, पोलीस, अमिबा' ह्यांसारखे परभाषांमधून घेतलेले शब्द त्यांच्या मूळ रूपात असे लिहिले जातील; तर त्यांचे सामान्यरूप झाल्यावर ते 'काश्मिरात, मुस्लिमांना, ब्रिटिशांनी, हाऊसमध्ये, इंजिनात, पोलिसाने', असे लिहिले जातील.)

लेखनाचे नियम असे केल्यानंतर 'दिन-दीन, सुत-सूत' असे अर्थभेदयुक्त काही मोजकेच शब्द लेखनदृष्ट्या सारखेच दिसू लागतील, ह्याचीही मला कल्पना आहे. परंतु महामंडळाने जेव्हा मराठीच्या प्रकृतीनुसार सर्व अन्त्याक्षरे दीर्घ लिहिण्याचा नियम केला, तेव्हाही 'रवि-रवी, गुरु-गुरू' अशा काही अर्थभेदयुक्त शब्दांमधील लेखनभिन्नता संपलीच की. परंतु अशी भिन्नता संपल्यामुळे फार मोठे अर्थघोटाळे झाले, असे एकही उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाही, आणि ह्यामुळे पुढेही फार मोठे अर्थघोटाळे होतील, असे मला वाटत नाही. इथे आपण सर्वांनीच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ज्या शब्दांमध्ये इकार, उकार आणि अनुस्वार ह्या बाबी येतात, केवळ त्याच शब्दांना एकापेक्षा अधिक अर्थ आहेत, असे काही आहे का. ज्या शब्दांमध्ये मुळातच ह्या तीनपैकी एकही बाब नाही, अशा शब्दांनाही एकापेक्षा अनेक अर्थ आहेतच की. (उदाहरणार्थ: नवा = न वापरलेला; अननुभवी; अनोळखी; आधुनिक. पदर = साडीचा काठ; पापुद्रा; ताबा; आसरा; विषयाचे अंग; नहाण येणे. सोवळा = पवित्र; निर्व्यसनी; अलिप्त.) मग असा अनेकार्थी शब्द एखाद्या ठिकाणी योजला जातो, तेव्हा अर्थाचा घोटाळा होतो का? नाही. कारण योग्य तो अर्थ संदर्भाने समजतो. असे बहुसंख्य अनेकार्थी शब्द जर संदर्भाने बरोबर समजत असतील, तर र्‍हस्व-दीर्घ-अनुस्वार-युक्त थोड्या शब्दांचे अर्थभेद लेखनाने दाखवण्यासाठी नियमांमध्ये विनाकारण अपवाद आणण्याची नितांत आवश्यकता आहे का, हा विचार होणे मला महत्त्वाचे वाटते.