सावल्यांच्या मीलनाची रात्र...!

प्रदीप कुलकर्णी

saavalee
धुंद डोळ्यांचे निमंत्रण मी कुठे स्वीकारले ?
बोलक्या मौनातले क्षण मी कुठे स्वीकारले ?

यौवनाच्या केवड्याचे पान जे आले पुढे...
चंदनी जो देह, त्याचे दान जे आले पुढे...
सर्व हे आले पुढे पण...मी कुठे स्वीकारले ?

लाट ती उन्मत्त नाही पेलता आली मला
त्या मिठीची वीज नाही झेलता आली मला
तप्त श्वासांचे नभांगण...मी कुठे स्वीकारले ?

देह एखाद्या सतारीसारखा झाला जरी
तो गुलाबी हात गोरा भोवती आला जरी
सूर स्पर्शांचे विलक्षण मी कुठे स्वीकारले ?

सावल्यांच्या मीलनाची रात्र ती होती जणू...
पेटले नाहीत का पेटूनही माझे अणू ?
ते असोशीचे तुझेपण मी कुठे स्वीकारले ?

हे न माझे, हे न माझे, वाटले मज सारखे !
देह देहाला, मनाला आणि मनही पारखे !

paNatee