प्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद

मीरा फाटक

प्रा.रोहिणी गोडबोले

प्रा.रोहिणी गोडबोले! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथील एक शास्त्रज्ञ. विज्ञान जगतात, त्यातही उच्च ऊर्जा भौतिकशास्त्राच्या (High Energy Physics) क्षेत्रात जगभरात मोठा दबदबा असलेले एक नाव. शालेय, महाविद्यालयीन आणि पदव्युत्तर शिक्षणात नेत्रदीपक यश संपादन करून पुढील शिक्षणासाठी रोहिणी गोडबोले अमेरिकेतील सनी, स्टोनीब्रुक ह्या विद्यापीठात दाखल झाल्या. १९७९ साली उच्च ऊर्जा भौतिकशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवून त्या भारतात परत आल्या. तेव्हापासून आजतागायत त्या व्यस्त आहेत त्या विश्वाच्या मूलकणांशी संबंधित संशोधन व तदनुषंगिक अनेक कामे यामध्ये. ह्या कालावधीत त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधांची संख्या दोनशेच्या घरात जाते. इंडियन नॅशनल सायन्स ऍकॅडमी (INSA), दिल्ली; इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्सेस(IAS), बंगलोर आणि नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्स, अलाहाबाद ह्या भारतातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या तिन्ही संस्थांच्या फेलो म्हणून निवड होण्याचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. गेल्या ७५ वर्षाच्या इतिहासात ह्या तिन्ही संस्थांच्या फेलो म्हणून निवड झालेल्या महिलांची संख्या १० ते १२ पेक्षा जास्त नाही! आय.आय.टी. मुंबईने २००४ साली त्यांना Distinguished Alumnus Award देऊन गौरवलेले आहे. त्यांना मिळालेल्या इतर मानसन्मानांमध्ये नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेसने सर्वोत्कृष्ट महिला शास्त्रज्ञासाठी ठेवलेले शील मेमोरियल ऍवॉर्ड, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सने दिलेले एक्सलन्स इन रिसर्च इन सायन्स यासाठीचे रुस्तुम चोक्सी ऍवॉर्ड, कोलकत्याच्या एशियाटिक सोसायटीने दिलेले मेघनाद साहा सुवर्णपदक इत्यादींचा समावेश आहे. शिवाय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने त्यांना जगदीशचंद्र बोस फेलोशिप आणि INSA ने जवाहरलाल नेहरू सेंटेनरी विजिटिंग फेलोशिप देखील दिलेली आहे. ह्यातील काही सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. 
इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्सेस तर्फे दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या ’प्रमाण’ ह्या प्रख्यात संशोधन पत्रिकेच्या त्या प्रमुख संपादक आहेत. अलीकडेच त्यांनी इंटरनॅशनल युनियन ऑफ प्यु‌अर ऍंड ऍप्ला‌ईड फिजिक्स (IUPAP) च्या सर्वसाधारण सभेत भारताचे प्रतिनिधित्व केले. आय.यू.पी.ए.पी.ने २००२ साली ’वुइमेन इन फिजिक्स’ अशी एक परिषद पॅरिस येथे भरवली होती. त्यात ’भौतिकशास्त्रात भारतीय महिलांचे स्थान’ यासंबंधी व्याख्यान देण्यास ’भारतातील यशस्वी महिला शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांना पाचारण करण्यात आले होते.

'दिवाळी मनोगत'साठी प्रा.रोहिणी गोडबोले यांची ई-मेल व दूरध्वनीद्वारे घेतलेली ही मुलाखत.

 

एस.एस.सी.ला गुणवत्ता यादीत येऊनही त्यावेळच्या प्रथेप्रमाणे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे न जाता भौतिकशास्त्रामध्ये संशोधन करावे असे तुम्हाला का वाटले? प्रोफेशनल अभ्यासक्रमाकडे जाण्यासाठी घरून काही दबाव आला नाही का?

खरे म्हणजे, प्रोफेशनल अभ्यासक्रमाकडे जायचे नाही हे मी शाळेत असतानाच मनोमन ठरवले होते. माझी आई शिक्षिका होती. आपल्या एका तरी मुलीने (आम्ही चौघी बहिणीच) डॉक्टर व्हावे अशी आईची फार इच्छा होती; पण त्यासाठी तिने माझ्यावर तशी जबरदस्ती केली नाही. (माझ्या धाकट्या बहिणीने डॉक्टर होऊन तिची ती इच्छा नंतर पुरी केली!) माझा स्वतःचा ओढा प्राध्यापकी करण्याकडे किंवा ’ऍकॅडमिक्स’ कडे होता. वडील अर्थशास्त्र विषय घेऊन प्रथम क्रमांकाने बी.ए. झाले होते. घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी सरकारी नोकरी धरली; पण ते फावल्या वेळात अर्थशास्त्रामध्ये पदवी घेऊ इच्छिणाऱ्या आपल्या ओळखीतील मुलांना मार्गदर्शन करीत असत. कदाचित याचा परिणाम माझ्यावर कळत-नकळत झाला असेल. एक मात्र निश्चित, आमच्या आईवडिलांनी आम्हा मुलींच्या निर्णयांवर कुठल्याही प्रकारचा दबाव कधी आणला नाही.

तुम्ही एस.एस.सी. मध्ये गुणवत्ता यादीत आलात, त्यानंतर बी.एस्सी. मध्ये पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवलात आणि एम. एस्सीमध्ये आय.आय.टी. मुंबईमध्ये प्रथम क्रमांक. ह्या चढत्या आलेखाची पुढची पायरी म्हणजे परदेशात जाऊन संशोधन. त्याबद्दल थोडं सांगा.

मी आधी म्हटल्याप्रमाणे संशोधनात शिरायचे असे काही मी ठरवले नव्हते. खरे तर संशोधन म्हणजे काय याचीही मला कल्पना नव्हती. पण मला राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञा शोध (NSTS) शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याच्या अंतर्गत निरनिराळया संशोधन संस्था व विद्यापीठे यात घेण्यात आलेल्या शिबिरांत मी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवल्या होत्या. तेथील एकूण वातावरण, सहाध्यायांशी झालेला संवाद यातून संशोधनात शिरावे असे वाटले. त्यासाठी परदेशी जाण्याचे ठरले, ते मात्र थोडेसे योगायोगाने आणि घाईघाईतच! त्यासाठी माझ्या वर्गमित्रांची बरीच मदत झाली. काही हितचिंतकांनी, 'मुलीला परदेशी पाठवू नका, तिच्या लग्नात अडचण येईल, योग्य जोडीदार शोधणे अवघड जाईल,' असे आईवडिलांना सांगितले (आता असे होत नसेल पण मी सांगत आहे ती गोष्ट ३०/३५ वर्षांपूर्वीची आहे). पण माझ्या आईवडिलांनी अर्थातच तिकडे लक्ष दिले नाही.
अमेरिकेला जाऊन मी भौतिकशास्त्राविषयी शिकलेच; पण आयुष्याविषयीही खूप शिकले. संशोधनातील सुरुवातीचा काळ मी अमेरिकेत घालवला असल्याने भौतिकशास्त्राचे आंतरराष्ट्रीय रूप सुरुवातीसच बघायला मिळाले आणि क्षितिजे आपोआपच रुंदावली. शिवाय माझ्या काम करण्याच्या पद्धतीत एक प्रोफेशनॅलिझम आला.

बंगलोरच्या आय.आय.एस्सी. मध्ये येण्याआधीचा तुमचा प्रवास कसा झाला?

अमेरिकेतून पीएच.डी. करून आल्यावर मी ३ वर्षे मुंबईला टी.आय.एफ.आर. मध्ये होते. नंतर ४ महिने मुंबईलाच रॉयल इंस्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये, त्यानंतर १२ वर्षे मुंबई विद्यापीठात प्रथम व्याख्याती व नंतर अधिव्याख्याती म्हणून (त्यातली २-३ वर्षे जर्मनीत डॉर्टमुंड विद्यापीठात) आणि आता गेली १३-१४ वर्षे आय.आय.एस्सी. मध्ये.

तुम्ही केलेल्या आणि करत असलेल्या संशोधनाबद्दल, म्हणजे तुम्ही संशोधनात नेमके काय करता हे सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दात सांगाल का?

माझे संशोधनाचे क्षेत्र म्हणजे विश्वातील मूलभूत कण व त्यांच्यामधील प्रक्रिया. साधारणपणे न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, प्रकाशाचे कण फोटॉन व न्यूट्रिनो याबद्दल बऱ्याच जणांनी ऐकलेले असते. परंतु या यादीतील प्रोटॉन, न्यूट्रॉन हे मूलभूत कण नसून ते स्वतःच क्वार्क्स या मूलभूत कणांपासून बनलेले असतात, हा गेल्या पन्नास वर्षातील या विषयातील एक महत्त्वाचा शोध. ह्या विश्वाच्या ह्या भव्य, दिव्य शिल्पाच्या विटा म्हणजे हे सर्व मूलभूत कण व या विटा एकत्र ठेवणारे सिमेंट म्हणजे या सर्वांमधील आपापसातील आकर्षण-अपकर्षणाचे जोर! हे विश्व कोणत्या मूलभूत घटकांचे बनलेले आहे व त्यांच्यातील आकर्षण व अपकर्षणाचे नियम काय आहेत, यामधील संशोधन म्हणजेच 'एलिमेंटरी पार्टिकल फिजिक्स'मधील संशोधन! माझे आतापर्यंतचे सर्वच संशोधन या विषयात व तेही सैद्धांतिक. गेल्या साठ-सत्तर वर्षांमध्ये हे सिद्धांत मांडले गेले ते प्रयोगातील मिळालेल्या माहितीचा उपयोग करीत आणि त्या सिद्धांतांचे खरे-खोटेपण पडताळून पाहण्यासाठी सुचवलेल्या प्रयोगांनी दाखवलेल्या वाटांवर थोडी वाटचाल करून. त्यामुळे हे मूलभूत घटक कोणते आहेत व त्यांच्यातील आकर्षण व अपकर्षणाचे नियम काय आहेत, याची बऱ्यापैकी कल्पना आलेली आहे. विसाव्या शतकातील भौतिकशास्त्रातील बरीचशी नोबेल पारितोषिके या विषयात दिली गेली आहेत. पण गाडी अजून शेवटच्या मुक्कामावर पोचलेली नाही. त्यामुळे या सिद्धांताच्या प्रायोगिक प्रचीतीची अगदी 'अंतरीची खूण' कशी मिळेल व प्रयोगांमधील निष्कर्षांमधून या सैद्धांतिक कल्पनांच्या पुढच्या वाटचालीच्या कोणत्या पूर्वखुणा मिळू शकतील, हा या विषयात काम करणाऱ्या आम्हा सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञांच्या समोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न!

वा! म्हणजे तुमचे संशोधनकार्य विश्वाचे कोडे उलगडण्याच्या प्रयत्नाला हातभार लावणारे आहे!  तुमचे संशोधन मुख्यत्वे सैद्धांतिक आहे. थोडा नाजुक प्रश्न! सैद्धांतिक शास्त्रज्ञ (theorist) आणि प्रायोगिक शास्त्रज्ञ (experimentalist) यांचे परस्पर संबंध कसे असतात?

माझे सर्व काम सैद्धांतिकच आहे पण ते प्रयोगाशी संलग्न आहे. भौतिकशास्त्राच्या सर्वच शाखांमध्ये सैद्धांतिक आणि प्रायोगिक अशी दोन्ही प्रकारची कामे होतात; नव्हे तसे होणे आवश्यकच आहे. इतर शाखांशी तुलना करता मूलकण भौतिकशास्त्रात म्हणजेच उच्च ऊर्जा भौतिकशास्त्रात ह्या दोन 'वर्गां'मधील अंतर जरा जास्त आहे. उच्च ऊर्जा भौतिकशास्त्रात करायला लागणारे प्रयोग हे अत्यंत गुंतागुंतीचे असतात. त्यामुळे ह्या दोन वर्गांत बरेच अंतर पडते. माझ्यासारखे लोक जे सैद्धांतिक काम करत असून प्रयोगाशी संलग्न असतात ते ह्या दोघांचा समन्वय घडवून आणतात. ह्या वर्गाला फेनॉमिनॉलॉजिस्ट म्हणतात.