प्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद

अंकसमिती

(पृष्ठ २)

८. ब्रिटिश इंग्रजीमध्ये उच्चारानुसार स्पेलिंगमध्ये बदल करून अमेरिकेने ते स्वीकारले आहेत. एवढेच नाही तर काही शब्दांच्या अर्थातही फरक पडला आहे. उदाहरणार्थ 'मोमेंटरीली' हा शब्द. ह्या शब्दाचा मूळ इंग्रजी अर्थ 'थोड्या वेळासाठी', मात्र अमेरिकेत हा शब्द 'थोड्याच वेळात' ह्या अर्थी वापरला जातो. विमान थोड्याच वेळात उतरेल ही सूचना विमानातील प्रवाश्यांना 'we will be landing momentarily' अशी दिली जाते. मराठी-हिंदी मध्येही सारख्या उच्चारांचे परंतु भिन्न अर्थांचे शब्द आहेत, उदाहरणार्थ 'संभावना'. आता संभावनाचा हिंदी अर्थ हाच मराठी अर्थ असे समजणारी मराठी माणसे विशेषत: तरूण पिढीत कमी नसावीत. तेव्हा हिंदी अर्थ जास्त प्रचलित झाल्यामुळे मराठी संभावनाचा अर्थ हिंदीतील संभावनाप्रमाणेच करावा का? हिंदी आणि मराठीत असलेल्या भिन्न अर्थी इतर शब्दांबद्दलही असे करावे का?

मराठी भाषेने काही शब्द फारसीतून घेतले. काही संस्कृतमधून. भारतातील इतर भाषातही असेच बदल झाले आहेत. पण या शब्दांचे अर्थ प्रत्येक भाषेने वेगवेगळे अनुकूल करून घेतले आहेत. त्या अर्थांपैकी ज्याचा वापर, प्रचार जास्त झाला ते शब्द त्या अर्थाने त्या त्या विशिष्ट भाषेत रूळले. तेव्हा एखाद्या शब्दाचा जो अर्थ अधिक वापरात असेल तो घ्यावा. काही शब्दांचे अर्थ हिंदी आणि मराठीत अतिशय भिन्न आहेत. त्यांचा गोंधळ होवू नये. लिखाण करतांना कोणाकरता लिहायचे, उद्देश काय आहे ते ध्यानात ठेवून लेखन केले तर असा गोंधळ टाळता येईल. पुन्हा येथे भाषेच्या वापराविषयी जागृत असण्याचा मुद्दा येतोच.

९. हल्ली बोली मराठीत लेखन करण्याची पद्धत फार मोठ्या प्रमाणात सर्वत्र आढळते. केवळ कथा, कथेतील संवाद, अनुभव कथन एवढेच नाही, तर वैचारिक लेखांमध्येही आणि तेही अंतर्नादसारख्या दर्जेदार मासिकांमध्येही असे बोलीभाषेतील लेखन सापडते. केलं, झालं, विचारलं असे शब्दच नाहीत तर समजलंय का? विचारतोय, विचारतेय अशी रचनाही सर्रास आढळते. अशा रचनेबद्दल तुमचे काय मत आहे? बोली भाषेतील रचना संवादांमध्ये योग्य वाटली तरी इतर लेखनामध्ये, विशेषत: वैचारिक लेखांमध्ये असणे तुम्हाला योग्य वाटते का? केलं, झालं ह्या रचनेला चुकीचेही म्हणता येत नाही.

भाषा बदलते आहे, ती प्रवाही आहे यात शंका नाही. महाराष्ट्रात राहणारे आणि महाराष्ट्राबाहेर वावरणारे असे दोन गट मराठी लिहितात. मी आधी उल्लेख केलाच आहे की प्रत्येकाला कमीत कमी तीन भाषा येतात. सभोवतालच्या वातावरणाचा, संस्कृतीचा भाषेवर सतत परिंणाम होत असतो आणि तो टाळता येत नाही. हा बदल आता वैचारिक लेखनातही दिसणार आहे, दिसू लागला आहे असे म्हणू या. अतिरेक नसेल तर या बोलीभाषेच्या वापराविषयी फार तक्रार करू नये असे माझे मत आहे. श्री. अर्जुनवाडकर यांनी सुद्धा असेच म्हटले आहे. अशा लेखनाचे प्रमाण फार असेल तर हा संपादकांचा वैयक्तिक निर्णय आहे तो त्यांनी घ्यावा असे मी म्हणेन.
अनेक वेळा प्रमाणभाषा, ललित लेखनातील भाषा वा बोलीभाषांचा वापर कसा करावा हे शिकवले जात नाही. प्रदेशानुसार संवादात वापरात असलेली बोलीभाषा वेगवेगळी असू शकते. निवेदनातली भाषाशैली वेगळी आहे. तसेच समीक्षेची वा प्रबंधाची भाषा मात्र वेगळी आहे. आपण करत असलेले वैचारिक लेखन, ग्रांथिक लेखन हे भविष्यात संदर्भ म्हणून वापरले जाऊ शकते याची जाणीव लेखकाने असू द्यावी. त्यात प्रमाणभाषा वापरावी. प्रमाणभाषा म्हणजे साडेतीन टक्के उच्चभ्रू समाजाची मराठी नाही; तर ती सर्वांना समजेल, सर्वांना समजावे, याकरता असणारी मराठी भाषा आहे हे ध्यानात असू द्यावे. ललित लेखनात संवाद लिहितांना कोकणी, वऱ्हाडी भाषा असली तरी जे लिहिले आहे त्याचा अर्थ वाचकांना समजणे महत्त्वाचे. प्रादेशिक वैशिष्ट्ये लेखनात आली तर भाषा अधिक समृद्ध होते. अर्थबोध होईल अशारितीने असे प्रादेशिक शब्द, प्रादेशिक वाक्यरचना ललित लेखनात, निवेदनात जरूर वापरावी. एकाच नियतकालिकाच्या प्रदेशानुसार निघणार्‍या आवृत्तीत वाक्यरचना, शब्द यांच्या वापरात बदल आढळतो. हे वैशिष्ट्यच म्हणायचे. भाषेचा मूळ उद्देश संवाद साधणे हा आहे. माहिती समजणे महत्त्वाचे आहे. लोकांच्या मनात मराठीच्या वापराविषयी जागृती जशी वाढेल तसे हे सर्व प्रश्न सुटतील असे मला वाटते.

प्रा. प्र. ना. परांजपे यांनी आपला बहुमूल्य वेळ ह्या मुलाखतीसाठी दिला आणि मराठी भाषा आणि शुद्धलेखनविषयक अनेक मुद्यांवर आपले विचार सांगितले ह्याबद्दल अंकसमिती आणि मनोगतींतर्फे त्यांचे मन:पूर्वक आभार.