महाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे

प्रियाली

(पृष्ठ २)

घृष्णेश्वराचे प्राचीन मंदिर कसे अस्तित्वात आले याबद्दलही अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार, घृष्मा (किंवा घृष्णा) नावाची एक शिवभक्त स्त्री दरदिवशी शिवलिंग बनवून नंतर ते भक्तिभावाने शिवतीर्थात विलीन करत असे. या बाईला घरात आपल्या सवतीकडून बराच जाच होता. एके दिवशी सवतीने घृष्मेच्या मुलाला कपटाने ठार केले. दु:खाने वेडीपिशी झालेली घृष्मा शिवतीर्थावर येऊन शंकराची पूजा करून आळवू लागली आणि त्याच शिवतीर्थातून तिचा मुलगा पुनर्जीवित होऊन परतला. यावेळेस शंकराने तिथे उपस्थितांना दर्शन दिले आणि गावकऱ्यांनी शंकराचे मंदिर त्या ठिकाणी बांधले, जे घृष्णेश्वराच्या नावाने प्रसिद्ध झाले.

घृष्णेश्वर कळस

घृष्णेश्वराच्या मंदिराचा कळस

अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख येथे आढळून येतो. त्यानुसार 'श्री शके १६९१ विरोधी वत्सरी माघ सुरी नाग बुध दिनी होळकर कुलाल वाल कल्पवल्ली श्री अहिल्याबाईने श्री तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धार केला असे श्रीरस्तू शिवमाकल्पं' हे कोरलेले आढळते. आज सुमारे एक एकर क्षेत्रफळात वसलेले हे मंदिर मालोजीराजे आणि अहिल्याबाईंनी केलेल्या जीर्णोद्धारामुळे सुस्थितीत आहे. मंदिराच्या चार दिशांना चार महादरवाजे असून चौरसाकृती शिवतीर्थासभोवती अष्टतीर्थांची आठ सुंदर आणि सुबक देवालये आहेत. शिवमंदिराचे गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप असे तीन मुख्य भाग असून मंदिराचा आकाशाच्या दिशेने झेपावाणारा उंच कळस आणि त्यावरील अप्रतिम कोरीव काम लक्षवेधक आहे.

गोन्देश्वर मंदिर

नाशिकपासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर सिन्नर येथील गोन्देश्वराचे मंदिर हा हेमाडपंती स्थापत्यकलेचा आणखी एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. मध्ययुगीन काळातील अतिशय सुंदर आणि सुबक कारागिरीचा आविष्कार म्हणून गोन्देश्वर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास कळतो. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते इ.स. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे. महाराष्ट्रात आढळणार्‍या मध्ययुगीन वास्तूंपैकी अत्युत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गोन्देश्वर मंदिराची गणना होते.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची वास्तू पायर्‍या पायर्‍यांनी बनलेल्या १२५ फूट x ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे.

गोन्देश्वर मंदिर

गोंदेश्वर मंदिर

हे मंदिर इतर हेमाडपंती मंदिरांपेक्षा किंचित वेगळे असून उत्तरेकडील नागरी मंदिरांची झाक त्यावर दिसते. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोन्देश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. इतर मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर थोडे उंचावर असून मंदिराचे सभामंडप आणि गर्भगृह असे भाग आहेत. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्‍या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.

नैसर्गिक उत्पात आणि मानवी औदासिन्यातून टिकून राहिलेली ही मंदिरे काही स्थानिकांच्या आस्थेतून अद्याप सुस्थितीत आहेत. कला, शिल्प आणि स्थापत्याचा हा समृद्ध वारसा असल्याचे ध्यानात आल्यावर पुरातत्त्वखात्यानेही या मंदिरांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. शासनाने या स्थळांचा पर्यटन विकास केल्यास आणि स्थानिकांनी योग्य काळजी घेतल्यास सर्वांच्या अथक प्रयत्नांतून आणि श्रद्धेतून महाराष्ट्राला हेमाडपंतांनी दिलेला हा वैभवशाली वारसा टिकून राहील याची खात्री वाटते.

आभार: या लेखाला माहितीचा हातभार लावण्याबद्दल चित्तरंजन भट (चित्त) आणि शुद्ध मराठी यांची आभारी आहे. संगमेश्वर, अमृतेश्वर आणि घृष्णेश्वर मंदिरांची प्रकाशचित्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल ध्रुव मुळे (चिकू) यांची आणि गोन्देश्वर मंदिराचे प्रकाशचित्र उपलब्ध करून दिल्याबद्दल पराग पुरंदरे यांचीही आभारी आहे. 

संदर्भसूची:

  1. प्राचीन बांधकामे- अरविंद जामखेडकर
  2. हेमाडपंत - इंग्रजी विकिपिडीया
  3. हेमाडपंती मंदिरे - महाराष्ट्र गझेटियर्स डिपार्टमेंट 
  4. घृष्णेश्वर मंदिर
  5. गोन्देश्वर मंदिर
  6. मोडी लिपी