संपादकीय

अंकसमिती

नमस्कार रसिकहो,

महाराष्ट्रात गेल्या शे-दीडशे वर्षांमध्ये आकाशकंदील, अभ्यंगस्नान, फटाके, फराळ ह्यांबरोबरच दिवाळीची नाळ दिवाळी अंकांशी जुळली आहे. सृजनशील आणि सिद्धहस्त अशा सरस्वतीच्या उपासकांकडून मिळणारी प्रतिभेची आतषबाजी आणि नवरसांनी तुडुंब भरलेला साहित्यिक फराळ ही ह्या दिवाळी अंकांची वैशिष्ट्ये असतात. मासिके, त्रैमासिके, नियतकालिके, अनियतकालिके आणि आंतरजालावरील संकेतस्थळे दिवाळी विशेषांक काढतात. मनोगतही ह्या परंपरेमध्ये सामील होते. ह्यावर्षी मनोगताचा पाचवा दिवाळी अंक वाचकांच्या हाती सुपूर्त करताना अंकसमितीस आनंद होत आहे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याच्या आवाहनास प्रतिसाद देत आपले दर्जेदार लेखन दिवाळी अंकाकरता पाठविणार्‍यांची अंकसमिती आभारी आहे. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत ह्या वर्षी अंकाला भरघोस प्रतिसाद मिळाला नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. मनोगतावर फार सक्रिय नसलेल्या काही जुन्या सदस्यांनी अंकासाठी आवर्जून लेखन पाठविले. मनोगतावर सक्रिय असलेल्या नवीन सदस्यांकडून मात्र पुरेश्या प्रमाणात लेखन मिळाले नाही ह्याची खंत वाटते. दिवाळी अंकासाठी आलेल्या साहित्याचे संपादन करताना संपादक मंडळाला खूप काही शिकण्यास मिळते. भाषेच्या विविध पैलूंचे, मांडणीचे, विविध प्रकारच्या साहित्यांचे, शैलींचे अवलोकन करताना काय असावे सोबतच काय असू नये ह्याबद्दलही जाणिवा मनांमध्ये खुणा करतात. मनोगताने मराठीच्या आग्रहास व योग्य वापरास नेहमीच महत्त्व दिले आहे आणि मराठीच्या संवर्धनास हातभार लावला आहे. मनोगताचा 'शुद्धिचिकित्सक' ही मनोगताने आंतरजालीय मराठीला दिलेली देणगी आहे.

भाषा दर बारा कोसांवर बदलते असे म्हणतात. खरे तर बदलते ती बोली, भाषा तरीही मराठीच असते. मराठी भाषेमध्ये अशा अनेक बोलींचा अंतर्भाव आहे. अनेक बोलींचे मिश्रण मराठीमध्ये असल्यामुळे प्रमाण भाषेबद्दलच्या चर्चा सर्व माध्यमांमधून आणि संकेतस्थळांवरही झडत असतात. इंग्रजांच्या काळात मेजर कॅन्डीने सदाशिव पेठेतील ब्राह्मणांच्या बोलीला प्रमाण मराठी मानण्याचा प्रस्ताव मांडला. तेव्हापासून ती बोली ही प्रमाण बोली ठरली असली, तरी त्यामुळे ती इतर बोलींपेक्षा वरचढ आहे असा त्याचा अर्थ होत नाही. एखादी व्यक्ती मराठी जाणते ह्याचा अर्थ तिला मराठीच्या सर्व बोलींतील सर्व शब्द समजतील असे नाही. म्हणूनच लेखनासाठी प्रमाण भाषेचे महत्त्व आहे. शालेय शिक्षण प्रमाण बोलीमध्ये होणे आवश्यक असते ते ह्याच कारणासाठी. लेखन करताना ह्या प्रमाण बोलीचा वापर केला की त्यातील आशय बहुतेकांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. प्रमाण भाषा आणि शुद्ध भाषा ह्यात नेहमी गोंधळ केला जातो. प्रमाण बोली ही शुद्ध आणि बाकीच्या बोली अशुद्ध असे मानणे चूक आहे. कोणतीही बोली अशुद्ध नसते, मात्र ती अप्रमाण असू शकते. प्रमाण बोलीसाठी लेखननियम निश्चित केलेले असतात. प्रमाण बोलीमध्ये शब्दांतील र्‍हस्व-दीर्घ अक्षरांविषयी, शब्द आणि क्रियापदांच्या रूपांविषयी, वाक्यरचनेच्या साच्याविषयी, तज्ज्ञांनी मान्यता दिलेले ठोकताळे असतात. हे नियम पाळून उत्तमोत्तम साहित्यरचना करता येतात हे आजवर अनेक लेखक-लेखिकांनी, कवि-कवयित्रींनी सिद्ध केलेच आहे.

मराठीमध्ये शब्द आणि क्रियापदांची बोली आणि लेखी रूपे आढळतात. त्या रूपांना 'बोली' आणि 'लेखी' म्हणण्यामध्येच त्यांचा वापर कुठे करावा हे सूचित होत असते. केलं, झालं, असं, ही बोली तर केले, झाले, असे, ही लेखी वा ग्रांथिक भाषा. लिहिताना बोली रूपे वापरणे नियमाविरुद्ध आहेच, शिवाय ते भाषेचा र्‍हास करणारेही आहे. लेखनातील संवादांमध्ये शब्दांची बोली रूपे शोभून दिसत असली तरी संवादेतर वाक्यांमध्ये शब्द-क्रियापदांची लेखी रूपे वापरावीत असे नियम सांगतो. मात्र आजकाल सर्वत्र बोली रूपे वापरण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. वर्तमानपत्रांमधून, पुस्तकांतून, मासिकांमधून अशा बोली रूपे वापरून लिहिलेल्या कथा आणि लेखांचा सुळसुळाट दिसतो. अनेक लेखकांना बोली रूपे वापरून लिहिणे हा त्यांच्या शैलीचाच भाग आहे असे वाटते आणि त्यामुळे त्यात बदल करण्याची त्यांची इच्छा व तयारी नसते. ह्याच कारणास्तव सदर अंकातही बोली रुपे वापरून लिहिलेल्या कथांचा समावेश असला तरी अंकसमितीची भूमिका बोली रुपांना प्राधान्य देणारी नाही हे ह्या निमित्ताने नमूद करीत आहोत. बोली रूपे लिहिण्यामध्ये एकवाक्यता आढळत नाही. ’मी बघत आहे.’ हे वाक्य; ’मी बघत्ये.’, ’मी बघतीये.’, ’मी बघतेय.’, ’मी बघते आहे.’ अशा विविध प्रकारे लिहिले जाते. तेव्हा लेखन करताना ते प्रमाण भाषेत ’मी बघत आहे.’ असे लिहिणे हे योग्य ठरावे. हल्ली कथा आणि ललित लेख तर सोडाच, पण वैचारिक लेखही बोली रूपे योजून लिहिलेले आढळतात आणि वाचताना ते शब्द सतत खटकत राहतात. असे बोली भाषेतील वैचारिक लेख ’अंतर्नाद’सारख्या दर्जेदार मासिकांमधून त्यांचे रुपांतर न करता छापले जातात ह्याचे आश्चर्य वाटते. हाही आजच्या 'चालायचंच!' संस्कृतीचा आविष्कार.

हल्ली वर्तमानपत्रांकडे नजर टाकताच डोळ्यांना खुपतो तो परभाषिक शब्दांचा वाढता वापर. वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमधील सदरांची नावे इंग्रजी वा हिंदी असतात. तेव्हा त्या सदरांमधील लेखनांमध्ये इंग्रजीचा अनावश्यक वापर असणार हे उघड आहे. महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता यांसारखी अग्रगण्य वर्तमानपत्रेही ह्याला अपवाद नाहीत. अगदी साध्या शब्दांसाठीही इंग्रजीचा आधार घेण्याची वृत्ती हल्ली फार बळावली आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अर्थातच, लिहितानाही त्यामुळे लेखकाला आधी सुचतो तो इंग्रजी शब्द. नाच वा नृत्य लिहिण्याऐवजी डान्स, दार-दरवाजा लिहिण्याऐवजी गेट वा डोअर, दिव्याऐवजी लाईट, स्वयंपाकघरा ऐवजी किचन - अशाप्रकारे शब्द योजून आपण नक्की काय साधतो? ज्या वस्तू, क्रिया वा संकल्पना मुळात आपल्याकडील नाहीत अशांसाठी इंग्रजी शब्दांचा वापर (आणि तोही शक्यतो त्या शब्दाला मराठी विभक्तीप्रत्यय लावून- उदाहरणार्थ पेनाने, टेबलावर, बॅंकेत वगैरे) अर्थातच मान्य करायला हवा. मात्र ज्या वस्तू, क्रिया आणि संकल्पनांसाठी आपल्याकडे पूर्वापार चालत आलेले शब्द आहेत, अशा असंख्य शब्दांसाठी आपल्या भाषेतले शब्द आपल्याला सर्वप्रथम का सुचू नयेत? इंग्रजीच्या वापराचे प्रमाण केवळ शब्दांपुरते मर्यादित नसते, तर काही कथांमधून (त्याही स्वतंत्र कथा, अनुवाद नव्हेत) संवादांतील पूर्ण वा अर्धी वाक्ये इंग्रजीत लिहिलेली सापडतात. केवळ देवनागरीमध्ये इंग्रजी शब्द लिहिला म्हणजे तो मराठी होत नाही. प्रसिद्ध लेखक ह. मो. मराठे यांच्या कित्येक कादंबऱ्या मराठी आहेत की देवनागरी लिपीतल्या इंग्रजीत आहेत असा प्रश्न पडतो. हाच प्रश्न हल्ली मासिकांमधून छापल्या जाण्यार्‍या कथांबाबतही पडतो. मराठीत लिहिले म्हणजे बोजड वाटते आणि इंग्रजी शब्दांच्या वापराने लेखन आधुनिक वाटते हा गैरसमज लेखकांनी मनांतून काढून टाकावा. आपल्या बोलीचे आपण धेडगुजरीकरण केले असल्यामुळे अर्थातच आपले लेखनही तसेच धेडगुजरी होत आहे. अशाने आपण एकच गोष्ट साध्य करतो, आणि ती म्हणजे आपल्या भाषेचा र्‍हास. अगदी साध्यासुध्या, रोजच्या वापरातील शब्दांसाठीही आपल्याला इंग्रजीचा आधार घ्यावा लागावा ही आपली शोककथा झाली आहे. कथेतील पात्रांचे योग्य चित्र त्या पात्रांच्या तोंडी असलेल्या संवादांबरोबरच त्या पात्रांच्या वर्णनांमधून व्यक्त करण्यामध्ये लेखकाचे यश असते.

मराठीवर केवळ इंग्रजीचेच आक्रमण होत नाही, तर ते इतर भाषांचेही होत असते. इतर भाषांतील आपल्याकडे नसलेल्या गोष्टींसाठीचे शब्द आपल्या भाषेत सामावून घेण्याने भाषा प्रवाही राहते. भाषा ही प्रवाही असावी, तिच्या साचलेपणा नको हे खरेच. शंभर वर्षांपूर्वीची मराठी आजच्यापेक्षा वेगळी होती. मराठी भाषेचा इतिहास बघता सुरूवातीला महानुभावांची प्राकृताशी साम्य असणारी भाषा होती. ज्ञानेश्वरांनी संस्कृत - प्राकृताच्या संगमातून वेगळी मराठी घडवली. मुसलमानी आक्रमणामुळे त्यात अरबी - फारसी शब्द आले आणि ते इतके रुळले की ते परकीय आहेत हेच आता जाणवत नाही. उदाहरणार्थ वजन, खर्च, जमा, बाजार, बाग, कायदा वगैरे. पुढे संत एकनाथ- पंडित कवी - सावरकर यांच्यामुळे संस्कृतनिष्ठ मराठी वापरली जाऊ लागली. म्हणजे मराठी भाषेच्या घडणीत इतर अनेक भाषांचा मिलाफ आहे. मात्र हा मिलाफ शब्दांपर्यंत मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. शब्दांची विभक्ती रूपे आणि त्यांचा वाक्यातील उपयोग हा मराठीच्या वळणाने करण्याचा कटाक्ष आपण पाळला पाहिजे. त्याने 'माझी मदत' करण्याऐवजी 'मला मदत' केली जाईल. एखादी गोष्ट माझ्यावर 'थोपवली' जाण्याऐवजी 'लादली' जाईल आणि त्याने भाषेचा र्‍हास मात्र 'थोपवता' येईल. मराठी कार्यक्रमांना त्याने 'दर्शकां'ऐवजी 'प्रेक्षक' लाभतील. हिंदीचे अनुकरण हे कदाचित जाणीवपूर्वक होत नसेलही, पण ते होत आहे असे लक्षात येताच ते जाणीवपूर्वक थांबवले मात्र पाहिजे.

आंतरजालावर मराठीमध्ये लेखन सहज झाल्यापासून मोठ्या प्रमाणात लोक लिहिते झाले आहेत. वर्तमानपत्रांच्या ई-आवृत्त्या, जालनिश्या, संस्केतस्थळे ह्यांवर विपुल प्रमाणात लेखन होत असते. ज्याला लिहावेसे वाटेल तो आणि त्याला जे लिहावेसे वाटेल ते, मनात येताच संगणकावरून जालावर उतरवता येते. जालीय लेखनाला वाचकवर्गही मोठ्या प्रमाणात लाभला आहे. मात्र लेखनाचे आणि लेखन करणार्‍यांचे प्रमाण वाढले असले तरी लेखनाचा दर्जा मात्र दुर्दैवाने वाढलेला आढळत नाही. अनेक जालनिश्यांवर, वर्तमानपत्रांमध्ये आणि संकेतस्थळांवर अशुद्धलेखन मोठ्या प्रमाणात आढळते. ह्याची महत्त्वाची कारणे म्हणजे भाषेच्या सुयोग्य वापर करण्याबाबतीतील जाणीवेचा अभाव व त्याबद्दल असलेली अनास्था. असे लिहिणार्‍या इतरांचे हात आपल्याला थांबवता आले नाहीत, तरी किमान आपल्या हातून शुद्ध आणि दर्जेदार लेखन व्हावे असा आग्रह धरणे आपल्याला शक्य व्हावे.

ह्यावर्षीच्या दिवाळीचे स्वागत करतानाच आपण आपल्या मनांमध्ये मराठीच्या योग्य वापराचा आग्रह धरू आणि मराठीच्या संवर्धनाचा संकल्प सोडू.

अंकसमितीतर्फे सर्वांना दिवाळीच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !