सपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या

यमाजी मालकर
 
"अक्षर ही निसर्गाने मानवाला दिलेली कल्पना बायनरीतून यशस्वीपणे कशी पेलायची, हे इंग्रजीला एका विवक्षित पातळीनंतर झेपणार नाही. जगाला 'अक्षर' ही कल्पना मराठीच देऊ शकेल. त्यामुळे संगणकीय क्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकेल. मराठी भाषा अस्तंगत झाली तर जगाला पुढील शतकात शास्त्रीय भाषा शोधताना मराठीचे पुन्हा उत्खनन करावे लागेल."
 

मराठी भाषेचे अभ्यासक शुभानन गांगल यांच्या "मराठी भाषाविज्ञान, ध्वनी ते अक्षरनिर्मिती' या अतिशय शास्त्रीय पुस्तकातील हे वाक्‍य वाचले, तेव्हा मी अचंबित झालो. श्री. गांगल यांची आणि माझी भेट डिसेंबर २००७ मध्ये झाली. 'सकाळ'च्या २००८ मधील बदलाचे नियोजन त्या वेळी सुरू होते. नव्या प्रश्‍नाची नवी उत्तरे दिली पाहिजेत आणि त्याची सुरवात आपणच केली पाहिजे, या विचाराने 'उकल' नावाचे सदर या वर्षात सुरू करण्याचा निर्णय मी घेतला होता. असे अनेक विषय समोर आले होते, मात्र ते सर्व बाजूला ठेवून मी श्री.गांगल यांच्याशी बोललो. कार्यालयातच दोन दिवसांत आम्ही आठ तास बोलत होतो. मराठी भाषेच्या शास्त्रीय रचनेविषयी समजून घेत होतो. एक जानेवारीच्या 'सकाळ'मध्ये 'मराठीचे चपखल प्रमाणीकरण' असा लेख 'उकल' सदरात प्रसिद्धही झाला. श्री. गांगल यांच्या प्रयत्नांना त्यानंतर बरीच गती मिळाली, असे त्यानंतरच्या त्यांच्या भटकंतीवरून लक्षात आले. अर्थात आजचा विषय हा केवळ मराठी भाषा किती श्रेष्ठ आहे किंवा शास्त्रीय आहे, याशी संबंधित नाही. नव्या माध्यमांमध्ये ती कशी वापरली जाऊ शकते आणि त्या संदर्भातील कोणती आव्हाने आपल्यासमोर आहेत, याविषयी आपल्याला संवाद साधायचा आहे. मराठीच्या भवितव्याविषयी जी चर्चा वर्षानुवर्षे केली जाते, त्याविषयीचे काही पैलू समजून घेतले पाहिजेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा पैलू आहे तो मराठी भाषेचे अभिजन वर्गाने केलेले खच्चीकरण. केवळ मातृभाषाच नव्हे, तर भारतीय जीवनपद्धतीचेही या वर्गाने खच्चीकरण केले आहे. त्याचा परिणाम असा झाला, की मराठीतील अर्थव्यवहार रोडावत गेला. दहा कोटी लोकांची भाषा म्हणून मराठी ओळखली जात असतानाही दैनंदिन व्यवहारातून ती बाजूला पडते आहे, असे गेली काही वर्षे लक्षात येते आहे. समाजाची समृद्धी ही केवळ ऐहिक समृद्धी असून चालत नाही. ती समृद्धी अंतिमतः सांस्कृतिक समृद्धीकडे वळवावी लागते. तशी ती वळली नाही तर तो समाज आपली सांस्कृतिक ओळख विसरून जातो. मराठी समाजामध्ये या संदर्भात सध्या काय चाललेले आहे, याविषयी जाणकारांना बोलावे लागेल, असे मला वाटते. मराठीची आणि मराठी समाजाची जी सांस्कृतिक ओळख आहे, ती आगामी पाच-दहा वर्षांत हा समाज अधोरेखित करू शकला नाही तर तो समाज एकसंध होऊ शकतो, यावर मराठी समाजाचा विश्‍वास राहणार नाही. ती वेळ येऊ नये, यासाठी सध्याच्या ऐहिक समृद्धीचा योग्य वापर करून अभिजन वर्गालाच पुढाकार घ्यावा लागेल. ज्या भाषेच्या अंगाखांद्यावर आपण मोठे झालो, जी आपली ओळख आहे आणि जिचा अभिमान आहे, असे आपण म्हणतो- ते सर्व व्यवहारात उतरवावे लागेल. हे सर्व करण्यासाठी मराठीभाषेच्या प्रमाणीकरणाचे मोठे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. सुदैवाने ज्यांनी ही गरज ओळखली, अशी शुभानन गांगल, लेखक रवींद्र कृष्ण देसाई (पुणे) यांच्यासारखी माणसे त्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना बळ देण्याची आणि शक्‍य असेल तेथे त्यात सहभागी होण्याची तयारी करावी लागेल.

माझ्या मनात नेहमी असा विचार येतो, की पोटापाण्याच्या प्रश्‍नांतून बाहेर पडू न शकलेल्या समाजाच्या सांस्कृतिक समृद्धीची काळजी खरोखरच कोणी घेऊ शकणार आहे काय? या प्रश्‍नाचे उत्तर या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सरकार देऊ शकेल काय? खरोखरच अभिजन वर्गाला या प्रश्‍नाविषयी प्रेम आहे काय?... असे अनेक प्रश्‍न मनात येतात; आणि आज तरी त्याची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. ती मिळण्यासाठी मराठी समाजाला व्यापून टाकणार्‍या धोरणाची गरज आहे. त्यासाठी हा समाज किमान समान कार्यक्रमांवर संघटित करावा लागेल. निवडणुकीत कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर जसे परस्परविरोधी विचाराचे पक्षही किमान समान कार्यक्रम ठरवून एकत्र येतात, तसे मराठी समाजातील विविध घटकांना करावे लागेल, असे मला वाटते. या संदर्भातील सध्याच्या काळातील एकच उदाहरण या ठिकाणी देतो, म्हणजे हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. संगणकाच्या पडद्यावर मराठी भाषा मागे का पडते, याचा अभ्यास लेखक रवींद्र देसाई यांनी केला आणि सरकार, तसेच जाणकार मराठी समाजाला एक प्रश्‍न विचारला, तो असा : इंग्रजीप्रमाणे एकच की बोर्ड ले-आऊट सर्व सॉफ्टवेअर कंपन्यांना वापरायला भाग पाडणे, हे संगणकाच्या मराठी वापराबाबत सयुक्तिक नाही का? या प्रश्‍नाचे उत्तर सरकार आणि मराठी समाज किती प्रामाणिकपणे देणार, यावर संगणकासाठी मराठी भविष्यात आपण किती वापरणार, हे अवलंबून आहे.

हा प्रश्‍न येथे यासाठी उपस्थित केला, की त्यावर मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर, माध्यमांतील वापर आणि नवे जग आपण कसे समजून घेणार आहोत, हे अवलंबून आहे. आमची सांस्कृतिक - सामाजिक ओळखही अंतिमतः त्यावरच अवलंबून आहे. आणखी एका गोष्टीचा खुलासा येथे केला पाहिजे. केवळ मराठी समाजातच नव्हे, तर भारतातील सर्व प्रादेशिक समाजांमध्ये जागतिकीकरणामुळे गुंतागुंतीचे प्रश्‍न निर्माण होत आहेत. त्यातील अनेक प्रश्‍न हे अपरिहार्यच आहेत. मात्र त्याविषयीचा साकल्याने विचार होणार नसेल, तर त्याच्यासारखी धोकादायक गोष्ट दुसरी नाही. याचा अर्थ असा, की आमच्या समाजामध्ये इतके स्तर वाढत चालले आहेत, की तो समाज, समाजसमूह एकत्र येण्याचे प्रमाण कमी होते आहे; किंवा तो त्याच समूहाचे विघटन करण्यासाठी एकत्र येताना दिसतो आहे. त्यामुळे समूहांचे आकार रोडावत चालले आहेत. हे आकार असेच रोडावत गेले तर जागतिकीकरणाच्या माध्यमातून जे सपाटीकरण सुरू आहे, ते या सर्व समूहांचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा वेळी भाषा हा फार कमी महत्त्वाचा मुद्दा असेल. व्यावसायिक हितसंबंधच महत्त्वाचे ठरतील आणि त्यासाठी वाटेल त्या तडजोडी करायला ते समूह मागेपुढे पाहणार नाहीत. असे व्हायचे नसेल तर मराठी समाजाचे विघटन रोखावे लागेल. ते रोखण्याचा मार्ग आहे, त्याला त्याच्या अस्मितांची चांगल्या अर्थाने जाणीव करून देणे. त्यासाठी किमान समान कार्यक्रम त्याच्या हाती देणे आणि हा कार्यक्रम या समाजातील सर्व घटक मान्य करतील असा एकोपा प्रस्थापित करणे. कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी जसे साधनसंपत्तीचे न्याय्य वाटप मान्य करावे लागते, तसेच हे आहे. सर्वांना सामावून घ्यायचे असेल तर सर्वांना एकमेकांविषयी प्रेम तर वाटायलाच हवे. समाजाची साधनसंपत्ती वाढवीत राहिली पाहिजे, या आधुनिक मंत्राला तर पर्यायच नाही. मात्र ती वाढविताना आपण आपल्या 'आईवडिलांना'च विसरत नाही ना, याचे भान ठेवावे लागेल. सांस्कृतिक समृद्धी आणि भावनिक ऐक्‍याचा मुद्दा ज्यांना पटला आहे, अशी माणसे आजही काम करत आहेत. मात्र सपाटीकरण रोखण्यासाठी ते पुरेसे नाही. आधुनिक काळाच्या गरजा भागविण्यासाठी मराठीच्या हातात ती सर्व शस्त्रे ज्या दिवशी येतील, तो मराठी समाजाचा खरा सुदिन.

यमाजी मालकर

ज्येष्ठ पत्रकार यमाजी बाळाजी मालकर हे जुलै २००५ पासून "सकाळ' पुणे आवृत्तीचे संपादक आहेत. पत्रकारितेत २४ वर्षे कार्यरत असणाऱ्या मालकरांचा अनुभव थोडक्यात असा सांगता येईल. १९८४ पासून "मराठवाडा' दैनिकातून पत्रकारितेस प्रारंभ, शेती, ग्राम सुधारणेविषयी "तांबडं फुटतंय' (सकाळ-पुणे) या सदरात आदर्श गावांतील सामूहिक प्रयत्नांची दखल, ताज्या घडामोडींवर "आज काल' (सकाळ -औरंगाबाद) तर २००६-०७ मध्ये प्रसिद्ध "डेट लाईन' स्तंभातून लेखन. "सफर युरोपची' ही वृत्तमालिका "सकाळ'मध्ये प्रसिद्ध (१९९९) नव्या प्रश्‍नांची नवी उत्तरे सांगणारे "उकल' पाक्षिक सदराचे २००८ मध्ये लेखन. "सकाळ'औरंगाबादचे कार्यकारी संपादक. "जागर'मधून पुण्याच्या प्रश्नांविषयी नियमित लेखन.  मालकर यांची आजवर तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. उद्योगपती करमचंद थापर यांच्या इंग्रजीतील चरित्राचा मराठीत अनुवाद, "यशकथा मराठवाड्याच्या' या पुस्तकाचे संपादन, आणि "डेटलाईन' लेखसंग्रह. पाणी, पर्यावरण, ऊर्जा विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. मराठवाड्यात शेती आणि नागरी वस्तीत जलफेरभरणावर जनजागरणात सहभाग ", 'माझे पुणे-स्वच्छ पुणे' मोहिमेला 'सकाळ' मार्फत चालना, जर्मनीत मे २००० मध्ये झालेल्या "द्रयुपा' या आंतरराष्ट्रीय मुद्रणविषयक प्रदर्शनात "सकाळ'तर्फे सहभाग, त्यानिमित्त युरोप दौरा. "ग्लोबल वार्मिंग' विषयक संयुक्त राष्ट्रसंघाच्या सिंगापूर येथील (मे २००७) कार्यशाळेत सहभाग ही काही ठळक उदाहरणे.  कामगारविषयक सतत तीन वर्षांच्या लिखाणाबद्दल पुणे जिल्हा पत्रकार संघ व पूना इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे पुरस्कार तसेच कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार. अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन त्यांनी मराठी भाषाविषयक आपले मनोगत दिवाळी अंकामध्ये व्यक्त केले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.