मराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत

अरुण फडके

(पृष्ठ ४)

ह्या नव्या नियमांप्रमाणे लेखन बघणे हे सुरुवातीला विचित्र वाटेल ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. किंबहुना मला स्वतःलाही काही दिवस ते विचित्रच वाटेल. त्याचप्रमाणे एवढ्या वर्षांची सवय सोडून एकदम असे लिहिणे हे इतरांप्रमाणेच मलाही तेवढेच कठीण जाणार आहे. परंतु 'नजरेला कसे दिसेल किंवा वाटेल, आणि आपली सवय बदलणे किती जड जाईल' हे शास्त्रीय मुद्दे होऊ शकत नाहीत. त्याचप्रामणे आपल्याला काय सोपे जाईल, असा विचार करणे, हा अप्पलपोटेपणा होईल. आपल्याला येणार्‍या पिढीचा विचार करायचा आहे. ती पिढी कोणत्या प्रकारच्या वेगवान युगात वावरणार आहे, ह्याचा विचार करायचा आहे. अशा वेळी लेखनाच्या नियमांमध्ये एकवाक्यता असणारी भाषाच वेगात प्रगती करू शकेल, ह्या गोष्टीवर माझा तरी विश्वास आहे. आणि येणारी पिढी जेव्हा पहिल्यापासून ह्याचप्रमाणे लिहायला शिकेल, तेव्हा तिला ह्यात काहीच वावगे किंवा विचित्र वाटणार नाही, हे तर उघडच आहे.


इंग्लिश भाषेतील स्पेलिंग्जमधील अनियमितपणा काढून टाकण्यासाठी किंवा होईल तेवढा कमी करण्यासाठी तिकडेही काही हालचाली सुरू झाल्याची कुणकुण आपल्याला महाजालावर दिसू लागली आहे. मग आपणही वेळीच सावध होणे शहाणपणाचे नाही का?

ह्याप्रमाणे नियम झाले, तर कोणताही शब्द लिहावा लागेल, तेव्हा तो 'साधा शब्द, सामासिक शब्द, साधित शब्द, जोडशब्द' ह्यांपैकी कोणत्या गटात मोडतो, हे कळल्यावर त्यातील कोणताही इकार किंवा उकार बिनचूक लिहिणे बहुसंख्यांना सहज शक्य होणार आहे, हे निश्चित.

प्रचलित नियमांचा माझा व्यवस्थित अभ्यास असून त्याच अभ्यासावर आज मी अनेक प्रकारची कामे करू शकत आहे. त्यामुळे प्रचलित नियमांचा मला व्यक्तिशः काही त्रास होत असल्यामुळे मी ते बदलून मागत नसून, सर्वसाधारण मराठी माणसाला लेखनात त्रासदायक ठरणारी अशी ह्या नियमांमधील विसंगती काढून टाकण्यासाठी आणि पुढच्या पिढीला काहीतरी शास्त्र पाळणारे लेखननियम देण्यासाठी हा सारा खटाटोप आहे, ही भूमिका लक्षात घेऊन ह्या नव्या नियमांकडे पाहावे, अशी माझी विनंती आहे.

- अरुण फडके