मत्सर

संध्याकाळी ७ वाजता आशिष कसाबसा घरी पोहोचला. आजचा दिवस तसा फारच गडबडीचा होता. सकाळपासून घरी फोन करायलाही वेळ मिळाला नव्हता, आरती किती रागात असेल हे सांगायची गरजच नव्हती. पण आशय ला तरी कुठे पाहिलं होतं त्याने सकाळपासून. घरातून निघाला तेव्हा तो झोपलेलाच होता. घाईघाईने घरी आलेल्या आशिषाला पाहून आशयने पळत पळत जाऊन पकडलं तर आरतीने एक रागीट कटाक्ष टाकला.

"सकाळपासून उच्छाद मांडला आहे नुसता. जरा काही देत नाही म्हटलं तर भोकांड पसरून बसतो." आरती रागारागात म्हणाली.

"जाऊ दे गं, त्याला काय समजतंय, त्याचं वय काय, आपलं काय?" ,आशिष.

"हो, रडल्यावर सगळं मिळतं, आणि आपला बाबा आपले लाड करतो हे बरं कळतं त्याला? सकाळपासून काही खाल्लं नाहीये त्याने. मघापासून दूध देण्याचा प्रयत्न करतेय तेही पीत नाहीये. तूच भरव आता त्याला. मी जरा घर आवरते.", असं म्हणून आरती तिथून उठलीच.

आशय बाबांच्या मांडीवर जाऊन बसला देखील होता. आशिषने दुधाची बाटली त्याच्या तोंडाला लावायचा प्रयत्न केला पण त्याने हातानेच ती दूर सारली.

"बरं, नाही प्यायचं दूध? चला आपण खेळूया जरा. " मग बाप-लेक चेंडू घेऊन खेळू लागले.

आशिष आणि आरतीच्या लग्नाला अडीच-तीन वर्षे झाली, तोपर्यंत तरी आयुष्य आरामात चालू होतं. पण आशयच्या जन्मानंतर मात्र त्यांच्या संथपणे चाललेल्या आयुष्यात धावपळ सुरू झाली होतं. सगळं कसं त्याला केंद्रबिंदू ठेवूनच आरेखलं जात होतं. पण एक होतं आशयला आधीपासूनच बाबाचा फार लळा. संध्याकाळी बाबा घरी आला की स्वारी खुललीच म्हणायची एकदम. प्रत्येक दिवस जणू त्यांच्यासाठी नवीन असायचा. आरती दिवसभरांतल्या बाळाने नवीन शिकलेल्या गोष्टी आशिशला सांगायची. दिवस कसे भुर्रकन उडून चालले होते.आशयचं वय आता साधारण दीड वर्ष झालं होतं आणि त्याच्या वयानुसार त्याची प्रगतीही चालूच होती. आजकाल त्याला रडण्याचे फायदे कळले होते. :-) जरा काही मनासारखं झालं नाही की तो भोकांड पसरायचा. बरं आशिष ऑफिसातून परत येईपर्यंत आरती त्याचं, घरचं करेपर्यंत थकून जायची त्यात असा आशयचा वाढता हट्टीपणा !

तासभर झाला तरी आशयची खायची काही चिन्हे दिसेनात.आशिषला तिने आता खेळ थांबवायला सांगितले आणि वरण-भात मिसळून आणला. आई समोर दिसल्यावर आशय परत पळून बाबांकडे गेला. आशिषलाच मग गप्पा मारायला समोर बसवून ती आशयला एकेक घास भरवू लागली, पण आज आईचे ऎकायचेच नाही असे त्याने बहुतेक ठरविले होते. आरतीचे तो ऎकत नाहीये म्हटल्यावर आशिशने त्याला आपल्याकडे घेऊन काही बाही गप्पा मारत सगळा भात संपवून टाकला आणि त्याला झोपवलेही. रात्रीच्या जेवणात आरतीचे मुळीच लक्ष नव्हते. आशय जेवून झोपूनही गेला तरी तिची एव्हढी का चिडचिड होते हे आशिषला काही कळत नव्हतं. कसंबसं आवरून अंथरुणावर पडल्यावर आरतीला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

आशयला बाबाचा लळा आहे हे तर तिला माहीतच होतं पण आज काल तो तिचं काहीच ऎकत नाही हे तिला फारच टोचत होतं. माझ्या हातून खायला नकॊ, बाबा सोबत असेल तर माझ्याकडे यायला नको की माझ्याशी लाडाने खेलायला नको.बरं आपलंच पोर ते, आणि तेही इवलुसं. त्याला काय कळणार आपल्याला काय वाटतं ते. त्याच्यावर रागावून काय उपयोग? आशिशला काही बोलावं तरी काय? की आपल्याच मुलासाठी मी तुझ्याशी स्पर्धा करतेय? त्याला आपले बाबा प्रिय आहेत म्हणून त्याच्यावर चिडतेय? बरं या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं असाही प्रयत्न केला. पण तिला हेही वाटत होतं की तो लहान असतानाच ही अवस्था, आपल्याला आयुष्य सोबत काढायचं आहे. जर हे असं वाढतंच गेलं तर आपण सहन करू शकू का? आज आशयला काही कळत नाही असं तरी म्हणता येतंय. उद्या तो समजून-सावरूनही आईकडे दुर्लक्ष करू लागला तर? मला सहन होईल का? या सर्व विचारात तिला उशीरा कधीतरी झोप लागली.

दुसऱ्या दिवशी झोपलेल्या आशयच्या निरागस चेहऱ्याकडे पाहताना तिला वाटलं कसं रागावू शकतो या निरागस पिलावर? रात्रीचे विचार मागे सोडून तिने एका नवीन दिवसाची नवीन सुरुवात करायचं ठरवलं.आज आशयला अजिबात रडू द्यायचं नाही, त्याला अजिबात रागावायचं नाही. मग दिवसभर त्यांनी दोघांनी खूप मजा केली. खूप खेळ खेळले, बाहेर भटकूनही आले. इतरवेळी आरती आशयला घेऊन बसायची, त्याला छोट्या-छोट्य़ा गोष्टी शिकवायची, कधी तो लक्ष देत नसला तरी एखादे गाणे त्याला सारखे ऎकवत राहायची. तर कधी तो एखाद्या वस्तूला हात लावताना 'नको' म्हणून सांगत राहायची की ज्यामुळे त्याला कळेल तरी की त्याला हात लावायचा नाही किंवा ती खायची वस्तू नाहीये ते. पण आज यातलं काहीच तिने केलं नव्हतं.

वरवर जरी हे सर्व ठीक वाटत असलं तरी आरतीला मनातून हे काही पटत नव्हतं.अगदीच राहवेन म्हणून ती संध्याकाळी आशयला घेऊन तिच्या आईकडे गेली. थोडा वेळ गप्पा झाल्यावर तिने मुद्द्याला हात घातला. तिचं बोलणं ऎकून आई हसूच लागली. आशिष आपल्या बोलण्याला हसतॊ हे तिला माहीत होतं पण आईलाही हसताना पाहून तिची अजूनच चिडचिड झाली.

मग शेवटी आईने तिला समजावलं, 'अगं वेडे, मत्सर हा तर माणसाचा स्वभावधर्मच आहे. अगदी तू नाही का तुझ्या दादाला मी जवळ घेतलं की रागवायचीस. तुला वाटायचं की माझं त्याच्यावर जास्त प्रेम आहे.तेव्हा तू बाबांकडे तक्रार घेऊन जायचीस. लग्नानंतर घरातून बाहेर गेल्यावर तुला कळलंच ना की आम्ही दोघंही तुझ्यावर किती प्रेम करतो ते? "

"अगं पण आशय एकुलता एक आहे आणि आताशी तर दीड वर्षाचाच आहे. त्याला वळण तर लावायलाच हवं ना? आतापासूनच मला हे असं दुसरेपण मिळतं आपल्याच मुलाकडून. बरं आशिषला तरी काय बोलणार? तो त्याच्याकडून प्रयत्न करतोच. भाऊ-बहीण किंवा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यात मत्सर असतो हे मला मान्य आहे पण मला याचं वाईट वाटतंय की आपल्याच मुलासाठी  स्वतः:च्याच नवऱ्याशी स्पर्धा करावीशी वाटावी हा कुठला स्वभावधर्म?" आरती कळवळून म्हणाली.

"हे बघ, तुला जे वाटतं ते काही चूक आहे असं मी म्हणणार नाही. आणि त्यात स्वतः:ला अपराधी वाटण्यासारखंही काही नाहीये. आशयला बाबांसारखी आईही प्रिय वाटावी म्हणून तू त्याला हवं ते करू देणार आहेस का? नाही ना? तुला काय वाटतंय माझ्यासाठी हे सर्व सोपं होतं का? तुम्ही झालात तेव्हा मीही अशीच एक सर्वसामान्य स्त्री होते. पण मग 'आई' झाले.माणसाला स्वभाव बदलणं किती तरी अवघड असतं, तेच तर एक आई करते. म्हणून 'पालक' होणं सोपं असतं, 'आई' होणं अवघड. आपल्या मुलासाठी, त्याच्या भल्यासाठी, त्याचाच राग स्वीकारण्याचा जुगार आईला खेळावाच लागतो. आज तुला वाटतंय की ही तर सुरुवात आहे, अजून आयुष्य जायचंय. तुझं म्हणणं बरोबर आहे. ही तर सुरुवात आहे तुझ्या 'आई' होण्याची.त्याच्या परीक्षा रोज वेगवेगळ्या असतात, त्या देत राहणं आणि पास होण्याचा प्रयत्न करणं इतकंच आपल्या हातात असतं. आज तुला तुझ्या या मत्सरावर मात करून योग्य तेच करायची परीक्षा द्यायची आहे.आणि तू पास होशीलच याची मला खात्री आहे. "

मनावरचं मणांचं ओझं उतरवून आरती घरी आली होती !

-अनामिका.