कोण तू आहेस माझी...?

कोण तू आहेस माझी...?
कोण तू आहेस माझी...?

***

प्राण तू आहेस माझा...
श्वास तू आहेस माझा...
जो कधी सरणार नाही -
ध्यास तू आहेस माझा... !

दुःख तू आहेस माझे...
तू व्यथा आहेस माझी...
अंतही नाही जिला ती
तू कथा आहेस माझी... !

स्वप्न तू आहेस माझे...
तू अपेक्षा फक्त माझी...
प्रेमही तू मुग्ध माझे
प्रीत तू अव्यक्त माझी... !

भास तू आहेस माझा...
तू खुळी चाहूल माझी...
चकवते आहे मला जी
तीच ती तू हूल माझी... ! 

तू विसावा शांत माझा...
गाढ तू एकांत माझा...
जो जगूही देत नाही
तोच तू आकांत माझा...  !

सूर तू आहेस माझा
तूच ना आवाज माझा ?
गीत तू आहेस माझे
तू सुरीला साज माझा...  !

तू दिशा आहेस माझी
तू प्रतीक्षा दीर्घ माझी...
रोज मी जी भोगतो ती
तूच शिक्षा दीर्घ माझी... ! 

...एवढे सारे तरीही
तू कुणी नाहीस माझी
चार घटकाही खरे तर
पाहुणी नाहीस माझी !

***
तू कुणी नाहीस माझी !
तू कुणी नाहीस माझी !

- प्रदीप कुलकर्णी

(रचनाकाल ः २८ डिसेंबर १९९८)