कास पुष्पमहोत्सव

पृष्ठ क्रमांक

छाया राजे

कंदी पेढ्यांसाठी प्रसिद्ध असलेले सातारा शहर आता कासच्या पुष्पपठारामुळे पुन्हा एकदा पर्यटकांच्या यादीत ठळक झाले आहे. पावसाची सुरुवात झाली की थोड्याच दिवसात रंगीबेरंगी चिमुकल्या फुलांनी गच्च भरून जाणार्‍या कासच्या पुष्पपठाराने सातारा शहराला एक नवी ओळख दिली आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर आता देशभरातील पर्यटक, निसर्गप्रेमी, छायाचित्रकार तिकडे आपला मोर्चा वळवू लागले आहेत.

पुष्पपर्यटन
कासपठारावरील पुष्पपर्यटन

प्रसारमाध्यमांमुळे कास पुष्पपठाराची महती आणि माहिती सर्वतोमुखी झाली आणि लवकरच हे पठार आपल्या निसर्गचमत्काराने जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेईल अशी चिन्हे दिसू लागली. जूनमध्ये पावसाच्या सुरुवातीनंतर ते साधारण पावसाळा संपल्यावर काही काळपर्यंत हे फुलांनी बहरून गेलेले पठार पहायला मिळते. सप्टेंबरच्या अखेरीस बहर ओसरायला लागल्याच्या बातम्याही येत होत्या. त्यामुळे ऑक्टोबरचा कडक उन्हाळा सुरू झाल्यावर 'हा पुष्पसोहळा पहायला मिळेल की नाही?' अशी शंका मनाशी बाळगतच तिकडे पावले वळवली.

कासचे पुष्पपठार महाराष्ट्रातील सातारा शहरापासून अवघ्या २८ कि.मी. अंतरावर आहे. सातारा शहरातूनच कास पठाराकडे जाण्याचा रस्ता आहे. पण रस्ता थोडा अरुंद व चढाचा असल्यामुळे द्रुतगती महामार्गावरची गती येथे कामी येत नाही. कदाचित निसर्गाच्या चमत्काराकडे जाताना जरा अदबीने शांत-संथ लयीत जाणेच अपेक्षित असावे! आदल्या दिवशी सातार्‍यात मुक्काम करून सकाळी सात-सव्वासातच्या दरम्यान पठारावर पोहोचणे उत्तम. दुपारपर्यंत फुलांच्या संगतीत मनसोक्त भटकून जेवणासाठी खाली सातार्‍यात परत येता येते. संपूर्ण दिवस तिथे घालवायचा असेल तर जेवणाचे डबे, पिण्याचे पाणी सोबत घेऊन पठारावर वनभोजनाचाही आनंद लुटता येईल, अर्थातच तिथल्या स्वच्छतेचे भान ठेवून.

गाड्यांची रीघ
गाड्यांची रीघ

कास पुष्पपठाराच्या नैसर्गिक चमत्काराने आठवण करून दिली ती 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' उर्फ 'फूलों की घाटी' ची (बहुधा याला मराठीत नाव देण्याची आपल्याला गरज भासली नाही). ही आठवण जागी होणे साहजिकच होते. पठारावर असंख्य फुले उमलतात म्हणजे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स सारखी का? ती दरी, आपले पठार. आठवण आणि तुलना होणे साहजिकच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही ठिकाणी असलेले पुष्पवैभवाचे साम्य. पण कास पुष्पपठार आपले वेगळेपण लेवून आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि कास पुष्पपठार ही दोन्ही ठिकाणे ज्यांनी पाहिली आहेत त्यांना पुष्पपठाराचे वेगळेपण सहज जाणवेल. दोन्हीकडच्या फुलांचे सौंदर्य, वैशिष्टये वेगवेगळी आहे. पण दोन्हीतून मिळणारी नैसर्गिक चमत्काराची अद्भुत अनुभूती आणि आनंद मात्र सारखाच.

कासचे पठार केवळ पुष्पसमृद्ध नाही, तर ते निसर्गसमृद्धदेखील आहे. इथे फुलांसोबतच दुर्मिळ वनौषधी, पाणवनस्पती, रंगीबेरंगी फुलपाखरे, वेगवेगळ्या आकारा-रंगांचे कीटक, पक्षी, साप, सरडे, खेकडे पहायला मिळतात. हेही निसर्गाचे सोबतीच ना! सार्‍यांचा मुक्त वावर आहे इथे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये मात्र फुलपाखरे पहायला मिळाल्याचे आठवत नाही. तिथे परागवहनाचे काम वाराच करत असावा.

कंदीलपुष्प
कंदीलपुष्प

कास पठारावरील फुले काही अपवाद वगळता आकाराने खूपच लहान आहेत. काही फुले इतकी छोटी आहेत की शोधक नजरेलाच त्यांचे अस्तित्व जाणवेल. काही फुलांच्या तुर्‍यांची टोके तर अगदी खसखशीचे दाणेच जणू. ही फुले खडकांवर तर अगदी चिमूटभर मातीच्या थरातून तरारली आहेत. एखाद्या भागात ज्या रंगाची फुले अधिक, तिथे त्या रंगाचे पठार! कास पठारावर डांबरी रस्त्याच्या उजव्या बाजूने महाबळेश्वरकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्याने साधारण तीन कि.मी. पुढे गेले की खडकाळ पठारावर एक तळे आहे. हे तळे पांढर्‍या रंगाच्या पाणफुलांनी पूर्ण आच्छादले आहे. या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे पाच किंवा सहा पाकळ्यांच्या या फुलाला नाजुक धाग्यांची झिरमिळ आहे. शुभ्र केसाळ कडांमुळे फुलाचा आकार अगदी मजेदार दिसतो. ह्या फुलांवर बागडणारे असंख्य भुंगे फुलांचा गोडवा सिद्ध करतात. पाने कमळासारखी असली तरी कमळ नसलेली ही फुले उमललेली पहायची असतील तर कास पठारावर दुपारच्या आत पोहोचले पाहिजे आणि तीन कि.मी. चालण्याचे श्रम घेतले पाहिजेत. अगदी आदल्या दिवसापर्यंत गाड्या थेट तळ्यापर्यंत जात असत, पण आता वाढती गर्दी पहाता पठारावर विशिष्ट अंतराच्या पुढे पर्यटकांच्या गाड्या न जाऊ देण्याचा नुकताच घेतलेला निर्णय आणि त्याची तात्काळ केलेली अंमलबजावणी योग्यच वाटली. त्यामुळे पर्यटकांना चालण्याचे थोडे श्रम होतात हे खरे पण तरी त्यानंतर जे पाहायला मिळते त्याने सर्व श्रमांचा विसर पडतो!

कुमुदिनी आणि भ्रमर
कुमुदिनी आणि भ्रमर

इथे रानफुलांच्या असंख्य जाती-उपजाती पहायला मिळतात. त्यांचा उमलण्याचा कालावधी वेगवेगळा असल्याने एकाच फेरीत सगळ्याच प्रकारची फुले पहायला मिळणे केवळ अशक्य. त्यासाठी कासच्या वाटेवर अनेकवेळा जाण्याची कास धरावी लागेल. या सर्वच फुलांची शास्त्रीय नावे जाणून घेणे हा एक अभ्यासाचा भाग आहे. ती लक्षात ठेवणेही तितके सोपे नाही. ही नेहमीची गुलाब, मोगरा, चाफा, शेवंती यांसारखी सर्वत्र आढळणारी फुले नाहीत. त्यामुळे ती आपल्या नित्य परिचयाची नाहीत. त्यांच्याशी परिचय करून घेणे एका भेटीत शक्य होणार नाही. पण पहिल्याच भेटीत ती आपल्याला आपलेसे नक्कीच करून घेतात. आपले रंगरूप आणि वेगळेपण आपल्या मनावर ठसवतात. त्यांच्या नावांमध्येही असाच वेगळेपणा आहे, त्यांच्या रंगारूपावरून, वैशिष्ट्यांवरून त्यांना दिलेली मराठी नावे गोड वाटतात. कंदिलपुष्प, हळुंदा, हिरसुटा, सीतेची आसवं, कारवी, तेरडा, जांभळ्या मंजिर्‍या, तुतारी, बर्का अशी मराठी नावे असलेल्या फुलांच्या जाती-उपजाती इथे पहायला मिळतात. त्यांच्या लक्षात ठेवायला अवघड अशा शास्त्रीय नावांपेक्षा मिकी माऊस सारखे दिसणारे पिवळे फूल, लाल तुरा असलेले फूल, छोट्या चेंडूंसारखे दिसणारे गेंद अशी त्यांची वर्णने करणारी नावे जास्त जवळची वाटतात. आणि नावे तरी कशाला? फुले ही तर पाहण्याची, पाहून आनंद घेण्याची गोष्ट. त्यामुळे शाब्दिक जंजाळात न अडकता कॅमेर्‍यात बंदिस्त करता आलेली फुले वाचकांसमोर ठेवणेच मला जास्त योग्य वाटते. त्यांची विविध रंगांची उधळण म्हणजे आनंदाचा अमूल्य ठेवा.