कोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना

नंदन होडावडेकर

(पृष्ठ २)

मोठा पट असल्यामुळे कोसलात काही ठिकाणी थोडा पसरटपणा येणे अपरिहार्य आहे, पण त्याचबरोबर पांडुरंगची मनःस्थिती दर्शवणारी रोजनिशी नेमाड्यांना वेगवेगळे भाषिक प्रयोग करायलाही वाव देते. ‘पूर्वजांच्याच नशिबी नपुंसकगिरी नव्हती. म्हणून हे फेरे - मर्द बापांपायी’ सारखी वाक्यं याच भागातली. मनीच्या मृत्यूचे प्रकरण नेमाड्यांनी अतिशय जीवघेणे लिहिले आहे. ‘तिच्याबरोबर तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिने एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली’, यासारख्या ओळी पहिल्याच प्रयत्नात ‘कट निअरर द एकिंग नर्व्ह’चा परिणाम साधून जातात.

पण या गोष्टींबरोबरच दुसर्‍या भागात, पांडुरंगाचा संपूर्ण पराभवाकडे होणारा प्रवास दाखवताना कोसला काही ठिकाणी विस्कळीतही होते. कॅचर मात्र एखाद्या परिणामकारक शॉर्ट फिल्मसारखा नेमका परिणाम साधून उत्कर्षबिंदूवर थांबते. नायकाच्या संपूर्ण पराभवाचा, त्याच्या हतबल मानसिकतेचा संपूर्ण प्रवास दाखवण्याच्या भानगडीत ती पडत नाही. हा एक मुख्य फरक वगळला तर; अंतर्नादच्या श्रेष्ठ पुस्तके विशेषांकात संजय जोशींनी लिहिलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे कोसला निर्णायकपणे पराभूतवादी तर कॅचर ढोबळमानाने आशावादी, होल्डनच्या भवितव्याबद्दलच्या सार्‍या शक्यता मोकळ्या ठेवून संपली असल्याचे म्हटले आहे, ते तितकेसे पटत नाही. होल्डन सॅनिटोरियममध्ये असल्याचे कादंबरीच्या सुरुवातीला आणि शेवटी पुरेसे स्पष्ट केले आहेच. उलटपक्षी अखेरीस पांडुरंग 'उदाहरणार्थ काही झालं तरी हे आपल्याला खुंट्यावर आणून वगैरे बांधतीलच. मग नेमकं अगोदरच खुंट्यावर येऊन उभं राह्यलेलं बरं' ह्या तडजोडवादी वृत्तीचा स्वीकार करताना दाखवला आहे.

अगदी गेलेल्या वर्षांबद्दल बोलताना 'आपापली वर्षं पुढे अचूक शिल्लक असतातच...तेव्हा गमावली ही भाषा उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही' अशीही टिप्पणी करतो. कादंबरीच्या विस्तारानंतर प्रवाहाच्या विरूद्ध पोहायची धडपड सोडून देऊन तथाकथित व्यवहारी शहाणपण अंगीकारलेला पांडुरंग सांगवीकर हा या दोन कादंबर्‍यांतला मुख्य फरक. सारांश म्हणजे, पुनरुक्तीचा आरोप पत्करून, ऑगस्ट स्ट्रिंडबर्गच्या भाषेत सांगायचे झाले तर एकाच दु:खाची नस शोधणार्‍या दोन वेगळ्या मातींतल्या ह्या दोन असामान्य कादंबर्‍या. कोसला लिहिताना नेमाड्यांनी 'कॅचर'वरून प्रेरणा घेतली आहे, हे अमान्य करता येणार नाही. तपशीलांतील आणि त्याहूनही महत्त्वाचा म्हणजे, शैलीतील सारखेपणा वरवरच्या वाचनातही जाणवण्यासारखा आहे. पण त्याचवेळी कोसला ही कॅचरची नक्कल आहे असे म्हणणे चुकीचे, अन्याय्य ठरेल. मूळ कल्पनेत नेमाड्यांनी स्वत:च्या प्रतिभेची गुंतवणूक करून तिचा थोडा विस्तार केला आहे, हे नक्की. समीक्षकी भाषेत, त्यामुळे कॅचर अधिक 'टोकदार' ठरते आणि कोसला थोडी 'पसरट' होते असे म्हणायचे की, कोसला हे कॅचरच्या वाटेवरचे पुढचे पाऊल आहे असे ठरवायचे; हा भाग अलाहिदा (आणि व्यक्तिसापेक्षही).