मार्च २००५

आपल्या संगणकाची सुरक्षितता भाग २

या आधी लिहिलेल्या भाग १ नंतर बर्‍याच दिवसांनी हा भाग २ लिहीत आहे. त्याबद्दल क्षमस्व.
पहिल्या भागात आपण आपल्या हातून घडणार्‍या काही अश्या कृतींची यादी बघितली होती की ज्यामुळे आपल्या संगणकावर संगणक-विषाणू येऊ शकतो. आता या भागात याबाबत थोडे विस्ताराने पाहू...

 1. फ्लॉपी डिस्क/फ्लॅश मेमरी संगणकात घालून अथवा दुसर्‍या संगणकास आपला संगणक जोडून काही संगणक-विषाणू  असलेल्या फाईल्स कॉपी करणे.
  सर्वसाधारणपणे या कृतीने आपण फक्त विषाणूग्रस्त फाईल आपल्या संगणकावर आणतो. यापुढे यातील एखादी फाईल आपण उघडली अथवा चालू केली तरच विषाणू आपले काम चालू करतो.
  तुलना: ही गोष्ट गॅस चालू ठेवण्यासारखी आहे, भडका उडण्यासाठी फक्त एका ठिणगीची गरज असते.
  उपाय: प्रत्येक वेळी दुसरीकडून फाईल आणायच्या आधी एकदा विषाणू प्रतिबंधक प्रणालीं (अँटीव्हायरस सॉफ्टवेअर) वापरुन त्यात संगणक-विषाणू नसल्याची खात्री करणे.
 2. एखादी अशी सीडी संगणकाच्या ड्राईव्ह मध्ये घालणे की ज्यामध्ये संगणक-विषाणू असलेल्या फाइल्स आहेत.
  ज्या वेळी आपण एखादी सीडी संगणकाच्या ड्राईव्ह मध्ये घालतो, त्यावेळी आपला संगणक आपोआप त्यातील एक विशिष्ट फाईल (असल्यास) चालू करतो. (याचमुळे एखाद्या चित्रपटाची सीडी घातल्यावर आपोआप चित्रपट चालू होतो)
  जर या सीडीवर संगणक-विषाणू असेल तर अर्थातच सीडी घातल्या घातल्या तो आपले काम चालू करतो.
  तुलना: गॅस चालू ठेवणे आणि कडेला समई तेवत असणे.
  उपाय: शक्यतो अधिकृत ठिकाणाहून आणलेल्या सीडी वापरणे, तशी माहिती नसल्यास आपोआप सीडीवरील फाईल चालू करण्याची सोय बंद करणे. हे कसे करावे ते इथे बघा.
 3. इंटरनेट ला आपला संगणक जोडणे.
  आपल्या संगणकावर अश्या अनेक फाईल्स असतात की ज्या अधुन मधुन इंटरनेटद्वारा एखाद्या संकेतस्थळास माहिती पाठवावयाचा, घ्यावयाचा प्रयत्न करत असतात. ज्यावेळी आपण आपला संगणक इंटरनेटला जोडतो, त्यावेळी त्यांना खरोखरच तसे करता येते. तसेच बाहेर इंटरनेटवर असे अनेक प्रोग्राम्स असतात की जे इंटरनेटला जोडलेल्या संगणकावर घुसण्याचा प्रयत्न करत असतात. आपला संगणक सुरक्षित नसेल तर असे प्रोग्राम्स आपल्या संगणकावर येण्याची शक्यता वाढते.
  तुलना: घराची दारे खिडक्या उघडी टाकून आपण आतल्या एखाद्या खोलीत काम बसून राहणे.
  उपाय: आपल्या संगणकावर फायरवॉल-प्रणाली बसवून घेणे.
 4. संगणकावरील एखादा व्हायरस असलेला प्रोग्राम चालू करणे.
  आता याबद्दल काही अधिक सांगणे गरजेचे आहे असे मला वाटत नाही.
  तुलना: स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे.
  उपाय: आपल्या संगणकावर एखादी चांगली विषाणू प्रतिबंधक प्रणालीं चालू स्थितीत ठेवणे. अशी प्रणाली त्वरीत संगणक-विषाणू ओळखून हा प्रोग्राम चालू होऊ देत नाही तसेच हे आपल्या निदर्शनास आणते. 
 5. इमेल मधुन आलेल्या विषाणू असलेल्या फाईल्स आपल्या संगणकावर उतरवून घेणे: हा प्रकार क्र.१ सारखाच आहे.
 6. आऊटलूक वगैरे प्रकारच्या इमेल-प्रणाली मधुन एखादी व्हायरस असलेली मेल बघणे:
  आऊटलूक एक्सप्रेस मधून मेल बघत असताना, त्यातील फाईल्स ह्या चालू होऊ शकतात. याचाच अर्थ त्यातील विषाणूबाधीत फाईल केवळ ती मेल बघण्यामुळे आपले काम चालू करु शकते. यामुळे केवळ आपल्याच संगणकाला धोका उत्पन्न होत नसुन, हाच विषाणू पुढे आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना पाठवला जाऊ शकतो.
  तुलना: अविश्वासू व्यक्तीकरवी आपली पत्रे पाठवण्याचे, आणण्याचे काम करुन घेणे. 
  उपाय: आऊटलूक एक्सप्रेस नं वापरणे. याऐवजी भाग १ मध्ये नमुद केलेल्या प्रणाली वापरणे. अथवा आऊटलूक मध्ये कार्यान्वित होणार्‍या विषाणूंसंबंधी पुर्ण माहिती करुन घेणे. आणि योग्य ती काळजी घेणे.
 7. एखाद्या ब्राऊजर मध्ये एखादी साईट बघत असताना अचानक उपटलेल्या विंडो मध्ये हो(Yes) असे क्लिक करणे:
  बर्‍याचदा आपण एखादे संकेतस्थळ बघत असताना अचानक एक खिडकी (विंडो) उघडली जाते. ही बहुतेक करुन त्या पानावरील जाहिरातीने उघडलेली असते. आणि त्यात विषाणू असलेल्या फाईल्स असू शकतात. ही अचानक उघडलेली खिडकी अश्या विषाणूग्रस्त फाईलला चालू करु लागते. परंतु आपला ब्राऊजर त्यास तसे करुन देत नाही, आणि तो आपल्यास परवानगी मागतो. आपण जर नं विचार करता परवानगी दिली तर हा विषाणू आपले काम चालू करतो.
  तुलना: कुठल्याही अनोळखी माणसास घरात घेणे.
  उपाय: अशा प्रकारे आलेल्या खिडक्यांमध्ये "हो" वर टिचकी नं मारणे. या प्रकारच्या खिडक्यांना प्रतिबंध करणारी प्रणाली आपल्या संगणकावर कार्‍यान्वित ठेवणे. (पहा: भाग १)

थोडक्यात काय, तर संगणक वापरताना आपण थोडी सजगता ठेवली पाहिजे. अन्यथा घरात संगणक असण्याचा फायदा होण्याऐवजी त्रासच व्हायचा. थोडीशी माहिती ठेवणे, दडपून काहीही नं करणे, या गोष्टी केल्यास आपण आपल्या संगणकाचा योग्य तो उपयोग करुन घेऊ शकू.

या भागातून आपल्याला आपल्याच कृतींमुळे विषाणू आपल्या संगणकावर कसा शिरू शकतो ते कळले असेल. आता अचानक उघडणार्‍या खिडक्यांना प्रतिबंध करणारी प्रणाली, फायरवॉल-प्रणाली तसेच विषाणू प्रतिबंधक प्रणालींसंबंधी अधिक माहीती आपण पुढील भागात पाहू.

Post to Feedप्रशासक यांस,
प्रकाशित करण्यायोग्य
फायरवॉल
मृदुला यांस, आपले म्हण
माहिती हवी आहे....
माझ्या घरी इंटरनेट
क्षमस्व राज,
अँटीव्हायरस
नमस्कार.... महत्वाचे
अभिनंदन
ऍंटीव्हायरस डाउनलोड..................
अँटीव्हायरस

Typing help hide