(अ)शुद्धलेखनापायी कुमारभारती रद्दीत!

आजच्या म. टा. त ही चित्तथरारक बातमी वाचायला मिळाली. मनोगतावर शुद्धलेखनाचा धरलेला आग्रह वाचल्यावर कुणा सदस्याचे ह्या बातमीकडे दुर्लक्ष होईल असे वाटत नाही, तरीही सर्वांना वाचून आस्वाद घेता यावा ह्या हेतूने ती येथे उतरवून ठेवत आहे.

म.टा. तली मूळ बातमी : दहावी मराठीची पुस्तके रद्दीत
मंगळवार जून १२ २००७. 

* १३ लाख पुस्तके चुकीची!

* शुद्धलेखनाच्या अनेक चुका

* नुकसान साडेतीन कोटीचे

* नवी पुस्तके १५ जूनपर्यंत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या मराठीच्या 'कुमारभारती' पुस्तकात शुद्धलेखनाच्या अनेक चुका झाल्याने सुमारे १३ लाख पुस्तके 'बालभारती'ला अक्षरश: रद्दीत काढावी लागणार असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आता मराठीचे नवे बिनचुकांचे पुस्तक बाजारात येण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेले मराठीचे पुस्तक एक मे पूवीर् विद्यार्थ्यांच्या हातात पडणे अपेक्षित होते. मात्र, या पुस्तकात चुका आढळल्याने राज्य सरकारला ती रद्दीत काढावी लागणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास मठकरी यांना समजली. त्यामुळे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा भुर्दंड सरकारला भोगावा लागणार असल्याचेही त्यांना कळले. याबाबत विचारणा करण्यासाठी मठकरी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका मेधा कुलकणीर्, शिक्षण मंडळाचे सदस्य मिलींद कांबळे, महेश लडकत आदी कार्यर्कत्यांनी सोमवारी काळपांडे यांना त्यांच्या दालनातच दोन तास घेराव घातला. काळपांडे यांनी चूक मान्य करून याबाबत खुलाशाचे पत्र भाजपला दिले. चुका नसलेले मराठीचे पुस्तक तसेच मराठी व इंग्रजी माध्यमाची भुगोलाची पाठ्यपुस्तके १५ जूनपर्यंत विक्रीसाठी येतील, असे आश्वासनही काळपांडे यांनी दिले. भाजपने घेराव मागे घेतल्यानंतर मनसेच्या कार्यर्कत्यांनी काळपांडे यांच्या दालनात घुसून कार्यालयातील फाइल आणि कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून गोंधळ घातला!

चौकशी सुरू

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार मराठीचे पुस्तक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातफेर् करण्यात आले. बोर्डाच्या मराठी विषय अभ्यास मंडळाने हे पुस्तक योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर या पुस्तकांची छपाई करण्यात आली. पुस्तकाची छपाई झाल्यानंतर अभ्यास मंडळाच्या निमंत्रकांनी या पाठ्यपुस्तकात शुद्धलेखनाच्या चुका असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यमान अध्यक्षांनी हे पुस्तक नव्याने छापून वितरित करण्याच्या सूचना पाठ्यपुस्तक मंडळास दिल्या. सदोष पुस्तकांसाठी जे जबाबदार आहेत, त्यासंदर्भातील चौकशी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात येत असल्याचे पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष काळपांडे यांनी स्पष्ट केले.