रोहिणी गोडबोले - एक संवाद

मीरा फाटक

(पृष्ठ २)

सैद्धांतिक शास्त्रज्ञ व प्रायोगिक शास्त्रज्ञ हे नेहमीच एकमेकांना पूरक असतात. आमच्या शाखेत हे जरा जास्तच असते असे वाटते. उच्चऊर्जा भौतिकीच्या बहुतेक परिषदांमध्ये कार्यक्रमाची आखणी करणे, व्याख्याने/चर्चासत्रे ठरवणे ह्या प्रक्रियांमध्ये सैद्धांतिक शास्त्रज्ञ व प्रायोगिक शास्त्रज्ञ यांचा सारखाच सहभाग असतो.

मात्र आताच्या एल.एच.सी.च्या प्रयोगातून ’हिग्स बोसॉन’ हे मूलकण मिळाल्यावर हे कण कसे शोधायचे यावर ज्यांनी अनेक वर्षे काम केले ते सैद्धांतिक शास्त्रज्ञ कदाचित थोडे खट्टू होतील, कारण हे कण हुडकण्याचे श्रेय पदरात पडणार ते प्रायोगिक शास्त्रज्ञांच्याच!!!

एखाद्या संशोधन संस्थेत जितके चांगले संशोधन करता येईल तितके चांगले संशोधन विद्यापीठात राहून करता येणार नाही, असे नेहमीच म्हटले जाते. असे का? वेळाची अनुपलब्धतता, पैशाची कमतरता की पोषक वातावरणाचा अभाव?

हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या पॉलिसी प्लॅनर्सनी विद्यापीठांकडे फक्त शिक्षण देणाऱ्या संस्था म्हणून पाहिले. विद्यापीठातील प्रमोशन पॉलिसीमध्येही संशोधनाला फारसे महत्त्व दिले गेले नाही. संशोधनाने शिक्षकाचे शिकवणेही अधिक सशक्त होते व विद्यापीठातील तरुण विद्यार्थ्यांमुळे संशोधनाची पातळीही उंचावू शकते हे आपल्याकडे विसरले गेले. यामुळे 'पोषक वातावरणाचा अभाव' हेच मुख्य कारण आहे असे मला वाटते. काही मोजके अपवाद सोडले तर विद्यापीठात काम करणारेही 'शिकवण्यातून संशोधनाला वेळ मिळत नाही, संशोधनासाठी विद्यापीठाकडे पैसा नाही' असे सांगून स्वतःचे समाधान करून घेतात. मला असे वाटते की, काही निवडक विद्यापीठांमध्ये चांगल्या वर्किंग कंडिशन्स देऊन तरुण शास्त्रज्ञांना आकृष्ट करणे आणि संशोधनाला उत्तेजन देणे असे काही केले तर त्याचे भविष्यात चांगले परिणाम दिसून येतील. एखाद्या विद्यापीठात चांगले संशोधक गेले की आपोआपच चांगले विद्यार्थीही त्या विद्यापीठात जात राहतात.

तुम्ही कामाच्या निमित्ताने अमेरिका, जर्मनी, जपान इ. देशांमध्ये बऱ्याचदा जाता. तिथेही विद्यापीठे व संशोधन संस्था यात असाच फरक आढळतो का?

परदेशात सर्वसाधारणपणे असा फरक फारसा दिसून येत नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे अनेक प्रथितयश शास्त्रज्ञ विद्यापीठातील तरुण विद्यार्थ्यांशी येणाऱ्या संपर्कामुळे खूष असतात.

मूलभूत संशोधनाच्या संदर्भात बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 'सरकार ह्या संशोधनावर इतका पैसा खर्च करते, पण ह्याचा समाजाला काय उपयोग होतो?' तुम्ही यावर काय उत्तर द्याल?

मूलभूत संशोधनाचा समाजाला केव्हा व कसा उपयोग होईल हे सांगणे कठीण आहे. आजच्या संशोधनाचा पुढे कित्येक वर्षांनी उपयोग होऊही शकतो. आजचे विज्ञान हे उद्याचे तंत्रज्ञान असे म्हणतातच. शिवाय मूलभूत संशोधनाचा समाजाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपयोग झालेलाही आहे. ट्रॅंझिस्टर, वर्ल्ड वाइड वेब, ग्रिड कंप्युटिंग ह्यांचा जन्म होण्यास अनुक्रमे कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स, पार्टिकल फिजिक्स, एल.एच.सी.चा प्रयोग हे कारणीभूत आहेत. या सर्वांचा, विशेषतः पहिल्या दोनांचा तर जगभर उपयोग झालेला सर्वांना दिसत आहे. माझ्या मते पूर्वीच्या काळी कवी, चित्रकार, गायक इत्यादींना राजाश्रय होता. तशीच थोडीशी गत आहे मूलभूत संशोधनाची. खरे सांगायचे तर, ही चर्चा अगदी गॅलिलिओच्या काळापासून चालत आलेली आहे.

एका दिवाळी अंकात तुम्ही एक अनुभव सांगितला आहे. तो म्हणजे, केवळ तुमच्या शोधनिबंधातूनच जे तुम्हाला ओळखत होते असे एक ज्येष्ठ प्राध्यापक तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर म्हणाले की, "ओह! आय ऑलवेज थॉट यू वेअर अ मॅन!" हे ऐकून तुमची प्रतिक्रिया काय झाली? म्हणजे तुम्हाला ही प्रशंसा वाटली, की उत्तम संशोधन हे काय फक्त पुरुषच करतात का? असे वाटून राग आला, की केवळ गंमत वाटली?

फक्त थोडी गंमत वाटली!

ह्याच्याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न. असा एक समज आहे की पुरुष सहकारी महिला सहकाऱ्यांना पुढे येऊ देत नाहीत. बाईला पुरुषाची बरोबरी करण्यासाठी दुप्पट काम करावे लागते. वगैरे वगैरे. तुमचा काय अनुभव आहे?

या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटते की इतरांना कमी काम करून जे मिळाले त्यासाठी मला मात्र जास्त त्रास झाला. ह्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी चांगले काम करणे आवश्यक आहे; पण ते पुरेसे नाही! काही पुरुष सहकाऱ्यांनाही आपल्या कामाचे चीज झालेले दिसत नाही. स्त्रियांच्या बाबतीत हे कदाचित जास्त झालेले दिसत असेल. पण माझ्याजवळ याविषयीची माहिती नसल्याने या मुद्द्यावर काही सरसकट विधान मी करू शकत नाही. मला स्वतःला मात्र अशा प्रकारचा अनुभव कधी आला नाही.

म्हणजेच असेही म्हणता येईल का की तुम्हाला पुरुषांपेक्षा वेगळी वागणूक किंवा जेंडर बायस याचा कधी अनुभव आला नाही?

छे छे! असे मात्र अजिबात नाही. माझ्या प्रगतीच्या आड कोणी जाणून बुजून आले किंवा माझे काम पुढे जाऊ दिले नाही अशा प्रकारचे ढोबळ अनुभव मला कधी आले नाहीत. पण मी अमेरिकेतून डॉक्टरेट घेऊन आल्यावर मुंबईला टी.आय.एफ.आर.मध्ये काम करत होते तेव्हा माझ्या काही सहकाऱ्यांनी माझ्या भविष्याबद्दल काही सुचवणी केल्या. त्यामधील काही माझ्या योग्यतेपेक्षा निश्चितच कमी दर्जाच्या होत्या. तसेच मी मुंबई विद्यापीठात नोकरी करू लागले तेव्हा मी एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना शिकवू शकेन की नाही अशी शंका माझ्या एका वरिष्ठांना आली! हे मी स्त्री असल्यामुळे झाले असावे असे मला वाटते. त्यावेळी मी माझ्या पद्धतीने हे दोन्ही प्रसंग हाताळले. सहकाऱ्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले आणि स्वतःला त्रास करून घेतला नाही. पण सर्वच मुली असे करू शकतील असे नाही. काही जणी नक्कीच मनस्ताप करून घेतील. मला असे वाटते की कोणत्या गोष्टी स्त्रियांसाठी आणि कोणत्या पुरुषांसाठी याबद्दलचे पूर्वग्रह समाजमानसात घट्ट बसलेले आहेत. मी अमेरिकेला पी.एच.डी. करायला निघाले तेव्हा माझ्या एका खऱ्याखुऱ्या हितचिंतकांनी मी भारतातच पीएच.डी. करावे असा सल्ला दिला. तो माझ्याबद्दलच्या आपुलकीमुळे आणि माझ्याबद्दल वाटणाऱ्या काळजीमुळे दिला गेला होता हे मला माहीत आहे पण असा सल्ला मुलाला दिला गेला नसता! माझी स्वतःची उदाहरणे सोडून इतरत्र पाहिले तर नवराबायको दोघे नोकरी करत असताना काही कारणाने एकाने नोकरी सोडावी असा प्रसंग आला तर बायकोच नोकरी सोडते. नवरा घर सांभाळतोय आणि बायको नोकरी करतेय हे चित्र स्वीकारणे आपल्या समाजाला कठीण जाते.

महिला शास्त्रज्ञांच्या संदर्भातील आणखी एक प्रश्न. तरुण विवाहित आणि लेकुरवाळ्या महिला शास्त्रज्ञांची मुलांचे संगोपन आणि संशोधन हे करताना होणारी तारेवरची कसरत आपण पाहतोच. अशा महिलांसाठी काही वर्षे तरी पार्ट टाईम नोकऱ्या असाव्यात ज्यायोगे महिलांना मुलांचे संगोपनही करता येईल आणि त्या आपल्या संशोधन विषयाच्या संपर्कातही राहतील, अशी एक सूचना काही वर्षांपूर्वी आली होती. तुम्हाला याबद्दल काय वाटते? सरकारने याबाबतीत काही पावले उचलली आहेत का?

हल्ली ह्या विषयाची खूपच चर्चा होत आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने ह्यासाठी DST National Taskforce For Women ची स्थापना केली आहे. ह्याच्या अंतर्गत ज्या महिलांच्या संशोधन कार्यात खंड पडला असेल त्यांना पुन्हा संशोधन सुरू करता यावे यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पार्ट टाईम नोकऱ्या सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे. हे सर्व ठीक आहे. पण संशोधनाच्या क्षेत्रात आपले बस्तान बसवण्याचा काळ आणि मुले होण्याचा काळ हा एकच असतो. त्या काळात कामात खंड पडला तर ते करीयरच्या दृष्टीने नुकसानकारकच असते. म्हणून संशोधनसंस्थेजवळच महिलांना राहण्याची जागा देणे, पाळणाघरांची सोय करणे हे व्हायला पाहिजे. तसेच लोकांची मानसिकताही थोडी बदलायला पाहिजे. मुलांचे संगोपन ही फक्त आईचीच नाही तर आई आणि वडील ह्या दोघांची जबाबदारी आहे हे मान्य करायला पाहिजे आणि ते आचरणातही आणायला पाहिजे. असे झाले तर संशोधनकार्यात खंड पडण्याची शक्यताही खूप कमी होईल.