सर्वोत्तम मनोगत - वैचारिक

`सर्वोत्तम मनोगत' असा अंक साकारावा, अशी सूचना `मनोगत'च्या दिवाळी अंकाविषयी चित्त यांनी मांडलेल्या प्रस्तावात झाली आहे. या (सध्या कल्पनाविश्वातच असणाऱ्या) अंकात `मनोगत'च्या सदस्यांना आवडलेल्या साहित्याचा मतदान घेऊन समावेश केला जावा असे सन्जोप राव यांनी मांडले आहे. त्यांच्याशी मी सहमत असून वैचारीक लेखांवर मतदान घेण्यासाठी हा प्रस्ताव ठेवतो आहे.

१. प्रत्येक `मनोगती'नं या निवडीत भाग घ्यावा ही विनंती.

२. पाच लेख प्रत्येक `मनोगती'नं सुचवावेत. (दोन किंवा अधिक नावानं लिखाण करणारेही एकाच नावानं एकाच मताचा अवलंब करतील ही आशा आहे.) लेखांचे दुवे द्यावेत. लेखकाचं/लेखिकेचं नाव, जमल्यास प्रसिद्धीची तारीख द्यावी. उतरत्या भाजणीनं क्रम असावा.

३. प्रत्येक सुचवणीसोबत तो लेख का आवडला याचं कारण एका वाक्यात द्यावं. म्हणजे तुम्ही त्या लेखाकडं ज्या दृष्टिकोणातून पाहाता आहात ते समजून घेऊन मला त्या मतदानाचं विश्लेषण करता येईल. इथं मुद्द्यांचा ठोस वाद-प्रतिवाद हा निकष सोडून इतर निकषांवर लिहावे. उदा.: भाषेचा फुलोरा, संदर्भांची निवड, लेखाचा बांधीवपणा वगैरे.

४. हा अंक निघाला नाही तरी तुमचं मत वाया जाऊ देऊ नये अशी इच्छा आहे. त्यासाठी, `सदस्यांच्या आवडीवर आधारीत माझी निवड' अशा स्वरूपात ते इथंच प्रकाशीत करता येईल.

५. लेखांची सुचवणी नव्या प्रतिसादाच्या स्वरूपात करावी. या प्रस्तावाविषयी काही मते-मतांतरे असतील तर ती तशा पहिल्या प्रतिसादाला पोट-प्रतिसादाच्या स्वरूपात द्यावीत ही विनंती.

श्रावण मोडक