रिमिक्स आणि आपण..

              अभिजात संगीताची पार्श्वभूमी लाभलेल्या भारतासारख्या देशात आज संगीताची चाललेली ससेलहोलपट म्हणजे अतिशय गंभीर बाब बनली आहे. ज्या देशाच्या इतिहासात स्वतःच्या गायकीने दीप प्रज्वलित करणारा तानसेन होऊन गेला त्याचा वर्तमान असा असावा यापेक्षा वेगळं दु:ख आणखी काय असेल? ज्यांनी संगीतासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं, त्यांच्या संगीताचा पाठपुरावा करणं ही गोष्ट तर दूरंच पण तो ठेवा आपण जपूनही ठेवू शकत नाही.

         'संगीत' याची व्याख्या करायची झाली तर "गायन, वादन आणि नृत्य यांचा सुरेख संगम." आणि हा संगम जिथे होतो तिथे एक अप्रतिम कलाकृती जन्म घेते. गायनाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर शास्त्रीय आणि सुगम असे दोन भाग आपण करू शकतो. गाण्यासाठी केवळ आवाजाची देणगी असून भागत नाही तर गीतकाराने रचलेल्या भावना समजून गाणे हे गायकाचे कौशल्य असते. शास्त्रीय गायन शिकायचे झाले तर उभा जन्म त्यासाठी कमी पडेल. भारतीय संगीतामध्ये असंख्य प्रकारची वाद्ये आहेत. हार्मोनियम, तबला, सितार, तानपुरा, बासरी, सनई अशी अनेक. या सगळ्यातून निघणारे स्वर हे एखाद्याला स्वर्गीय सुखाची अनुभूती देऊ शकतात. आणि म्हणूनच एखादा झाकीर हुसेन आपल्या तबल्याच्या ठेक्यावर प्रचंड जनसमुदायाला खिळवून ठेवू शकतो. नृत्याबाबत बोलायचं तर, कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी( आणखी जे काही प्रकार असतील ते) या सारखे शास्त्रीय नृत्याचे प्रकार तर आहेतच, लोकनृत्य आहेत... आणि अशास्त्रीय असेही प्रकार आहेत जे मानवी मनाला भावतात.

        पण पोटाच्या वरचा आणि खालचा भाग कोणत्याही दिशेने हालवला की आपण नृत्य करतो असा काहीसा समज रिमिक्सवर व्हिडिओ काढणाऱ्यांचा असतो. रिमिक्सच नव्हे तर पूर्ण कुटुंबासोबत बसून उपभोग घ्यावा अशी गाणी आज सापडायची अवघड आहेत. मी नवीन गाणी, संगीत आणि नृत्याच्या विरोधात अजिबात नाही. कोणतेही गाणे रिमिक्स करताना त्या गाण्यासाठी खरंतर, ते गाणं संगीतबद्ध करण्यासाठी आधीच्या संगीतकाराने किती श्रम घेतले आहेत हा विचार करण्याची क्षमताच या लोकांच्यात नसते. जे गाणे रिमिक्स केले ते आधी खूप गाजलेले असते आणि म्हणूनच ते रिमिक्स केले जाते. खूपशी गाणी अशी आहेत जी गाजलेली नाहीत,ती गाणी रिमिक्स केली नाही जात कारण मुळातच न गाजलेली गाणी ती रिमिक्स केल्यावर कोण ऐकणार?,  ही भिती.  मुळातच सुंदर असणाऱ्या गीतांना एक-दोन नवीन बिटस घालून नेमकं काय साधायचा प्रयत्न करणार? स्वतःकडे काहीही कला नाही, प्रतिभा तर नाहीच नाही आणि यातून नेमका कोणता संदेश लोकांपर्यंत पोहोचवणार. ज्या गाण्यामध्ये जया भादुरी गोड हसून, अवखळपणे प्रेमाला साद घालते, त्याच गाण्याच्या रिमिक्स्मध्ये कमीतकमी कपड्यांमध्ये नको ते शरीराचे भाग हालवत एखादी 'हॉट' मॉडेल चेहऱ्यावर कामुक भाव दाखवत, बघणाऱ्याची वासना चाळवते. आपण नक्की कुठे चाललो आहोत?

       या रिमिक्स करणाऱ्यांची एक मात्र कमाल आहे, ज्या जुन्या गाण्यांमध्ये जास्तीत जास्त शास्त्रीय संगीतावर भर दिला आहे (उदा. बितिना बितायी - परिचय, रैना बित जाए - अमरप्रेम, जा तोसे नहीं बोलू - परिवार) अशा गाण्यांचे रिमिक्स त्यांना करावेसे नाही वाटत. याचे कारण एकतर शास्त्रीय संगीत समजून घेण्याची कुवत नाही आणि दुसरं म्हणजे अशा गाण्यांमध्ये कोणतेही वाद्य 'बडवलेले' लोक स्वीकारणार नाहीत, ही खात्री.  जर इतकीच संगीताची जाण असेल, तर जुनी गाणी कशाला, नवीनंच गाणी जी आधी कुणीही ऐकलेली नसतील, ती घेऊन संगीतबद्ध करून ती लोकांसमोर आणावीत. त्यांच्या संगीतामध्ये प्रभाव पाडण्याची ताकद असेल तर लोक नक्की त्यांची गाणी स्वीकारतील. कोणत्याही गाण्याला रिमिक्स करून, एखाद्या मॉडेलला कमीतकमी कपड्यांत नाचवले म्हणजे आपली प्रतिभा सिद्ध होते हा एक (गोड?) गैरसमज या मंडळींनी करून घेतला आहे.

       मला आश्चर्य वाटते या गाण्याच्या व्हिडिओ मध्ये भाग घेणाऱ्या मुला-मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे. "तुमचा मुलगा एम.बी.बी.एस. ला पहिला आला, त्याचा फोटो आम्ही पाहिला पेपरमध्ये" हे विधान ऐकल्यावर त्या आई-वडिलांना असमान ठेंगणं झाल्यासारखं होतं आणि ऊर अभिमानाने भरून येतो. पण जेव्हा त्या आई-वडिलांना कोणी विचारतो की," अमुकअमुक गाण्यामध्ये त्या मुलीच्या अंगचटीला जाणाऱ्या मुलांपैकी तो त्या बाजूचा मुलगा तुमचा का?" तेव्हा त्या आई-वडिलांना धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं होईल, अशी इच्छा नाही झाली तरच नवल? आपण नावीन्याचा स्वीकार जरूर करावा  पण सदसद्विवेक बुद्धी जागी ठेवून. फिल्म लाइन मध्ये जाण्यासाठी व्हिडिओ अल्बम हे एक सोपं गणित झालं आहे म्हणून, की जगण्यासाठी लागणारा पैसा खूप कमी पडतो म्हणून हे तरुण 'असले' व्हिडिओ अल्बम करतात?

       जी गोष्ट मुलांची तिच मुलींची. ज्या गाण्यावर अरूणा इराणीची थिरकती अदा पाहायला मिळते त्याच गाण्याच्या रिमिक्सवर एक मुलगी आपल्या प्रियकराला उद्दीपित करताना दिसते. 'सजना है मुझे सजना के लिए' या गाण्याच्या अर्थाशी दूरान्वयेही संबंध नसलेले चित्रण केले जाते आणि त्यात प्रियकरच आपल्या प्रेयसीला साडी नेसवताना दाखवला जातो. 'काटा लगा' असे 'रेकत' ब्लाऊज वर उचलणारी मुलगी कोणत्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करते? मुळात, कला ही गोष्ट आपल्याकडे नाही हे सत्य स्वीकारण्यापेक्षा तिला अशा प्रकारच्या व्हिडिओचा मुलाजमा चढवून, स्वतःला संगीतकार म्हणवण्याचा अट्टहास का? यातून काय साध्य होणार?

      रिमिक्स आवडणारा रसिकवर्ग ही आहे. पण त्यामध्ये वावरणाऱ्या रसिकांमध्ये अर्धवट वयातील मुलांचा जास्ती समावेश आहे. नुकतीच पौगंडावस्थेत आलेली मुले, ज्यांची सारासार विचार करण्याची क्षमता नसते, जी असे रिमिक्स अल्बम बघतात त्यांच्या मनावर नक्कीच परिणाम होत असेल. जे समोर दिसते तेच सत्य असे समजून चालणाऱ्या तरुणाला आपली एखादी वर्ग मैत्रीण, बहीण यांच्यामध्येही तिच मॉडेल नाही दिसणार का?  हा विचार करायला नको का?

   रिमिक्स गाणी विकत कोणी घेणार नाही म्हणून 'असले' व्हिडिओ अल्बम काढून, त्या व्हिडिओसाठी तरी आपली गाणी विकली जातील, ही मानसिकता बदलायला हवी, नाहीतर, सरकारने असल्या अल्बम च्या निर्मितीवरच बंदी घालायला हवी.

  'विद्वान सर्वत्र पूज्यते' या नियमाप्रमाणे खरंच जर तुमच्यात कला असेल तर 'अशा' व्हिडिओशिवाय ही तुमची गाणी लोकप्रिय होतील आणि झालेलीही आहेत. चिक्कार उदाहरणे देता येतील. उस्ताद सुलतान खान आणि चित्रा यांनी गायिलेले 'पिया बसंती रे' हे गीत एका सुंदर रचनेचा नमुना आहे.

   संपूर्ण जगात भारतीय संगीताला श्रेष्ठत्व दिले गेले आहे. ते जपण्यासाठी कोणीही परदेशी लोकं नाही येणार, ते आपल्यालाच जपायला हवे. संगीताच्या नावाखाली ओरडत, रेकत अंगविक्षेप करत स्वतःला कलाकार म्हणवण्यापेक्षा जे खरोखरचं संगीत निर्मिती करत आहेत त्यांना ऐकणं ही सुद्धा एकप्रकारे संगीताची पूजाच आहे. गरज आहे फक्त आपली क्षमता ओळखण्याची आणि सत्य स्वीकारण्याची.

( या लेखातून कोणावरही मला प्रत्यक्ष आरोप करायचा नाही.)

- प्राजु.